Source :- ZEE NEWS

Egypt Pyramid Mystery Deepens: इजिप्तमध्ये एका पिरॅमिडखाली एक भव्य रचना लपलेल्याची थक्क करणारी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, पिरॅमिड्सखाली 3 हजार खोल्या आणि अनेक मार्गांनी बनलेली एका चक्रव्यूहासारखी रचना आढळून आली आहे. या दाव्यासंदर्भात 2023 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘द लॅबिरिंथ, द कोलोसी आणि द लेक’ या मथळ्याखालील संशोधनपर पेपरमध्येही संदर्भ देण्यात आलेला. या संशोधनावर आधारित अहवाल लिहिणाऱ्या लेखकांचे म्हणणे आहे की, त्यांना असे काही पुरावे सापडले आहेत की ज्यामध्ये इजिप्तमधील हवारा या पिरॅमिडखाली जमिनीमध्ये अति भव्य असे भूमिगत कक्ष आहेत. हवारा पिरॅमिड जगप्रसिद्ध गिझा पिरॅमिडसारखा दिसत नाही, मात्र तो तितकाच भव्य आणि रहस्यमयी असून या नव्या संशोधनामुळे त्याचं गूढ अधिक वाढलं आहे.

2500 वर्षांपूर्वीच दिसलेली पिरॅमिड्सखालील कथित चक्राकार रचना?

अशीही एक मान्यता आहे की पिरॅमिड्ससारख्या या अतिभव्य वास्तू प्राचीन इजिप्शियन लोकांच्या खूप आधीच्या काळातील एका प्रगत, संघटित समाजाने उभारल्या होत्या. इतिहासकार आणि भूगोलशास्त्रज्ञ हेरोडोटस हे सुद्धा आजपासून तब्बल 2500 वर्षांपूर्वी पिरॅमिड्सखालील कथित चक्राकार रचनेबद्दल बोलले होते. मात्र या पिरॅमिड्सखालील खोल्यांवर दुमत आहे. काही तज्ञांचे म्हणणे आहे की, वर्षानुवर्षे वापरल्या जाणाऱ्या डेटिंग पद्धतीमध्ये इजिप्तमधील जमिनीखाली अशा खोल्या अस्तित्वात असल्याच्या दाव्याला दुजोरा मिळत नाही. 

पिरॅमिड्सखाली आणि आजूबाजूला 3 हजार खोल्या

मात्र एकीकडे खरोखरच पिरॅमिड्सखाली अशा खोल्या आहेत की नाही यावरुन दुमतं असलं तरी अशा भूतकाळात रस असलेल्या आणि उत्खनन्नाची आवड असलेले अनेक लोक आता इजिप्तमध्ये येत आहेत. जमिनीखालील या चक्राकार रचना खरंच अस्तित्वात आहेत का हे शोधण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर हे उत्सुक संशोधक करत आहेत. रडार आणि उपग्रह स्कॅन यासारख्या माध्यमातून पिरॅमिड्सखालील जमिनीत नेमकं काय आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. अशाच एका संशोधनामधून या पिरॅमिड्सखाली आणि आजूबाजूला 3 हजार खोल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.

भव्यतेमध्ये पिरॅमिड्सपेक्षाही मोठ्या खोल्या

प्राचीन इतिहासकारांनीही पिरॅमिड्सखालील या चक्रारकार आणि शेवट नसलेल्या खोल्यांबद्दल लिहून ठेवलं आहे. अनेक दाव्यांनुसार या खोल्यांपैकी प्रत्येक खोली आकाराने त्यावर असलेल्या पिरॅमिडपेक्षाही भव्य आहे. हेरोडोटसने असाही दावा केला होता की, या रहस्यमयी चक्राकार रचनेतील खोल्या या “भव्यतेमध्ये पिरॅमिड्सपेक्षाही सरस आहेत.” मात्र या दाव्यावर वैज्ञानिकांचे एकमत झालेले नाही.

हेरोडोटस आहे कोण आणि त्याने कोणत्या संदर्भातून हे लिहिलं?

इसवी सनपूर्व 500 सालाच्या सुमारास हेरोडोटसने इजिप्तला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यावेळी स्थानिकांनी त्याला जमिनीवरील चक्रव्यूहकार रचना दाखवण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्याला भूगर्भामध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याने जे पाहिले आणि जे दाखवण्यात आले नाही त्याच्या आधारे असा दावा केला की तेथे 3 हजार खोल्या आहेत. यापैकी काही खोल्या वर आणि काही खाली असल्याचं त्याने लिहून ठेवलेलं. या कथित गूढ रचनेबद्दलचा हा पहिला लेखी अहवाल होता असं मानलं जातं. अनेक शतकांमध्ये हा दावा काळाच्या पडद्या आड जात राहिला.

प्राचीन सुरक्षा प्रणाली?

जमिनीवरील खोल्यांचा काही भाग इजिप्तवर आक्रमण करणाऱ्या आक्रमणकर्त्यांनी नष्ट केला. हवारा येथील पिरॅमिड आता गिझा पिरॅमिडइतका भव्य दिसत नाही. मात्र हवारा पिरॅमिडचा गाभा तीन मोठ्या दगडी ब्लॉक्सपासून बनलेला आहे. हे खडक प्राचीन सुरक्षा प्रणालींसारख्या मार्गांना बंद करणारे दाराचे सापळे होते असा दावा अहवाल आणि नोंदींमध्ये असल्याचं सांगितलं जातं. 

1800 च्या उत्तरार्धात मिळालेले संकेत पण…

इजिप्तवर अभ्यास करणारे सर फ्लिंडर्स पेट्री यांनी सन 1800 च्या उत्तरार्धात हवारा येथील पिरॅमिडखाली एक गुप्त जगा असल्याचे संकेत मिळाले होती. त्यांनी या चक्राकार रचनेचा पाया ओळखला होता. भव्य दगडी स्लॅब आणि ग्रिडसारख्या गोष्टींच्या त्यांनी नोंदीही केल्या होत्या. मात्र पाणी आणि तंत्रज्ञानाच्या कमतरतेमुळे ते जमिनीमध्ये अधिक खोलवर जाऊ शकले नव्हते असं सांगितलं जातं. 

त्या भव्य पुतळ्यांशी पिरॅमिड्सचा संबंध?

काहींना असा विश्वास आहे की जर सर फ्लिंडर्स पेट्री यांना योग्य स्रोत मिळाले असते तर त्यांनी या भूमिगत रचनेचा शोध घेतला असता. मात्र आज त्याबद्दल फक्त पुस्तकांमध्येच चर्चा होताना दिसते पण ते प्रत्यक्षात सापडलेले नाहीत. पिरॅमिड्सचा ईस्टर बेटावरील अतिभव्य दगडी पुतळ्यांशी एक गूढ संबंध असू शकतो, असं काही संशोधकांचे म्हणणे आहे. दोन्ही ठिकाणी जमिनीच्या वर महाकाय दगडी रचना आहेत आणि त्यांच्या उद्देशाबद्दल नेमकी ठोस माहिती आजही उपलब्ध झालेली नाही. काही पिरॅमिड्स ही थडगी असल्याचे मानले जात होते. मात्र सर्वच पिरॅमिड्स खडगी नाहीत याची आता शास्त्रांनाही खात्री पटल्याचं सांगिलं जातं. खरंच ईस्टर बेटांवरील संस्कृती आणि पिरॅमिड्स उभारणाऱ्या संस्कृतींमध्ये समान धागा आहे का? हे रहस्य अजूनही माणासाला उलगडलेलं नाही. विशेष म्हणजे ईस्टर बेटं आणि इजिप्तमधील अंतर हे 17480 किलोमीटर इतकं आहे. 

SOURCE : ZEE NEWS