Source :- BBC INDIA NEWS

आरजी कर हॉस्पिटल

फोटो स्रोत, Getty Images

पश्चिम बंगालमधल्या प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक म्हणजे आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय. पाच महिन्यांपूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

या प्रशिक्षक डॉक्टरचा मृतदेह 9 ऑगस्ट 2024 ला रुग्णालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये सापडला.

या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त केला गेला. पश्चिम बंगालमधल्या आरोग्य सेवा दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद होत्या.

घटनेच्या पाच महिन्यांनंतर एकीकडे सरकारी रुग्णालयात काम करणारे आरोग्यसेवक त्यांच्या सुरक्षेबद्दल काळजीत आहेत, तर दुसरीकडे मृत पीडितेच्या आई-वडिलांनी याबाबत एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

आज (18 जानेवारी) बलात्कार आणि हत्या प्रकरणाची अंतिम सुनावणी कोलकात्याच्या सियालदह न्यायालयात होणार आहे.

या गुन्ह्याचे पुरावे मिटवण्याच्या आरोपाखाली वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप घोष आणि टाला पोलिस ठाण्याचे प्रभारी अभिजित मंडल यांच्याविरोधात सीबीआयला आरोपपत्र दाखल करता आलेलं नाही. त्यामुळे त्यांना जामीन मिळाला आहे.

आर जी कर

सीबीआय करत असलेल्या तपासाबद्दल मृत पीडितेच्या आई-वडिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

त्याबद्दलचीच याचिका त्यांनी कोलकात्याच्या उच्च न्यायालयात आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

सियालदहच्या विशेष न्यायालयाला शनिवारी या प्रकरणात आरोपींना शिक्षा देण्यापासून थांबवलं जावं आणि पुन्हा नव्यानं या प्रकरणाचा तपास करावा, अशी मागणी या याचिकेत केली आहे.

याचिकेत नेमकं काय म्हटलंय?

गार्गी गोस्वामी या पीडितेच्या आई-वडिलांच्या वकील आहेत.

सीबीआयने तपास नीट केला नसल्याने त्यांना सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावण्याची गरज पडली असल्याचं त्या बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या.

याचिकेत अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. पोस्टमार्टमचा अहवाल, वैद्यकीय मंडळाने दिलेला अहवाल आणि फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळा म्हणजे ‘सीएसएफएल’ ने दिलेल्या अहवालात विरोधाभास असल्याचं त्यांनी याचिकेत सांगितलंय.

“सीबीआयच्या तपासात राहिलेल्या त्रुटी आम्ही याचिकेतून न्यायालयासमोर मांडल्यात. या त्रुटींमुळे न्याय मिळणार नाही असं आमचं म्हणणं आहे. तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरातून मिळालेल्या व्हीडिओवरून सीबीआयने फक्त संजय रॉय यालाच दोषी ठरवलंय. मात्र, व्हीडिओत इतर अनेक लोक येत जात असताना दिसत आहेत,” असं गार्गी गोस्वामी म्हणाल्या.

आरजी कर हॉस्पिटल आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

सीसीटीव्ही व्हीडिओत दिसलेल्या इतर लोकांची ओळख सीबीआयने पटवलेली नाही. त्यामुळे पूर्ण सत्य समोर येऊ शकलेलं नाही, असं त्या म्हणतायत.

या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय याला पोलिसांनी अटक केली आहे. तो पोलिसांसोबत नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता.

घटनेच्या पाच दिवसांनंतर म्हणजे 14 ऑगस्ट 2024 ला कोलकत्ता उच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवला होता.

महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप घोष आणि टाला पोलिस ठाण्याचे प्रभारी अभिजित मंडल यांना सीबीआयनेच पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक केलं होतं, तर कोलकाता पोलिस आयुक्त विनीत गोयल यांची राज्य सरकारने बदली केली.

लाल रेष
लाल रेष

घटनेनंतर काय बदल झाला?

रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी आता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) कडे दिली आहे.

तरीही इथं काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोलताना त्यांनी त्यांच्या सुरक्षेबाबत काळजी वाटत असल्याचं सांगितलं.

रुग्णालयात बीएससी नर्सिंग करणारी विद्यार्थिनी तृषा बॅनर्जी सांगते की, घटनेनंतर परिसरातल्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे आणि जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही लावलेत. तरीही तिला भीती वाटते.

कार्ड

त्याला दुजोरा देत तन्दा साहा म्हणते, “आमच्या मनातून भीती जात नाही. घटनेपासून आतापर्यंत ती भीती मनात घर करून आहे. अभ्यास करतानाही आपण सुरक्षित असू की नाही, असेच विचार येतात. पुरूष कर्मचारी सावरलेत. पण आम्ही महिला सतत आमच्या सुरक्षेबद्दल काळजीत असतो.”

इथं काम करणाऱ्या महिला आता कॅमेरासमोर येणं आणि अनोळखी लोकांशी बोलणं टाळत आहेत.

काही निवडक हिंमत करून बोलत आहेत. त्यातल्याच एक आहेत निवासी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या शबनम शाह. त्या रुग्णालयाच्या वसतीगृहात राहतात.

आरजी कर रुग्णालयाच्या सुरक्षेची जबाबदारी आता सीआयएसएफ कडे देण्यात आली आहे.

“जिथं बलात्कार झाला त्या कॉन्फरन्स हॉलच्या बाजूनं मी जाते तेव्हा आजही हृदयात कालवतं. अंगाचा थरकाप उडतो. मनात एक भीतीची लकेर निर्माण होते. त्या जागेजवळ आम्ही एकट्या जातच नाही. कुणी सोबत असावं आणि तिथून पटकन सटकता यासाठी प्रयत्न करतो,” त्या सांगतात.

शगुफ्ता यासमीन याही निवासी डॉक्टर. घटनेनंतर त्या भीतीनं घरी निघून गेल्या होत्या. जवळपास दोन महिन्यांनी परत आल्या.

बलात्कारानंतर न्यायाची मागणी करणारे आंदोलक

फोटो स्रोत, Getty Images

“माझ्या घरचे लोक सतत फोन करतात. रात्री ड्यूटी असते, तेव्हा भीती वाटू लागते. सीआयएसएफच्या सैनिकांना आम्ही पाहतो. तरीही भीती वाटते,” त्या म्हणतात.

बुधवारपासून 36 तासांची ड्युटी करणाऱ्या डॉक्टर श्रेया शॉ याही घरून सतत फोन येत असल्याचं बीबीसीशी बोलताना सांगतात.

“रात्री झोपण्याआधी ते सारखं फोन करून खोली व्यवस्थित लॉक करायला सांगतात. बाहेर सैनिक आहेत की नाही? एकटी आहेस की सोबत अजून कोणी आहे? असे अनेक प्रश्न विचारतात.”

आंदोलक डॉक्टरांचं म्हणणं काय?

या घटनेनंतर राज्यातले डॉक्टर उपोषणावर गेले होते.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या डॉक्टरांशी चर्चा केली आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचं आश्वासनही दिलं होतं.

मात्र, सरकारच्या आश्वासनावर विश्वास नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सीबीआयच्या तपासाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

कुटुंबियांना आपल्या सुरक्षेची काळजी असल्याचं निवासी डॉक्टर शगुफ्ता यासमीन सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणातलं प्राथमिक आरोपपत्र सीबीआयने सियालदहच्या विशेष न्यायालयात दाखल केलं आहे.

त्यात बलात्कार केल्याचा आरोप नागरी स्वयंसेवक संजय रॉय याच्यावर ठेवलाय.

यासोबत दुसऱ्या एका प्रकरणाबद्दलचं प्राथमिक आरोपपत्रही दाखल केलं आहे. त्या प्रकरणात सीबीआयने आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली प्राचार्य संदीप घोष यांना अटक केली होती.

या प्रकरणाचा वेगळा तपास सुरू आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC