Home LATEST NEWS ताजी बातमी जंगलात आढळले 400 मृतदेह, 191 जणांच्या हत्येप्रकरणी धर्मगुरू दोषी; केनियातलं हे प्रकरण...

जंगलात आढळले 400 मृतदेह, 191 जणांच्या हत्येप्रकरणी धर्मगुरू दोषी; केनियातलं हे प्रकरण काय आहे?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

पॉल मॅकेन्झी

केनियातील एका पंथाचा प्रमुख पॉल मॅकेन्झी याला 191 जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलंय. त्याच्या मोठ्या मुलाच्या म्हणण्यानुसार, त्याच्या लहान भावंडांनाही दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत जबरदस्तीनं उपवास करायला लावलं जात होतं.

27 वर्षीय डॅन मॅकेन्झी यानं सांगितलं की, त्यानं याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या आजीच्या घरातून त्याच्या पाच लहान भावंडांसह आठ मुलांची सुटका केली आणि त्यांना एका बचाव केंद्रात नेले.

बीबीसीच्या ‘न्यूजडे’ या कार्यक्रमात बोलताना डॅन म्हणाला, “त्यांना जबरदस्तीनं उपवास करायला लावण्यात आलं होतं. जवळपास तीन दिवस त्यांना अन्न दिलं गेलं नव्हतं.”

सोमवारी त्याच्या वडिलांना 191 जणांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं.

केनियाच्या किनाऱ्याजवळील शाकाहोला जंगलात उपासमारीमुळे या लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये 190 मुलं आणि एका प्रौढ व्यक्तीचा समावेश होता.

पॉल मॅकेन्झीने आपल्या पंथातील सदस्यांना स्वतःला आणि त्यांच्या मुलांना उपाशी ठेवून मरण्याचे आदेश दिले होते. असे केल्याने त्यांना “येशूची भेट घेता येईल”, असा त्याचा दावा होता.

या पंथाच्या अन्य 28 नेत्यांनाही हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे.

वडिलांच्या गुन्ह्याबाबत मुलानं काय सांगितलं?

डॅन मॅकेन्झीने सुरुवातीला आपल्या वडिलांची बाजू घेतली होती. वडिलांवर करण्यात आलेले आरोप त्याला सुरुवातीला समजले नव्हते. मात्र, न्यायालयातील सुनावणीदरम्यान हे प्रकरण किती भयावह आहे, याची त्याला जाणीव झाली.

डॅन म्हणाला, “मी 12 वर्षांचा असताना मला जवळपास एक आठवडाभर उपवास करायला भाग पाडण्यात आलं होतं.”

लहानपणी प्रार्थनासभेत सहभागी होण्यासाठी पंथाचे सदस्य त्याला तासनतास मारहाण करत असत, अशी आठवणही त्याने सांगितली.

आता डॅन आपल्या भावंडांची या पंथातून सुटका करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी त्याला अजूनही पंथाच्या शिकवणीवर विश्वास ठेवणाऱ्या कुटुंबातील सदस्यांविरोधात तक्रार करावी लागली.

तो म्हणाला, “मला माझ्या आजीविरोधात तक्रार करावी लागली.”

या पंथाच्या प्रमुखाच्या शिकवणीनुसार, शिक्षण घेण्यास मनाई होती आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांना “वाईट” मानले जात होते.

डॅन म्हणाला, “मी सात वर्षांचा असताना शाळा सोडली होती.”

धर्मगुरू  पॉल मॅकेन्झी अनेकदा मोठ्या समुदायांसमोर प्रवचनं द्यायचे. (संग्रहित छायाचित्र)

आता किनारपट्टीवरील मालिंदी शहरात राहणारा डॅन मोटारसायकल टॅक्सी चालवून स्वतःचा आणि आपल्या लहान भावंडांचा उदरनिर्वाह करतो.

वडिलांच्या गुन्ह्यांमुळे शहरातील काही लोक त्याच्यावर नाराज होते, असे त्याने सांगितले. मात्र, काही लोकांनी त्याला स्वीकारलेही, कारण त्याने त्या जीवनशैलीपासून स्वतःला दूर केले होते.

बीबीसीच्या ‘न्यूजडे’ कार्यक्रमात डॅन म्हणाला, “आपले मित्र आणि नातेवाईक गमावलेल्या लोकांना या निकालामुळे काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी मला आशा आहे.”

उपवास करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती

मोम्बासा या बंदरशहरात आठ तास निकालाचे वाचन करताना न्यायाधीश डायना मोचाचे म्हणाल्या की, मॅकेन्झीचे अनुयायी त्याला “येशूचा दूत” मानत होते.

या खटल्यातील एका सहआरोपीने न्यायालयाला सांगितले की, उपवास करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीला “लाथाबुक्क्यांनी मारून” स्वर्गात जाण्यास भाग पाडले पाहिजे, असे मॅकेन्झीने म्हटले होते.

न्यायाधीशांनी सांगितलं की, हा पंथ ज्या जंगलात कार्यरत होता, तिथे मृतदेह पुरण्याच्या प्रक्रियेला “लग्न” असे म्हटले जात होते. मृत व्यक्तींचे “येशूसोबत लग्न झाले”, असे मानले जात होते.

मॅकेन्झी आणि पंथाच्या अन्य नेत्यांविरोधात दहशतवाद, कट्टरतावाद आणि मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याच्या आरोपांखालीही स्वतंत्र खटले सुरू आहेत.

हत्येप्रकरणी आलेला हा निकाल पॉल मॅकेन्झीविरोधातील सर्वात गंभीर आरोपांवरचा पहिला निकाल आहे.

2023 मध्ये केनियाच्या किनाऱ्याजवळील शाकाहोला जंगलात उथळ कबरींमध्ये 400 हून अधिक मृतदेह आढळल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.

त्याला 6 नोव्हेंबर रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

(थॉमस मुकवाना यांच्या अतिरिक्त वृत्तांकनासह.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC