Home LATEST NEWS ताजी बातमी अंधश्रद्धेपोटी मुलांनी विहिरीत ढकलून केली वृद्ध आईची हत्या; 5 महिन्यांत पोलिसांनी असा...

अंधश्रद्धेपोटी मुलांनी विहिरीत ढकलून केली वृद्ध आईची हत्या; 5 महिन्यांत पोलिसांनी असा लावला छडा

7
0

Source :- BBC INDIA NEWS

ज्या आईला सांभाळायचं होतं, तिलाच मुलांनी विहिरीत फेकलं; नेमकं कारण काय?

फोटो स्रोत, UGC

(महत्त्वाची सूचनाः या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)

अशुभ वेळी मृत्यू झाल्यास घर सोडावं लागतं, या अंधश्रद्धेपोटी मुलांनी आपल्या जिवंत आईची विहिरीत ढकलून हत्या केली. त्यानंतर हा प्रकार आत्महत्या भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार तेलंगणा राज्यातून समोर आला आहे. तेलंगणा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

ज्या वृद्ध महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणाचा तपास पोलीस करत होते, त्याबाबत 5 महिन्यांनंतर नेमकं काय उघडकीस आलं? ते जाणून घेऊयात.

तेलंगणातील करीमनगर येथे आईचा मृत्यू घरात झाला तर घर सोडावं लागेल, अशी अंधश्रद्धा दोन मुलांना होता.

त्यामुळे त्यांनी आईला विहिरीत ढकलून तिची हत्या केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी दोन्ही मुलांना अटक करण्यात आली आहे.

सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं मानून त्याची तशी नोंद करण्यात आली होती. परंतु, 5 महिन्यांच्या तपासानंतर या प्रकरणाचं सत्य समोर आलं.

वैद्यकीय आणि फॉरेन्सिक अहवालातून हा आत्महत्येचा प्रकार नसून मुलांनी केलेली पूर्वनियोजित हत्या असल्याचं स्पष्ट झाल्याचं हुजूराबादचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास यांनी बीबीसीला सांगितलं.

सुरुवातीला याप्रकरणी ठोस पुरावे नव्हते. परंतु, आजारी आणि वयोवृद्ध महिला आत्महत्या करण्यासाठी घरापासून दूर असलेल्या ठिकाणी चालत जाऊ शकते का, असा संशय पोलिसांना होता. त्यामुळं या प्रकरणाचा अनेक महिने तपास सुरू ठेवण्यात आला, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पोलीस, कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 एप्रिल रोजी करीमनगर जिल्ह्यातील एलबोथारम गावातील कोने रवींद्र यांनी आपली 80 वर्षीय आई कोने व्यंकटम्मा यांनी आत्महत्या केल्याची तक्रार सैदापूर पोलीस ठाण्यात दिली.

‘हालचालही करू न शकणारी आई’

पोलिसांनी संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

व्यंकटम्मा राहत असलेल्या घरापासून त्यांचा मृतदेह सापडलेल्या विहिरीपर्यंतचं जास्त अंतर पोलिसांच्या संशयाचं प्रमुख कारण ठरलं.

Caption- शेतातील विहीर

फोटो स्रोत, UGC

“व्यंकटम्मा वृद्ध आणि आजारी असल्याने त्या कायम अंथरुणाला खिळून होत्या. त्यांना उठून चालताही येत नव्हतं.

अशा परिस्थितीत त्या घरापासून सुमारे 300 मीटर दूर जाऊन आत्महत्या करू शकतात, ही गोष्ट आम्हाला सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटत होती,” असं पोलीस निरीक्षक श्रीनिवास यांनी सांगितलं.

आईची आळीपाळीने जबाबदारी घेणारे मुलं

व्यंकटम्मा यांना समय्या, रवींद्र, कुमारस्वामी आणि श्रीनिवास असे चार मुलं आणि एक मोठी मुलगी आहे.

मोठा मुलगा समय्याच्या घरात व्यंकटम्मा यांच्यासाठी एक स्वतंत्र खोली ठेवण्यात आली होती.

Caption- ठोस पुरावे नसतानाही, एका महत्त्वाच्या मुद्द्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा अनेक महिने तपास सुरू ठेवला होता.

फोटो स्रोत, UGC

पोलिसांनी सांगितलं की, यापूर्वी चारही मुलं महिनाभर आईची काळजी घेण्याची जबाबदारी आलटून-पालटून घेत होते. परंतु, व्यंकटम्मा यांची तब्येत खालावली आणि त्यांना बसताही येत नव्हतं. त्यामुळं नंतर प्रत्येक मुलाने आठवडाभर आईची देखभाल करण्याची जबाबदारी घेतली होती.

हत्येवेळी तिसरा मुलगा कुमारस्वामीची आईची काळजी घेण्याची जबाबदारी संपत आली होती. आणखी 2 दिवसांनी धाकटा मुलगा श्रीनिवासची जबाबदारी सुरू होणार होती.

घरात मृत्यू झाला तर घर सोडावं लागतं, अशी अंधश्रद्धा

पोलिसांनी सांगितलं की, व्यंकटम्मा यांची प्रकृती खूप गंभीर होती. त्या शेवटच्या घटका मोजत असून आणखी 1-2 दिवसच जगतील, असं कुटुंबीयांना वाटत होतं.

त्यावेळी मोठा मुलगा समय्याने आईला आता प्रत्येकाने आपापल्या घरी नेऊन तिची काळजी घ्यावी, देखभाल करावी, असं सांगितलं.

Caption- व्यंकटम्मा यांना चार मुलं आणि एक मुलगी आहे.

फोटो स्रोत, UGC

पोलिसांनी सांगितलं की, पंचांगानुसार अशुभ वेळेत आईचा मृत्यू आपल्या घरात झाला, तर काही काळ घर बंद करून बाहेर जावं लागेल, असं समय्या यांना वाटत होतं. यापूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हाही कुटुंबीयांनी काही काळ घर सोडलं होतं, अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

पोलिसांनी सांगितले की, आईचा मृत्यू आपल्या घरात झाला तर आपल्यालाही घर सोडावं लागेल, असं धाकटा मुलगा श्रीनिवास यालाही वाटत होतं. आई आता फार दिवस जगणार नाही, असा विचार करून तिला आधीच मारण्याचा निर्णय त्याने मोठा भाऊ समय्या याच्यासोबत घेतला, अशी कबुली तपासादरम्यान श्रीनिवासने दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मोठ्या आणि धाकट्या मुलाने मिळून रचला कट

हुजूराबाद पोलीस आणि ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिलच्या रात्री तिसरा मुलगा कुमारस्वामी याच्या कुटुंबीयांची आईची देखभाल करण्याची पाळी संपली आणि ते घरी गेले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे समय्या आणि श्रीनिवास यांनी आईला घरातून उचलून जवळच्या शेतातील विहिरीत फेकून दिलं.

पोलीस निरीक्षक श्रीनिवास म्हणाले, “आईची हत्या करण्यासाठी दोन्ही भावांनी आधीच एक विहीर निश्चित केली होती. श्रीनिवास आईला उचलून घेऊन गेला, तर वाटेत आपल्याला कोणी पाहू नये याची समय्या काळजी घेत होता.”

Caption- व्यंकटम्मा अनेक दिवसांपासून आजारी होत्या, असं गावकऱ्यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, UGC

दुसऱ्या दिवशी व्यंकटम्मा दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.

व्यंकटम्मा घराच्या मागे असलेल्या शेतातील विहिरीत पडल्या असाव्यात, असा संशय कुटुंबीयांना आला. त्यांनी मोटारच्या मदतीने विहिरीतील पाणी बाहेर काढलं. त्यानंतर विहिरीत व्यंकटम्मा यांचा मृतदेह आढळून आला.

एलाबोथारम गावचे सरपंच नमिंडला रवींद्र यांनी बीबीसीला सांगितलं, “व्यंकटम्मा अनेक दिवसांपासून आजारी होत्या आणि त्यांना पक्षाघाताचा त्रासही झाला होता. त्या कशीतरी घराच्या मागच्या विहिरीजवळ जाऊन त्यात पडल्या असतील, असं आम्हाला वाटलं. पण, नंतर दोन्ही भावांनी गावकऱ्यांची दिशाभूल केल्याचं समोर आलं.”

तपासात काहीच प्रगती होत नव्हती

व्यंकटम्मा यांच्या मृत्यूबाबत कुटुंबातील कोणालाही संशय आला नव्हता.

पोलिसांना संशय होता, परंतु केवळ तांत्रिक पुराव्यांच्या मदतीनेच हा गुन्हा उलगडणं शक्य नव्हतं.

पोलिसांनी सांगितले की, हत्या झाली असावी या शक्यतेने तपास केला असता व्यंकटम्मा यांच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाहीत. त्यातच तपास अधिकारी बदलल्यामुळे या प्रकरणाचा तपास काही काळ रखडला होता.

Caption- अंधश्रद्धेपोटी मुलांनी आपल्या आईची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

नंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक श्रीनिवास यांनी सांगितलं, “या प्रकरणात कुटुंबातीलच लोक सहभागी होते. गंभीर आजारामुळे अंथरुणावर असलेल्या व्यंकटम्मा यांच्या मृत्यूबाबत गावकऱ्यांनाही संशय आला नव्हता.”

“पण, हा आत्महत्येचा प्रकार आहे, यावर आमचा विश्वास नव्हता. हत्या झाली हे सिद्ध करण्यासाठीही आमच्याकडे ठोस पुरावे नव्हते. त्यामुळे संशयित घरातीलच असल्याने त्यांना थेट पकडणं कठीण होतं. म्हणून आम्ही वैज्ञानिक पुरावे शोधण्यावर भर दिला “

फॉरेन्सिक अहवालाने उलगडलं हत्येचं गूढ

व्यंकटम्मा यांचा मृत्यू अपघात होता की हत्या, हे शोधण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या बाजूंनी तपास केला.

त्याचदरम्यान, काही गावकऱ्यांनाही याबाबत संशय येऊ लागला.

पोलिसांनी स्थानिक डॉक्टरांचा शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आणि काकतीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालांचा सखोल अभ्यास केला.

पोलिसांनी गळा आवळून हत्या केली का, जबरदस्तीने विहिरीत ढकललं का, की दुसरीकडे हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला का, या सर्व शक्यतांचा तपास करण्यात आला. अखेर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.

Caption- एलाबोथाराम गाव

फोटो स्रोत, UGC

पोलीस निरीक्षक श्रीनिवास म्हणाले, “कितीही संशय असला तरी तो सिद्ध करण्यासाठी पुरावे आवश्यक असतात. व्यंकटम्मा यांचा गळा आवळून खून केला का, खून करून मृतदेह विहिरीत टाकला का, की विहिरीत पडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, हे अहवालातून स्पष्ट होणार होतं.”

“शरीरावर जखमा असतील तर त्या मृत्यूपूर्वी झाल्या की मृत्यूनंतर, हेही फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवालातून समजतं. हे अहवाल मिळण्यास उशीर झाल्यामुळे प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यास आणि दोन्ही आरोपींना अटक करण्यासही उशीर झाला.”

अंधश्रद्धेमुळेच आईची हत्या केल्याचा पोलिसांचा दावा

पोलिसांनी सांगितलं की, व्यंकटम्मा यांच्या हत्येमागे मालमत्ता, पैसे किंवा कौटुंबिक वाद कारणीभूत नव्हते. आईचा मृत्यू घरात झाला तर घर सोडावं लागेल, या अंधश्रद्धेतूनच ही हत्या करण्यात आली होती.

पोलीस निरीक्षक श्रीनिवास यांनी सांगितलं, “आईची प्रकृती गंभीर होती, तर तिला सरकारी रुग्णालयात नेऊन उपचार करता आले असते. परंतु, अंधश्रद्धेमुळे त्यांनी आईची हत्या केली.”

पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या सत्यामुळे गावकरी हादरून गेल्याचे सरपंच नमिंडला रवींद्र यांनी सांगितले.

सरपंच नमिंडला रवींद्र म्हणाले, “आई-वडिलांची काळजी न घेणाऱ्यांसाठी हे प्रकरण एक धडा ठरावं, अशी गावात चर्चा आहे. नैसर्गिक मृत्यूची वाट न पाहता आपल्या आईची हत्या करणं अत्यंत क्रूर आहे. घरात मृत्यू झाला तर घर सोडावं लागतं, ही अंधश्रद्धा आहे. खरंच घर सोडण्याची वेळ आली असती, तर दुसरं घर भाड्याने घेऊन राहता आलं असतं.”

बीबीसीने आरोपींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. गावचे सरपंच, स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या माध्यमातूनही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळाल्यास ही बातमी अपडेट केली जाईल.

महत्त्वाची सूचना

मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर औषधोपचार आणि थेरपीने उपचार करता येतात. यासाठी उपलब्ध हेल्पलाइनवर संपर्क करून मदत मिळवू शकता.

स्नेहा आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन – 044-24640050 (24 तास उपलब्ध)

राज्य आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन – 104 (24 तास उपलब्ध)

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची हेल्पलाइन – 1800-599-0019

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC