Home LATEST NEWS ताजी बातमी आजोबांच्या 5, पणजोबांच्या 11 पत्नी; या अनुभवातून जन्मली नेटफ्लिक्सवरील गाजलेली मालिका

आजोबांच्या 5, पणजोबांच्या 11 पत्नी; या अनुभवातून जन्मली नेटफ्लिक्सवरील गाजलेली मालिका

5
0

Source :- BBC INDIA NEWS

आजोबांच्या 5, पणजोबांच्या 11 पत्नी; या अनुभवातून जन्मली नेटफ्लिक्सवरील गाजलेली मालिका

फोटो स्रोत, Netflix/Iconic Digital

झिम्बाब्वेच्या लेखिका स्यू न्याथी यांनी त्यांची पहिली कादंबरी द पॉलीगॅमिस्ट प्रकाशकांकडे पाठवली, तेव्हा हे पुस्तक वाचलं जाणार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं. एका विवाहित पुरुषाची आणि त्याने फसवलेल्या महिलांची कथा या कादंबरीत मांडण्यात आली आहे.

पण न्याथी तिथं थांबल्या नाहीत. त्यांनी स्वतः संपादक, अक्षरजुळणीचं काम करणारी व्यक्ती आणि चित्रकार शोधला. 2012 मध्ये त्यांनी स्वतःच्या खर्चानं केवळ 500 प्रती प्रकाशित केल्या. प्रकाशकांचे अंदाज चुकीचे ठरवत हे पुस्तक प्रचंड गाजलं.

आता या कादंबरीवर आधारित मालिका नेटफ्लिक्सवर आली आहे. या मालिकेनं 60 हून अधिक देशांमध्ये नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या टॉप 10 मालिकांमध्ये स्थान मिळवलंय.

अमेरिकेत ती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली. हॉलिवूड अभिनेत्री ताराजी पी. हेन्सन यांनी सांगितलं की ही मालिका त्यांना इतकी खिळवून ठेवणारी वाटली की त्यांनी एका दिवसात तिचे सर्व 22 भाग पाहून पूर्ण केले.

मात्र न्याथी यांचं म्हणणं आहे की ही केवळ बहुपत्नीत्वाची कथा नाही.

बहुपत्नीत्वाची परंपरा त्यांच्या कुटुंबासाठी अनोळखी नव्हती. त्यांच्या आईच्या बाजूच्या कुटुंबात अनेक पिढ्यांपासून बहुपत्नीत्वाची प्रथा होती.

त्यांचे आजोबा, ज्यांचं 1979 मध्ये निधन झालं, त्यांच्या पाच पत्नी होत्या. पणजोबांच्या 11 पत्नी होत्या. न्याथी यांच्या आजी या त्यांच्या आजोबांच्या पहिल्या पत्नी होत्या. हे सर्वजण एकत्रच राहात.

न्याथी यांच्या आजी त्यात प्रमुख व्यक्तीची भूमिका पार पाडत अगदी आपल्या नवऱ्याला नव्या पत्नीची निवड करतानाही त्या अनेकदा मदत करत असत.

“तिथं कोणतेही वाद किंवा भांडणं नव्हती, कारण प्रत्येकाला आपली जागा माहिती होती,” न्याथी सांगतात.

या व्यवस्थेकडे त्या कशा पाहत होत्या, असा प्रश्न न्याथी यांनी आपल्या आजींना विचारला होता. त्यावर त्यांनी अतिशय व्यावहारिक उत्तर दिलं. घरकाम, शेतीची कामं आणि भावनिक जबाबदाऱ्या वाटून घेण्यासाठी अधिक लोक असणं फायदेशीर ठरत होतं. ही एक खुली व्यवस्था होती.

“प्रत्येकाला आपलं नेमकं स्थान काय आहे हे माहिती होतं,” न्याथी म्हणतात.

आजोबांच्या 5, पणजोबांच्या 11 पत्नी; या अनुभवातून जन्मली नेटफ्लिक्सवरील गाजलेली मालिका

झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेत विशिष्ट पारंपरिक प्रथांनुसार बहुपत्नीत्वाला कायदेशीर मान्यता आहे. पण 2001 मध्ये हरारे येथे तरुण नोकरदार महिला म्हणून काम करत असताना न्याथी यांना वेगळंच वास्तव दिसू लागलं.

अनेक पुरुष वरकरणी एकपत्नीत्वाचा दावा करत होते. मात्र प्रत्यक्षात त्यांचे इतर महिलांबरोबर संबंध होते आणि त्यांनी गुप्त कुटुंबं उभी केली होती. त्यांच्या कादंबरीतील बहुपत्नीत्वाचं चित्रण याच वास्तवावर आधारित आहे. त्यांच्या मते, ही त्या प्रथेची “आधुनिक किंवा विकृत आवृत्ती” आहे, ती परस्पर संमतीऐवजी फसवणुकीवर आधारलेली आहे.

“मी बहुपत्नीत्वाच्या विरोधात नाही,” न्याथी म्हणतात. “पण महिलांचा निर्णय घेण्याचा अधिकार हिरावून घेतला जाण्याच्या विरोधात आहे. एखाद्या स्त्रीनं (विवाहाच्या- एकत्र राहाण्याच्या) नात्यात प्रवेश केल्यानंतर नियम बदलणं चुकीचं आहे.”

निर्णय घेण्याची ताकद कोणाकडे?

कादंबरीतील नायिका जॉइसला वाटतं की तिचं लग्न एका पुरुष आणि एका स्त्रीच्या नात्यावर आधारित आहे. मात्र तिचा पती जोनासी तिच्या नकळत आणखी तीन महिलांशी लग्न करतो आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र बिऱ्हाडं उभारतो.

तो कधीही कबुली देत नाही, कोणतीही घोषणा करत नाही. पण गुपितं हळूहळू उघड होत जातात. या महिलांची आयुष्यं एकमेकांशी जोडली जाऊ लागतात आणि जॉइसला कळतं की तिला वाटत असलेलं एकपत्नीत्व खरं तर फसवं होतं.

या कथेत सतत एक प्रश्न समोर येतो. तो म्हणजे निर्णय घेण्याची ताकद कोणाकडे आहे आणि कोणाकडे नाही हा…

जोनासी हा श्रीमंत, स्वतःच्या बळावर उभा राहिलेला व्यावसायिक आहे. पुरुषसत्ताक समाजात तोच सर्व निर्णय घेतो.

जॉइसनं त्याचं साम्राज्य उभारण्यात मदत केली असली तरी तिची आर्थिक स्थिती त्याच्यावर अवलंबून असते. नंतर येणारी पत्नी माटिपाही जोनासीसाठी काम करते आणि तिची परिस्थितीही अशीच असते.

परिणामी या महिलांचं स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य कमी होतं आणि त्या अधिक असुरक्षित बनतात.

वयातील अंतरही हा असमतोल अधिक तीव्र करतं, असं न्याथी सांगतात.

आजोबांच्या 5, पणजोबांच्या 11 पत्नी; या अनुभवातून जन्मली नेटफ्लिक्सवरील गाजलेली मालिका

कथेत एचआयव्हीशी संबंधित एक भाग आहे.

“जर सुरक्षित लैंगिक संबंधांबाबत चर्चा करण्याचं स्वातंत्र्यच नसेल, तर अशा नात्यांमध्ये महिलांना खऱ्या अर्थानं काही म्हणण्याचा अधिकार राहत नाही,” त्या सांगतात.

कादंबरी आणि नेटफ्लिक्स मालिकेत काही फरक आहेत. मालिकेत कथा दक्षिण आफ्रिकेत नेण्यात आली आहे. ती झुलू भाषेत चित्रीत करण्यात आली असून तिला सबटायटल्स देण्यात आली आहेत. तसेच जोनासीच्या पत्नींची संख्या कादंबरीपेक्षा कमी दाखवण्यात आली आहे.

आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे कादंबरी पूर्णपणे जोनासीच्या पत्नींच्या दृष्टिकोनातून सांगितली जाते.

“मला महिलांचे आवाज पुढं आणायचे होते,” न्याथी म्हणतात.

प्रत्येक स्त्री अशा एका पुरुषाबरोबरच्या नात्यात का अडकली जो तिच्याशी प्रामाणिक नव्हता, हे तिनं स्वतःच्या शब्दांत सांगावं, अशी त्यांची इच्छा होती.

त्यांच्या मते, या कथेतले विषय अनेक महिलांच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. अनेक वाचक त्यांना लिहितात की त्यांना जॉइस किंवा इतर पत्नींमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. काही जणी सांगतात की त्या स्वतःही एखाद्या “जोनासी”सोबत संसार करत आहेत आणि त्यातून बाहेर पडू इच्छितात.

मालिका प्रदर्शित झाल्यानंतर अॅम्नेस्टी साऊथ आफ्रिकाने भावनिक आणि नार्सिसिस्टिक अत्याचारांबाबत मार्गदर्शन करणारी माहिती प्रसिद्ध केली.

“काही लोकांसाठी ही फक्त मालिका नाही,” न्याथी म्हणतात. “हे त्यांचं वास्तव आहे. ही मालिका समाजाला आरसा दाखवते.”

मात्र सर्वांनीच या मालिकेचं स्वागत केलेलं नाही.

आजोबांच्या 5, पणजोबांच्या 11 पत्नी; या अनुभवातून जन्मली नेटफ्लिक्सवरील गाजलेली मालिका

फोटो स्रोत, Netflix/Iconic Digital

केनियाचे सनदी अधिकारी जेफ्री मोसिरिया यांनी ही मालिका केनियात बंद करण्याची मागणी केली. त्यांच्या मते, या मालिकेत बहुपत्नीत्वाची सरळसोट तुलना व्यभिचार, फसवणूक आणि अत्याचाराशी केली जाते.

मात्र न्याथी यावर फारसं भाष्य करत नाहीत.

त्यांच्या मते, संस्कृती बदलते. परंपरा कालांतराने बदलू शकतात किंवा विकृतही होऊ शकतात. त्या केवळ त्या बदलांचं चित्रण करत आहेत.

त्या म्हणतात की या मालिकेनं आणखी एक महत्त्वाची गोष्ट केली आहे. श्रीमंत कृष्णवर्णीय आफ्रिकन लोकांना कथानायक म्हणून दाखवून तिनं अनेकांचे डोळे उघडले आहेत.

एका युरोपीय वाचकाने त्यांना सांगितलं की श्रीमंत कृष्णवर्णीय आफ्रिकन लोक अस्तित्वात आहेत हे त्यांना याआधी ठाऊकच नव्हतं.

“आफ्रिकन असण्याची आपली जी रूढ कल्पना आहे ती बहुतेकदा गरिबीशी जोडलेली असते,” न्याथी म्हणतात.

त्यांच्या मते, ही मालिका त्याच धारणांना छेद देते. शिवाय झुलू भाषेत ती तयार झाल्यामुळे ती अधिक प्रभावी ठरली आहे.

“इंग्रजीमध्ये आपल्या स्थानिक भाषांइतकी सांस्कृतिक समृद्धी नाही,” त्या म्हणतात.

लेखनाच्या क्षेत्रात कोणाला संधी मिळते, याविषयी बोलताना न्याथी यांच्या आवाजात थोडी नाराजी जाणवते.

लेखनासाठी नोकरी सोडली

लहानपणापासून त्यांना लेखिका व्हायचं होतं. पण त्यांच्या पालकांनी त्यांना अधिक पारंपरिक व्यवसाय निवडण्यास प्रोत्साहन दिलं.

त्यांनी जवळपास दोन दशकं वित्त क्षेत्रात काम केलं. गुंतवणूक विश्लेषक म्हणून काम करताना लेखनाकडे केवळ कला म्हणून नव्हे, तर व्यवसाय म्हणूनही पाहायला शिकल्याचं त्या सांगतात.

नोकरीमुळे आर्थिक गरजा भागत होत्या. पण लेखनाची आवड कायम होती. त्यामुळे त्या दिवसभराचं काम संपल्यानंतर रात्री द पॉलीगॅमिस्ट लिहित असत.

कादंबरी प्रकाशित केल्यानंतर काही वर्षांनी, वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्र सोडलं आणि पूर्णवेळ लेखन सुरू केलं. त्या आता 48 वर्षांच्या आहेत.

“लोक म्हणतात, ‘तुम्ही एका रात्रीत यशस्वी झालात.’ पण तसं अजिबात नाही,” त्या म्हणतात. “ओळख एका रात्रीत मिळाली असेल, पण त्यामागे अनेक वर्षांचं काम आणि त्याग आहे.”

त्यांच्या मते, विशेषतः आफ्रिकेत बहुतेक लेखक केवळ पुस्तकांच्या विक्रीवर गुजराण करू शकत नाहीत.

काही यशस्वी लेखकांना श्रीमंत पती, अनुदानं किंवा लेखक निवास कार्यक्रमांचा आधार मिळतो.

मात्र एकल पालक असलेल्या न्याथी यांना अशा सुविधा उपलब्ध नव्हत्या. मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळत त्यांनी लेखनासाठी विविध नोकऱ्या केल्या.

“पुस्तक लिहायला सुरुवात करण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत खूप मोठा काळ जाऊ शकतो. कधी दोन वर्षं, तर कधी आठ वर्षंही लागू शकतात. तोपर्यंत जगायचं कसं? उदरनिर्वाह तर करावाच लागतो,” त्या म्हणतात.

“मी तो प्रवास केला आहे. तो खूप अनिश्चित असतो. त्यामुळे बराच काळ नोकरी टिकवावीच लागते.”

त्यांच्या मते, “लेखन ही अशी चैनीची गोष्ट आहे जी अनेकांना परवडत नाही.” याची किंमत समाजाला अनेक न ऐकल्या गेलेल्या आवाजांच्या स्वरूपात चुकवावी लागते.

आजोबांच्या 5, पणजोबांच्या 11 पत्नी; या अनुभवातून जन्मली नेटफ्लिक्सवरील गाजलेली मालिका

फोटो स्रोत, Netflix/Iconic Digital

आफ्रिकन लेखकांचा जागतिक स्तरावर प्रसार होण्यातही असमतोल असल्याचं त्यांना वाटतं.

“परदेशात प्रकाशित झालेल्या आफ्रिकन लेखकांना अधिक सहज ओळख मिळते. जगभरातील पुस्तकं आफ्रिकेत सहज पोहोचतात, पण आफ्रिकन लेखकांची पुस्तकं जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नसतं,” त्या म्हणतात.

चार कादंबऱ्या आणि दहा वर्षांच्या लेखनानंतरही जी ओळख मिळाली नव्हती, ती नेटफ्लिक्समुळे मिळाली.

सध्या त्या गेली दोन वर्षं लिहित असलेल्या एका ऐतिहासिक कादंबरीचा पहिला मसुदा पूर्ण करत आहेत. त्यातील विषय अनेकांना आपले वाटतील, असं त्या सांगतात.

लेखन करू इच्छिणाऱ्या आणि आर्थिक संसाधनांचा अभाव असलेल्या महिलांना त्या एक साधा सल्ला देतात.

“सर्व गोष्टींची सुरुवात एका कथेतून होते. तुमच्याकडे पैसे नसतील तर पेन आणि कागद घ्या आणि लिहायला सुरुवात करा.”

त्या पुढे म्हणतात, “पैसा कधीच प्रेरणा असू नये. कठीण काळात तुम्हाला टिकवून ठेवणारं बळ म्हणजे लेखनावरील प्रेम.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC