Home LATEST NEWS ताजी बातमी ग्राऊंड रिपोर्ट : ‘पेरण्यांचा खर्च देणं बाकी, आता जळालेलं पीक काढायचाही खर्च’;...

ग्राऊंड रिपोर्ट : ‘पेरण्यांचा खर्च देणं बाकी, आता जळालेलं पीक काढायचाही खर्च’; पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा

6
0

Source :- BBC INDIA NEWS

दुष्काळ

वाळलेल्या पिकाचा भारा घेऊन जाताना उन्हामुळे विष्णू केवटेंना दम लागला. सुरकुतलेल्या चेहऱ्यावर घामाच्या धारा उन्हाची तीव्रता दाखवत होत्या.

कोरडी होत जाणारी जमीन आणि वाळून चाललेली पिकं पाहत एका झाडाच्या सावलीचा आधार घेत केवटे बसले होते. पाठीमागे शेतात पाण्याअभावी जळून चाललेलं रान!

केवटेंनी त्यांच्या शेतातलं वाळलेलं पीक जनावरांना चारा तरी होईल म्हणून तोडून आणलं होतं. त्यालाच टेकून केवटे बसले होते.

शेतातून भारा उचलून आणताना चटका बसणाऱ्या उन्हात त्यांची दमछाक झाली होती.

हा भारा आणलाय तो तरी किती दिवस पुरायचा, हा प्रश्न त्यांच्या समोर आ वासून उभा होता. पण तेवढाच आधार तरी आहे, असंही ते सांगत होते.

माणच्या पट्ट्यात फिरताना दुपारी 12च्या सुमारास केवटे भेटले. ऊन मी म्हणतंय अशा परिस्थितीत एखादा पांढरा ढग पाऊस नाही, पण किमान क्षणभर सावली तरी आणत होता. उन्हाचा चटका इतका की 5 मिनिटं उभं राहणंही अवघड.

खरंतर या पट्ट्यात सप्टेंबर हा पावसाचा काळ. पण सप्टेंबरचा पंधरवडा उलटला, तरी पावसाचा थेंबही न पडल्याची चिंता केवटेंच्या चेहऱ्यावर दिसत होती.

‘यंदा पाऊस नाही, पाणी नाही; जित्राबासाठी हाल बेकार’

नेमकी काय परिस्थिती आहे ते सांगताना केवटे म्हणाले, “यंदा पाऊस नाही, पाणी नाही. जित्राबासाठी हाल बेकार. बाजरी, मका होती पण जळून गेलं सगळं. पाणीच नाही तर काय करायचं? टँकरने पाणी पोहोचतंय, पण ते कुठे पुरणार? 5 मिनिटं मोटार चालते, विहिरींना पाणी नाही. आता पाऊस येईल तेव्हा खरं म्हणायचं!”

विष्णू केवटे

केवटेंच्या शेतापासून काही अंतरावर माया केवटेंचं शेत आहे. आपला मुलगा आणि सुनेसह माया केवटे शेती करतात.

शिवाय मुलगा आधार केंद्रावर काम करत असल्याचं त्या सांगतात. माया केवटे एकल महिला आहेत. शेत हा या कुटुंबाच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार.

दुष्काळ

सप्टेंबर महिना उलटून गेला तरी सूर्य आग ओकतोय, अशी परिस्थिती.

जून महिन्यात पाऊस आला तेव्हा त्या तुटपुंज्या ओलीचा आधार घेत केवटेंनी त्यांच्या शेतात मका, बाजरी अशी पिकं लावली. पण पावसाने ओढ दिली आणि पिकांची वाढ खुंटली.

वाळून चाललेल्या पिकांकडे पाहणारे शेतकरी यंदा रब्बी तरी वाट्याला येणार का, याची वाट पाहत आहेत. पेरण्यांसाठीचा खर्च अजून देणं आहे, त्यात आता हे जळलेलं पीक काढायलाही खर्च होणार असल्याचं त्या सांगतात.

‘गुरांनाही काही उरलं नाही; वैरण कुठून आणायची?’

बीबीसी मराठीशी बोलताना माया केवटे म्हणाल्या, “पाऊस येईल म्हणून थोड्या पावसावर पेरलं. पण पेरल्यापासून काही नाही. वाळून चाललंय सगळं. गुरांनाही काही उरलं नाही.”

“मी या वर्षी बाजरी केली. दर वर्षीच करते. आम्हाला विहिरीला पाणी नसतं. पाऊस आला तर त्याच्या ओलीच्या आधारावर आम्ही पेरतो. बाजरी केली आणि चाऱ्यासाठी कडबा केला होता. पण आता गुरांना काही उरलं नाही.”

“आम्हाला पेरणीसाठी वापरलेल्या ट्रॅक्टरचं भाडं मात्र द्यावं लागणार. गुरांसाठी वैरण कुठून आणायची, हा प्रश्न आहे.”

माया केवटेंनी त्यांच्या शेतासोबत जवळच असणाऱ्या कलावती नामदे यांच्या शेतातही पेरणी केली होती. तिथंही पीक नसल्याचं त्या सांगतात.

नामदे म्हणाल्या, “कडबा पेरला होता, तो जळून गेला. मळ्यात बाजरी केली होती, ती पण जळून गेली. फुलोऱ्याला आली एवढी एवढी आणि जळून गेली. पाणीच नाही तर काय?”

माया केवटे

माण-खटावच्या बहुतांश पट्ट्यात हीच परिस्थिती. काहींनी तर पीक येणार नाही याचा अंदाज आल्यावर पेरलेलं सगळं काढून टाकलंय.

मोकळी माळरानं आणि त्याच्या शेजारी ओसाड शेतजमीन, हे दृश्य या पट्ट्यात फिरताना पावलोपावली दिसतं.

तसं हा भाग मुळातच दुष्काळी. पण जलसंधारणाची काही कामं झाल्यानंतर गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी तुलनेने बरी परिस्थिती दिसत होती.

पण यंदा मात्र पावसाने ओढ दिली असताना प्रत्येक जण मागे पडलेल्या दुष्काळाची आठवण करत, यंदा कसं करायचं, असा प्रश्न विचारताना दिसतो.

दुष्काळ

खरं तर इथला पट्टा हा परतीच्या पावसावर प्रामुख्याने अवलंबून असलेला. पेरण्यांचा पहिला टप्पा जूनमध्ये आणि नंतर परतीच्या पावसाच्या आधारावर पुढच्या पेरण्या, हे शेतकऱ्यांसाठी ठरलेलं.

पण यंदा मात्र जूनमधली बहुतांश पेरणी वाया गेल्याचं ते सांगतात.

पेरणी तर वाया गेलीच, आता काही ठिकाणी असलेल्या फळबागा कशा वाचवायच्या, याची धडपड सुरू आहे.

‘जनावरं एक-एक कमी केली; खायला नाही, मग काय करायचं?’

लांब मळ्यात राहणाऱ्या जयश्री लांब यांच्या अंगणात वाळून गेलेल्या पिकांचे भारे जनावरांच्या चाऱ्यासाठी उन्हात ठेवले आहेत. त्यांच्या आणि नातेवाईकांच्या मिळून असलेल्या काही एकरांच्या क्षेत्रात आता ओस पडलंय. चिकूच्या बागेच्या सावलीत त्यांनी त्यांच्या म्हशी आणि शेळ्या बांधल्या आहेत. ही सावली तरी किती काळ टिकणार, असा प्रश्न त्या विचारतात.

“वीतभर वैरण आहे, ती तेवढी आणून टाकली आहे शेळ्यांसाठी. जनावरं पण एक-एक कमी केली. खायला नाही, मग काय करायचं? पाणी नसल्याने झाडांमध्ये पानगळ व्हायला लागली आहे. चिकूचं पळ गळून गेलं. पाऊस कमी असतो, पण दरवर्षी भर येतो या फळांना,” त्या सांगतात.

शेताची ही परिस्थिती. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने माती कितीही खणली तरी जमिनीत ओल दिसत नाही. याचा तात्कालिक परिणाम तर दिसतोच. शिवाय मातीचा पोत खराब होत असल्याचं संशोधन सांगतं.

माणदेशी फाऊंडेशनतर्फे शेतकऱ्यांच्या मातीचं परीक्षण करून अहवाल दिला जातो. यावरून मायक्रो न्यूट्रिएंट्सची काय परिस्थिती आहे, ते ठरवलं जातं आणि त्याच्या आधारे पेरण्यांपासून नियोजन होतं. याच अभ्यासातून काही नवी निरीक्षणं समोर आल्याचं माणदेशी फाऊंडेशनचे करण सिन्हा सांगतात.

करण सिन्हा

बीबीसी मराठीशी बोलताना सिन्हा म्हणाले, “पाऊस कमी झाला तर कोणतं पीक घ्यायचं, याचा अजून लोकांना अवेअरनेस दिसत नाही. थोडा पाऊस झाला की उसाची लागवड होताना दिसते. त्यामुळे मातीच्या पोतावर परिणाम होत आहे, हे दिसतंय.”

“सगळ्यात महत्त्वाचं मातीतला झिंक हा घटक फक्त पिकांसाठीच नाही, तर माणसाच्या वाढीसाठीसुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून दुष्काळाच्या भागातल्या लोकांची उंची कमी असते. त्याचं महत्त्वाचं कारण झिंक.”

“सॉईल मॉईश्चर, ऑर्गॅनिक कार्बन आणि झिंक हे तिन्ही एकमेकांना रिलेटेड आहेत. सॉईल मॉईश्चर कमी झालं तर झिंक कमी होणार. मॉईश्चर टिकून नाही राहिला तर उस नाही, पण बाकीही काही उगवणार नाही.”

“डाळिंब दुष्काळात उगवून येतं. पण तेही आता येणं अवघड झालंय. ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण 4 टक्क्यांपर्यंत असेल तर आपण शेती करू शकतो, शेती वाढवू शकतो. आत्ता आमच्याकडे जो डेटा आहे, त्यात ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण 0.4 टक्के दिसतं.”

जमिनीची आर्द्रता कमी झाल्यामुळे खतं घेण्याची क्षमता देखील कमी होत असल्याचं सिन्हा नोंदवतात.

फळबागा वाचवण्यासाठी टँकरच्या पाण्याचा आधार

फळबागा किंवा शेतासाठी आता टँकरने पाणीपुरवठा करून ते जगवण्याची धडपडही काही ठिकाणी केली जाते आहे.

जिल्हा प्रशासनाने आता या परिस्थितीबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला असल्याचं साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सांगितलं.

बीबीसी मराठीशी बोलताना पाटील म्हणाले, “पावसाची तूट माण, खटाव, फलटण आणि कोरेगावचा काही भाग इथं दिसतेय. उत्पादनावर परिणाम होणार आहे. टँकरद्वारे पाणीपुरवठा, तसंच कॅनॉलमधून उपसा सिंचनद्वारे काही भागात पाणी पाठवलं जात आहे.”

“आम्ही शासनाला अहवाल पाठवला आहे. माण-खटाव भागात पाऊस होतोय. हा भाग रब्बीचा म्हणूनच ओळखला जातो. पुरेसा पाऊस झाला तर पेरण्या होतील.”

परतीच्या पावसाच्या 2 ते 3 सरी झाल्या. त्यावर आता रब्बीमध्ये तरी पिकं येतील, अशी आशा अनेकांना वाटत आहे. तरीही हा पाऊस पुरेसा नाही. पण हवामान विभागाचा अंदाज मात्र या पावसाकडून फारशी आशा नसल्याचं सांगतोय.

दुष्काळग्रस्त माणदेशी माणसं यंदा पुन्हा होरपळतील का, याची चिंता आता इथल्या सगळ्यांनाच सतावतेय.

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

यात सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर या 6 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. दुष्काळ जाहीर झालेल्या या तालुक्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना आणि सवलतींचाही शासन निर्णयात उल्लेख करण्यात आला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC