Home LATEST NEWS ताजी बातमी टक्कल केल्याने केस दाट येतात? पांढरे केस उपटल्याने आणखी पांढरे केस येतात?...

टक्कल केल्याने केस दाट येतात? पांढरे केस उपटल्याने आणखी पांढरे केस येतात? जाणून घ्या 5 गैरसमज आणि वस्तुस्थिती

5
0

Source :- BBC INDIA NEWS

केसांचे तेल किती उपयोगी आहे?

फोटो स्रोत, Getty Images

केस आपल्या सौंदर्यात भर घालतातच, पण त्याचबरोबर आपल्या टाळूचं ऊन, थंडी आणि धुळीपासूनही संरक्षण करतात. निरोगी केस हे चांगला आहार, पोषण, संप्रेरकांचा (हार्मोन्स) समतोल आणि उत्तम आरोग्याचं लक्षणही मानलं जातं.

केस गळण्याची समस्या पूर्वी प्रामुख्याने मध्यम वयानंतर दिसायची. परंतु, आता अनेकांना वयाच्या विशी-तिशीतच या समस्येला सामोरं जावं लागत आहे.

केवळ पुरुषच नाही, तर महिला, तरुण, प्रसूतीनंतरच्या माता, वृद्ध आणि काही वेळा लहान मुलांनाही केस गळतीचा त्रास होतो.

यामुळे बाजारात ‘आठवडाभरात केस वाढतील’, ‘100 टक्के गॅरंटी ‘, ‘टक्कलावर कायमचा उपाय’ अशा अनेक जाहिराती दिसून येतात. पण, यापैकी अनेक दाव्यांना कोणताही ठोस असा वैज्ञानिक पुरावा किंवा आधार नसतो.

केस गळणं हा नेहमीच एखादा आजार असलेच असं नाही. अनेकवेळा ते शरीरात सुरू असलेल्या दुसऱ्या एखाद्या समस्येचं लक्षण असू शकतं. त्यामुळे केस गळण्यामागचं नेमकं कारण शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

केस कसे वाढतात?

प्रत्येक केस एका छोट्या केसकूपातून (हेअर फॉलिकल) वाढतो. प्रत्येक केसाच्या वाढीचा जीवनप्रवास साधारणपणे 3 टप्प्यांतून होतो.

केस कसे वाढतात?

फोटो स्रोत, Getty Images

1. ॲनाजेन

हा केसांच्या वाढीचा टप्पा आहे. ही अवस्था साधारण 2 ते 7 वर्षे टिकते. आपल्या डोक्यावरचे साधारण 85 ते 90 टक्के केस या टप्प्यात असतात.

2. कॅटाजेन

ही मधली अवस्था आहे. ती अल्प काळासाठी असते. या टप्प्यात केसांची वाढ मंदावते.

3. टेलोजेन

हा केसांच्या विश्रांतीचा टप्पा असतो. या टप्प्यानंतर केस गळून पडतात आणि त्याच्या जागी नवीन केस उगवतात.

त्यामुळे दररोज 50 ते 100 केस गळणं हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. याला आजार किंवा वैद्यकीय समस्या समजण्याची गरज नाही.

Caption- डेंग्यू, टायफॉइडसारख्या आजारांनंतर किंवा प्रसूतीनंतरही अनेकांना केस गळतीची समस्या उद्भवू शकते.

फोटो स्रोत, Getty Images

केस गळण्याचे प्रकार आणि प्रमुख कारणं

प्रत्येकामध्ये केस गळण्याची समस्या सारखी नसते.

1. अँड्रोजेनेटिक अलोपेसिया

केस गळतीचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे.

या स्थितीत पुरुषांमध्ये कपाळावरील केस मागे सरकणे, डोक्याच्या मध्यभागी म्हणजेच वरच्या भागातील केस विरळ होणे आणि हळूहळू टक्कल पडणे अशी लक्षणं दिसून येतात. महिलांमध्ये प्रामुख्याने डोक्याच्या मध्यभागी केस पातळ किंवा विरळ होतात. परंतु, महिलांमध्ये पूर्ण टक्कल पडण्याचं प्रमाण कमी असतं. हा प्रकार प्रामुख्याने आनुवंशिक कारणं आणि हार्मोन्समधील बदलांमुळे होतो.

2. टेलोजेन एफ्लुव्हियम

या प्रकारात अचानक आणि नेहमीपेक्षा जास्त केस गळू लागतात.

डेंग्यू, कोविड, टायफॉइड, मोठी शस्त्रक्रिया, प्रसूती किंवा तीव्र मानसिक तणावानंतर अनेकदा अशा केसगळतीची समस्या उद्भवते.

अनेकवेळा अशा परिस्थितीनंतर 3 ते 6 महिन्यांत केस पुन्हा वाढू लागतात.

3. ॲलोपेशिया एरियाटा

हा एक शरीराच्या प्रतिकारशक्तीशी संबंधित आजार आहे.

या आजारात शरीराची रोगप्रतिकारशक्ती केसांच्या मुळांवर (हेअर फॉलिकल्स) हल्ला करते. त्यामुळे डोक्यावर गोलाकार ठिकाणी केस गळून चट्टे पडतात.

या प्रकरणांमध्ये काही जणांच्या भुवया आणि दाढीचे केसही गळू शकतात.

4. ट्रॅक्शन अलोपेसिया

केस सातत्याने खूप घट्ट बांधून ठेवल्यामुळे ही समस्या उद्भवते. घट्ट वेणी, घट्ट पोनीटेल किंवा हेअर एक्स्टेन्शन्स (उदा. हेअरपीसेस) वापरल्यामुळे केस गळू शकतात.

5. स्कारिंग अलोपेसिया

ही समस्या दुर्मीळ असली तरी गंभीर असते. यात केसांची मुळं कायमस्वरुपी खराब होऊ शकतात. उपचाराला उशीर झाल्यास त्या ठिकाणी पुन्हा केस येत नाहीत. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा त्वरीत सल्ला घेणं आवश्यक आहे.

Caption- केस गळण्याची अनेक कारणे आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

दररोज 100 पेक्षा जास्त केस गळत असतील, केस खूप विरळ होत असतील, टाळू (स्कॅल्प) दिसू लागला असेल, गोलाकार भागात केस गळत असतील किंवा भुवया व दाढीचे केसही गळत असतील, तर या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. अशा वेळी त्वचारोगतज्ज्ञांचा (डर्मेटोलॉजिस्ट) त्वरित सल्ला घेणं योग्य आणि हिताचं ठरेल.

डॉक्टर कोणत्या चाचण्या करतात?

प्रत्येकाला सर्व तपासण्या किंवा चाचण्या करण्याची गरज नसते.

लक्षणांनुसार डॉक्टर सीबीसी (कम्प्लिट ब्लड काऊंट), सीरम फेरिटिन, थायरॉईड, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, झिंक, हार्मोन्सच्या तपासण्या किंवा ट्रायकोस्कोपी (केस आणि टाळूची विशेष तपासणी) करण्याचा सल्ला देऊ शकतात.

क्वचित प्रसंगी टाळूची बायोप्सीही केली जाते. या तपासण्यांच्या अहवालानुसार पुढील उपचार निश्चित केले जातात.

Caption- केस वाढीबाबत सोशल मीडियावर दिसणाऱ्या अनेक जाहिरातींना कोणताही वैज्ञानिक आधार नसतो.

फोटो स्रोत, Getty Images

सध्या कोणते उपचार उपलब्ध आहेत?

केस गळण्याचं कारण काय आहे, यावरच त्याचे उपचार ठरतात.

1. शरीरामध्ये पोषक घटकांची कमतरता असेल, तर लोह (आयर्न), व्हिटॅमिन बी12 आणि व्हिटॅमिन डी यांसारख्या घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी उपचार केले जातात.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विनाकारण व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं योग्य नाही.

2. मिनॉक्सिडिल

केसांच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमध्ये मिनॉक्सिडिलचा वापर मोठ्याप्रमाणावर केला जातो.

पुरुष आणि महिलांमधील काही विशिष्ट प्रकारच्या केसगळतीवर हे औषध उपयुक्त ठरते.

परंतु, हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलं पाहिजे.

3. फिनास्टेराइड

याचा वापर प्रामुख्याने पुरुषांमधील आनुवंशिक टक्कल पडण्याच्या समस्येसाठी केला जातो.

हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखीखालीच घेतलं पाहिजे.

4. पीआरपी (प्लेटलेट-रिच प्लाझ्मा)

या उपचारात रुग्णाच्या रक्तातून प्लेटलेट्स वेगळे करून ते एका विशेष पद्धतीने टाळूमध्ये इंजेक्शनद्वारे दिले जातात.

काही लोकांसाठी हा उपचार उपयोगी ठरू शकतो. परंतु, प्रत्येकाला एकसारखाच परिणाम मिळेल असं नाही.

5. लो-लेव्हल लेसर थेरपी

काही संशोधनांमध्ये याचे फायदे दिसून आले आहेत. पण हा उपचार प्रत्येकासाठी आवश्यक असतोच असं नाही.

6. केस प्रत्यारोपण (हेअर ट्रान्सप्लांट)

आनुवंशिक टक्कल असलेल्या काही लोकांसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हा उपचार फक्त अनुभवी प्लास्टिक सर्जन किंवा त्वचारोगतज्ज्ञांकडेच केला पाहिजे.

सोशल मीडियावर दिसणारे उपचार खरे आहेत का?

हल्ली यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेकडो व्हीडिओ दिसतात.

‘7 दिवसांत केस येतील’, ‘या तेलाने टक्कल नाहीसं होईल’, ‘एका पानामुळे नवीन केस येतील’ अशा अनेक जाहिराती वारंवार आपल्याला दिसतात. पण अशा दाव्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नसतो.

केस गळतीची कारणं वेगवेगळी असतात. त्यामुळे सर्वांना एकाच प्रकारचं औषध उपयोगी किंवा गुणकारी ठरत नाही.

स्टिरॉइड लोशन्स धोकादायक असतात का?

डॉक्टर फक्त विशिष्ट परिस्थितींमध्येच स्टिरॉइड्स लिहून देतात.

पण मेडिकल दुकानातून स्वतःच ते विकत घेऊन महिनोन्‌ महिने वापरल्यास त्वचा पातळ होणे, संसर्ग होणे आणि इतर दुष्परिणाम होण्याचा धोका जास्त असतो.

Caption- ज्या लोकांच्या आहारात प्रथिने (प्रोटीन) कमी असतात, त्यांच्यामध्ये केस कमकुवत होण्याची शक्यता असते.

फोटो स्रोत, Getty Images

केसांचे तेल किती उपयोगी आहे?

खोबरेल तेल, बदामाचे तेल यांसारखी तेलं टाळूला ओलावा देऊ शकतात आणि केस तुटण्यापासून काही प्रमाणात संरक्षण करू शकतात.

परंतु, आनुवंशिक टक्कल किंवा तीव्र प्रमाणात होणारी केसगळती पूर्णपणे बरी करू शकत नाहीत.

टक्कल केल्याने केस दाट येतात? पांढरे केस मुळापासून काढल्याने वाढतात? जाणून घ्या वस्तुस्थिती

फोटो स्रोत, Getty Images

केस प्रामुख्याने केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. त्यामुळे आहारात प्रथिने कमी असतील तर केस कमकुवत होण्याची शक्यता असते.

त्यामुळे दैनंदिन आहारात अंडी, दूध, दही, मासे, चिकन (मर्यादित प्रमाणात), डाळी, मूग, सोया उत्पादनं, हिरव्या पालेभाज्या, बदाम, अक्रोड, तीळ, ताजी फळं आणि विविध रंगांच्या भाज्यांचा समावेश असावा.

केस कसे धुवावेत?

अनेकांना असं वाटतं की रोज शॅम्पूने केस धुतल्याने केस गळतात, पण हे खरं नाही. हा एक गैरसमज आहे.

साधारणपणे आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुणं पुरेसं असतं.

ज्यांना जास्त घाम येतो, ते गरजेनुसार अधिक वेळा केस धुवू शकतात.

खूप गरम पाण्याने केस धुणं चांगलं नाही.

सौम्य शॅम्पू वापरणं चांगलं असतं.

हेअर ड्रायर आणि स्ट्रेटनर वापरू शकता, पण अति उष्णता टाळावी. तसेच याचा रोज वापर करणं योग्य नाही.

आवश्यकता असेल तर हीट प्रोटेक्शन म्हणजे उष्णतेपासून संरक्षण करणारी उत्पादने वापरावीत. केस ओले असताना जोरात विंचरू नका.

गैरसमज आणि वस्तुस्थिती

गैरसमज 1: दररोज शॅम्पू केल्याने केस गळतात.

वस्तुस्थिती: योग्य शॅम्पू वापरल्याने साधारणपणे कोणतीही हानी होत नाही.

गैरसमज 2: टक्कल केल्याने केस पुन्हा दाट येतात.

वस्तुस्थिती: याला कोणताही वैज्ञानिक आधार किंवा पुरावा नाही.

गैरसमज 3: तेल लावल्याने टक्कल जाते किंवा केस येतात.

वस्तुस्थितीः नाही.

गैरसमज 4: पांढरे केस मुळापासून उपटल्याने आणखी पांढरे केस येतात.

वस्तुस्थिती : केस उपटून किंवा मुळापासून उपटल्याने आजूबाजूच्या केसांचा रंग बदलत नाही.

गैरसमज 5: प्रत्येकाला बायोटिनच्या गोळ्या आवश्यक असतात.

वस्तुस्थितीः बायोटिनची कमतरता फारच दुर्मीळ असते. तपासणीशिवाय सप्लिमेंट्स घेण्याची गरज नसते.

केस गळणं ही एक सामान्य समस्या आहे. परंतु, प्रत्येकामध्ये त्याची कारणं वेगवेगळी असतात. काही लोकांमध्ये ही केवळ तात्पुरती समस्या असते, तर काहींच्या बाबतीत हार्मोन्समधील बदल, पोषक घटकांची कमतरता, थायरॉइडचे विकार किंवा आनुवंशिक कारणंही असू शकतात.

म्हणून इंटरनेटवर दिसणाऱ्या प्रत्येक उपायावर विश्वास ठेवण्यापेक्षा, समस्या दीर्घकाळ सुरू राहिली तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घेणं सर्वात योग्य ठरतं.

केस गळतीचं योग्य कारण ओळखून वैज्ञानिक पद्धतीने उपचार सुरू केल्यास अनेकांमध्ये ही गळती नियंत्रित करता येऊ शकते.

केसांच्या आरोग्यासाठी केवळ महागडे शॅम्पू, तेल किंवा सौंदर्योपचार पुरेसे नसतात. शरीर निरोगी असेल तर केसही निरोगी राहू शकतात.

संतुलित आहार, पुरेशी झोप, मानसिक शांतता, डोक्याची/टाळूची स्वच्छता आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं- हीच दाट आणि निरोगी केसांची खरी गुपिते आहेत.

(लेखिका डॉक्टर आहेत. या लेखाचा उद्देश वैद्यकीय माहिती, प्रक्रिया आणि उपचारांबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. आरोग्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC