Home LATEST NEWS ताजी बातमी अल्झायमर्सचा धोका तरुणवयापासूनच? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

अल्झायमर्सचा धोका तरुणवयापासूनच? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

7
0

Source :- BBC INDIA NEWS

तरुण वयातच वाढतोय अल्झायमर्सचा धोका; तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

अल्झायमर्स म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते वयाच्या उत्तरार्धात स्मरणशक्ती गमावत जाणारा एखादा माणूस. पण हा आजार फक्त वृद्धापकाळातच होतो की त्याचा पाया काही दशकं आधीच रचला जातो? याचं उत्तर जगभरातले संशोधक सतत शोधत आहेत.

अल्झायमर्सची लक्षणं स्पष्टपणे दिसण्याआधी 10 ते 20 वर्षं आधीच रुग्णाच्या मेंदूत बदल सुरू होऊ शकतात असं संशोधन सुचवतं. त्यामुळे आता हा आजार झाल्यावर उपचारांवर लक्ष देण्याबरोबर तारुण्यात किंवा मध्यम वयात आपल्या मेंदूचं आरोग्य कसं जपायचं याचा विचार सुरू आहे.

सर्वात आधी डिमेन्शिया हा स्मरणशक्ती, विचारशक्ती आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम करणाऱ्या लक्षणांचा समूह आहे, तर अल्झायमर्स हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार असून जगभरातील बहुतेक डिमेन्शियाच्या प्रकरणांसाठी तो कारणीभूत असतो हे समजून घेऊ.

नवीन भाषा शिकणं, नियमित व्यायाम करणं, विशिष्ट प्रकारचा आहार घेणं किंवा शरीरातील व्हिटॅमिन डीची पातळी राखणं यांसारख्या गोष्टींचा भविष्यातील स्मरणशक्तीशी काही संबंध आहे का, याचा शोध सध्या अनेक संशोधनांमधून घेतला जात आहे. या संशोधनांमधून अद्याप अंतिम उत्तरं मिळालेली नसली, तरी मेंदूची काळजी घेण्याची सुरुवात निवृत्तीनंतर नव्हे तर तारुण्यातच होत असावी, असे संकेत मिळत आहेत.

त्यामुळे संशोधक आज औषधांबरोबरच व्यायाम, आहार, शिक्षण आणि इतर जीवनशैलीविषयक घटकांवर लक्ष केंद्रित करत आहेत.

यातील एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘कॉग्निटिव्ह रिझर्व्ह’. काही लोकांच्या मेंदूत अल्झायमर्सशी संबंधित बदल आढळूनही त्यांच्यात स्मरणशक्ती कमी होण्याची लक्षणं उशिरा दिसतात.

संशोधकांच्या मते, सतत शिकणं, वाचन, नवीन कौशल्यं आत्मसात करणं आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहणं यामुळे मेंदूतील न्यूरल नेटवर्क अधिक मजबूत होतं. त्यामुळे मेंदूला काही प्रमाणात नुकसान झालं तरी तो पर्यायी मार्ग वापरून काम करू शकतो.

तरुण वयातच वाढतोय अल्झायमर्सचा धोका; तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्या 5 महत्त्वाच्या गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

व्यायामाचाही मेंदूच्या आरोग्याशी घनिष्ठ संबंध असल्याचं संशोधनातून दिसत आहे. अलीकडील अभ्यासांमध्ये GPLD1 नावाच्या प्रथिनावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

व्यायामानंतर तयार होणारं हे प्रथिन मेंदूचं संरक्षण करणाऱ्या ‘ब्लड-ब्रेन बॅरियर’च्या कार्यात मदत करू शकतं, असं प्राण्यांवरील संशोधनातून दिसून आलं आहे.

संशोधकांच्या मते, यामुळे स्मरणशक्ती टिकवण्यात आणि वयानुसार होणारे काही बदल कमी करण्यात मदत होऊ शकते.

1. आहार आणि व्यायामाचा संबंध

व्यायामाबरोबरच आहार आणि पोषण यांचाही मेंदूच्या आरोग्याशी संबंध असू शकतो का, याचा शोध संशोधक घेत आहेत.

आहाराबाबत काही संशोधकांनी MIND Diet वर विशेष भर दिला आहे. मेडिटेरानिअन आणि DASH आहारपद्धतींच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या या आहारात हिरव्या पालेभाज्या, बेरीज, सुकामेवा, मासे आणि ऑलिव्ह ऑइल यांना महत्त्व दिलं जातं.

काही अभ्यासांमध्ये हा आहार घेणाऱ्या लोकांमध्ये अल्झायमर्सचा धोका कमी असल्याचं आढळलं आहे, जरी यावर अजूनही पुढील संशोधन सुरू आहे.

बागेत बसलेला तरुण

फोटो स्रोत, Getty Images

अलीकडच्या काळात व्हिटॅमिन डी देखील संशोधकांच्या चर्चेचा विषय बनलं आहे. 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका दीर्घकालीन अभ्यासात, मध्यम वयात ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीचं प्रमाण जास्त होतं, त्यांच्यात पुढील काळात अल्झायमर्सशी संबंधित ‘टाऊ’ प्रथिनाचं प्रमाण कमी असल्याचं दिसून आलं. मात्र संशोधक स्पष्ट करतात की हा संबंध आहे, कारण-परिणाम सिद्ध झालेला नाही. व्हिटॅमिन डी थेट अल्झायमर्स रोखतो, असं अद्याप म्हणता येत नाही.

या सर्व संशोधनांचा एकत्रित संदेश असा आहे की अल्झायमर्सवर खात्रीशीर इलाज अद्याप नसला, तरी जीवनाच्या सुरुवातीच्या आणि मध्यम टप्प्यातील सवयी मेंदूच्या दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम करू शकतात.

2. कधीकधी विसरणं आणि अल्झायमर्स यात फरक काय?

अनेक लोकांना अल्झायमर्सची पूर्ण माहिती नसते. कधीकधी काही गोष्टी विसरायला झाल्या तर लगेच अल्झायमर्स झाला असा शिक्का स्वतःवर किंवा दुसऱ्यावर मारू नये. याचं निदान तज्ज्ञ डॉक्टरांनीच केलं पाहिजे.

अधूनमधून नाव विसरणं, किल्ली कुठे ठेवली हे आठवण्यासाठी थोडा वेळ लागणं किंवा एखादा शब्द आठवायला अडचण होणं हे वय वाढल्यावर सामान्यपणे घडू शकतं आणि त्याचा अर्थ अल्झायमर्स असतोच असं नाही.

मात्र जेव्हा स्मरणशक्तीतील समस्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू लागतात, जसं की महत्त्वाच्या गोष्टी वारंवार विसरणं, परिचित ठिकाणी रस्ता चुकणं, रोजची कामं सांभाळताना अडचणी येणं किंवा निर्णयक्षमता आणि वर्तनात बदल दिसू लागणं, तेव्हा चिंता करण्याची गरज असते.

डॉ. जयेंद्र यादव यांनी अल्झायमर्सच्या बाबतीत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली. डॉ. जयेंद्र यादव नवी मुंबईच्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल येथे न्यूरोलॉजिस्ट कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

 विचार करणारे लोक

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न- स्मरणशक्तीबद्दलच्या समस्या नेमक्या कधी डॉक्टरांकडे तपासून घ्यायला हव्यात?

डॉ. जयेंद्र यादव- जर स्मरणशक्तीतील बदल सतत होत असतील, कालांतरानं हे बदल वाढत असतील किंवा दैनंदिन कामकाजावर परिणाम करत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

वारंवार तेच प्रश्न विचारणं, आर्थिक व्यवहार किंवा औषधांचं नियमन आणि व्यवस्थापन करण्यात नव्यानं अडचणी येणं, वेळ किंवा ठिकाणाबाबत गोंधळ होणं, स्वभावात बदल होणं किंवा पूर्वी सहज करता येणारी कामं कठीण वाटू लागणं ही काही महत्त्वाची लक्षणं आहेत.

लवकर तपासणी केल्यास हे बदल अल्झायमर्समुळे आहेत की इतर एखाद्या वैद्यकीय कारणामुळे, किंवा ताण, झोपेच्या समस्या अथवा जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे आहेत, हे ओळखता येतं.

डॉ. जयेंद्र यादव यांचं मार्गदर्शन

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न- अल्झायमर्स हा मुख्यतः आनुवंशिक आजार आहे का, की जीवनशैलीचाही त्यावर प्रभाव असतो?

डॉ. जयेंद्र यादव- आनुवंशिक घटकांचा काही प्रमाणात प्रभाव असू शकतो, पण अल्झायमर्स हा केवळ जनुकांवर अवलंबून असलेला आजार नाही. आयुष्यभरातील जीवनशैली, हृदयाचं आरोग्य, नियमित शारीरिक हालचाल, झोपेचा दर्जा, आहार, शिक्षण, सामाजिक सहभाग आणि मधुमेह व उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचं व्यवस्थापन या सर्व गोष्टी मेंदूच्या आरोग्यावर परिणाम करतात. निरोगी हृदयामुळे मेंदूकडे रक्तपुरवठा चांगला राहतो. त्यामुळे हृदयाचं आरोग्य जपणं हे मेंदूचं आरोग्य जपण्याचाही महत्त्वाचा भाग आहे.

बागेत विचार करणारे ज्येष्ठ नागरिक पुरुष

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न- आई-वडील किंवा आजी-आजोबांना अल्झायमर्स असेल, तर मुलांना किंवा नातवंडांना हा आजार होण्याचा धोका किती वाढतो?

डॉ. जयेंद्र यादव- कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला अल्झायमर्स असेल तर धोका काही प्रमाणात वाढू शकतो. मात्र याचा अर्थ त्या व्यक्तीला अल्झायमर्स होईलच असा होत नाही. बहुतांश प्रकरणांमध्ये आनुवंशिक, पर्यावरणीय आणि जीवनशैलीशी संबंधित घटक एकत्रितपणे काम करत असतात.

एका व्यक्तीला धीर देणारे हात

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न- अल्झायमर्सबाबतचे असे कोणते गैरसमज आहेत?

डॉ. जयेंद्र यादव- सर्वात सामान्य गैरसमज म्हणजे अल्झायमर्स हा फक्त वृद्धांनाच होतो. वय हा महत्त्वाचा घटक असला तरी काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये तरुणांनाही हा आजार होऊ शकतो. आणखी एक गैरसमज म्हणजे अल्झायमर्सचं निदान झालं की सगळी आशा संपलीच जणू.

प्रत्यक्षात सध्या पूर्ण उपचार उपलब्ध नसले तरी लवकर निदान, योग्य वैद्यकीय उपचार, जीवनशैलीतील बदल आणि आवश्यक आधारव्यवस्था यामुळे लक्षणांचं व्यवस्थापन करता येतं आणि जीवनमान सुधारता येतं.

हेही लक्षात ठेवायला हवं की अल्झायमर्स हा वाढत्या वयाचा सामान्य भाग नसून उपचार आणि काळजीची गरज असलेली ती एक वैद्यकीय स्थिती आहे.

अर्कचित्र आजी आजोबा

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न- औपचारिक निदान होण्याच्या अनेक वर्षांपूर्वी काही सुरुवातीची लक्षणं दिसू शकतात का?

डॉ. जयेंद्र यादव- होय. सुरुवातीची लक्षणं अनेकदा सूक्ष्म असू शकतात आणि निदानापूर्वी अनेक वर्षं आधीच दिसू शकतात.

अलीकडील संभाषणं वारंवार विसरणं, तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणं, नियोजन किंवा समस्या सोडवण्यात अडचणी येणं, स्वभाव किंवा मनःस्थितीत बदल होणं आणि पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस कमी होणं ही काही सुरुवातीची लक्षणं असू शकतात. मात्र अधूनमधून विस्मरण होणं म्हणजे अल्झायमर्स आहे असा निष्कर्ष काढता येत नाही.

प्रश्न- ऐकण्याची क्षमता कमी होणं आणि डिमेन्शियाचा धोका यांचा काय संबंध आहे?

डॉ. जयेंद्र यादव- उपचार न झालेल्या श्रवणदोषाचा संबंध संज्ञानात्मक क्षमतांमधील घट आणि डिमेन्शियाच्या वाढत्या जोखमीशी आढळून आला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला नीट ऐकू येत नाही, तेव्हा आवाज आणि संभाषण समजून घेण्यासाठी मेंदूला अधिक मेहनत घ्यावी लागते.

त्यामुळे कालांतरानं मानसिक ताण वाढू शकतो. तसेच मेंदूपर्यंत पोहोचणारी आणि प्रक्रिया केली जाणारी माहितीही कमी होऊ शकते. त्यामुळे ऐकण्याच्या समस्यांचं लवकर निदान आणि व्यवस्थापन केल्यास संवाद सुधारण्यास, मेंदू सक्रिय ठेवण्यास आणि संज्ञानात्मक आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते.

खिडकीतून बाहेर पाहाणारी महिला

फोटो स्रोत, Getty Images

प्रश्न- मेंदूच्या आरोग्याबाबत कोणता गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे?

डॉ. जयेंद्र यादव- मेंदूचं आरोग्य ही आयुष्यभराची गुंतवणूक आहे. तरुणपणी घेतलेले निर्णय आणि अंगीकारलेल्या सवयींचा परिणाम मेंदू वृद्ध होताना दिसून येतो.

नियमित व्यायाम, तणावाचं व्यवस्थापन, चांगली झोप, हृदयाचं आरोग्य जपणं, सतत शिकत राहणं आणि सामाजिक नाती दृढ ठेवणं या गोष्टी मेंदूच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत.

अल्झायमर्स पूर्णपणे रोखण्याचा खात्रीशीर मार्ग नसला तरी लहानपणापासून किंवा तरुणपणापासून आरोग्यदायी सवयी अंगीकारल्यास संज्ञानात्मक क्षमतेतील घट होण्याची शक्यता कमी करता येऊ शकते.

3. तरुणांची जीवनशैली आणि अल्झायमर्स

अल्झायमर हा आजार सहसा वृद्धापकाळाशी जोडला जातो. मात्र मेंदूचं आरोग्य आणि भविष्यातील स्मरणशक्तीची क्षमता घडवण्याची प्रक्रिया तरुण वयापासूनच सुरू होते. त्यामुळे 20 आणि 30 वयोगटातील तरुणांनीही आपल्या मेंदूच्या आरोग्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील न्युरोलॉजिस्ट कन्सल्टंट डॉ. यतीन सागवेकर याबद्दल अधिक माहिती देतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, “स्मरणशक्ती कमी होणं किंवा डिमेन्शियाचा धोका हा एका दिवसात निर्माण होत नाही. तरुणपणी अंगीकारलेल्या सवयी, जीवनशैली आणि आरोग्याचे निर्णय यांचा परिणाम अनेक वर्षांनी दिसू शकतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच निरोगी जीवनशैली स्वीकारल्यास वाढत्या वयात मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.”

ते पुढं सांगतात, “संशोधनातून असे दिसून आलंय की डिमेन्शियाशी संबंधित अनेक धोक्याचे घटक आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच विकसित होऊ लागतात. नियमित शारीरिक हालचाल, संतुलित आहार, दर्जेदार झोप, योग्य वजन आणि रक्तदाब, रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं यामुळे मेंदूच्या आरोग्याला दीर्घकालीन फायदा होऊ शकतो.”

व्यायामशाळेत डंबेल्स घेऊन बसलेला तरुण

फोटो स्रोत, Getty Images

व्यायाम हा मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नियमित शारीरिक हालचालींमुळे रक्ताभिसरण सुधारतं, शरीराची चयापचयक्रिया चांगली राहते, दाह कमी होतो आणि मेंदूतील पेशींमधील संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. एरोबिक व्यायाम, शक्तिवर्धक व्यायाम आणि दिवसभर सक्रिय राहण्याची सवय यांचा एकत्रित लाभ होऊ शकतो.

मेंदूच्या आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक असते. पुरेशी आणि चांगल्या दर्जाची झोप स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी, भावनांचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि मेंदूची दैनंदिन कार्यक्षमता टिकवण्यासाठी आवश्यक असते.

4. मेंदूला सक्रिय ठेवण्यासाठी काय करायचं?

या प्रश्नाचं उत्तर डॉ. सागवेकर देतात. ते म्हणतात, “नवीन भाषा शिकणं, पुस्तकं वाचणं, वाद्यवादन किंवा नवीन कौशल्य आत्मसात करणं यासारख्या मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक क्रिया मेंदूला सक्रिय ठेवतात. यामुळे मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्याची क्षमता वाढू शकते. अल्झायमर्स पूर्णपणे टाळणं शक्य आहे की नाही हे निश्चित नसलं तरी मेंदूला सतत नवी आव्हानं देणं निश्चितच फायदेशीर ठरू शकतं.”

आनंद व्यक्त करणारं कुटुंब

फोटो स्रोत, Getty Images

केवळ शरीर-मनाची काळजी घेतली म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही. डॉ. यतीन सागवेकर एका महत्त्वाच्या गोष्टीकडं लक्ष वेधतातत. ते म्हणजे आपले नातेसंबंध आणि सामाजिक सहभाग.

ते म्हणतात, “मानवी नातेसंबंध आणि सामाजिक सहभाग यांचाही मेंदूच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचं दिसून येतं. कुटुंबीय, मित्र आणि समाजाशी जोडलेलं राहणं, अर्थपूर्ण संवाद साधणं आणि सामूहिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाकीपणा कमी होण्यास मदत होते. मजबूत सामाजिक संबंध हे निरोगी वृद्धत्वासाठी महत्त्वाचं मानले जातात.

5. तरुणांनी आतापासूनच काय करायचं?

आजच्या तरुणांमध्ये वाढता स्क्रीन टाइम ही अनेकदा चर्चेची बाब असते. मात्र चिंता केवळ स्क्रीन वापरण्याची नसून त्यामुळं व्यायाम, झोप, सामाजिक संवाद आणि मानसिक आव्हानात्मक क्रिया कमी होत असतील तर ती समस्या ठरू शकते.

दीर्घकाळ बसून राहणं, खराब आहार, अपुरी झोप, तंबाखू आणि मद्यपान या सवयी एकत्र आल्यास त्यांचा परिणाम दीर्घकालीन आरोग्यावर होऊ शकतो.

डॉ. सागवेकर सांगतात, “तरुण वयातच काही साध्या सवयी अंगीकारून भविष्यातील मेंदूचं आरोग्य जपता येऊ शकतं. नियमित व्यायाम, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवणं, धूम्रपान आणि अतिमद्यपान टाळणं, चांगली झोप घेणं, सामाजिक संबंध जपणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं हे मेंदूला निरोगी ठेवण्याचे महत्त्वाचे मार्ग मानले जातात. अल्झायमर हा केवळ वृद्धापकाळात विचार करण्याचा विषय नसून त्याची तयारी तरुणपणातच सुरू होते, हा यामागचा मुख्य संदेश आहे.”

डंबेल्सचा व्यायाम करणारी तरुणी

फोटो स्रोत, Getty Images

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC