Source :- BBC INDIA NEWS
सह्याद्रीच्या खोऱ्यात वाघांच्या डरकाळ्या पुन्हा घुमण्यासाठी गेली 14 वर्षे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांना काहीसं यश आलं आहे, असं चिन्ह आता दिसतं आहे. पूर्वी सह्याद्रीच्या राधानगरी पट्ट्यात आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिसणारे वाघ आता कोकणातही दिसत आहेत.
वाईल्ड लाईफ कॅान्झर्वेशन ट्रस्ट आणि वनविभागानं कॅमेरा ट्रॅपद्वारे केलेल्या मोजणीनुसार कोकण ते चांदोली अभयारण्याच्या पट्ट्यात 12 वाघांची नोंद झाली आहे. यातला सकारात्मक आणि महत्त्वाचा भाग म्हणजे यात बछड्यांचाही समावेश आहे.
पश्चिम घाटातलं वाघांचं अस्तित्व कमी होतंय असं म्हणलं जात असताना झालेली ही नोंद सकारात्मक मानली जात आहे.
पश्चिम घाटातली वाघांची संख्या का ठरतेय काळजीचं कारण?
केरळपासून गुजरातपर्यंत पसरलेला पश्चिम घाट वन्य प्राण्यांसाठी खजिना मानला जातो. भारताचा 6 टक्के भूभाग असणाऱ्या या भागात देशभरातील एकूण वन्यप्राण्यांपैकी 30 टक्के प्राणी, पक्षी, कीटक आणि मासे आढळतात. त्यातही हा भाग हत्ती आणि वाघांचा अधिवास म्हणून ओळखला जातो.
जवळपास 18 टक्के वाघांचा अधिवास हा पश्चिम घाटात असल्याची नोंद आहे. उत्तर पश्चिम घाटाचा भाग असणाऱ्या महाराष्ट्राच्या पट्ट्यातही पुर्वी वाघ आढळायचे.
कर्नाटकातील काली वाईल्डलाईफ सँक्च्युअरी ते गोवा मार्गे कोकण आणि सह्याद्री हा त्यांचा भ्रमणमार्ग. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये हा अधिवास धोक्यात आल्याची चिन्हं दिसत होती.
2022 च्या नॅशनल टायगर कॅान्झर्वेशन अथॅारिटीच्या स्टेटस ऑफ टायगर आणि कोप्रेडेटर्स इन इंडियाच्या रिपोर्टनुसार पश्चिम घाटात एकूण 1087 वाघ असण्याची शक्यता आहे. मात्र, तामिळनाडू वगळता इतर ठिकाणी ही आकडेवारी काळजीत टाकणारी असल्याचं हा अहवाल नोंदवतो.
या अहवालानुसार गोव्यात 2014 पासून वाघांची संख्या कमी राहिली आहे. इथं एकूण 5 वाघ आढळतात. कर्नाटकात कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे मोजल्या गेलेल्या वाघांची अंदाजे संख्या 563 आहे.
केरळमध्ये एकूण 213 वाघ आढळतात. मात्र 2018 मध्ये सर्वाधिक संख्या असलेल्या वायनाडमध्ये 120 वाघ होते, ती संख्या आता कमी होऊन 80 वर आली आहे. तामिळनाडूमध्ये तुलनेने चांगली परिस्थिती असल्याचं हा अहवाल सांगतो. इथं एकूण 306 वाघ आढळतात.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना वन्यजीव अभ्यासक सुनील करकरे म्हणाले, ” संख्येपेक्षा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अधिवासासाठी योग्य परिस्थिती आहे का?”
“गेल्या काही वर्षांमध्ये खासगी जमीन मालकी (प्रायव्हेट लॅण्ड होल्डिंग) वाढली आहे. आधी रबराची शेती वाढली होती. आता अननसाची लागवड होताना दिसत आहे. त्यात हत्तींच्या संख्येमुळे अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक फेन्सिंग केलं जातं. वाघांसाठी सुरक्षितता महत्त्वाची असते. तसा अधिवास असेल तर ते राहतात.”
काय बदललं?
शिकार आणि सुरक्षित अधिवास नसल्यानं वाघांची संख्या झपाट्यानं कमी होत गेली. ही संख्या वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू झाले. 2010 मध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली. यानंतर हा परिसर आणि कर्नाटकाला जोडणारा आजूबाजूचा कॅारिडोअर विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील माजी अधिकारी उत्तम सावंत यांनी याचे टप्पे स्पष्ट केले. ते म्हणाले, “या पट्ट्यात काम सुरू केलं, तेव्हा इथं वाघ आहेत यावरच लोकांचा विश्वास नव्हता, अशी परिस्थिती होती. त्यात घनदाट जंगल असल्यानं वाघ दिसणं अवघड.”
“जे काम होत होतं ते वाघांच्या अधिवासाच्या अनुषंगानं होत नव्हतं. घर चांगलं असेल, तर आपण रहायला जातो. त्यामुळे वाघांचा अधिवास (हॅबिटॅट) सुधारण्यावर भर दिला गेला. यासाठी या भागातल्या गावांचं पुनर्वसन केलं गेलं. हळूहळू या पट्ट्यात कमीत कमी डिस्टर्बन्स असेल याकडे लक्ष दिलं गेलं.”
“एकीकडं कोअर भागातल्या अडचणी कमी केल्या गेल्या. दुसरीकडं बफर (मुख्य भागाच्या आजूबाजूचा परिसर जिथं मानवी वस्ती असू शकते) तिथे जनजागृती सुरू झाली.”
याचा पुढचा टप्पा होता तो वाघ येण्यासाठी परिस्थिती निर्माण करण्याचा. यासाठी महत्त्वाचं होतं ते वाघांसाठी शिकारीची उपलब्धता.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक किरण जगताप बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “2017 पासून टायगर रिकव्हरी प्रोग्रॅम सुरू आहे. पहिला टप्पा 2020-21 अखेर सुरू झाला. त्यात वाघाचं भक्ष्य असणारे तृणभक्षी प्राणी वाढवण्याचे प्रयत्न झाले. तसंच वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या मदतीनं कॅमेरा ट्रॅपिंग सुरू केलं. त्यामुळे ‘प्रेचं डिस्ट्रीब्युशन’ कसं आहे ते समजलं.”
“प्री-ऑगमेन्टेशनमध्ये गवती कुरणांची संख्या वाढवणं, पाणवठ्यांची सोय करणं यावर भर दिला. त्यामुळे तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढून वाघांची संख्या वाढायला मदत झाली.”
कोकणात वाघांची नोंद
हे प्रयत्न सुरू असताना वाघ केवळ शिकार किंवा अस्तित्वाच्या चिन्हांवरून मोजले जात होते. त्यामुळे नक्की संख्या किती हे मोजण्यासाठी या संपूर्ण कॅारिडोअरमध्ये कॅमेराट्रॅप लावण्यात आले.
कॅमेरा ट्रॅप म्हणजे प्रामुख्यानं झाडांवर लावण्यात येणारे कॅमेरे. यामुळे त्या टप्प्यातील परिसराचं शूट होत रहातं. यात दोडामार्ग आंबोली आणि चांदोली या परिसरात वाघांचा वावर आणि प्रजनन होत असल्याचं लक्षात आलं.
जगताप सांगतात, “सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दोन पुरुष वाघ सातत्यानं पहायला मिळत आहेत. लार्जर लॅण्डस्केपमध्ये 10 ते 12 वाघ दिसले. यात बछड्यांचाही समावेश आहे. याचा अर्थ जंगलाचं संरक्षण होत आहे आणि पर्यायानं पूर्ण इकोसिस्टिमचं संरक्षण उत्तमरीत्या होत असल्याचा हा पुरावा आहे.
वाघाला आपण किस्टोन स्पिशीज संबोधतो. त्याचं अस्तित्व असणं याचा अर्थ अन्नसाखळी (फूड चेन) आहे. तृणभक्षक प्राणी, गवत असल्यामुळे वाघ स्थिरावले असल्याचं हे लक्षण आहे.”
2010 ते 2020 या 10 वर्षात झालेल्या अभ्यासानुसार वाघांच्या ॲक्युपन्सीमध्ये वाढ झाली असल्याचं वाईल्ड लाईफ कॅान्झर्वेशन ट्रस्टचे कॅान्झर्वेशन बायोलॅाजिस्ट गिरीश पंजाबी नोंदवतात. ते म्हणाले, “याला स्पष्टपणे एक सकारात्मक ट्रेण्ड म्हणू शकतो.”
“पुर्वीच्या वाघांच्या संख्येचा डेटा नाही. 2022-23 मध्ये 10 किंवा 12 वाघ होते. या पुढच्या अभ्यासात वाढ झाली की, काय हे समजेल. मात्र ॲक्युपन्सी सर्व्हेत अस्तित्वाच्या चिन्हांवरून लॅण्डस्केपमध्ये सर्व्हे केला होता. त्याप्रमाणे आम्हाला वाघांच्या संख्येत वाढ दिसली. म्हणजे 2010-11 मध्ये 30 टक्के क्षेत्रात वाघ होते. 2019-20 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात 60 टक्के क्षेत्रात वाघ दिसले.”
“कोकणात पण वाघ आहेत. सावंतवाडी विभागातही वाघ आहेत आणि कोल्हापूर विभागातही वाघ आहेत. एकूण 8 वाघ या दोन्ही भागात वावरतात,” असं गिरीश पंजाबी सांगतात.
वाघांचा प्रवास
वाघ प्रामुख्यानं स्वतःसाठी ‘टेरिटरी’ शोधण्यासाठी किंवा प्रजननासाठी प्रवास करतात. म्हणजे वाघांच्या शोधात वाघिणींचा प्रवास होतो आणि तसंच वाघिणींच्या शोधात वाघांचा प्रवास होतो.
महाराष्ट्राच्या पट्ट्यात येण्यासाठी या दोन्ही गोष्टी कमी पडत होत्या. यासाठी सह्याद्रीपासून कोकणापर्यंत एकूण 8 वनक्षेत्र राखीव किंवा अभयारण्य म्हणून निवडण्यात आली. त्यात 2 भाग सोडता, इतर भागांना संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे.
दोडामार्ग ते चांदोली क्षेत्रात वाघांची नोंद होणं आणि त्यात बछडे असणं यासाठीच महत्त्वाचं मानलं जातंय. हे वाघ प्रवास करून सह्याद्रीत जाण्याची शक्यता असल्यानं ही बाब सकारात्मक मानली जात आहे.
सह्याद्रीचा हा पट्टा यातले काही बछडे अधिवास म्हणून स्विकारू शकतात. येथे प्रजनन झाल्यास संख्या वाढण्यासाठी फायदा होऊ शकतो.
गिरीश पंजाबी सांगतात, “2010 मध्ये सह्याद्री टायगर रिझर्व्ह घोषित झाला तेव्हापासून विभागाने कॅारिडोअरवर जास्त लक्ष दिलं. कारण त्यांना माहिती आहे की, हा कॅारिडोअर सह्याद्री टायगर रिझर्व उत्तरेत आहे आणि काली टायगर रिझर्व दक्षिणेत आहे. याच्या मधला जंगलाचा पट्टा आहे तो आमचा कॅारिडोअर आहे. त्यामुळे विभागानं लक्ष ठेवलं आहे.”
आव्हान कायम
अर्थात वाघांची संख्या नोंदली जाणं यामुळं सारं आलबेल आहे, असं मात्र नाही. विकासाचं मोठं आव्हान या प्रकल्पासमोर उभं आहे. वन्यजीव अभ्यासक सुनील करकरे यात दोन महत्वाचे अडथळे नोंदवतात.
बीबीसी मराठीशी बोलताना करकरे म्हणाले, “सोर्स पॅाप्युलेशन वाढते आहे, हे 100 टक्के सकारात्मक चिन्ह आहे. पण त्याचा प्रवास होण्यासाठी तशी परिस्थिती आहे का? हा महत्त्वाचा मुद्दा. सध्या या पट्ट्यात अनेक प्रकल्प, रस्ते प्रस्तावित होत आहेत.”
रत्नागिरी, नागपूर किंवा शक्तीपीठ महामार्गासारखे रस्ते कनेक्टिव्हिटी तोडू शकतात. ते होऊ नये यासाठी काही उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत का? याची जाहीर वाच्यता करण्यात आली नाही. यापूर्वी देखील नागझिरा पेंचमध्ये अशी परिस्थिती झाल्याचं आपण पाहिलं आहे. आणि तिथे कोर्टाच्या आदेशानेच उपाययोजना केल्या गेल्या हे देखील तथ्य आहे.”
गिरीश पंजाबीदेखील हीच भीती व्यक्त करतात. त्यांच्या मते, जो प्रकल्प आवश्यक नाही आणि जिथे हॅबिटॅट लॅास होतोय तिथे वनविभागाने हस्तक्षेप करणं आवश्यक आहे.
पंजाबी म्हणतात, “विकास थांबवू शकत नाही. पण हा हॅबिटॅट राहिला आहे तो शेवटचा आहे. हा हॅबिटॅट तुटला तर तो कॅारिडोअर राहणार नाही.”
यावर उपाययोजना केल्या जात असल्याचं वनविभागाचे अधिकारी सांगतात. या प्रश्नांवर बोलताना जगताप म्हणाले, “वाघांचा भ्रमण मार्गाचा जो पट्टा आहे तो काली पासून सुरु होऊन सह्याद्री पर्यंत आपण जसं म्हणलं तसं शेती, रस्ते अशी कामं सुरू आहेत. हे पूर्णपणे थांबवू शकत नाही. पण ज्या पद्धतीने डिझाईन आणि डेव्हलप करावं लागतील, त्यात वन्यजीव संरक्षणाच्या गोष्टी आपल्याला समाविष्ट कराव्या लागतील.
वाईल्डलाईफ मिटिगेशन मेजर्स आपण मोठ्या प्रोजेक्ट साठी करणं आवश्यक आहेत. सर्व मोठ्या प्रोजेक्टना राज्य किंवा राष्ट्र वन्यजीव मंडळाच्या परवानगीची अट टाकली तर हे मिटीगेशन मेजर्स समाविष्ट केले जातील. त्यातून संवर्धनाला मदत होईल.”
कोकणात 12 वाघांमध्ये बछडे आणि वाघिणीही आहेत. पण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मात्र दोनच वाघ फिरत आहेत. ही परिस्थिती तशीच राहिली तर तेही निघून जाण्याची भीती आहे.
एकीकडे विकासाची वाढ, तर दुसरीकडे कमी असलेली वाघीणींची संख्या ही दोन प्रमुख आव्हानं या प्रयत्नांमधला अडथळा ठरत आहेत. शिकारीवर लक्ष ठेवताना या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारचे प्रयत्न महत्वाचे ठरतील.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC