Source :- BBC INDIA NEWS
43 मिनिटांपूर्वी
निवडणूक जिंकल्याचं कळाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ गवर्नमेंट एफिशिएन्सी (DOGE) म्हणजेच सरकारी कार्यक्षमता विभागाची स्थापना करण्याची घोषणा केली होती.
त्याची जबाबदारी टेस्ला आणि स्पेसएक्स कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांच्यासोबत भारतीय वंशाचे खासदार विवेक रामास्वामी यांना दिली होती.
घोषणेवेळी या दोन प्रमुखांविषयी बोलताना ट्रम्प यांनी खास विशेषणं वापरली. ते मस्क यांना ‘द ग्रेट इलॉन मस्क’ म्हणाले; तर विवेक रामास्वामी ‘देशभक्त अमेरिकन’ असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘आम्ही सौम्यपणे वागणाऱ्यातले नाही,’ असं जबाबदारी स्वीकारताना रामास्वामी म्हणाले होते.
ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर डीओजीईने पहिला निर्णय जाहीर केला. त्यात डीओजीईची जबाबदारी आता फक्त इलॉन मस्क यांच्यावर असणार आहे हे स्पष्ट झालंय. विवेक रामास्वामी संघटनेतून बाहेर पडलेत.
सरकारी खर्च आटोक्यात ठेवणं ही DOGE ची जबाबदारी असते. त्यामुळे ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची धुरा सांभाळताच विवेक रामास्वामी यांनी DOGE चा निरोप घेतल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
प्रत्यक्ष रामास्वामी यांनी याबद्दल फारशी प्रतिक्रिया दिली नसली तरी त्यांच्या इलॉन मस्क यांच्यासोबतच्या संबंधात कटुता आली असल्याचं म्हटलं जातंय.
‘स्पेक्ट्रम’ वृत्तसंस्थेचे राजकीय पत्रकार टेलर पॉर्पिलार्ज यांनी या बाबतची एक पोस्ट एक्स (आधीचे ट्वीटर) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिली होती.
“ट्रम्प-वेन्स प्रशासनाच्या प्रवक्त्या ॲना केली यांनी सांगितल्याप्रमाणे DOGE ची उभारणी करण्यात विवेक रामास्वामींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
“पुन्हा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना DOGE पासून फारकत घ्यावी लागेल, असं त्या म्हणाल्यात.
“गेल्या दोन महिन्यात DOGE च्या उभारणीत विवेक यांनी दिलेल्या योगदानासाठी ते कृतज्ञ असून अमेरिकेला महान बनवण्यासाठी विवेक असेच काम करत राहतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.”
विवेक रामास्वामींचं म्हणणं काय?
टेलर यांची ही पोस्ट रिपोस्ट करत विवेक रामास्वामी लिहितात, “DOGEच्या उभारणीत माझा वाटा होता ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. इलॉन आणि संघटनेतील इतर सदस्य सरकारी कामकाज सुरळीत करण्यासाठी समर्थ आहेत यावर मला पूर्ण विश्वास आहे.
“ओहियो मधल्या माझ्या भविष्यातल्या नियोजनाविषयी मी लवकरच सविस्तर सांगेन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, अमेरिकेला पुन्हा महान बनवण्यासाठी आम्ही सगळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मदत करण्यास तत्पर आहोत.”
रामास्वामी 39 वर्षांचे अमेरिकन नागरिक आणि बायोटेक क्षेत्रातील उद्योगपती आहेत. 2024 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारांच्या शर्यतीत रामास्वामी यांचंही नाव होतं. पण कॉकस किंवा प्रायमरी यापैकी कोणत्याही बैठकीत त्यांना पाठिंबा मिळाला नाही.
त्यानंतर रामास्वामी यांनी आपला अर्ज मागे घेत ट्रम्प यांना पाठिंबा द्यायचं ठरवलं. पुढच्या वर्षी ते ओहायोच्या राज्यपाल पदासाठी निवडणुक लढवण्याच्या विचारात आहेत. शिवाय, जे.डी. वेन्स उपराष्ट्राध्यक्ष झाल्याने अमेरिकन सीनेटची एक जागा मोकळी झाली आहे. तीही विवेक यांना मिळू शकते.
DOGE हा एक गैर सरकारी कार्यकारी विभाग असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे.
सरकारी खर्च आटोक्यात ठेवण्यासाठी मार्ग शोधणे आणि अनावश्यक सरकारी संस्था बंद करण्यासाठी अहवाल तयार करणे हे या विभागाचं काम आहे. तिथं काम करताना रामास्वामी तर फ्रेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन (एफबीआय) ही कायद्याची अंमलबाजवणी करणारी संस्थाच बंद करण्याविषयी बोलत होते.
सीएनए या अमेरिकन वृत्तसंस्थेनुसार, जेडी वेन्स यांच्या मोकळ्या जागी रामास्वामी यांची नियुक्ती करण्याची कल्पना डोनाल्ड ट्रम्प यांनीच सुचवली होती.
मात्र, 2026 मध्ये ओहायोमध्ये राज्यपाल पदाची निवडणूक लढवणार असल्याचे संकेत रामास्वामी यांनी त्यांच्या ‘एक्स’ वरच्या पोस्टमध्ये दिले आहेत. पण त्याआधी ते सीनेट जागेवरही काम करतील, असं म्हटलं जात आहे.
विवेक यांच्यावर नाराजी?
ओहायोच्या राज्यपाल पदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा रामास्वामी येत्या आठवड्यात करतील, असं ‘न्यूयॉर्क टाइम्स‘ या अमेरिकन वृत्तपत्राने सांगितलंय.
‘डीओजीईची प्रमुख जबाबदारी ट्रम्प यांनी इलॉन मस्क आणि रामास्वामी या दोघांकडे दिली होती तेव्हापासून दोघांमध्ये बरोबरी नसल्याचं बोललं जात होतं. विवेक यांच्या तुलनेत मस्क अतिशय श्रीमंत आहेत. त्यांची लोकप्रियताही अधिक आहे.”
एका वर्षापुर्वी विवेक रामास्वामी यांची एकूण संपत्ती 96 कोटी डॉलर्स इतकी होती. तर मस्क यांची 449 अब्ज डॉलर्स इतकी. डीओजीईच्या माध्यमातून दोघांनी अमेरिकेच्या फ्रेडरल बजेटमध्ये दोन ट्रिलियन डॉलर एवढी घट होणार असल्याची घोषणा केली. अनेकांना ही अतिशयोक्ती वाटते.
“सोशल मीडियावर परंपरावादी लोकांसोबत रामास्वामी एच-1बी व्हिजावरून वाद घालत होते असं ट्रम्प यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. हे ट्रम्प यांना आवडलं नाही. ते कौशल्यपूर्ण कामगारांना एच-1बी व्हिजा देण्याचं समर्थन करतात. ट्रम्पचे काही समर्थक याचा विरोध करत आहेत,” असं न्यूयॉर्क टाइम्समध्ये लिहिलं आहे.
डिसेंबर महिन्यात रामास्वामी यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली होती. प्रतिभावान लोकांना सोडून अमेरिकन संस्कृती सामान्य दर्जाच्या लोकांना प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी एच-1बी व्हिजा गरजेचा आहे, असं रामास्वामी यांनी लिहिलं होतं.
“आपण मॅथ ऑलंपियार्ड विजेते तयार करण्याऐवजी प्रॉम क्वीनला जास्त महत्त्व देतो. वाचणं, लिहिणं याऐवजी विनोद करत बसतो. असं असताना आपण चांगले इंजिनियर निर्माण करू शकत नाही.
“कार्टुनऐवजी आपल्याला विज्ञानावर लक्ष द्यायची गरज आहे. टीव्हीला कमी आणि पुस्तकांना जास्त वेळ द्यायचा हे ठरवलं पाहिजे. मॉल संस्कृतीपासून दूर रहायची गरज आहे.”
विवेक रामास्वामी यांच्या या वक्तव्याकडे दुसऱ्यांना कमी लेखण्याची वृत्ती म्हणून पाहिलं जात असल्याचं न्यूयॉर्क टाइम्सने लिहिलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC