Source :- BBC INDIA NEWS

पाकिस्तान

फोटो स्रोत, BBC Urdu

भारतानं 7 मे रोजी पाकिस्तानमधल्या 9 ठिकाणांवर हवाई हल्ला केला. यापैकी 7 ठिकाणं ही लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या इस्लामिक संघटनांचे तळ होते, असं भारतानं म्हटलं आहे.

या दोन्ही दहशतवादी संघटना असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं देखील जाहीर केलं आहे.

भारतात विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करत असलेल्या गटांना आणि व्यक्तींना पाकिस्तान पाठिंबा देत असल्याचा आरोप भारताकडून होतो.

पण, पाकिस्तानं मात्र हे फेटाळून लावलेलं आहे.

पण, 7 मे रोजी केलेल्या कारवाईत ज्या दोन दहशतवादी संघटनांचे तळ उद्धवस्त केल्याचं भारतानं म्हटलंय त्या संघटना नेमक्या काय आहे?

या दोन दहशतवादी संघटना काय आहेत?

लष्कर-ए-तैयबा या नावाचा अर्थ army of the pure असा होतो. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात ही संघटना आहे. 1990 च्या सुमारास हाफिज सईदने लष्कर-ए-तैयबा(LeT) ची स्थापना केली.

1993 पासून लष्कर-ए-तैयबाने लष्करी आणि नागरी ठिकाणांवर अनेक दहशतवादी कारवाया घडवून आणल्याचं युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काऊन्सिलने म्हटलंय.

मुंबईमध्ये नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचाही यात समावेश आहे. यामध्ये 166 जण मारले गेले होते.

याशिवाय मुंबईत जुलै 2006 मध्ये लोकल ट्रेन्समध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि डिसेंबर 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यांमागेही लष्कर-ए-तैयबावरच आरोप झाले होते.

पाकिस्तानातील लाहोर शहरापासून तासाभराच्या अंतरावर मुरीदके आहे. इथेच लष्कर-ए-तैयबा आणि त्यांच्याशी संबंधित इतर संघटनांचं मुख्यालय असून ते 200 एकरांवर पसरलेलं आहे, असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं (UNSC) ने म्हटलं आहे.

ताज हॉटेल, मुंबई

फोटो स्रोत, AFP

सीमेपासून 25 किलोमीटर दूर असणाऱ्या याच मुरीदकेमधल्या मरकज तैयबा इथंही भारताने 7 रोजी हवाई हल्ला केला. मरकज (Markaz) या शब्दाचा अर्थ होतो हेडक्वार्टर्स.

इथे दहशतवाद्यांचा तळ होता आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यात सहभागी झालेल्या अजमल कसाब, डेव्हिड हेडलीसारख्या दहशतवाद्यांना इथेच प्रशिक्षण देण्यात आलं, असं भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत सांगितलं.

लष्कर-ए-तैयबाने वेळोवेळी ओसामा बिन लादेन आणि अल्-कायदाला विविध मार्गांनी मदत केल्याचंही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं (UNSC) म्हटलंय.

पण हा गट संपुष्टात आणल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. या संघटनेचा संस्थापक हाफिज सईदला 2019 मध्ये अटक करण्यात आली असून 31 वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आलेला आहे.

जैश-ए-मोहम्मद

भारतीय लष्कराच्या पत्रकार परिषदेत लष्कर-ए-तैयबासोबतच जैश-ए-मोहम्मद (JeM)चा देखील उल्लेख होता.

जैश-ए-मोहम्मद चा अर्थ Army of the Prophet Mohammad अर्थात प्रेषित मोहम्मदांचं सैन्य. 1999 मध्ये भारतातल्या तुरुंगामधून सुटका झाल्यानंतर मसूद अझहरने ही संघटना स्थापन केली.

24 डिसेंबर 1999ला इंडियन एअरलाईन्सच्या IC814 विमानाचं अपहरण करून ते अफगाणिस्तानातल्या कंदाहारला नेण्यात आलं.

या विमानातल्या 155 ओलिसांची सुटका करण्याच्या बदल्यात भारताच्या तुरुंगात असणाऱ्या मसूद अझहरची मुक्तता करण्यात आली होती.

2001 मधल्या भारतीय संसदेवरच्या हल्ल्यामध्ये लष्कर-ए-तैयबासोबतच जैश-ए-मोहम्मदचाही हात असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर 2002 मध्ये पाकिस्तानने या संघटनेवर बंदी घातली.

मसूद अझहर

फोटो स्रोत, Getty Images

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अनेक आत्मघातकी हल्ल्यांची जबाबदारी या गटाने घेतलेली आहे. पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतातीलच बहावलपूरमध्ये जैशचं मुख्यालय असल्याचा अंदाज आहे.

भारताने हवाई हल्ला केलेल्या 9 जागांपैकी आणखी एक जागा म्हणजे बहावलपूरमधला मरकज सुभानअल्लाह तळ.

आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटरवर असणारा हा तळ म्हणजे जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय होतं. इथे या संघटनेचं भरती आणि प्रशिक्षण केंद्र होतं असं भारतीय सैन्यानं सांगितलं.

भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातले 10 सदस्य आणि 4 सहकारी ठार झाल्याचं जैश-ए-मोहम्मदने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं होतं.

मौलाना मसूद अझहर सार्वजनिक ठिकाणी फार कमी दिसलाय.

हाफिज सईदप्रमाणे पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये मसूद अझहरशी संबंधित बातम्या फार दिसत नाहीत. गेल्या दोन दशकांमध्ये फक्त दोन वेळाच मसूद अझहर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसला आहे.

भारत-पाकिस्तान तणावात आतापर्यंत काय काय घडलं?

पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला झाला. यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे पाकिस्तानमधील दहशतवादी गट असल्याचा आरोप भारतानं केला.

त्यानंतर भारतानं 7 मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला.

हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर असून यामध्ये नागरी वस्त्यांना टार्गेट केलं नसल्याचं भारतानं म्हटलं. पण, यात नागरिकांना टार्गेट केल्याचा दावा पाकिस्तानी लष्करानं केला आहे.

भारताच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, “पाकिस्तानने ड्रोन्सच्या माध्यमातून अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुजसह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.”

त्यानंतर गुरुवारी सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील एअर डिफेन्स सिस्टीमला टार्गेट केले असून लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केल्याचं देखील या निवेदनात म्हटलं आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Reuters

दुसरीकडे भारताचे 25 ड्रोन पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

8 मे रोजी रात्री पाकिस्तानने जम्मू-कश्मीरमधील उधमपूर, काश्मीरमधील अनेक भाग आणि पंजाबमधील पठाणकोट इथं डझनभर क्षेपणास्त्रं डागल्याचा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे. ही क्षेपणास्त्र निष्प्रभ केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानने भारताने केलेल्या या आरोपांचे खंडन केले आहे.

नियंत्रण रेषेजवळील पुंछ भागात काल रात्री जोरदार गोळीबार सुरू होता, ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि एक महिला जखमी झाली.

पुंछचे पोलीस अधिकारी नवीद अहमद यांनी बीबीसीला सांगितले की, “गोळीबारात लोहाल बेला येथील रहिवासी मुहम्मद अबरार यांचा मृत्यू झाला आणि बेलियां गावातील शाहिदा अख्तर नावाच्या महिलेला गोळीबारात दुखापत झाली असून त्यांच्यावर मंडी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.”

त्यानंतर 9 मेच्या रात्रीही पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न सुरू होता. भारतानं मात्र हे हल्ले निकामी केल्याचं लष्करानं म्हटलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC