Home LATEST NEWS ताजी बातमी अंतराळातील जीव पृथ्वीवर आले तर? परग्रहावरील जीवांमुळे पृथ्वीवर नवे आजार पसरू शकतात?

अंतराळातील जीव पृथ्वीवर आले तर? परग्रहावरील जीवांमुळे पृथ्वीवर नवे आजार पसरू शकतात?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

पर्सिव्हरन्स, अंतराळ

Published

वाचन वेळ: 5 मिनिटे

नासाचा ‘पर्सिव्हरन्स’ रोव्हर मंगळावरील खडकांचे नमुने गोळा करून त्यांचे विश्लेषण करत आहे. पृथ्वीसारखं वातावरण असलेले ग्रह अंतराळात कुठे आहेत, याचा शोध खगोलशास्त्रज्ञ घेत आहेत. शिवाय, आपल्या आकाशगंगेतील दूरच्या ग्रहांवरून येणाऱ्या संभाव्य संदेशांकडेही लक्ष ठेवले जात आहे.

या सर्व प्रयत्नांचा एकच उद्देश आहे- पृथ्वीच्या बाहेर कुठे जीवसृष्टी अस्तित्वात आहे किंवा कधी होती का, हे शोधणे.

गेल्या अनेक दशकांपासून मनुष्य पृथ्वीबाहेर जीवसृष्टीच्या खुणांचा शोध घेत आहे. परंतु, चित्रपटांमध्ये दाखवले जाणारे हिरव्या रंगाचे परग्रहवासी (एलियन्स) असतात, तसेच परग्रहावरचे जीव असतीलच असं नाही.

प्रत्यक्षात, परग्रहावरील जीव हे सूक्ष्मजीव असण्याची शक्यता जास्त आहे, असं अवकाश जीवशास्त्रज्ञ आणि लेखिका मायकेला मुसिलोव्हा सांगतात. त्यांनी नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) यांसारख्या संस्थांसोबत संशोधन केलं आहे.

परंतु, अंतराळात सूक्ष्मजीव सापडले, तर त्यांच्यामुळे आपण आजारी पडू शकतो का? तसेच, पृथ्वीपासून खूप दूर जाताना आपणच नकळत हे सूक्ष्मजीव दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो का?

अत्यंत कठीण वातावरण

मुसिलोव्हा यांनी बीबीसीच्या ‘क्राऊडसायन्स’ पॉडकास्टमध्ये सांगितलं की, अंतराळातील कठीण परिस्थितीत जीवाणूंसारखे (बॅक्टेरिया) साधे जीव टिकून राहण्याची शक्यता जास्त असते.

पृथ्वीवर आढळणारे काही बॅक्टेरिया ‘बीजाणू’ (स्पोर) नावाच्या रूपात बदलू शकतात. त्यामुळे ते अंतराळातही बराच काळ जिवंत राहू शकतात. स्पोर ही अशी निष्क्रिय अवस्था आहे, जी किरणोत्सर्गाचाही सामना करू शकते, असं त्या सांगतात.

पर्सिव्हरन्स

“स्पोर तयार होताना पेशीभोवती एक जाड संरक्षणात्मक आवरण तयार होतं. तिथे डीएनए घट्ट गुंडाळला जातो आणि काही खास प्रथिने त्याचं संरक्षण करतात. ही प्रथिने सीटबेल्टसारखं काम करतात. त्यामुळे किरणोत्सर्गामुळे डीएनएचे तुकडे झाले तरी ते त्याला सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.”

मुसिलोव्हा सांगतात की, काही सिद्धांतांनुसार बॅक्टेरियाचे स्पोर अंतराळात हजारो वर्षे तग धरून राहू शकतात. परंतु, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर या स्पोरवर दीर्घकाळ पुरेशा चाचण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे सध्या हे केवळ अंदाज आणि सिद्धांतांपुरतेच मर्यादित आहेत.

अंतराळातील जीव पृथ्वीवर आले तर?

अंतराळातील सूक्ष्मजीव पृथ्वीवर आणता येतील का आणि ते आपल्यासाठी धोकादायक ठरून आजार पसरवू शकतील का, हे शास्त्रज्ञांना शोधावं लागेल. दुसऱ्या ग्रहावरून पृथ्वीवर होणाऱ्या अशा संभाव्य संसर्गाला ‘बॅकवर्ड्स कंटॅमिनेशन’ म्हणतात.

मंगळाच्या पृष्ठभागावरून आणलेल्या नमुन्यांमुळे पृथ्वीवर धोका निर्माण होण्याची शक्यता ‘अत्यंत कमी’ असल्याचं तज्ज्ञांच्या समित्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. तरीही, नासासारख्या अंतराळ संस्था हा धोका अत्यंत गांभीर्याने घेत आहेत, असं मुसिलोव्हा सांगतात.

उदाहरणार्थ, सध्या स्थगित करण्यात आलेल्या ‘मार्स सॅम्पल रिटर्न’ मोहिमेत यासाठी विशेष खबरदारीची योजना होती.

नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम आखण्यात आली होती. मंगळावरील नमुने पहिल्यांदाच पृथ्वीवर आणण्याचं या मोहिमेचं उद्दिष्ट होतं.

मंगळ

मुसिलोव्हा म्हणाल्या, “हे नमुने आधी पृथ्वीवर खास ‘नियंत्रित प्रयोगशाळांमध्ये’ (कंटेन्मेंट प्रयोगशाळा) ठेवले जाणार होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली जाणार होती.”

या मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी एक सिल्व्हिओ सिनिबाल्डी आहेत. ते युरोपियन स्पेस एजन्सीचे ग्रह संरक्षण अधिकारी (प्लॅनेटरी प्रोटेक्शन ऑफिसर) आहेत.

ते सांगतात की, केवळ नमुनेच (व्हेरिएंट्स) धोकादायक मानले जात नाहीत.

“अंतराळयानाच्या बाहेरील भागाला लागलेले दूषित कण पृथ्वीपर्यंत पोहोचू शकतात का, याचाही आम्ही अभ्यास केला. हे कण पृथ्वीच्या वातावरणाजवळही पोहोचू नयेत, याची आम्ही काळजी घेतली,” असं सिनिबाल्डी यांनी स्पष्ट केलं.

माणसांमुळे अंतराळ प्रदूषित होऊ शकतं का?

अमेरिकेतील पिट्सबर्ग विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि माजी नासा अंतराळवीर केट रुबिन्स सांगतात की, सूक्ष्मजीव अंतराळात जिवंत राहू शकत असतील, तर आपणच ते सूक्ष्मजीव अंतराळात घेऊन जातोय का, याचाही आपण विचार करायला हवा.

मानव अंतराळात जाताना नकळतपणे सूक्ष्मजीवही सोबत घेऊन जातात. रुबिन्स सांगतात की, वातावरणात होणारे बदल ओळखण्याची सूक्ष्मजीवांमध्ये एक खास क्षमता असते.

रुबिन्स म्हणतात, “तणावासारख्या गोष्टींचा सूक्ष्मजीवांवर मोठा परिणाम होतो. अंतराळ प्रवास आणि कमी गुरुत्वाकर्षणाचं वातावरण सूक्ष्मजीवांसाठी खूप तणावपूर्ण असतं.”

कमी गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत ठेवलेल्या काही बॅक्टेरियांमध्ये आजार निर्माण करण्याशी संबंधित जनुके म्हणजेच जीन्स सक्रिय होत असल्याचं अभ्यासानातून दिसून आलं आहे.

“हे थोडं चिंताजनक आहे. कारण हे जीवाणू आजार पसरवण्याच्या दृष्टीने अधिक धोकादायक होऊ शकतात,” असं रुबिन्स सांगतात.

काही संशोधनांनुसार, अंतराळ प्रवासामुळे मानवाची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होऊ शकते.

नासाच्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, शिंगल्ससारख्या आजारांशी संबंधित काही निष्क्रिय व्हायरस अंतराळात पुन्हा सक्रिय होऊ शकतात.

रुबिन्स सांगतात, “याचा अर्थ रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम झाला असावा आणि त्यामुळे तो व्हायरस पुन्हा सक्रिय झाला असावा.”

अंतराळ प्रवास

मुसिलोव्हा म्हणतात की, आपण सूक्ष्मजीव अंतराळात घेऊन गेलो, तर त्याचा आपल्या वैज्ञानिक संशोधनावरही परिणाम होऊ शकतो. कारण आपल्याला ज्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे, तीच गोष्ट आपल्या सूक्ष्मजीवांमुळे दूषित होण्याची शक्यता असते.

“मंगळावर कधी जीवसृष्टीसाठी अनुकूल परिस्थिती होती का, याचा शोध घेण्यासाठी आपण तिथे विविध वैज्ञानिक उपकरणं पाठवत आहोत,” असं त्या सांगतात.

“काही सूक्ष्मजीव पृथ्वीवरून मंगळावर आपल्याबरोबर नकळत पोहोचले असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात मंगळावर जीव आढळून आले, तर ते मंगळावरचे आहेत की पृथ्वीवरून गेलेले दूषित सूक्ष्मजीव आहेत, हे आधी तपासावं लागेल.”

सिनिबाल्डी म्हणतात की, हा धोका कमी केल्यामुळे ‘इतर ग्रहांवर पृथ्वीवरचे सूक्ष्मजीव पसरून त्यांची संख्या वाढण्यापासूनही रोखता येईल’.

यामध्ये अंतराळयानाची रचनाही महत्त्वाची भूमिका बजावते.

ईएसएचं ‘रोझलिंड फ्रँकलिन’ हे एक्सोमार्स रोव्हर 2028 मध्ये अंतराळात पाठवण्याची योजना आहे. मंगळावर प्रदूषण होण्याचा धोका कमी होईल, अशा पद्धतीने या रोव्हरची रचना केली जात आहे.

ईएसएच्या मते, हे रोव्हर अत्यंत स्वच्छ वातावरणात तयार करण्यात आलं आहे. सूक्ष्मजीवांची संख्या कमी करण्यासाठी कोरड्या उष्णतेसोबत (ड्राय हीट) अल्ट्राव्हायोलेट आणि गॅमा किरणांचाही वापर करण्यात आला आहे. यामुळे रोव्हरवरील बॅक्टेरियांची संख्या शक्य तितकी कमी करणं शक्य होतं. पण ते पूर्णपणे नष्ट करता येत नाहीत.

“संपूर्ण रोव्हरच्या बाहेरील भागावर 10 हजारांपेक्षा कमी बॅक्टेरियांचे स्पोर्स असावेत, अशी मर्यादा ठरवण्यात आली होती. साधारणपणे एवढे स्पोर्स सुईच्या टोकाच्या आकाराच्या आठव्या भागाइतक्या क्षेत्रात आढळतात,” असं एक्सोमार्सचे अभियंता पॉल मीचम सांगतात.

“आम्ही ठरवलेल्या मर्यादेच्या केवळ 10 टक्के इतकीच संख्या ठेवण्यात यशस्वी झालो,” असं ते सांगतात.

हे महत्त्वाचं का आहे?

यावर्षी ऑगस्टमध्ये नासाच्या शास्त्रज्ञांना आढळून आलं की, पृथ्वीवर आढळणारे काही सूक्ष्मजीव चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील सावलीत असलेल्या छोट्या जागांमध्ये आणि भेगांमध्येही जिवंत राहू शकतात.

या संशोधनातून अंतराळात सूक्ष्मजीव कसं टिकतात आणि कसं वागतात, हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं.

अंतराळामध्ये सूक्ष्मजीव जिवंत राहू शकतात किंवा अधिक आजार (उग्र) पसरवणारे होऊ शकतात. त्यातच अंतराळ प्रवासामुळे मानवाची रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ शकते.

त्यामुळे या सूक्ष्मजीवांचा अंतराळवीरांच्या आरोग्यावर आणि अंतराळ मोहिमांच्या यशावर परिणाम होऊ शकतो.

मानव भविष्यात पृथ्वीपासून दूर आणि दीर्घकाळ अंतराळात राहण्याची योजना आखत आहेत, त्यामुळे या समस्या आणखी महत्त्वाच्या ठरतात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर एखादा अंतराळवीर आजारी पडला, तर त्याला उपचारासाठी 24 तासांच्या आत पृथ्वीवर परत आणता येऊ शकतं. परंतु, चंद्रावरून पृथ्वीवर परतण्यासाठी अनेक दिवस लागतात.

“ही गोष्ट फार मोठी समस्या वाटणार नाही, परंतु जर तुम्हाला गंभीर संसर्ग झाला तर हीच गोष्ट मोठ्या अडचणीची ठरू शकते,” असं रुबिन्स सांगतात.

हा लेख बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या ‘क्राउडसायन्स’ कार्यक्रमातील एका भागावर आधारित आहे. अतिरिक्त माहिती: डेझी स्टीफन्स.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC