Source :- BBC INDIA NEWS

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Published

वाचन वेळ: 3 मिनिटे

उत्तर-पश्चिम भारतात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह सुरू असलेल्या पावसामुळे तापमानातील उष्णतेत घट झाली. त्यामुळे नागरिकांना कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

यासह राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली तसेच लगतच्या नैऋत्य उत्तर प्रदेशात काही भागांमध्ये कमाल तापमानात 2 ते 8 अंश सेल्सिअससची घट नोंदवण्यात आली आहे. अशीच घसरण किनारी आंध्र प्रदेश आणि यानाममध्येही पाहायला मिळाली.

एकीकडे उत्तर भारतातील तापमानात घट झाली असतानाच, मध्य भारत, पूर्व भारतासह महाराष्ट्राच्या काही भागात मात्र, अजूनही उन्हाचा तडाखा कायम आहे. महाराष्ट्रातील काही भागांत 40 ते 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं जात आहे.

असं असलं तरी, महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सूनपूर्व हवामानाची सुरुवात झाली आहे. आज (31 मे) मुंबईच्या काही भागांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. या रिमझिम पावसामुळे नागरिकांना उष्णता आणि दमटपणापासून काहिसा दिलासा मिळाला आहे.

पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील काही भागात वादळी पावसाच्या शक्यतेचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवला आहे.

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईने 30 मे रोजी सांगितलं की, “उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि 40-50 किमी प्रति तास वेगाने वाहणारे सोसाट्याचे वारे होण्याची दाट शक्यता आहे.”

दरम्यान, यंदाच्या हंगामासाठीचा सुधारीत म्हणजे दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागानं शुक्रवारी 29 मे रोजी जाहीर केला होता. हवामानाचा हा अंदाज संपूर्ण हंगामासाठीचा आणि संपूर्ण देशभरासाठीचा आहे. यात (± 4%) फरक पडू शकतो.

देशातील इतर भागात काय स्थिती?

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम भारतातील बहुतांश भाग, मध्य आणि पूर्व भारतातील काही प्रदेश तसेच किनारी आंध्र प्रदेश व यानममध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 ते 8 अंश सेल्सिअसने कमी राहिले.

तर, दुसरीकडे पंजाबच्या उत्तरेकडील भागांमध्ये, हरियाणा, चंदीगड आणि दक्षिण-पश्चिम हिमाचल प्रदेशाच्या काही भागांमध्ये तापमानात सरासरीपेक्षा तब्बल 8 ते 15 अंश सेल्सिअसची घट नोंदवण्यात आली. त्यामुळे उत्तर भारतातील नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी हवामान विभागाने काही भागांत मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा कायम ठेवला आहे.

जूनमध्ये असं असेल हवामान

जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

तापमान

फोटो स्रोत, IMD

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी यंदा जूनमध्येही नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये जास्त दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जास्त आहे.

जुलै महिन्यासाठीचा अंदाज हवामान विभाग जून महिन्याच्या अखेरीस वर्तवेल.

एल निनोचा परिणाम

मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज वर्तवण्यासाठी काही वातवरणीय परिस्थिती आणि घटनांचा आधार घेतला जातो.

त्यातल्या तीन प्रमुख गोष्टी म्हणजे एल निनो, इंडियन ओशन डायपोल आणि उत्तर गोलार्धातील हिमवर्षाव.

एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी या भागातजमा होते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो.

साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.

सध्या पॅसिफिक महासागरातलं तापमान न्यूट्रल स्थितीत आहे, पण वेगानं तिथे एल निनो तयार होत असून, यंदा नेहमीपेक्षा जास्त तीव्र एल निनो तयार होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

एल निनो

फोटो स्रोत, Getty Images

इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आणि पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.

IOD सकारात्मक असतो, म्हणजे हिंदी महासागराच्या पश्चिम भागाचं, आफ्रिकेजवळचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतातमान्सूनला पोषक ठरताना दिसते.

यंदा सकारात्मक IOD तयार होण्याची शक्यता तर आहे, मात्र त्याची तीव्रता कमी असेल, असं भाकित काही हवामान मॉडेल्सनी वर्तवलं आहे.

मान्सूनवर परिणाम करणारी आणखी गोष्ट म्हणजे उत्तर गोलार्धात वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव. हा हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.

याशिवाय जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC