Source :- BBC INDIA NEWS
- Author, रफी बर्ग
- Role, बीबीसी न्यूज
-
17 जानेवारी 2025
अपडेटेड 54 मिनिटांपूर्वी
इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर सुमारे 15 महिन्यांनी रविवारपासून गाझामध्ये शस्त्रसंधीला सुरुवात झाली आहे. हमासनं 15 महिन्यांपासून कैदेत असलेल्या तीन महिला बंदींची सुटका केली.
या शस्त्रसंधीमुळं आता इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबणार आहे. शस्त्रसंधीची सुरुवात कैदी आणि बंदींच्या देवाण-घेवाणीपासून झाली आहे.
इस्रायलच्या तुरुंगात कैदेत असलेल्या पॅलिस्टिनींच्या मोबदल्यात टप्प्या-टप्प्यानं इस्रायलच्या नागरिकांची सुटका केली जाणार आहे.
इस्रायलच्या सरकारनं हमासकडून त्यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या त्यांच्या बंदी असलेल्या तिन्ही नागरिकांची नावं जाहीर केली आहेत. हमासनं या तीन नागरिकांना रेड क्रॉसच्या कार्यकर्त्यांकडे सोपवलं.
या तीन महिलांमध्ये 24 वर्षीय रोमी गोनेन, 31 वर्षीय डोरोन स्टेनब्रेकर आणि 27 वर्षीय एमिली दमारी यांचा समावेश आहे.
इस्रायलच्या सरकारनं परतलेल्या तिन्ही नागरिकांचं स्वागत केलं आहे. तसंच त्यांच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे.
7 ऑक्टोबर 2023 ला हमास या पॅलेस्टाइनच्या सशस्त्र गटानं इस्रायलवर हल्ला केला तेव्हापासून हे युद्ध सुरू होतं.
किती ओलिसांची सुटका?
इस्रायल आणि हमास यांच्यात कोणकोणत्या गोष्टीवरून सहमती झाली ते अजून स्पष्ट झालेलं नाही.
मात्र, गुंता अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले. अनेक मुद्द्यांवरून अजूनही बोलणं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
गाझामधे सुरू असलेलं युद्ध बंद होईल आणि ओलिस ठेवलेल्या लोकांना सोडलं जाईल तेव्हा हा करार पूर्ण होईल.
2023 च्या ऑक्टोबरमध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. तेव्हा 251 लोकांना बंदी बनवलं होतं. सध्या हमासकडे 94 इस्रायली बंदी आहेत. मात्र, त्यापैकी फक्त 60 लोक जिवंत असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.
त्याच्या मोबदल्यात इस्रायल जवळपास 1000 पॅलिस्टिनी कैद्यांना सोडेल, असं म्हटलं जात आहे. हे कैदी गेली अनेक वर्ष इस्रायलच्या कारागृहात बंदिस्त होते.
युद्धविरामाच्या तीन पायऱ्या
कराराची घोषणा झाल्यानंतर युद्धबंदी तीन पायऱ्यांमध्ये लागू केली जाईल. रविवारपासून करार लागू केला जाईल असं कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी म्हटलंय.
आता हा करार कसा पुढे जाईल ते समजून घेऊ.
पहिली पायरी
पहिले सहा आठवडे या प्राथमिक पायरीवर काम केलं जाईल असं अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी सांगितलं. त्यात संपूर्ण युद्धबंदी केली जाईल असं ते म्हणाले.
या प्रक्रियेत हमास ओलिसांना सोडेल तर इस्राईल पॅलेस्टिनी कैदींना सोडेल. मात्र, किती ओलिसांना सोडलं जाईल हे बायडन यांनी स्पष्ट केलं नाही.
हा आकडा 33 असल्याचं कतारच्या पंतप्रधानांनी बुधवारी संध्याकाळी बोलताना सांगितलं.
या 33 लोकांमध्ये काही लहान मुलंही असल्याचं इस्रायल सरकारचे प्रवक्ते डेव्हिड मेन्सर यांनी याआधी म्हटलं होतं.
त्यातील तीन लोकांना त्वरीत सोडलं जाईल आणि नंतर उर्वरित लोकांची येत्या 6 आठवड्यात पॅलेस्टिनी कैद्यांबरोबर अदला-बदली केला जाईल, असं एका पॅलिस्टिनी अधिकाऱ्याने बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
या पायरीवर गाझातील सगळ्या रहिवासी भागातून इस्रायली सैन्य मागं बोलावलं जाईल, असं बायडन यांनी म्हटलंय. सोबतच, पॅलिस्टिनी लोक गाझामध्ये त्यांच्या घरात परत जाऊ शकतील.
इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझातले जवळपास 23 लाख लोक विस्थापित झाले आहेत.
याशिवाय, गाझामध्ये मानवाधिकारासंबंधी मदतीची वाढ केली जाईल आणि दररोज मदत घेऊन जाणाऱ्या शेकडो ट्रकला तिथे जाण्याची परवानगी दिली जाईल.
दुसऱ्या आणि तिसऱ्या पायरीची प्रक्रिया युद्धबंदीनंतर 16 व्या दिवशी सुरू होईल असं एका पॅलिस्टिनी अधिकाऱ्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं.
दुसरी पायरी
दुसऱ्या पायरीत युद्ध होऊच नये, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या पायरीवर उर्वरित ओलिस, बंदी आणि पॅलिस्टिनी कैंद्यांना मुक्त केलं जाईल.
एकूण 1,000 पॅलिस्टिनी कैद्यांना सोडणार असल्याचं इस्रायलने मान्य केलं आहे, असं म्हटलं जातंय. त्यातील 190 कैदी 15 वर्ष किंवा त्यापैक्षा जास्त वर्ष शिक्षा भोगत आहेत.
खूनाच्या आरोपाखाली अटक केलेल्या लोकांना सोडलं जाणार नाही, असं एका इस्रायली अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं. याशिवाय, गाझामधून इस्रायली सैन्य पूर्णपणे मागे घेतलं जाईल.
तिसरी पायरी
तिसऱ्या आणि शेवटच्या पायरीत गाझाचं पुर्नवसन केलं जाईल. यासाठी अनेक वर्ष लागतील. या पायरीत हमासच्या कैदेत असताना मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे मृतदेहही इस्रायलकडे सुपूर्त केले जातील.
करारामधले निरुत्तरित प्रश्न
इस्रायल आणि हमासचा एकमेकांवर अजिबात विश्वास नाही. त्यांच्यामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टींवर सहमती झाली आहे, ती मिळवण्यासाठी अनेक महिने तडजोडी कराव्या लागल्यात
ओलिस ठेवलेल्या लोकांना सोडण्याआधी हमासला युद्ध पूर्णपणे संपवायचं होतं. पण इस्रायलला ते मान्य नव्हतं. दोन्ही पक्ष युद्धबंदीच्या अटींवर चर्चा करत असताना युद्ध पूर्णपणे बंद असेल.
युद्ध कायमचं थांबणार का?
याबाबत अजूनही पुरेशी स्पष्टता नाही.
हमासचं सैन्य आणि प्रशासकीय क्षमता नष्ट करणं हा इस्रायलचा युद्ध करण्यामागचा मुख्य उद्देश होता. त्याप्रमाणे इस्रायलने हमासचं भरपूर नुकसान केलं आहे. तरीही, पुन्हा स्वतःच्या पायांवर उभं रहायची क्षमता हमासकडे आहे.
हमासचे किती कैदी जिंवत आहेत आणि किती नाहीत हेही स्पष्ट झालेलं नाही. शिवाय, इस्रायल सरकारही ज्यांच्या शोधात आहे अशा हरवलेल्या कैदींची माहिती हमासकडे आहे, की नाही तेही अस्पष्ट आहे.
काही कैद्यांना सोडण्याची मागणी हमासने स्वतः केली आहे. मात्र, त्यांना सोडणार नसल्याचं इस्रायलने सांगितलं आहे.
यात 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यातील काही आतंकवादीही सामील असल्याचं म्हटलं जातंय.
बफर झोनचं काय होणार?
एखादा दिवस ठरवून इस्रायल बफर झोनमधून बाहेर पडण्यास सहमती दाखवेल, की नाही हेही स्पष्ट झालेलं नाही.
यापूर्वी इस्रायल आणि हमास यांच्यामधला युद्धविराम थोड्या झटापटीनंतर लगेचच संपुष्टात आला होता. यावेळीही पुन्हा युद्ध सुरू होण्यासाठी एखादी छोटीशी घटनाही पुरेशी ठरू शकते.
कसा लागू होणार करार?
अमेरिका आणि कतारने कराराची घोषणा केली असली, तरी इस्रायच्या मंत्रिमंडळाकडून त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही. मात्र, इस्रायलमध्ये डाव्या विचारसरणीची सत्ता असल्याने त्यासाठी फार अडचण येणार नाही असं म्हटलं जात आहे.
मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी सकाळी होण्याची शक्यता होती. त्याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हा करार यशस्वी होईल, असा पूर्ण विश्वास वाटत असल्याचं कतारचे पंतप्रधान अल-थानी म्हणाले. “अमेरिका, इजिप्त आणि कतार या कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल, ” असंही त्यांनी सांगितलं आहे.
गाझावर कोणाचं राज्य?
युद्धबंदीनंतर गाझावर कोण राज्य करणार हा सगळ्यात मोठा अनुत्तरित प्रश्न आहे.
कायद्यानं गाझावर राज्य करण्याचा अधिकार पॅलिस्टिनी प्रशासनाचा असेल असं बुधवारी कराराची घोषणा करण्यापूर्वी पॅलेस्टाइनचे पंतप्रधान मोहम्मद मुस्तफा म्हणाले होते.
इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पश्चिमेकडच्या काही भागावर प्रशासनाचं राज्य आहे. मात्र, गाझावर हमासचं किंवा पॅलिस्टिनी प्रशासनाचं राज्य असावं असं इस्रायलला वाटत नाही.
गाझावर आपलं नियंत्रण असावं अशी इस्रायलची इच्छा आहे.
म्हणूनच अमेरिका आणि कतारसोबत इस्रायल गाझावर शासन करण्यासाठी एका तात्पुरत्या समितीची स्थापन करण्याबाबत चर्चा करत आहे. मात्र, याच समितीला गाझावर राज्य करणाऱ्या नव्या सरकारचं स्वरूप येऊ शकतं.
7 ऑक्टोबर 2023 ला गाझात काय झालं होतं?
हमासच्या शेकडो सैनिकांनी दक्षिण इस्रायलवर अभुतपूर्व हल्ला केला होता. सीमेवरच्या तारा तोडून दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले. पोलीस स्टेशन, सैन्याची तळं आणि अनेक वस्त्यांवरही त्यांनी हल्ला चढवला.
या हल्ल्यात जवळपास 1200 लोक मारले गेले आणि 250 हून जास्त लोकांना बंदी बनवून गाझात आणलं गेलं. हमासने इस्रायलवर हजारो रॉकेटही सोडले.
याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायने पहिले हवाई मार्गेने आणि मग जमिनीवरून आक्रमण करत मोठ्या संख्येनं सैन्य पाठवलं.
तेव्हापासून इस्रायल गाझावर हल्ले करत आहे. हमासही इस्रायलवकर रॉकेट हल्ला करण्याची एकही संधी सोडत नाही.
इस्रायलच्या सततच्या हल्ल्यांनी गाझा उद्ध्वस्त झालंय. तिथे अन्न, पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा गंभीर तुटवडा जाणवत आहे.
आंतरराष्ट्राय संस्थांनाही गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत.
गाझातल्या हमासच्या आरोग्य विभागानुसार इस्रायलच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 46,700 पेक्षा जास्त लोक मारले गेलेत. यात बहुतेक सामान्य नागरिकांचा समावेश आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC