Home LATEST NEWS ताजी बातमी ‘अदृश्य’ कीटकामुळे चेन्नईतील विद्यार्थ्याचा मृत्यू; जाणून घ्या स्क्रब टायफसची लक्षणं, उपचार आणि...

‘अदृश्य’ कीटकामुळे चेन्नईतील विद्यार्थ्याचा मृत्यू; जाणून घ्या स्क्रब टायफसची लक्षणं, उपचार आणि खबरदारी

8
0

Source :- BBC INDIA NEWS

कीटक

चेन्नईतील अण्णा विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याचा गेल्या आठवड्यात स्क्रब टायफसचा ताप आल्याने आणि उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने मृत्यू झाला.

स्क्रब टायफस हा एका जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे.

हा जीवाणू लहान झाडे-झुडपांवर आढळणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या चिगर माइट्स (उण्णी) या सूक्ष्म परजीवी कीटकांमध्ये आढळतो.

हा आजार Orientia tsutsugamushi या जीवाणूमुळे होतो आणि चिगर माइट्स (Chigger mites) नावाच्या अतिशय सूक्ष्म कीटकांच्या चाव्यामुळे माणसांमध्ये पसरतो.

पूर्वी हा आजार मुख्यतः शेती आणि दाट झाडी असलेल्या भागांपुरता मर्यादित मानला जात होता.

मात्र भारताच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने (NCDC) 2024 मध्ये म्हटलं होतं की, हा आता केवळ विशिष्ट भौगोलिक भागांपुरता मर्यादित राहिलेला नाही. शहरी भागांमध्येही त्याची प्रकरणं आढळत आहेत.

स्क्रब टायफसची लक्षणं कोणती?

स्क्रब टायफसची सुरुवातीची लक्षणं इतर तापाच्या आजारांसारखीच असू शकतात.

मुख्य लक्षणांमध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो:

  • अचानक ताप येणे
  • थंडी वाजणे
  • अंगदुखी आणि स्नायू दुखणे
  • त्वचेवर लाल पुरळ किंवा डाग येणे
  • कीटक चावलेल्या जागी काळसर व्रण तयार होणे
स्क्रब टायफस

एनसीडीसी (NCDC)च्या माहितीनुसार, या आजाराची सुरुवात अनेकदा तीव्र डोकेदुखी, थंडी आणि तापाने होते.

आजार गंभीर झाल्यास फुफ्फुसं, हृदय, मूत्रपिंड आणि मेंदू यांसारख्या अवयवांवरही परिणाम होऊ शकतो. काही रुग्णांमध्ये मानसिक गोंधळ किंवा इतर न्यूरोलॉजिकल लक्षणंही दिसू शकतात.

स्क्रब टायफस कसा पसरतो?

साथरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. रामासुब्रमणियन यांनी बीबीसी तमिळला सांगितलं, “जर 100 जणांना हा आजार झाला, तर त्यापैकी 50 जणांच्या शरीरावर कीटक चावलेल्या जागी काळा डाग किंवा व्रण स्पष्टपणे दिसतो.

काहींना तापासोबत लिम्फ नोड्स सुजतात, काहींच्या यकृतावर परिणाम होतो, तर काहींच्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. त्यामुळे काही रुग्ण रुग्णालयात दाखल होताना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार करतात.”

“स्क्रब टायफस हा रिकेट्सियल (Rickettsial) आजारांच्या गटातील एक आजार आहे. रिकेट्सिया (Rickettsiae) नावाच्या लहान (Gram-negative) दंडगोलाकार जीवाणूंमुळे रिकेट्सियल आजार होतात.

हे जीवाणू प्रामुख्याने उवा, चिगर माइट्स आणि इतर सूक्ष्म परजीवी कीटकांच्या शरीरात, विशेषतः त्यांच्या पचनसंस्थेत राहतात,” असं ते म्हणाले.

तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी संचालक डॉ. कुलंथैसामी यांनी सांगितलं, “रिकेट्सियल आजारांपैकी सर्वाधिक परिचित आजार म्हणजे स्क्रब टायफस. या आजाराची प्रथम ओळख जपानमध्ये झाली. हा आजार माइट्सद्वारे पसरत असल्याचं आढळल्यानंतर त्याला ‘त्सुत्सुगा-मुशी’ (Tsutsuga-mushi) असं नाव देण्यात आलं. जपानी भाषेत ‘त्सुत्सुगा’ (Tsutsuga) म्हणजे धोकादायक आणि ‘मुशी’ (Mushi) म्हणजे कीटक किंवा माइट.”

स्क्रब टायफस पसरवणारे चिगर माइट्सहेच Orientia tsutsugamushi हा जीवाणू वाहून नेतात. त्यांचा आकार केवळ 0.2 ते 0.4 मिलीमीटर इतका असल्याने ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत.

ते फक्त सूक्ष्मदर्शकातून पाहता येतात. हे चिगर माइट्स विशिष्ट प्रकारच्या अधिवासात राहतात.

साथरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. रामासुब्रमणियन

भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, रशिया, कोरिया, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया यांसह अनेक देशांमध्ये स्क्रब टायफसची प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

केंद्रीय आरोग्य सेवा संचालनालयाच्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी या आजाराची सुमारे 10 लाख नवीन प्रकरणं आढळतात. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास या आजारामुळे होणारा मृत्यूदर 30% पेक्षा जास्त असू शकतो.

डॉ. कुलंथैसामी म्हणाले, “स्क्रब टायफसचं वेळेत निदान करून तातडीने उपचार सुरू केले, तर हा आजार 100% बरा होऊ शकतो. मात्र उपचारांना विलंब झाल्यास आजाराची तीव्रता वाढते.”

डॉ. व्ही. रामासुब्रमणियन म्हणाले, “काही रुग्णांमध्ये फुफ्फुसांमध्ये ARDS (Acute Respiratory Distress Syndrome) विकसित होऊ शकतो. अशा रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागू शकते. त्यांची प्रकृती सुधारते की नाही, हे 2 ते 3 दिवसांनीच स्पष्ट होतं.”

स्क्रब टायफसमध्ये अनेकदा अचानक तीव्र ताप येतो. मात्र त्याची लक्षणं डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांच्या लक्षणांपेक्षा फार वेगळी नसतात.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या मते, तापाचं कारण 5 दिवसांहून अधिक काळ स्पष्ट होत नसेल, तर स्क्रब टायफसची शक्यता तपासणं आवश्यक आहे.

डॉ. रामासुब्रमणियन म्हणाले, “ताप आला तर तो साधा व्हायरल ताप आहे की डेंग्यू, फ्लू, चिकनगुनिया किंवा स्क्रब टायफस, हे डॉक्टरच तपासणीनंतर सांगू शकतात. त्यामुळे तापासाठी थेट मेडिकलमधून औषधं घेऊ नका. या आजारांचं वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास जीवितहानी होऊ शकते.”

स्क्रब टायफसपासून बचाव कसा करावा?

दाट झाडी, गवत किंवा वेलींनी व्यापलेल्या भागात जाणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

विशेषतः ट्रेकिंग किंवा शेतीच्या भागात जाणाऱ्यांनी पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावेत, जेणेकरून कीटक चावण्याचा धोका कमी होईल.

तसेच शरीरावर कुठेही कीटक चावल्याची खूण, काळसर व्रण किंवा तापासह अशी लक्षणं दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं डॉ. रामासुब्रमणियन यांनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC