Home LATEST NEWS ताजी बातमी कुनोच्या जंगलात चित्त्याला गोळी कोणी मारली? शरीरातून 5 छर्रे बाहेर, केंद्राकडून तपास...

कुनोच्या जंगलात चित्त्याला गोळी कोणी मारली? शरीरातून 5 छर्रे बाहेर, केंद्राकडून तपास सुरू

5
0

Source :- BBC INDIA NEWS

भारतामध्ये चित्त्यांना पुन्हा आणून त्यांची संख्या वाढवण्याचा प्रकल्प 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता. (फाइल फोटो)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी चित्ता पुनर्वसन प्रकल्पांतर्गत भारतात आणलेल्या चित्त्यांपैकी एका 19 महिन्यांच्या चित्त्याचा गोळीचे छर्रे लागल्याने मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात असलेल्या मादी चित्ता निर्वाच्या 19 महिन्यांच्या केएनजी22 या नर बछड्याच्या शरीरातून शस्त्रक्रियेदरम्यान गोळीचे 5 छर्रे काढण्यात आले.

या घटनेनंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय पथक पाठवलं आहे.

पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, या पथकात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) वन महानिरीक्षक, वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाचे अतिरिक्त संचालक आणि या विभागाचे प्रादेशिक उपसंचालकांचा समावेश आहे.

मध्य प्रदेश सरकारनेही वन आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक विशेष तपास पथक तयार केले आहे.

भारतात चित्त्यांची संख्या वाढवणं, त्यांचं संरक्षण करणं आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणं यासाठी 2022 पासून चित्ता पुनर्वसन प्रकल्प राबवला जात आहे. नेमकं अशा वेळी ही घटना घडली आहे.

अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

मध्य प्रदेशच्या वन विभागातील वन्यजीव विभागाच्या प्रमुख आणि मुख्य वन्यजीव रक्षक डॉ. समिता राजौरा यांनी बीबीसीला सांगितलं, “केएनजी22 हा चित्ता 25 ऑक्टोबरला श्योपूर वन विभागातील कंपार्टमेंट क्रमांक 748 या भागात जखमी अवस्थेत आढळला होता. आम्ही त्याला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.”

राजौरा यांच्या मते, “सुरुवातीच्या एक्स-रेमध्ये चित्त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांत काही बाहेरील वस्तू दिसल्या. त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू केले. तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर या जखमी चित्त्याला जबलपूर येथील नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विज्ञान विद्यापीठात पाठवण्यात आले. तिथे शस्त्रक्रिया आणि रेडिओलॉजी विभागात चित्त्याच्या शरीरातून बंदुकीचे 5 छर्रे काढण्यात आले.”

रेडिओ कॉलरच्या मदतीने चित्त्यावर सतत लक्ष ठेवले जात असतानाही ही घटना घडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. (फाइल फोटो)

या प्रकरणाचा वेगवेगळ्या बाजूंनी तपास केला जात आहे, असं राजौरा यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं.

त्या म्हणाल्या, “हा परिसर पूर्वीपासूनच संवेदनशील आहे. काही काळापूर्वी तिथे बिबट्यांची शिकार झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे चित्त्याची शिकार करण्याच्या उद्देशाने त्याला गोळी मारली का, की आपल्या जनावरांचा बचाव करण्यासाठी एखाद्या गावकऱ्याने हे कृत्य केलं, हा पण तपासाचा विषय आहे.”

राजौरा यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक चित्त्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र पथक नेमलेलं आहे. हे पथक रेडिओ कॉलरच्या सिग्नलच्या मदतीने चित्त्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवतं.

गोळीबाराचा आवाज या पथकाला का ऐकू आला नाही आणि रेडिओ कॉलरच्या सिग्नलवरून चित्त्याचा मागोवा घेताना काही चूक झाली का, याचीही तपास पथक चौकशी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्राने तपास पथक पाठवले

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 28 ऑक्टोबरला या प्रकरणाच्या तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक पाठवण्यात आल्याची माहिती दिली.

हे पथक घटनेची परिस्थिती आणि उपलब्ध पुरावे तपासून घेईल. तसेच, मध्य प्रदेशच्या वन विभागाशी चर्चा करून पुढील कारवाईबाबत शिफारस करेल.

केंद्र सरकारने सांगितलं की, हे पथक तपासाचा अहवाल आणि शिफारसी मंत्रालयाकडे सादर करेल. त्यानुसार राज्य सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांना पुढील सूचना दिल्या जाऊ शकतात.

मध्य प्रदेशातील वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी या प्रकरणावरून वन विभागाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बीबीसीशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, “रेडिओ कॉलर लावलेल्या चित्त्याचे ठिकाण शिकाऱ्यांना कसे समजले? आणि त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेले पथक त्यावेळी कुठे होते?”

दुबे यांनी आरोप केला की, या भागात यापूर्वीही बिबट्यांची शिकार झाल्याच्या घटना घडल्या होत्या. परंतु, त्यातून वन विभागाने कोणताही धडा घेतल्याचे दिसत नाही.

चित्ता

दुबे यांच्या म्हणण्यानुसार, 2025 आणि 2026 मध्ये या मोठ्या जंगल परिसरात आंतरराज्यीय शिकारी टोळ्या पकडल्या होत्या. तरीही येथील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

कुनो, श्योपूर आणि मुरैनाच्या परिसरातील जंगलांमध्ये यापूर्वीही बिबट्यांची शिकार झाल्याच्या संशयावरून तपास करण्यात आला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला समोर आलेल्या वृत्तांनुसार, या भागात बिबट्यांची हत्या करून त्यांचे अवयव तस्करीसाठी पाठवणाऱ्या कथित टोळीची चौकशी करण्यात आली होती. या प्रकरणी अनेकांना अटक झाल्याचे वृत्तही आले होते.

वन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, “चित्त्याला कोणत्या प्रकारच्या शस्त्राने जखमी केले गेले, गोळी कोणी झाडली आणि चित्त्यावर जाणीवपूर्वक हल्ला करण्यात आला होता का, याचा शोध घेणं यालाच सध्या प्राथमिकता आहे.”

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केएनजी22 या चित्त्याच्या मृत्यूनंतर भारतातील चित्त्यांची एकूण संख्या 58 झाली आहे. यापैकी 52 चित्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात, 4 गांधी सागर वन्यजीव अभयारण्यात आणि 2 वीरांगना दुर्गावती व्याघ्र प्रकल्पामध्ये आहेत.

भारतात चित्त्यांना पुन्हा आणण्याचा प्रकल्प सप्टेंबर 2022 मध्ये सुरू झाला. त्यावेळी नामिबियातून 8 चित्ते भारतात आणण्यात आले. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते आणण्यात आले होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC