Source :- BBC INDIA NEWS

सांकेतिक छायाचित्र

फोटो स्रोत, Daniel Arce-Lopez/BBC

ब्राझीलच्या रिओ दि जनेरोमध्ये जेव्हा पोलीस कोकेन आणि चरसचा साठा जप्त करतात, तेव्हा त्यांना जप्त केलेल्या पॅकेट्सवर ‘स्टार ऑफ डेव्हिड’ हे धार्मिक चिन्ह छापलेलं दिसतं.

ज्यूंच्या या पवित्र चिन्हाचा धार्मिक श्रद्धेशी काहीही संबंध नाही. याचा संबंध पेंटेकोस्टल ख्रिश्चनांशी आहे. त्यांच्या मते, ज्यू इस्रायलमध्ये परतल्यावर ख्रिस्त दुसऱ्यांदा प्रकट होईल.

रिओमध्ये ड्रग्जचा व्यवसाय करणाऱ्या शक्तिशाली टोळीचं नाव ‘प्युअर थर्ड कमांड’ असं आहे.

ही टोळी आपल्या विरोधकांना ‘गायब’ करते, असं सर्वत्र बोललं जातं. इव्हँजेलिकल ख्रिश्चन धर्मानुसार, या टोळीच्या धार्मिक श्रद्धा खूप कट्टरपंथी आहेत.

‘इव्हँजेलिकल ड्रग डीलर्स’ हे पुस्तक लिहिणाऱ्या धर्मतज्ज्ञ व्हिव्हियन कोस्टा यांच्यानुसार, या टोळीच्या प्रमुखाला ‘ईश्वराकडून मिळालेल्या ज्ञानानंतर’ शहराच्या उत्तरेकडील पाच भागांवर नियंत्रण मिळवले आहे.

या टोळीच्या म्होरक्याने त्यांच्या ठिकाणाला ‘इस्रायल कॉम्प्लेक्स’ असं नाव दिलं आहे.

या टोळीचे लोक स्वत:ला ‘गुन्हेगारीचे सैनिक’ म्हणतात आणि ज्या भागावर त्यांचं नियंत्रण आहे, त्याचा मालक येशू ख्रिस्त असल्याचं मानतात, असे व्हिव्हियन कोस्टा सांगतात.

काही लोक या लोकांना ‘नार्को-पेंटेकोस्टल’ असंही म्हणतात.

रायफल आणि बायबल

पास्टर डिएगो नॅसिमेंटो यांना गुन्हेगारी आणि चर्च या दोन्ही गोष्टींचा अनुभव आहे. एका बंदुकधारी गँगस्टरच्या सांगण्यावरूनच त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता, असं ते सांगतात.

नासिमेंटोला पाहून कुणाचाही विश्वास बसणार नाही की, मुलासारखा दिसणारा आणि नेहमी हसतमुख राहणारा 42 वर्षीय व्यक्ती एकेकाळी गुन्हेगारी टोळी ‘रेड कमांड’चा भाग होता.

गुन्हेगारी टोळीतील काही कृत्यांमुळं नासिमेंटो यांनी 4 वर्षे तुरुंगात घालवली. असं असूनही ते गुन्हेगारीच्या दुनियेतच अडकून राहिले. मात्र, कोकेनच्या व्यसनामुळे त्यांना टोळीतून बाहेर काढण्यात आलं. यानंतर त्यांनी गुन्हेगारी जग सोडण्याचा निर्णय घेतला.

सांकेतिक छायाचित्र

फोटो स्रोत, Daniel Arce-Lopez/BBC

ते म्हणतात, “मी माझं कुटुंब गमावलं आणि जवळजवळ एक वर्ष रस्त्यावरच रहावं लागलं. मी कोकेन घेण्यासाठी माझ्या घरातील सामानही विकलं.”

त्यावेळी शहरातील व्हिला केनेडी परिसरातील एका मोठ्या ड्रग्ज विक्रेत्याने त्याच्याशी संपर्क केला होता.

लाल रेष
लाल रेष

नासिमेंटो सांगतात की, त्यांनी मला धार्मिक शिक्षण देणं सुरू केलं आणि या सर्व गोष्टींतून बाहेर पडण्याचा मार्ग असल्याचं सांगत ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास सांगितलं.

पास्टर नासीमेंटो आजही गुन्हेगारांबरोबर वेळ घालवतात. मात्र, हा वेळ ते तुरुंगात घालवतात आणि गुन्हेगारांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात.

त्यांचं जीवनही एका गुन्हेगारानेच बदललं होतं. मात्र, नासिमेंटो ‘धार्मिक गुन्हेगार’ शब्द योग्य मानत नाहीत.

ते म्हणतात, “मी त्यांना केवळ चुकीच्या मार्गावर गेलेल्या सामान्य लोकांप्रमाणेच बघतो. मात्र, त्यांना देवाची भीती आहे आणि त्यांना माहिती आहे की देवच त्यांचं रक्षण करतो.”

“‘इव्हँजिकल आणि गुन्हेगार यांना तुम्ही एकत्र करू शकत नाही. एखादी व्यक्तीनं ख्रिस्ताला स्वीकारलं आणि पवित्र आदेशांचं पालन केलं, तर तो कधीही ड्रग्जचा व्यवसाय करू शकत नाही.”

‘भीतीच्या छायेतलं आयुष्य’

या दशकाच्या अखेरीस पेन्टेकोस्टल ख्रिश्चन समुदाय ब्राझीलमधील कॅथोलिक समुदायाला मागे टाकून लोकसंख्येनुसार सर्वात मोठा धार्मिक गट बनेल.

वेगवेगळ्या टोळ्यांच्या प्रभावाखाली असलेल्या भागातले लोक यात अधिक रस घेत आहेत. यातील काही टोळ्या श्रद्धांचा वापर करून सत्ता मिळवत आहेत.

गुन्हेगारांवर आरोप आहे की, ते आफ्रिकन वंशाच्या ब्राझिलियन समुदायाविरुद्ध हिंसाचार करत आहेत.

रिओमधील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका क्रिस्टिना व्हिटाल सांगतात की, शहरातील गरीब समुदाय बऱ्याच काळापासून गुन्हेगारांनी घेरलेल्या अवस्थेत जगत आहे आणि आता त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावरही परिणाम होत आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, “इस्रायल कॉम्प्लेक्समधील इतर धार्मिक श्रद्धांवर विश्वास ठेवणारे लोक त्याबद्दल जाहीरपणे बोलू शकत नाहीत.”

सांकेतिक छायाचित्र

फोटो स्रोत, Daniel Arce-Lopez/BBC

व्हिटाल म्हणतात की, आसपासच्या भागातील आफ्रिकन वंशाच्या ब्राझिलियन समुदायांची धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली आहेत. काही गुन्हेगारी घटक अनेकदा त्यांच्या भिंतींवर ‘येशू इथला ईश्वर आहे’ असं लिहितात.

डॉ. रीटा सलीम या रिओ पोलिसांमध्ये वंश आणि असहिष्णुतेशी संबंधित गुन्हे विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, ड्रग्ज टोळ्यांकडून धमक्या आणि हल्ले यांचे दूरगामी परिणाम होतात.

“ही प्रकरणे अधिक गंभीर आहेत. कारण त्यांच्यामागे गुन्हेगारी टोळी किंवा तिचा म्होरक्या असतो. त्याची संपूर्ण परिसरात भीती असते,” असं डॉ. रीटा यांचं म्हणणं आहे.

त्या पुढे म्हणतात की, ‘इस्रायल कॉम्प्लेक्स’मधील कथित टोळीच्या नेत्यासाठी अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. त्या नेत्यावर आरोप आहे की, त्याच्या आदेशानुसार सशस्त्र लोकांनी आफ्रिकन वंशाच्या ब्राझिलियन लोकांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले केले.

‘नव धर्मयुद्ध’

धार्मिक विविधतेचे तज्ज्ञ मार्सिओ डी जगून यांच्या मते, 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला रिओमध्ये धार्मिक कट्टरतेचे आरोप येऊ लागले आणि अलीकडच्या काळात ही समस्या अनेक पटींनी वाढली आहे.

जगून हे कंडोंबल धर्माचे धर्मगुरू आहेत. के म्हणतात की, ही राष्ट्रीय स्तरावरील समस्या बनली आहे आणि ब्राझीलच्या इतर शहरांमध्येही असे हल्ले दिसून आले आहेत.

त्याला ते ‘नियो क्रुसेड’ म्हणतात. त्यांच्या मते, “या हल्ल्यांमुळे धार्मिक आणि वांशिक शोषण होते. गुन्हेगार आफ्रिकन धर्मांना अनैतिक म्हणून चित्रित करतात आणि देवाच्या नावाने वाईटाशी लढत असल्याचा दावा करतात.”

धार्मिक विषयांचे तज्ज्ञ व्हिव्हियन कोस्टा म्हणतात की, ब्राझीलमध्ये धर्म आणि गुन्हेगारी यांची सांगड काही नवीन नाही. भूतकाळात, गुन्हेगारांनी आफ्रिकन-ब्राझिलियन देवता आणि कॅथोलिक संतांकडून संरक्षण मागितले.

ते म्हणतात, “रेड कमांड किंवा थर्ड कमांडची सुरुवात बघितली तर आफ्रो आणि कॅथलिक धर्म इथे सुरुवातीपासूनच आहेत. म्हणूनच याला नार्को-पेंटेकोस्टल म्हणतात, म्हणजेच गुन्हेगारी आणि धर्म यांचा पारंपरिक संबंध.”

धर्म आणि गुन्हेगारी यांच्या जोडीला कोणतेही नाव दिले तरी सत्य हेच आहे की, ते ब्राझीलच्या संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC