Source :- BBC INDIA NEWS

कुर्डवाडी तालुक्यातील लउळ गावातील बालाजी खारे हा 27 वर्षाचा तरुण.

“एकेदिवशी गावाच्या चौकात बसलो होतो. तिथं काही मुलं मोबाईलवर फनरेप नावाचा चक्री जुगार खेळत होते. 36 आकड्यांपैकी आपण लावलेला आकडा लागला, तर 1 रुपयांना 36 रुपये मिळायचे. म्हणजे 10 रुपयांना 360, तर 100 रुपयांना 3600 रुपये मिळत होते.”

“पोरांचं पाहून मीही नितीन पाटमस नावाच्या एजंटकडून 5000 रुपयांचा बॅलन्स असणारा अॅप्लिकेशनचा आयडी-पासवर्ड घेतला. मात्र, त्यातून काही जिंकू शकलो नाही. त्यावर नितीनने मला जास्त बॅलन्स घे आणि जास्त पैशांनी खेळ असं सांगितलं. यात मी 90 लाख गमावले.”

हे सांगत होता सोलापूरच्या कुर्डवाडी तालुक्यातील लउळ गावाचा बालाजी खारे हा 27 वर्षांचा तरुण.

बालाजी आणि आणि त्याचे दोन भाऊ वडिलोपार्जित शेती आणि दुग्धव्यवसाय करायचे. शेतीला चांगला भाव येत असल्याने त्यांनी 12 एकरपैकी 3 एकर शेती विकली. योग्य भाव मिळाल्यास घराजवळ चांगली शेती घेऊ, या आशेने त्यांनी पैसे बँकेत ठेवले होते.

बालाजी खारे याबाबत बीबीसीशी बोलताना सांगत होता, “मी जास्तीच्या पैशांनी खेळलो, पण हाती काही लागलं नाही. मग आधी गमावलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी मी जास्त बॅलन्स घेऊ लागलो.”

“बँकेत शेताचे आलेले पैसे होते आणि पैसे जिंकून आहे तसे बँकेत भरू, या आशेने मी लाखो रुपयांचं बॅलन्स घेऊन रात्र-दिवस चक्री जुगार खेळू लागलो.”

“दरम्यान, नितीन पाटमस, वैभव सुतार, रणजीत सुतार यांनी मला अधिकचे पैसे टाकण्यास सांगितले. पैसे परत येतील, या भावनेने मी बँकेत होते तेवढे 82 लाख रुपये, सोनं गहाण ठेवून आणि ट्रॅक्टरवर कर्ज काढून आलेले सर्व पैसे या एजंटला दिले. पण हाती काहीच लागलं नाही,” असं बालाजी नमूद करतो.

शेवटी, त्याने पोलिसांकडे धाव घेत नितीन पाटमस, वैभव सुतार, रणजीत सुतार या तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली.

बालाजी खारे

पोलिसांनी बालाजीच्या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता 420, 465, 467, 468, 471, 120 B, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

आरोपींपैकी नितीन पाटमस, वैभव सुतार, स्वप्नील नागटिळक आणि अमित शिंदे यांना अटक करण्यात आली. रणजित सुतार आणि अन्य 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचं सहायक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांनी सांगितले.

गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकरणी तपास सुरू केला आहे. आरोपींचे बँक व्यवहार आणि त्यांच्याशी संबंधित इतर लोकांचा सहभाग या गुन्ह्यात आहे का, याचाही तपास आम्ही करत आहोत. सध्या आणखी आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचं सोलापूर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितलं.

बालाजी खारेचं म्हणणं आहे की, एकट्या लउळ गावात त्याच्यासारखं चक्री गेममध्ये अडकून आर्थिक फसवणूक झालेले 40 ते 50 जण आहेत.

संतोष शेंडे हे मागील 30 वर्षांपासून दूध डेअरी चालवतात. शेतकऱ्यांकडून दूध संकलन करून ते कंपनीला पाठवतात. त्यांनी सांगितलं की, मागील काही वर्षांपासून अनेक तरुण मुलं या गेमच्या आहारी गेल्याचं कळालं होतं. मात्र यात काही बालाजी खारेसारखे शेतकरी फसल्याचं कळल्यानंतर आम्ही याच्याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. माहिती घेतल्यास लक्षात आलं की, तालुक्यातील 700 ते 800 तरुण हे अशाप्रकारच्या ऑनलाइन जुगाराच्या गेममध्ये फसले आहेत.

यात काही स्थानिक एजंट सक्रिय असल्याचं देखील आम्हाला कळालं. त्यामुळे आणखी शेतकरी बांधव याच्यात अडकू नये. यासाठी आम्ही याविरोधात आवाज उठवला, असं संतोष शेंडे सांगतात.

एकट्या कुर्डूवाडी परिसरात 700-800 तरुण ऑनलाईन जुगारच्या नादात

कुर्डूवाडी हे सोलापूर जिल्ह्यातील तसा प्रसिद्ध परिसर. इथं मध्य रेल्वेचं मोठं जंक्शन आहे. ‘जंक्शन’ म्हणूनच या ठिकाणाची पर्यायाने शहराची ओळख आहे. रेल्वेच्या नेटवर्क जंक्शनमुळे शहराबरोबरच परिसराचा मोठा आर्थिक विकास साधला गेलेला.

मोठी आर्थिक उलाढाल असलेलं हे ठिकाण मागच्या दोन वर्षात ‘आमिषाच्या मोहजाळाचं जंक्शन’ झालंय. या परिसरातील साधारण 700 ते 800 तरुण ऑनलाईन चक्री जुगाराच्या खेळात फसले आहेत.

बालाजी खारे यांनी दिलेला चक्री गेमचा फोटो

फोटो स्रोत, Balaji Khare

गेलेले पैसे परत मिळतील, या खोट्या आशेवर पुन्हा-पुन्हा दिवस-रात्र या खेळाच्या फसवणुकीच्या दलदलीत फसलेल्या तरुणाईची घरदारं, शेती-वाडी, सोनं-नाणं, वाहनं हे सगळं अक्षरशः हातातून गेलं आहे. सगळी संपत्ती संपली.

या देशोधडीला लागलेल्या तरुणाईपैकी काहीजणांनी स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचं सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी सांगितलं.

चक्री जुगाराच्या नादात उद्ध्वस्त झालेल्या अनेकजणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी एकजणाने रेल्वे खाली आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये त्याचे हात-पाय कायमचे गेले. कायमचं अपंगत्व आलं.

बालाजी खारे यांनी दिलेला चक्री गेमचा फोटो

फोटो स्रोत, Balaji Khare

इतरही काहीजणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न झाला, असं सामाजिक कार्यकर्ते संतोष शेंडे यांनी बीबीसीला बोलताना सांगितलं.

त्यामुळे हा जीवघेणा चक्रीगेम बंद व्हावा आणि एजंट लोकांवर कारवाई व्हावी, अशी आमची मागणी असल्याचं शेंडे सांगतात.

“लऊळ गावासह माढा तालुक्यातील बऱ्याच लोकांनी जास्त नफा मिळेल या आशेपोटी गुन्ह्यातील आरोपींकडे मोठ्या प्रमाणात पैसे दिल्याची माहिती मिळत आहे.”

“ज्या लोकांनी गुन्ह्यातील आरोपी व इतर यांच्या अमिषाला बळी पडून त्यांच्याकडे फनरेपो चक्री गेममध्ये पैसे गुंतवले आहेत अशा लोकांनी यासंदर्भात त्यांचेकडील कागदपत्रे पुराव्यासह आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सोलापूर ग्रामीण येथे संपर्क साधावा,” असं आवाहन केल्याची माहिती सोलापूर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी बीबीसीशी बोलताना दिली.

लाल रेष

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई – 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस – 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स – 080 – 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
लाल रेष

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC