Home LATEST NEWS ताजी बातमी ट्रम्प यांना जीव वाचवण्याचं श्रेय देणाऱ्या नॅटली हार्प, अशा बनल्या ट्रम्प यांच्या...

ट्रम्प यांना जीव वाचवण्याचं श्रेय देणाऱ्या नॅटली हार्प, अशा बनल्या ट्रम्प यांच्या एवढ्या विश्वासू

6
0

Source :- BBC INDIA NEWS

35 वर्षीय हार्प ट्रम्प यांच्या सर्वात निष्ठावान सहकाऱ्यांपैकी एक आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

नॅटली हार्प या गेल्या काही वर्षांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सर्वात जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक म्हणून समोर आल्या आहेत. त्या ट्रम्प यांच्याबरोबर जेवढ्या वेळा दिसतात तेवढ्या वेळा फार कमी लोक दिसतात.

35 वर्षीय हार्प या ट्रम्प यांच्याबरोबर दीर्घकाळापासून काम करणाऱ्या आणि सर्वात निष्ठावान सहकाऱ्यांपैकी एक आहेत. ट्रम्प यांच्या ‘ट्रुथ सोशल’वर केल्या जाणाऱ्या पोस्टसह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवलेल्या आहेत.

जॉर्जियाचे सिनेटर जॉन ऑसॉफ यांनी नुकतंच एका भाषणात त्यांचं नाव घेतल्यानं त्यांची पुन्हा चर्चा सुरू झाली. ऑसॉफ यांनी ट्रम्प यांच्यावर वारंवार टीका केली आहे. त्यांचं हे भाषण नंतर सोशल मीडियावर व्हायरलही झालं.

कतारच्या ‘अमीर’ यांनी ट्रम्प यांना भेट दिलेल्या विमानात (ज्याला हवेत उडणारा महालही म्हटलं जातं) ट्रम्प यांनी नॅटली यांच्याबरोबर प्रवास केला होता. या दौऱ्यावर ऑसॉफ यांनी टीका केली होती.

त्यांनी नवीन एअर फोर्स वन विमान आणि गेल्या महिन्यात तुर्कीयेहून निघताना ट्रम्प यांनी गुपचूप विमान बदलल्याच्या वृत्तांचा उल्लेख केला. त्यावेळी सोबत असलेल्या काही मोजक्या लोकांमध्ये हार्प यांचा समावेश होता.

‘गेटकीपर’ आणि ‘कंफर्ट ब्लँकेट’ असं म्हटलं गेलेल्या या नॅटली हार्प यांच्याबाबत सध्या अनेकांमध्ये उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतंय.

व्हाइट हाऊस पर्यंतचा प्रवास

हार्प यांचा जन्म कॅलिफोर्नियात झालेला असून त्या एका सनातनी ख्रिश्चन कुटुंबातील आहेत. व्हाईट हाऊसपर्यंत पोहोचण्यासाठी हार्प यांनी एक असामान्य मार्ग अवलंबला आहे.

ट्रम्प यांनी आपला जीव वाचवल्याचं सांगत त्यांना श्रेय दिल्यानं त्या चर्चेत आल्या होत्या.

ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात ‘राइट टू ट्राय ॲक्ट’ मंजूर करण्यात आला होता. त्यामुळं काही विशिष्ट रुग्णांना प्रायोगिक उपचारांपर्यंत पोहोचण्याची अधिक संधी मिळाली. हार्प याही तेव्हा हाडांच्या कर्करोगावर अशाच प्रकारे उपचार घेत होत्या.

या अनुभवाबद्दल उघडपणे बोलत त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ट्रम्प समर्थक ‘मागा’ (MAGA – Make America Great Again) गटात कमी वेळात ओळख आणि लोकप्रियता मिळवली. त्यानंतर लगेचच ट्रम्प यांच्या 2020 दुसऱ्या निवडणूक मोहिमेच्या सल्लागार मंडळात त्यांचा समावेश झाला.

जॉर्जियाचे डेमोक्रॅटिक सिनेटर ऑसॉफ यांनी ट्रम्प यांच्या तुर्कीये दौऱ्यावर टीका केली आणि त्यात नॅटली हार्प यांचा विशेष उल्लेख केला.

फोटो स्रोत, Getty Images

“बाजारात उपलब्ध असलेल्या केमोथेरपीने माझ्यावर उपचार होऊ शकत नव्हते, तेव्हा कोणीही मला क्लिनिकल ट्रायल्समध्ये समाविष्ट करू इच्छित नव्हते,” असं हार्प 2020 च्या रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये म्हणाल्या होत्या.

“मिस्टर प्रेसिडेंट, त्यांनी मला प्रायोगिक उपचार पद्धतीत सहभागाचा अधिकार दिला नाही. तो तुम्ही दिला. तुमच्याशिवाय, मंजुरीची वाट पाहतच माझा जीव गेला असता.”

यावर, “त्यांनी टेलिव्हिजन स्क्रीन अशा प्रकारे उजळवून टाकली, जसं करताना मी फार कमी लोकांना पाहिलं आहे,” असं ट्रम्प कार्यक्रमानंतर म्हणाले होते.

या निवडणुकीत ट्रम्प यांच्या पराभवानंतर, हार्प यांना ‘वन अमेरिका न्यूज नेटवर्क’ (OAN) वर एक कार्यक्रम सादर करण्याचं काम मिळालं होतं.

तिथे त्यांना कट्टर ट्रम्प समर्थक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्या 2020 ची निवडणूक ट्रम्प यांनी जिंकली असल्याचा खोटा दावा त्या करत राहिल्या. 2022 मध्ये त्यांनी ते नेटवर्क सोडलं आणि ट्रम्प यांच्या अध्यक्षीय प्रचार मोहिमेत सहभागी झाल्या.

नॅटली हार्प यांचे व्हाइट हाऊसमधील पद

ट्रम्प हार्प यांच्याबद्दल काय विचार करतात याबद्दल मॅगी हॅबरमन, जोनाथन स्वान किंवा मायकल वुल्फ यांसारख्या पत्रकारांच्या पुस्तकांमधील निनावी, इतर सुत्रांकडून बरीचशी माहिती समोर आली आहे.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या फारशी माहिती उपलब्ध नाही.

हार्प यांचे भाऊ प्रेस्टन हार्प यांनी सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं की, “माझ्या आईने आम्हाला ज्या गोष्टींचा आदर करायला शिकवलं, ट्रम्प त्या सर्वासारखे आहेत. त्यामुळे मला वाटतं की, तिचं ट्रम्प यांच्याबाबतचं आकर्षण तिथूनच आलं आहे.”

त्यांनी म्हटलं की, नॅटली हार्प यांनी लहानपणापासूनच व्हाईट हाऊसचं वेड होतं. त्यांनी इराक युद्धादरम्यान जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्यासह पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षांना पत्रं लिहिली होती.

व्हाईट हाऊसमध्ये हार्प यांचे अधिकृत पद 'राष्ट्राध्यक्षांचे कार्यकारी सहाय्यक' हे आहे.

फोटो स्रोत, Getty Images

जेव्हा हार्प व्हाईट हाऊसमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांचं “स्वप्न अखेर साकार झालं”. तसंच त्यांची बहीण ट्रम्प यांची “सर्वात मोठी चाहती आहे, त्यामुळेच कदाचित त्यांना ती आवडते,” असंही प्रेस्टन म्हणाले.

“शिवाय ती सुंदर आहे, तिचं व्यक्तिमत्त्व खूप छान आहे. तिला वाटतं की त्यांनी तिचा जीव वाचवला आहे. त्यामुळे जी व्यक्ती अशा प्रकारच्या कृतज्ञतेने जगते, ती तिला नक्कीच खूप आकर्षक वाटत असेल,” असंही प्रेस्टन म्हणाले.

व्हाइट हाऊसमध्ये हार्प यांचं अधिकृत पद राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकारी सहाय्यक (एक्झिक्युटिव्ह असिस्टंट) असं आहे.

सहसा हे पद तुलनेनं कनिष्ठ असतं. त्यात कामाचं व्यवस्थापन करणे, वेळापत्रक तयार करणे, घडामोडींवर लक्ष ठेवणे आणि नियमित पण आवश्यक अशी सचिवाची कामं करणं याचा समावेश असतो.

मात्र, उपलब्ध माहितीनुसार, हार्प यांनी या भूमिकेला एक नवीन अर्थ दिला आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या प्रशासनात हे पद सांभाळलेल्या मॅडेलिन वेस्टरहाउट यांच्यासारख्या इतर आधीच्या व्यक्तींपेक्षा त्यांनी अधिक ओळख मिळवली आहे.

हार्प किती प्रभावी आहेत?

काही दिवसांपूर्वी जेव्हा सीएनएनच्या एका पत्रकारानं ट्रम्प यांना ऑसॉफच्या यांच्या वक्तव्यांबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा व्हाईट हाऊसनं नंतर त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडियाखात्यावरून संताप व्यक्त केला होता. पत्रकार क्रिस्टन होम्स यांनी एका कर्मचाऱ्यावर “घृणास्पद हल्ला” केला आहे, असंही यात म्हटलं होतं.

“एक दिवस तुमची मुलं तुमचा हा घृणास्पद आणि अमानवीय प्रश्न पाहतील. त्यांचे पालक इतके क्रूर आणि सूडबुद्धीचे असू शकतात यांची त्यांना किळस आणि लाज वाटेल,” असंही त्यांनी होम्सला उद्देशून केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये म्हटलं होतं.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात हार्प एक कर्मचारी म्हणून जवळजवळ नेहमीच उपस्थिती असते.

व्हाइट हाऊसमध्ये, पत्रकार त्यांना अनेकदा ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांच्यापासून काही फुटांच्या अंतरावर उभ्या असलेलं किंवा त्यांच्या दौऱ्यांसाठी एअर फोर्स वनमध्ये प्रवेश करताना पाहत असतात.

“ती खरंच नेहमीच आसपास असते, ” असं व्हाईट हाऊसच्या एका सुत्रानं बीबीसीला सांगितलं.

नॅटली हार्प

फोटो स्रोत, asos Katopodis/Getty Images

व्हाइट हाऊसमधील लोक आणि पत्रकार यांच्यात अनेकदा त्यांना “ह्युमन प्रिंटर” म्हणून ओळखलं जातं. कारण त्या नेहमीच एक पोर्टेबल प्रिंटर घेऊन फिरताना दिसतात. ट्रम्प यांना आवडणाऱ्या लेख आणि सोशल मीडिया पोस्टच्या प्रिंट त्या देत असतात.

म्हणजे ट्रम्प यांना कोणती माहिती किंवा अपडेट्स मिळतील हे ठरवण्याचे नेहमीपेक्षा जास्त अधिकार हार्प यांना आहेत, असा याचा अर्थ होतो असं मत व्हाइट हाऊसच्या कामाशी परिचित आणखी एका सुत्रानं व्यक्त केलं आहे.

अमेरिकेच्या माध्यमांशी बोलताना काही सुत्रांनी त्यांचं वर्णन ‘गेटकीपर’ आणि ‘कम्फर्ट ब्लँकेट’ असं केलं आहे.

हार्प सोशल मीडियावर ट्रम्प यांच्यासाठी लिहिण्याचं कामही करतात तसंच त्या त्यांच्या ‘ट्रुथ’ या सोशल अकाउंटवर त्यांच्या वतीने पोस्टही करतात.

ऑसॉफ यांच्या वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणावर शेअर झालेल्या एका फोटोमध्ये, हार्प ट्रम्प यांच्या लिहिण्याच्या शैलीत एक पोस्ट टाईप करत असल्याचे दिसत आहेत. कमला हॅरिस यांचं 2024 चं भाषण पाहत असताना ट्रम्प त्यांना पोस्ट लिहायला सांगत होते.

25 फेब्रुवारी 2025 रोजी, जेव्हा ट्रम्प कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी करत होते, तेव्हा नताली हार्प व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये उपस्थित होत्या.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

हार्प यांची चर्चा सुरू झाल्यानंतर व्हाईट हाऊसनं त्या ‘विश्वासू आणि मौल्यवान’ सदस्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र ट्रम्प यांनी कॅमेऱ्यासमोर त्यांच्याबद्दल क्वचितच भाष्य केलं आहे.

तुर्कीयेहून परत जाण्यासाठी ट्रम्प ज्या विमानात बसले होते, त्या विमानात हार्पही असल्याकडे इशारा करणाऱ्या अनेक टीका कारांमध्ये ऑसॉफ यांचाही समावेश होता.

अमेरिकेला इराणकडून असलेल्या धोक्याची माहिती मिळाल्यानंतर ट्रम्प यांनी या विमानाने प्रवास केला होता, असंही सांगण्यात आलं होतं.

ट्रम्प यांच्या कार्यकाळात सविस्तर वार्तांकन केलेले पत्रकार हॅबरमन यांना MS Now या वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात, ‘ट्रम्प यांनी हार्प यांना त्या गुप्त विमानातून सोबत का नेलं’, असं विचारण्यात आलं होतं.

त्यावर, “दुसरा चांगला शब्द नसल्यामुळं सांगायचंच तर, त्या त्यांच्यासाठी एक प्रकारच्या ‘बिंकी’ आहेत, एक ‘कम्फर्ट ब्लँकेट’.

2024 मध्ये न्यूयॉर्क टाइम्ससाठी वृत्त देताना हॅबरमन आणि स्वान यांनी सांगितलं होतं की, हार्प यांनी कथितपणे ट्रम्प यांना एक पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी, “तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात,” असं लिहिल्याचं ते म्हणाले होते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC