Home LATEST NEWS ताजी बातमी ‘आईसी विंडो’, ‘विंग्स ऑफ डार्कनेस’; फोटोग्राफर्सच्या नजरेतून निसर्गाचा चमत्कार दाखवणारे Photos

‘आईसी विंडो’, ‘विंग्स ऑफ डार्कनेस’; फोटोग्राफर्सच्या नजरेतून निसर्गाचा चमत्कार दाखवणारे Photos

5
0

Source :- BBC INDIA NEWS

'आईसी विंडो' शीर्षक असलेले हे छायाचित्र 'ॲनिमल पोट्रेट्स' या श्रेणीमध्ये विशेष कौतुकास पात्र ठरले आहे

फोटो स्रोत, Audun Rikardsen

आर्क्टिकच्या बर्फाळ प्रदेशातील सर्वात क्रूर आणि महाकाय शिकारी प्राण्यासमोर तुम्ही अचानक उभे ठाकलात, तर त्या क्षणी तुमची काय अवस्था होईल?

पाण्याखाली असलेल्या सील माशाच्या नजरेतून तो अंगावर काटा आणणारा प्रसंग कसा दिसला असेल, हे या अप्रतिम फोटोमध्ये हुबेहूब कैद झाले आहे. नॉर्वेचे वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑदुन रिकार्डसन यांनी टिपलेल्या या क्षणाचे यंदाच्या प्रतिष्ठित ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ स्पर्धेत विशेष कौतुक झाले आहे.

‘आर्क्टिक वाइल्डलाइफ टूर्स’मध्ये गाईड म्हणून कार्यरत असताना रिकार्डसन यांनी ही शक्कल लढवली. सील ज्या बर्फाच्या छिद्रातून श्वास घ्यायला वर येतात, बरोबर त्याच छिद्राखाली त्यांनी मोशन सेन्सर असलेला वॉटरप्रूफ कॅमेरा लावला.

अखेर पहाटे 4 वाजता त्यांची प्रतीक्षा संपली…एका मादी पांढऱ्या अस्वलाने उत्सुकतेने थेट त्या छिद्रातून खाली डोकावले आणि तो अद्भूत क्षण कॅमेऱ्यात कायमचा बंदिस्त झाला.

ते अस्वल तिथून दूर जाईपर्यंत रिकार्डसेन यांनी पूर्ण 8 तास धीर धरला आणि मगच कॅमेरा काढून फोटो पाहिले. कॅमेऱ्यात काय टिपलं गेलं आहे हे पाहताच ते थक्क झाले. त्या क्षणाबद्दल सांगताना रिकार्डसेन म्हणतात, “मी इतका भयंकर खूश झालो होतो की माझ्या तोंडून आनंदाची किंकाळीच फुटली… मला वाटतं त्या आवाजाने मैलोन्‌मैल झोपलेली सगळी अस्वलं दचकून जागी झाली असावीत.”

रिकार्डसेन यांनी यापूर्वीही ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ स्पर्धेत दोन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार पटकावले आहेत. 2019 मध्ये ‘बर्ड्स’ (पक्षी) आणि 2025 मध्ये ‘ओशन्स: द बिगर पिक्चर’.

या स्पर्धेतील मुख्य विजेत्यांची घोषणा मंगळवार, 13 ऑक्टोबर 2026 रोजी केली जाईल. त्यानंतर शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2026 पासून लंडनच्या ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’मध्ये या सर्व छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन भरवले जाईल.

द आर्ट ऑफ फ्लाईंग


द आर्ट ऑफ फ्लाईंग

फोटो स्रोत, Jack Crockford

शीर्षक : द आर्ट ऑफ फ्लाईंग

छायाचित्रकार : जॅक क्रॉकफोर्ड (UK)

ठिकाण : बुशी पार्क, लंडन

आफ्रिकेतून दरवर्षी होणारे स्थलांतर पूर्ण करून स्विफ्ट पक्षी लंडनमध्ये परतताना आणि त्यांच्या चिवचिवाटाने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडताना क्रॉकफोर्ड यांनी पाहिले. यातील बहुतेक पक्षी खूप उंचावरून उडत असल्याने कॅमेऱ्यात कैद करणं कठीण होतं.

पण काही पक्षी मात्र खाली येऊन गिरट्या घालत होते. त्यामुळेच क्रॉकफोर्ड यांना मनासारखा अचूक फोटो टिपण्याची सुंदर संधी मिळाली.

स्विफ्ट पक्षी आपले जवळजवळ संपूर्ण आयुष्य हवेत उडतच घालवतात. ते जमिनीवर केवळ घरटं बांधण्यासाठीच उतरतात.

अर्बन वँडरर

अर्बन वँडरर

फोटो स्रोत, Sora Miyazawa

शीर्षक: अर्बन वँडरर

छायाचित्रकार: सोरा मियाझावा (जपान)

ठिकाण: टोकियो, जपान

पाऊस पडून गेल्यानंतर मियाझावा यांना शहराच्या रस्त्यावरून सावकाश वाट काढणारा एक ‘ईस्टर्न जॅपनीज टॉड’ म्हणजे जपानी बेडूक दिसला. तो उडी मारून झाडीत गायब होण्याआधीच मियाझावा यांनी कॅमेऱ्याचा स्लो शटर स्पीड वापरून त्याचा सुरेख फोटो टिपला.

ईस्टर्न जॅपनीज टॉड हे सहसा पूर्व जपानमधील जंगले, गवताळ प्रदेश आणि नैसर्गिक परिसरात आढळतात. पण शहराच्या गजबजलेल्या वातावरणातही ते स्वतःला अत्यंत हुशारीने जुळवून घेतात हे यावरून दिसून येते.

लिफ्टेड टू द सरफेस

लिफ्टेड टू द सरफेस

फोटो स्रोत, Vegard Byrkjeland Aasen

शीर्षक: लिफ्टेड टू द सरफेस

छायाचित्रकार: वेगार बायर्कलँड ऑसन (नॉर्वे)

ठिकाण: क्वेनँगन, ट्रॉम्स काउंटी, नॉर्वे

‘नॉर्वेजियन ऑर्का सर्व्हे’साठी ड्रोन उडवत असताना ऑसन यांच्या नजरेस एक हृदयद्रावक दृश्य पडलं. एक पूर्ण वाढ झालेली ‘ऑर्का’ म्हणजे व्हेल मासा आपल्या मृत पिल्लाचे शरीर सावरत नॉर्वेच्या एका खाडीतून पुढे नेत होती.

ती ऑर्का त्या पिल्लाच्या शरीराला पुन्हा पुन्हा पाण्यात खाली जाऊ देत होती आणि क्षणात त्याला पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावर उचलून धरत होती. पाहणाऱ्याचे काळीज पिळवटून टाकणारा हा अत्यंत भावुक प्रसंग होता. पण तरीही कॅमेऱ्यात नोंदवून ठेवणं गरजेचं असल्याचं ऑसन यांना जाणवलं.

तिचं हे वागणं कदाचित आपल्या पिल्लाला पुन्हा जिवंत करण्याचा किंवा त्याचं रक्षण करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न असावा. किलर व्हेल्स अशा प्रकारे आपल्या मृत पिल्लांना सोबत वाहून नेताना याआधीही दिसल्या आहेत.

यात एका साउदर्न रेसिडेंट किलर व्हेलची विशेष नोंद आहे, जिने आपल्या मृत पिल्लाला तब्बल 17 दिवस आपल्यासोबत पाण्यात तरंगत नेलं होतं.

2026 मधील एका अभ्यासानुसार, किलर व्हेलच्या संपूर्ण प्रजातीमध्ये आपल्या पिल्लांविषयीची ही हळवी भावना आणि वर्तन आपण विचार करतो त्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात आढळते.

बायटिंग बॅक -

फोटो स्रोत, Andrea & Maceo Grammatico

शीर्षक: बायटिंग बॅक

छायाचित्रकार: आंद्रिया आणि मासेओ ग्रामातिको (फ्रान्स)

ठिकाण: सिएरपे, साउथ पुंतारेनास, कोस्टा रिका

काढलेले फोटो नीट तपासल्यानंतरच ग्रामातिको जुळ्या भावांना समजले की, त्यांच्या कॅमेऱ्याने एका अत्यंत विषारी ‘फेर-द-लान्स व्हायपर’ सापाच्या डोक्यावर आरामात बसलेल्या डासाचा अतिशय दुर्मिळ क्षण टिपला आहे.

हे छायाचित्र स्पष्ट आणि अचूक टिपण्यासाठी करण्यात आलेली ‘फोकस स्टॅकिंग’ हे आजवरचे सर्वात कठीण आणि आव्हानात्मक काम असल्याचं त्यांनी सांगितलं.

अत्यंत विषारी असणारा ‘फर-द-लान्स’ हा साप मध्य अमेरिकेत इतर कोणत्याही सापाच्या तुलनेत माणसांच्या मृत्यूला सर्वाधिक कारणीभूत ठरतो. हा साप आजूबाजूच्या परिसराशी आणि शेतांच्या परिसरात इतक्या हुबेहूब पद्धतीने मिसळून जातो की, शेतात काम करणाऱ्या मजुरांनाही तो सहजासहजी नजरेस पडत नाही.

विंग्स ऑफ डार्कनेस

विंग्स ऑफ डार्कनेस (काळोखाचे पंख)

फोटो स्रोत, Andrew Parkinson

शीर्षक: विंग्स ऑफ डार्कनेस

छायाचित्रकार: अँडी पार्किन्सन (UK)

स्थळ: मीटिंग ऑफ द वॉटर्स स्टेट पार्क, नॉर्थर्न पॅन्टॅनल, ब्राझील

ब्राझीलमधील पँटानलच्या दलदलीच्या भागात एका मृत मगरीच्या शरीरावर ठाण मांडून बसलेल्या काळ्या गिधाडाचा एक थरारक क्षण अँडी पार्किन्सन यांनी कॅमेऱ्यात टिपला. हा अप्रतिम शॉट घेण्यासाठी त्यांनी आपली बोट लांब अंतरावरच थांबवून ठेवली आणि ‘लाँग टेलिफोटो लेन्स’च्या साहाय्याने हा अचूक शॉट घेतला.

कॅमेऱ्याच्या चौकटीबाहेर दबा धरून बसलेला एक बिबट्या ते गिधाड उडून गेल्यावर त्या मृत शरीरावर ताबा मिळवण्यासाठी पुढे आला. तेव्हा कुठे पार्किन्सन यांच्या लक्षात आलं की, त्या केमन मगरीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला अतिशय स्वच्छ आणि सरळ जखम झाली होती. वेगात जाणाऱ्या एखाद्या बोटीच्या धडकेमुळे ही जखम झाली असावी, असा संशय पार्किन्सन यांनी व्यक्त केला.

आय ऑफ द स्टॉर्म

आय ऑफ द स्टॉर्म

फोटो स्रोत, Dewald Tromp

शीर्षक: आय ऑफ द स्टॉर्म

छायाचित्रकार: डेवाल्ड ट्रॉम्प (दक्षिण आफ्रिका)

ठिकाण: नामिब वाळवंट, स्वाकोपमुंड जवळ, नामिबिया

नामिबच्या रखरखत्या वाळवंटात ट्रॉम्प एका ‘नामाक्वा सरड्या’चा फोटो काढत असतानाच अचानक वाऱ्याचा वेग प्रचंड वाढला. बघता बघता वाळूचं भयंकर वादळ उठलं, ज्यामुळे डोळ्यांसमोरचं काही दिसेनासं झालं आणि श्वास घेणंही कठीण होऊन बसलं.

वाळवंटात कसे जगायचे, याची खास कला या सरड्यांना उत्तम अवगत असते. पाण्याशिवाय जगण्यासाठी ते थेट हवेतील गारवा आणि ओलावा शोषून घेतात. त्यांच्या शरीरावर जमा होणारे दवाचे थेंब त्वचेवरील अतिसूक्ष्म नळ्यांवाटे थेट तोंडात झिरपतात. इतकेच नाही, तर वनस्पती, वाळू आणि दगडांवर साचलेल्या धुक्याचे पाणी ते अलगद आपल्या जिभेने चाटून पितात.

फ्लॉक ऑफ गोल्ड

फ्लॉक ऑफ गोल्ड

फोटो स्रोत, Bence Máté

शीर्षक : फ्लॉक ऑफ गोल्ड

छायाचित्रकार : बेन्स माते (हंगेरी) – 2010 मधील विजेते छायाचित्रकार

ठिकाण : अशनिल अरुबा लॉज, त्सावो ईस्ट नॅशनल पार्क, केनिया

केनियातील एका छोट्या तळ्याजवळ बेन्स माते पक्ष्यांचे निरीक्षण करत होते. तितक्यात दुपारच्या सोनेरी उन्हात पाणी पिण्यासाठी लाखो लाल चोचीचे ‘क्वेलिया’ पक्षी एकदम खाली झेपावले.

त्यांच्या हजारो पंखांच्या फडफडाटाने हवेची एक प्रचंड मोठी लाट तयार झाली होती. माते यांच्या मते, हा हवेचा झोत चक्क 30 मीटर (98 फूट) लांबूनही स्पष्ट जाणवत होता.

लाल चोचीच्या ‘क्वेलिया’ पक्ष्यांचे थवे इतके महाकाय असतात की एकाच वेळी तब्बल 20 लाख पक्षी एकत्र उडू शकतात. जगात या प्रजनन करणाऱ्या प्रौढ पक्ष्यांची संख्या सुमारे 1.5 अब्ज असून, पृथ्वीवर सर्वाधिक संख्येने आढळणारा हा जंगली पक्षी आहे.

म्युच्युअल फ्रेंड्स

म्युच्युअल फ्रेंड्स

फोटो स्रोत, Ernest Porter

शीर्षक: म्युच्युअल फ्रेंड्स

छायाचित्रकार: अर्नेस्ट पोर्टर (दक्षिण आफ्रिका)

ठिकाण: मान्येलेटी गेम रिझर्व्ह, म्पुमालांगा, दक्षिण आफ्रिका

अभयारण्यात फिरत असताना अर्नेस्ट पोर्टर यांच्या कॅमेऱ्याने निसर्गातील अनोख्या मैत्रीचा एक सुरेख क्षण टिपला. दुपारच्या कोवळ्या उन्हात एक लाल चोचीचा ऑक्सपेकर पक्षी पांढऱ्या गेंड्याच्या पाठीवर बसून आपली चोच त्याच्या त्वचेवर घासत होता.

हे पक्षी केवळ गेंड्याच्या अंगावरचे किडे खाऊन पोट भरत नाहीत, तर एखादा धोका जवळ आल्यास विशिष्ट आवाज काढून गेंड्याला सावधही करतात. म्हणूनच आफ्रिका खंडात बोलल्या जाणाऱ्या या स्वाहिली भाषेत या पक्षाला ‘अस्करी वा किफारू’ म्हणजेच “गेंड्याचा पहारेकरी” म्हटले जाते.

अप अ ट्री विदाऊट अ स्क्विरल

 अप अ ट्री विदाऊट अ स्क्विरल

फोटो स्रोत, Allegra Hutton

शीर्षक: अप अ ट्री विदाऊट अ स्क्विरल

छायाचित्रकार: अलेग्रा हटन (USA)

ठिकाण: ओकावांगो डेल्टा, बोत्सवाना

आधी सशाची शिकार करण्यात अपयशी ठरलेल्या एका तरुण बिबट्याने नंतर एका चपळ खारीचा पाठलाग करत थेट झाडावर धाव घेतली.

मात्र, हुशार खार झाडाच्या शेंड्याकडे पळून निसटली आणि बिबट्या बिचारा फांदीला लटकतच राहिला. शेवटी शिकार न मिळाल्याने अगदी ओशाळवाण्या चेहऱ्याने त्याला झाडावरून खाली उतरावे लागले.

बिबट्यांच्या पिल्लांसाठी जंगलात टिकून राहणे अजिबात सोपे नसते. वयात येऊन स्वतःची शिकार स्वतः करण्याइतपत जगणाऱ्या बिबट्यांचे प्रमाण निम्म्यापेक्षाही कमी असते. कारण प्रौढ नर बिबटे, सिंह आणि इतर महाकाय शिकारी प्राण्यांपासून त्यांच्या जिवाला सतत मोठा धोका असतो.

स्प्लिट-सेकंड एस्केप

 स्प्लिट-सेकंड एस्केप

फोटो स्रोत, Jens Cullmann

शीर्षक: स्प्लिट-सेकंड एस्केप

छायाचित्रकार: जेन्स कुलमन (जर्मनी)

ठिकाण: सेंट्रल कालाहारी गेम रिझर्व्ह, बोत्सवाना

एक ‘आफ्रिकन बुलफ्रॉग’ म्हणजे मोठा आफ्रिकन बेडूक बाभळीच्या फुलपाखरावर झडप घालतो. पण त्याची ती शिकार हुकते.

मुसळधार पाऊस पडून गेल्यानंतरच्या पहिल्या फेरीत कुलमन यांना पाणथळ भागात असंख्य बेडकाची पिल्ले दिसली होती. बरोबर एका महिन्याने ते परतले तेव्हा डबक्यांमध्ये आणि तळ्यात सगळीकडे धष्टपुष्ट लहान बेडूक बागडताना दिसले. डोळ्यांसमोरून हलणारी कोणतीही वस्तू क्षणार्धात फस्त करणाऱ्या या खादाड बेडकांचे निरीक्षण करण्यात कुलमन यांनी तब्बल 2 आठवड्यांहून अधिक काळ घालवला.

पूर्ण वाढ झालेले हे आफ्रिकन बुलफ्रॉग आकाराने तब्बल 12 सेमी (4.7 इंच) पर्यंत लांब असू शकतात. वर्षाचे जवळजवळ 10 महिने ते जमिनीखाली सुप्तावस्थेतच गाढ झोपलेले असतात. एकदा का पाऊस सुरू झाला की ते जमिनीबाहेर येतात, भराभर अन्न खाऊन पोट भरतात आणि पिल्लांना जन्म देण्यासाठी बाहेर येतात.

हिडन ड्रॅगन

हिडन ड्रॅगन

फोटो स्रोत, Gil Wizen

शीर्षक: हिडन ड्रॅगन

छायाचित्रकार: गिल विझेन (इस्रायल/कॅनडा) – 2021 चे विजेते छायाचित्रकार

ठिकाण: वाइल्डसुमाको बायोलॉजिकल स्टेशन, नापो प्रांत, इक्वाडोर

गिल विझेन अवघ्या 15 मिमी लांबीच्या ‘लायकेन ड्रॅगन कॅटिडिड’ म्हणजे दगडफुलासारखा दिसणाऱ्या एका अनोख्या कीटकाचा फोटो काढत होते. त्याच्या आकारामुळे आणि रूपामुळे आजूबाजूच्या दगडफुलांपासून त्याला वेगळं ओळखणं अत्यंत कठीण होतं. जेव्हा त्या कीटकाची किंचित हालचाल झाली, तेव्हाच विझेन यांच्या नजरेस तो पडला. पण तरीही कॅमेऱ्याच्या लेन्समधून त्याला आजूबाजूच्या पार्श्वभूमीपासून वेगळं ओळखताना त्यांची चांगलीच कसरत झाली.

केवळ इक्वाडोरच्या अँडीज पर्वतरांगांमध्येच आढळणारा हा कीटक रूप बदलण्यात अत्यंत पटाईत आहे. सभोवतालच्या परिसराशी रंगरूप मिसळले तरीही तीक्ष्ण नजर असलेल्या शिकारी प्राण्यांच्या तावडीतून वाचण्यासाठी निसर्गाने त्याला काट्यांचे एक मजबूत कवच दिले आहे.

काम अमिड द स्टॉर्म

काम अमिड द स्टॉर्म

फोटो स्रोत, Shane Gross

शीर्षक: काम अमिड द स्टॉर्म

छायाचित्रकार: शेन ग्रॉस (कॅनडा) – 2024 चे ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ विजेते

ठिकाण: डी’अरोस बेट, सेशेल्स

एकीकडे आकाशात वादळाचे ढग दाटून येत होते आणि दुसरीकडे सूर्योदयाच्या कोवळ्या उन्हात सेशेल्सच्या किनाऱ्यावर मोठ्या डोळ्यांच्या ‘ट्रेव्हली’ माशांचा एक मोठा थवा पोहत होता. पाण्याचे वरचे आणि खालचे जग एकाच फ्रेममध्ये टिपण्यासाठी शेन ग्रॉस यांनी कॅमेरा उलटा पकडला जेणेकरून पाण्यात कॅमेऱ्याचे संतुलन व्यवस्थित राहील. त्यानंतर ते सावकाश त्या उत्सुक माशांच्या अगदी जवळ पोहोचले आणि हा अप्रतिम क्षण टिपला.

जगात इतरत्र या ‘बिगआय ट्रेव्हली’ माशांची सर्रास शिकार केली जात असली तरी या बेटाच्या पाण्यात मात्र ते निर्धास्तपणे वावरतात. 2030 पर्यंत पृथ्वीचा 30% भूभाग आणि सागरी क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी जगभरातील देशांनी एकत्र येऊन एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून, 2023 मध्ये डि’अरोस बेटाच्या सभोवतालच्या सागरी परिसराला ‘मरीन प्रोटेक्टेड एरिया’ घोषित करून तिथे मासेमारीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

पूलटाइम पासटाइम

पूलटाइम पास-टाइम

फोटो स्रोत, Loren Elliott

शीर्षक: पूलटाइम पासटाइम

छायाचित्रकार: लॉरेन इलियट (USA)

ठिकाण: मन्रोव्हिया, कॅलिफोर्निया, USA

घराच्या मागच्या बागेतून ये-जा करणाऱ्या काळ्या अस्वलांचा अचूक शॉट घेण्यासाठी लॉरेन इलियट एका स्थानिक नागरिकाच्या स्वयंपाकघरातील खिडकीत तासंतास वाट पाहत बसले होते.

अखेर एक भलेमोठे अस्वल बागेत आले आणि त्याने थेट स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारली. लॉस एंजेलिस काउंटीमध्ये मानवी वस्त्या थेट अस्वलांच्या जंगलात घुसल्यामुळे वन्यजीव आणि मानवी जीवन आता कसे अगदी समोरासमोर आले आहे, याचे वास्तव हे छायाचित्र मांडते.

ओशन प्रोटेक्टर

ओशन प्रोटेक्टर

फोटो स्रोत, Ralph Pace

शीर्षक: ओशन प्रोटेक्टर

छायाचित्रकार: राल्फ पेस (USA) – 2025 मधील विजेते छायाचित्रकार

ठिकाण: मॉन्टेरी बे, कॅलिफोर्निया, USA

संध्याकाळच्या मंद प्रकाशात मॉन्टेरी बे मधील उथळ पाण्यात पेस फोटो काढत असताना हिरव्यागार समुद्री गवतातून सावकाश पुढे जाणारा एक मोठा ‘सी हेअर’ (समुद्री जीव) त्यांच्या दृष्टीस पडला. पेस यांनी या दृश्याकडे “सागरातील उरल्यासुरल्या हिरवळीचे रक्षण करणारा एक शांत रक्षक” म्हणून पाहिले.

समुद्रातील गवतावर वाढणारे आणि सूर्यप्रकाश रोखणारे लाल शेवाळ खाऊन हा जीव या गवताचे रक्षण करतो. हे गवत केवळ सागरी पर्यावरणासाठीच आवश्यक नाही तर हवेतील कार्बन मोठ्या प्रमाणावर शोषून निसर्गाचा समतोल राखण्यातही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

द शो गोज ऑन

 द शो गोज ऑन

फोटो स्रोत, Pietro Rojas

शीर्षक: द शो गोज ऑन

छायाचित्रकार: पिएत्रो रोहास (ग्वाटेमाला)

ठिकाण: दोहा, कतार

शहरात आलेल्या एका सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ होणार असल्याचे समजताच पिएत्रो रोहास हे वास्तव कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी गेले. तिथे त्यांनी तोंडाला जाळी बांधलेल्या एका अस्वलाला जबरदस्तीने छोट्या मोटारसायकलवर बसवून ती चालवताना पाहिले. जंगलात मोकळेपणाने वावरणाऱ्या वन्यजीवांवर मानवाने स्वतःच्या मनोरंजनासाठी लादलेली ही सक्ती मनाला चटका लावणारी होती.

सर्कसमध्ये प्राण्यांवर होणारे अत्याचार आणि त्यांना होणारा असह्य त्रास लक्षात घेऊन जगातील 50 हून अधिक देशांनी आता सर्कशींमध्ये जंगली प्राण्यांच्या वापरावर पूर्ण बंदी घालून अत्यंत कडक नियम लागू केले आहेत.

(‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ ही स्पर्धा लंडनच्या ‘नॅचरल हिस्ट्री म्युझियम’तर्फे आयोजित केली जाते.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC