Source :- ZEE NEWS

India Pakistan Partition: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा तणाव कमालीचा वाढला आहे. पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द करण्याबरोबर पाकिस्तानी नागरिकांना दिलेला व्हिसा रद्द करत त्यांना तातडीने परत पाठवलं आहे. दोन्ही बाजूने घेण्यात आलेल्या काही निर्णयांमुळे दोन्ही देशांदरम्यानच्या व्यापारावरही परिणाम होईल असं सांगितलं जात आहे. दरम्यान या तणावाच्या पार्श्वभूमीवर इतिहासातील काही संदर्भ चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. यापैकीच एक संदर्भ म्हणजे भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तेव्हा भारताने पाकिस्तानला 55 कोटी रुपये दिल्याचा आहे. विशेष म्हणजे हे पैसे देण्याचा आग्रह महात्मा गांधींनी धरला होता असा दावाही अनेकदा गांधीवादाला विरोध करणाऱ्यांकडून केला जातो.

मात्र यासंदर्भातील नेमका घटनाक्रम महात्मा गांधींची पणतू तुषार गांधी यांनी 2018 साली ‘बीबीसी’साठी लिहिलेल्या एका विशेष लेखामध्ये सांगितला होता. महात्मा गांधींच्या हत्येला 70 वर्ष पूर्ण झाले त्याच दिवशी 30 जानेवारी 2018 रोजी लिहिलेल्या या लेखामध्ये तुषार गांधींनी महात्मा गांधींचा 55 कोटी रुपये देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध असल्याचं म्हटलं आहे. नेमकं या लेखात काय म्हटलेलं ते यानिमित्ताने जाणून घेऊयात…

दोन्ही देशांमध्ये पैशांचीही वाटणी झाली

‘गांधींनी भारत सरकारला पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यास भाग पाडलं’ असा आरोप वारंवार केला जातो. हा आरोप चुकीचा असल्याचं तुषार गांधींनी म्हटलं आहे. “भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीचा प्रस्ताव स्वीकारण्यात आलेला तेव्हा राज्यांच्या मालकीच्या सर्व संसाधनांची समान वाटणी करण्याचं निश्चित झालं होतं. भौतिक वस्तूंबरोबरच रोख पैसाही दोन्ही देशांना समान वाटून दिला जाईल असं ठरवण्यात आलेलं. त्याबद्दल तपशीलानुसार वाटाघाटी करण्यात आल्या आणि तशीच वाटणी झाली,” असं तुषार गांधींनी नमूद केलं आहे. 

ही जनतेची फसवणूक ठरेल असं गांधींचं मत होतं

“महात्मा गांधींनी 12 जानेवारी रोजी भारत सरकारने पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्याच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी भारत सरकारने हा निर्णय बदलल्याचं महात्मा गांधींना सांगितलं होतं.फाळणी पाप असून नागरिकांना दिलेला शब्द न पाळणे हे या पापात भर घालण्यासारखं होतं, असं गांधींचं म्हणणं होतं. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे तणाव असणारे मुद्दे निकाली निघत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानला मदत न देण्याचे तत्कालीन कॅबिनेटचे संकेत होते. हे म्हणजे कराराचा भंग करण्यासारखं होतं. हा स्वतंत्र भारताचा पाहिला करार होता. त्यामुळेच कराराचं पालन न करणं म्हणजे दिलेला शब्द न पाळण्यासारखं होतं,” असं तुषार गांधींनी महात्मा गांधींनी 55 कोटींच्या निधीला विरोध केल्याचा मुद्दा मांडताना म्हटलं आहे.

अचानक भारत सरकारने केली घोषणा

“महात्मा गांधींच्या उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीमध्ये भारत सरकारने अचानक पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यात येतील असं जाहीर केलं. ही घोषणा बिर्ला हाऊसमधून झाली. यामुळे असंतोष पसरला. गांधींनीच पाकिस्तानला 55 कोटी रुपये देण्यास भाग पाडल्याचं पसरवण्यात आलं,” असा दावा तुषार गांधींनी या लेखात केला आहे. 

नथुराम गोडसेच्या भावाचं पुस्तक

इतक्यावरच न थांबता, “नथुराम गोडसेंचा भाऊ गोपाळ गोडसेने यासंदर्भात ’55 कोटींचे बळी’ असं पुस्तक लिहिलं. नथुरामने कोर्टात दिलेल्या माहितीच्या आधारे हे पुस्तक लिहिण्यात आलं होतं,” असंही तुषार गांधींनी म्हटलं आहे. 30 जानेवारी 1948 ला नथूराम गोडसेने महात्मा गांधींची हत्या केली. 

तेव्हाचे 55 कोटी रुपये म्हणजे आजचे किती?

देशाची केंद्रीय बँक असलेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1960 पासून महागाईच्या दराच्या तुलनेत रुपयाचं मूल्य मोजते. त्या हिशोबाने गणित केल्यास 1960 चा विचार केला तर तेव्हाचे 55 कोटी रुपये हे आजच्या दरानुसार 318 कोटी 66 लाख 45 हजार रुपये इतके होतात असं महागाईचा दर मोजण्यासंदर्भातील ‘ईझेडटॅक्स डॉट इन’ वेबसाईटवरील आकडेमोड सांगते. यामध्ये अजून 12 वर्ष कमी केल्यास साधारणपणे 1948 साली दिलेले 55 कोटी रुपये हे आजच्या दरानुसार ढोबळ मानाने 350 कोटींच्या आसपास आहेत असं म्हणता येईल.

SOURCE : ZEE NEWS