Source :- BBC INDIA NEWS

माजी डीजीपी ओम प्रकाश यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. (संग्रहित छायाचित्र)

फोटो स्रोत, Bangalore News Photos

कर्नाटकमधील माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांची रविवारी (20 एप्रिल) त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी ओमप्रकाश यांच्या पत्नीला अटक करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

या हत्येप्रकरणी ओमप्रकाश यांच्या मुलीचीही पोलीस चौकशी करत आहेत. त्यांचा मुलगा कार्तिकेश याने याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता.

“आई पल्लवी आणि बहीण कृती नैराश्याने ग्रस्त होत्या आणि त्या दररोज वडिलांशी भांडत असत. या दोघींचा माझ्या वडिलांच्या हत्येत सहभाग असल्याचा मला संशय आहे,” असं कार्तिकेश यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रँचकडे (गुन्हे शाखा) सोपवण्यात आला आहे.

‘घरात बाहेरची कुणीही व्यक्ती नव्हती’

68 वर्षांचे ओमप्रकाश हे 2015 ते 2017 या काळात कर्नाटकचे पोलीस महासंचालक होते. त्यांच्या हत्येमुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

एखाद्या निवृत्त डीजीपी स्तराच्या अधिकाऱ्याची हत्या होण्याची राज्याच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. ते 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.

बंगळुरूचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (एसीपी) विकास कुमार यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं की, “माजी डीजीपी यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्या मुलीचीही सखोल चौकशी केली जात आहे.”

Photo Caption- कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची रविवारी त्यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली होती.

फोटो स्रोत, ANI

याआधी, आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी हिंदीला सांगितलं होतं की, “त्यांच्या (माजी डीजीपींच्या) पत्नी किंवा मुलगी यापैकी एक किंवा दोघीही या हत्येत सहभागी आहेत. कारण त्यावेळी घरात कोणीही बाहेरचा माणूस उपस्थित नव्हता.”

राज्याच्ये आणखी एक माजी डीजीपी, ज्यांच्या हाताखाली ओम प्रकाश यांनी कनिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणून काम केलं होतं, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं, “त्यांच्या वैवाहिक जीवनात वाद होते, ही गोष्ट स्पष्ट होती. कारण पल्लवी आमच्या काही सहकाऱ्यांच्या पत्नींकडे याबाबत तक्रार करत असत, माझ्या पत्नीलाही या गोष्टी सांगत. पण जे काही घडलं, ते पूर्णपणे धक्कादायक आहे.”

मुलानं काय सांगितलं?

पल्लवीने एका निवृत्त डीजीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीला फोन करून याबाबत माहिती दिली, तेव्हा पोलिसांना या हत्येची माहिती मिळाली. त्यानंतर या निवृत्त अधिकाऱ्यानं तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

कार्तिकेशने आपल्या तक्रारीत म्हटलं की, “माझी आई गेल्या एक आठवड्यापासून माझ्या वडिलांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होती. माझे वडील त्यांची बहीण सरिता कुमारीसोबत राहत होते. कृती 18 एप्रिलला आत्या सरिता कुमारी यांच्या घरी गेली होती आणि वडिलांवर घरी परतण्यासाठी दबाव टाकला होता.”

ओमप्रकाश आपल्या कुटुंबासह एका तीन मजली घरात राहत होते, जिथे प्रकाश आणि त्याची पत्नी तळमजल्यावर राहत होते. तर कार्तिकेश आणि त्यांची पत्नी पहिल्या मजल्यावर आणि कृती दुसऱ्या मजल्यावर राहत होती.

रविवारी सायंकाळी कार्तिकेश हे गोल्फ कोर्सवर होते, तेव्हा सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांना शेजारच्या व्यक्तीचा फोन आला आणि त्यांचे वडील घराच्या फरशीवर पडलेले असल्याची माहिती त्यांनी दिली.

सायंकाळी सुमारे पावणे सहाच्या सुमारास आपण घरी पोहोचल्याचे कार्तिकेश यांनी सांगितले.

अजूनही तपास सुरू आहे

कार्तिकेश म्हणाले, “मी पाहिलं की पोलीस आणि इतर लोक घराच्या आसपास जमले होते आणि माझ्या वडिलांच्या शरीराभोवती रक्त पसरले होते. त्यांच्या डोक्याजवळ एक चाकू आणि बाटली पडली होती.”

या कथित हत्येपूर्वी त्यांच्यात काही वाद झाला होता का? या प्रश्नावर एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, “कुटुंबातील नातेसंबंधांबद्दल मिळालेल्या माहितीवरून याचा फक्त अंदाज बांधता येऊ शकतो. कारण या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.”

बंगळुरूचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार यांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

फोटो स्रोत, ANI

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी पत्रकारांना सांगितलं की, “सुरुवातीच्या माहितीवरून असं दिसतं की, ओमप्रकाश यांच्या पत्नीने हा गुन्हा केला आहे. परंतु, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. संपूर्ण माहितीसाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.”

प्रकाश हे 2015 मध्ये डीजीपी असताना त्यांच्यासोबत काम केल्याची आठवण परमेश्वर यांनी यावेळी सांगितली.

“ते एक चांगले अधिकारी आणि चांगले व्यक्ती होते. असं घडायला नको होतं. या प्रकरणाची चौकशी झाल्यावर सर्व काही उघड होईल,” असंही त्यांनी म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC