Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Jugal Kishor Tiwari
2005 मध्ये कच्छमध्ये प्राचीन काळातील ‘वासुकी इंडिकस’ जातीच्या एका महाकाय सापाचे अवशेष सापडले होते.
लखपत तालुक्यातील प्रांध्रो गावच्या कोळसा खाणीतून या महाकाय सापाचे अवशेष मिळाले होते.
या शोधामुळे कच्छमधील तब्बल 4.7 कोटी वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ जीवसृष्टीची एक झलक जगासमोर आली.
शिवाय कच्छच्या पूर्व भागात भचाऊ तालुक्यातील धोलाविरा गावाजवळ असलेल्या ‘वूड फॉसिल पार्क’मध्ये सापडलेले काही अतिप्राचीन जीवाश्म त्याहूनही जुने असल्याचं सांगितलं जातं.
या पार्कमधील झाडांचे जीवाश्म ‘ज्युरासिक काळा’तील म्हणजेच 20 कोटी ते 14.5 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरच्या युगातील असल्याचं सांगितलं जातं.
संशोधकांना ‘वासुकी इंडिकस’ प्रजातीचे अवशेष 2005 मध्ये सापडले होते मात्र आयआयटी रुरकीच्या संशोधकांकडून त्यांची खरी ओळख पटवण्याचं काम 2022 मध्ये सुरू करण्यात आलं.
या अवशेषांचा सखोल अभ्यास केल्यानंतर संशोधकांनी एप्रिल 2024 मध्ये एका रिसर्च जर्नलमध्ये आपला शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यानंतरच जगाला जवळपास 10 ते 11 मीटर लांब असणाऱ्या या महाकाय सापाची माहिती मिळाली.
या संशोधनाच्या अडीच वर्षांनंतर कच्छमध्ये पुन्हा एकदा एक अत्यंत दुर्मिळ साप पाहायला मिळाला आहे. फरक फक्त एवढाच आहे की, हा साप जिवंत आहे आणि कच्छच्या एका वनअधिकाऱ्याला तो अगदी अनपेक्षितपणे दिसला.
दुर्मिळ साप कसा समोर आला?
6 सप्टेंबरला संध्याकाळी कच्छ सर्कल अंतर्गत येणाऱ्या कच्छ (पूर्व) वन विभागाच्या भुज (उत्तर) वनपरिक्षेत्राचे वन अधिकारी जयेश दुमादिया आणि त्यांच्या पथकाला हा दुर्मिळ साप आढळून आला.
जयेश दुमादिया आपल्या टीमसह पाकिस्तान सीमेजवळील ‘काळो डुंगर’ परिसरात पेट्रोलिंग करत होते तेव्हा त्यांना एक साप दिसला.
बीबीसीशी बोलताना जयेश दुमादिया यांनी सांगितलं, “माझी याच वर्षी एप्रिलमध्ये पंचमहलवरून कच्छमध्ये बदली झाली होती. त्यामुळे कच्छचे वन्यजीवन माझ्यासाठी तसे नवीनच आहे.”
“आम्ही पेट्रोलिंग करत असताना झाडीझुडपं नसलेल्या एका मोकळ्या, कोरड्या जागेत आम्हाला एक साप दिसला. तो साप व्यवस्थित बघण्यासाठी मी आमची बोलेरो कँपर गाडी थांबवली आणि आम्ही खाली उतरलो.”
“मला सापांविषयी बऱ्यापैकी माहिती असल्यामुळे तो कुठला साप आहे हे माझ्या लगेच लक्षात आलं. तो ‘ब्लॅक-हेडेड क्राउन स्नेक’ होता,” अशी माहिती त्यांनी दिली.
फोटो स्रोत, Jayesh Dumadia
ते पुढे म्हणाले, “गुजरातीत त्याला ‘रजवाडी साप’ म्हणतात. याआधी मी कधीच जिवंत रजवाडी साप पाहिला नव्हता.”
“पूर्वी मी फक्त एकदा एक मेलेला रजवाडी साप पाहिला होता. म्हणूनच या सापाची नीट पाहणी करण्यासाठी आणि रेकॉर्डसाठी आम्ही त्याचे फोटो काढू लागलो.”
“फोटो काढताना तो रजवाडी साप बिथरला, त्याने बचावात्मक पवित्रा घेतला आणि थेट आमच्या कँपर व्हॅनच्या खाली जाऊन लपला.”
पण त्यानंतर जे घडलं ते एखाद्या चित्रपटासारखंच नाट्यमय होतं.
दुमादिया पुढे म्हणाले, “आम्ही त्या रजवाडी सापाला गाडीखालून बाहेर काढण्याची धडपड करत होतो तेवढ्यात मंद प्रकाशात दुसरा एक साप अचानक समोर आला.”
“हा साप दिसायला पूर्णपणे वेगळा होता. त्यामुळे गाडीखाली लपलेल्या त्या बिनविषारी रजवाडी सापाला सोडून जमिनीवरील मिठाच्या थरावरून सरपटत जाणाऱ्या या नव्या सापाचे आम्ही फोटो काढू लागलो आणि त्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.”
“काही वेळात तो साप तिथून निघून गेला. नेमका हा कोणता साप आहे हे जाणून घेण्यासाठी मी त्याचे फोटो आणि व्हीडिओ ‘वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या तज्ज्ञांना आणि इतर सर्पमित्रांना पाठवले.”
“तेव्हा तज्ज्ञांनी मला माहिती दिली की, फोटोतला तो साप ‘एफ्रो-एशियन सँड स्नेक’ आहे आणि हा साप गुजरातमध्ये अतिशय दुर्मिळ मानला जातो.”
फोटो स्रोत, Jayesh Dumadia
डॉ. राजू व्यास हे सरपटणाऱ्या प्राण्यांचे तज्ज्ञ असून त्यांनी वडोदरा प्राणिसंग्रहालयात अनेक वर्षे निरीक्षक म्हणून काम केले आहे.
डॉ. राजू व्यास सांगतात की, ‘एफ्रो-एशियन सँड स्नेक’ म्हणजेच या वाळवंटी सापाचे शास्त्रीय नाव ‘सॅमोफिस स्कोकारी’ असे आहे.
त्यांच्या मते, ‘सॅमोफिस’ कुळातील साप हे प्रामुख्याने कोरड्या आणि वाळवंटी प्रदेशात राहतात.
डॉ. राजू व्यास यांच्या म्हणण्यानुसार, या प्रजातीचे साप आफ्रिकेपासून दक्षिण आशियापर्यंतच्या भागात पसरलेले आहेत. भारतात याच कुळातील ‘सॅमोफिस कॉन्डेनॅरस’ आणि ‘सॅमोफिस लेइथी’ जातीचे सापही दिसून येतात.
गुजरात वन विभागाने आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलं आहे की, ‘जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’च्या कामादरम्यान फर्डिनांड स्टोलिक्झा नावाच्या निसर्ग अभ्यासकाने 1871-72 च्या काळात कच्छ परिसराचे सर्वेक्षण केलं होतं.
या सर्वेक्षणाच्या वेळी स्टोलिक्झा यांनी एका ‘एफ्रो-एशियन सँड स्नेक’ला नमुना म्हणून पकडले होते. हा एक वेगळ्याच जातीचा साप असल्याचा दावा करणारा त्यांचा लेख 1872 मध्ये ‘जर्नल ऑफ एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल’ या मासिकात प्रसिद्ध झाला. पण नंतर हा साप दुसरा तिसरा कोणी नसून ‘एफ्रो-एशियन सँड स्नेक’च असल्याचं स्पष्ट झालं.
हा साप साधारण 4 फुटांपर्यंत लांब असू शकतो.
फोटो स्रोत, Jayesh Dumadia
राजू व्यास यांच्या म्हणण्यानुसार, “हा साप मुख्यत्वे जमिनीवरच राहतो. पण पाली किंवा सरडे पकडण्यासाठी तो छोट्या झाडीझुडपांवरही सहज चढतो.”
“हा साप लांबट आणि सडपातळ असून जमिनीवर खूप चपळाईने पळतो. तो प्रामुख्याने सरडे, कीटक इत्यादींना आपले भक्ष्य बनवतो आणि सरड्यांसाठी तो विषारी ठरतो.”
“पण याचे विष माणसावर फारसा वाईट परिणाम करत नाही. स्टोलिक्झा यांनी 1871-72 मध्ये हा साप कच्छमध्ये असल्याचं नोंदवून ठेवलं होतं, हे खरं आहे.”
“त्या काळानंतरही हा साप कच्छमध्ये सापडल्याच्या नोंदी आहेत. जुगल किशोर तिवारी यांच्याकडे तर त्याचे प्रत्यक्ष फोटोही आहेत.”
जुगल किशोर तिवारी हे कच्छमध्ये राहणारे एक पक्षीअभ्यासक आहेत.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितले, “बन्नी गवताळ मैदानाच्या पूर्व पट्ट्यातील लोढाई गावात 2009 मध्ये मला हा साप दिसून आला होता.”
“मी त्याचे फोटो काढले होते आणि नंतर अभ्यासकांनी हा ‘एफ्रो-एशियन सँड स्नेक’ असल्याचं स्पष्ट केलं होतं. खरं तर हा साप खूपच दुर्मिळ आहे. 2009 नंतर मात्र मला हा साप पुन्हा कधीच दिसला नाही.”
दोन्ही साप एकाच वेळी दिसल्यानंतर अधिकाऱ्यांनी काय केलं?
RFO जयेश दुमादिया यांच्या माहितीनुसार, हे दोन्ही साप कोरड्या जमिनीकडून कच्छच्या मोठ्या रणातील पाणी साचलेल्या भागाकडे जाताना दिसले.
“रजवाडी सापसुद्धा गुजरातमध्ये तसा खूप कमी पाहायला मिळतो. त्यात रजवाडी साप आणि एफ्रो-एशियन सँड स्नेक हे दोन्ही साप एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी एकत्र दिसणं, ही खरोखरच एक दुर्मिळ गोष्ट आहे,” असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
“6 सप्टेंबरनंतर आम्ही त्या भागात दोन-तीन वेळा शोधमोहीम राबवली. पण आम्हाला त्या दोघांपैकी एकही साप पुन्हा दिसला नाही.”
फोटो स्रोत, Jayesh Dumadia
वन अधिकाऱ्यांनी सांगितले की, रजवाडी सापाने तर चक्क वन विभागाच्या कँपर गाडीत बसून चांगलाच लांबचा प्रवास केला.
ते पुढे म्हणाले, “आम्ही त्याला गाडीखालून बाहेर काढण्याचे खूप प्रयत्न केले. पण तो काही बाहेर निघायला तयार नव्हता.”
“इकडे अंधार पडू लागल्याने आम्ही गाडी घेऊन त्या जागेपासून साधारण 30 किलोमीटर दूर असलेल्या वन विभागाच्या गेस्टहाऊसवर निघून आलो. तिथे पोहोचल्यावर पाहिले तर तो रजवाडी साप गाडीच्या खालीच लपून बसलेला दिसला. अखेर आम्ही त्याला गाडीखालून सुरक्षितपणे बाहेर काढले.”
बीबीसीशी बोलताना कच्छ वन परिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक डॉ. धीरज मित्तल म्हणाले, “आमच्या वन अधिकाऱ्याने या एफ्रो-एशियन सँड स्नेकची केलेली अचूक नोंद ही कच्छचे वन्यजीवन किती समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे, हेच सिद्ध करते.”
“या नोंदी आणि माहितीबाबत आम्ही सायन्स जर्नल्सच्या संपादकांशी संपर्क साधू. जेणेकरून ही ऐतिहासिक नोंद वैज्ञानिक पातळीवर अधिकृतपणे नोंदवली जाईल.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




