Home LATEST NEWS ताजी बातमी डायलिसिसची वेळ का येते? किडनीच्या आजाराची लक्षणं दिसेपर्यंत उशीर का झालेला असतो?

डायलिसिसची वेळ का येते? किडनीच्या आजाराची लक्षणं दिसेपर्यंत उशीर का झालेला असतो?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

डायलिसिसची वेळ का येते? किडनीच्या आजाराची लक्षणं दिसेपर्यंत उशीर का झालेला असतो?

फोटो स्रोत, Getty Images

  • Published

  • वाचन वेळ: 9 मिनिटे

भारतामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणाचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना आणखी एक आरोग्य समस्या वेगाने डोके वर काढत आहे ती म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज (CKD).

भारतात सध्या 13.8 कोटी पेक्षा जास्त लोक क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) सह जगत आहेत. जागतिक स्तरावर मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या आजारांमध्ये क्रॉनिक किडनी डिसीज नवव्या क्रमांकावर आहे.

क्रॉनिक किडनी डिसीजच्या ओझ्याच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून मधुमेह आणि हृदयविकारांप्रमाणेच क्रॉनिक किडनी डिसीजसुद्धा आता भारतासमोरचं पुढचं मोठं आरोग्य आव्हान बनत आहे.

हा आजार अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही ठळक लक्षणं दाखवत नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना किडनीची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतरच आजार असल्याचं समजतं. तज्ज्ञांच्या मते, म्हणूनच CKD ला अनेकदा ‘सायलेंट डिसीज’ किंवा ‘सायलेंट किलर’ म्हटलं जातं.

किडनीचं काम रक्तातील अपायकारक पदार्थ बाहेर काढणं, शरीरातील पाण्याचं आणि क्षारांचं संतुलन राखणं आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात मदत करणं असतं. पण जेव्हा किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते, तेव्हा त्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात.

यामुळे थकवा, सूज, भूक मंदावणं किंवा लघवीत बदल यांसारखी लक्षणं उशिरा दिसू लागतात. अनेकदा रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचतात तेव्हा किडनीचं मोठं नुकसान झालेलं असतं आणि काही प्रकरणांमध्ये डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय उरत नाही.

किडनीच्या वाढत्या आजारामागील कारणं, उशिरा होणारं निदान, उपचारांपुढील आव्हानं आणि हा धोका कमी करण्यासाठी काय करता येईल, याचा आढावा आपण इथं घेत आहोत.

आजाराचं निदान उशिरा का होतं?

क्रॉनिक किडनी डिसीजचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार बहुतेक वेळा कोणतीही स्पष्ट लक्षणं दाखवत नाही.

किडनीची कार्यक्षमता निम्म्याहून अधिक कमी झाल्यानंतरही अनेक व्यक्तींना स्वतःला काही गंभीर समस्या असल्याची जाणीव होत नाही. त्यामुळे नियमित तपासणी न केल्यास आजार लक्षात येत नाही.

यामध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना विशेष धोका असतो.

हे दोन्ही आजार वर्षानुवर्षं किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं नुकसान करू शकतात. मात्र रुग्णांचं लक्ष अनेकदा रक्तातील साखर किंवा रक्तदाब नियंत्रित ठेवण्याकडे असतं; किडनीची नियमित तपासणी मात्र मागे पडते.

ग्रामीण भागात किंवा कमी उत्पन्न गटांमध्ये तर तपासणीच्या सुविधा, जागरूकता आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता यांचाही प्रश्न असतो. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांनाही याचा मोठा धोका असतो.

डायलिसिसची वेळ का येते? किडनीच्या आजाराची लक्षणं दिसेपर्यंत उशीर का झालेला असतो?

फोटो स्रोत, Getty Images

तज्ज्ञांच्या मते, रक्त आणि लघवीच्या साध्या चाचण्यांमधून किडनीच्या कार्यक्षमतेबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते. मात्र अशा तपासण्या अनेकदा लक्षणं दिसल्यानंतरच केल्या जातात. त्यामुळे जेव्हा निदान होतं, तेव्हा काही रुग्णांमध्ये किडनी निकामी होण्याची प्रक्रिया खूप पुढे गेलेली असते.

म्हणूनच सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर जोखिम असणाऱ्या लोकांना नियमित स्क्रीनिंगवर अधिक भर देण्याची गरज असल्याचं सांगतात.

CKD ची लक्षणं कोणती? त्याचा सर्वाधिक धोका कोणाला असतो?

क्रॉनिक किडनी डिसीजचा विचार केला तर इथं चिंता केवळ रुग्णसंख्येची नाही. तर या आजाराचं निदान अनेकदा उशिरा होतं, म्हणजे किडनीचं लक्षणीय नुकसान झाल्यानंतरच रुग्ण डॉक्टरांकडे पोहोचतात. अशा वेळी हा आजार अधिक जीवघेणा ठरू शकतो.

परिणामी, अनेक रुग्णांना डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाची गरज भासते. जर आजाराचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात झालं आणि योग्य उपचार मिळाले, तर अशा अनेक प्रकरणांमध्ये ही गरज टाळता आली असती.

डायलिसिसची वेळ का येते? किडनीच्या आजाराची लक्षणं दिसेपर्यंत उशीर का झालेला असतो?

फोटो स्रोत, Getty Images

याबाबत आम्ही डॉ. निरंजन कुलकर्णी यांच्याकडून अधिक माहिती घेतली. ते मुंबईतल्या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयातील नेफ्रोलॉजी विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, “सुरुवातीची लक्षणं दिसून येईपर्यंत किडनीनं आपल्या फिल्टरिंग क्षमतेचा मोठा भाग गमावलेला असू शकतो. सुरुवातीच्या अवस्थेतील नुकसान अनेकदा पूर्णपणे लक्षणविरहित असतं. एका अभ्यासात तपासणी करण्यात आलेल्या सुमारे 17% लोकांमध्ये, ज्यांपैकी बहुतांश जणांना कोणतीही लक्षणं नव्हती, रक्त किंवा लघवीच्या चाचणीमधून हा आजार आढळून आला. सूज येणं, दम लागणं किंवा सतत थकवा जाणवणं यांसारखी लक्षणं दिसू लागतात, तेव्हा अनेकदा किडनीची कार्यक्षमता आधीच मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते.”

“आराम करूनही न जाणारा थकवा, घोटे, पाय किंवा चेहऱ्यावर सतत येणारी सूज, फेसाळ किंवा बुडबुडे असलेली लघवी, विशेषतः रात्री वारंवार लघवीला जाण्याची गरज, भूक कमी होणं, मळमळ, स्नायूंमध्ये गोळे येणं आणि एकाग्रता राखण्यात अडचण येणं ही किडनीच्या कार्यक्षमतेत घट झाल्याची संभाव्य लक्षणं असू शकतात. यातील अनेक लक्षणं अस्पष्ट स्वरुपाची असतात आणि तणाव, वाढतं वय किंवा इतर आजारांमुळे होत असल्याचं समजून दुर्लक्ष केलं जाऊ शकतं. त्यामुळे निदानात विलंब होण्याची शक्यता वाढते.”

डायलिसिसची वेळ का येते? किडनीच्या आजाराची लक्षणं दिसेपर्यंत उशीर का झालेला असतो?

फोटो स्रोत, Getty Images

याचा धोका सर्वात जास्त कोणाला असतो असं विचारल्यावर डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी मधुमेही आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांकडे निर्देश केला.

ते सांगतात, “मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना क्रॉनिक किडनी डिसीजचा सर्वाधिक धोका असतो. भारतात किडनी निकामी होण्याच्या बहुतांश प्रकरणांमागे ही दोन कारणं आढळतात. याशिवाय 50 वर्षांवरील व्यक्ती, लठ्ठपणाची समस्या असलेले लोक, धूम्रपान करणारे, किडनीच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असलेले, दीर्घकाळ वेदनाशामक औषधांवर अवलंबून असणारे, तसेच स्वयंप्रतिकार (autoimmune) विकार, वारंवार होणारा मूत्रपिंड संसर्ग किंवा मूतखड्याचा त्रास असलेले लोक यांनाही क्रॉनिक किडनी डिसीजचा धोका जास्त असतो.”

तपासण्या कधी करायच्या आणि काय काळजी घ्यायची?

मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या प्रत्येक व्यक्तीने निदान झाल्यापासून वर्षातून किमान एकदा किडनीची तपासणी करून घ्यावी, अशी शिफारस बहुतेक डॉक्टर करतात.

गुंतागुंत निर्माण होण्याची वाट पाहण्याऐवजी सुरुवातीपासूनच तपासणी करणं महत्त्वाचं मानलं जातं. यासाठी दोन साध्या चाचण्या केल्या जातात. पहिली असते ग्लोमेर्युलर फिल्ट्रेशन रेट (GFR) चा अंदाज घेण्यासाठी सीरम क्रिएटिनिनची रक्त तपासणी आणि दुसरी अल्ब्युमिनसाठी लघवीची तपासणी.

ज्यांना आधीपासून किडनीचा त्रास आहे किंवा ज्यांची रक्तातील साखर नीट नियंत्रणात नाही, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक वारंवार तपासण्या करण्याची गरज भासू शकते.

तरुणांनाही धोका

फोटो स्रोत, Getty Images

रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, मीठ आणि प्रक्रिया केलेल्या (processed) अन्नपदार्थांचं सेवन कमी करणं, मांसाहाराचं अतिसेवन टाळणं, पुरेसं पाणी पिणं, नियमित व्यायाम करणं, योग्य वजन राखणं, धूम्रपान सोडणं आणि मद्यपान टाळणं या उपायांमुळे किडनीचं नुकसान होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

तसेच किडनीचा आजार सुरू झाला असेल, तर त्याचा वेग कमी करण्यासही मदत होऊ शकते. अर्थात, जिथे वैद्यकीय उपचारांची गरज आहे तिथे हे उपाय उपचारांचा पर्याय ठरत नाहीत; मात्र किडनीच्या आजाराचा धोका कमी करण्यासाठी आणि किडनीचं आरोग्य जपण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतात.

किडनीच्या आजाराबद्दल पडणारे महत्त्वाचे प्रश्न

किडनीच्या आजाराबद्दल अनेक गैरसमज असतात तसेच एकूणच याची योग्य माहिती लोकांना नसते. किडनीसंदर्भात नेहमी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर डॉ. निरंजन कुलकर्णी यांनी दिली आहेत.

प्रिस्क्रिप्शनविना वेदनाशामक औषधांचा दीर्घकाळ वापर किती घातक ठरू शकतो?

डॉ. कुलकर्णी: अधूनमधून डोकेदुखीसाठी वेदनाशामक औषध घेणं आणि दीर्घकाळाच्या वेदनांसाठी नियमितपणे ती औषधं घेणं यात मोठा फरक आहे. आयबुप्रोफेन (Ibuprofen) आणि डायक्लोफेनॅक (Diclofenac) यांसारखी NSAIDs गटातील औषधं किडनीकडे होणारा रक्तपुरवठा कमी करू शकतात. त्यांचा नियमित आणि दीर्घकालीन वापर किडनीला कायमस्वरूपी नुकसान पोहोचवू शकतो.

विशेषतः शरीरात पाण्याची कमतरता असलेल्या, वयोवृद्ध, मधुमेह असलेल्या किंवा आधीपासून किडनीची कार्यक्षमता कमी झालेल्या व्यक्तींमध्ये हा धोका अधिक असतो. त्यामुळे दीर्घकाळ वेदनाशामक औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

प्रोटीन सप्लिमेंट्स, हर्बल उपाय किंवा फिटनेस प्रॉडक्ट्स धोकादायक ठरू शकतात का?

डॉ. कुलकर्णी: पोषणतज्ज्ञ किंवा डॉक्टरांच्या योग्य मार्गदर्शनाशिवाय घेतल्यास अशी उत्पादने किडनीसाठी धोकादायक ठरू शकतात. जास्त प्रमाणातील प्रोटिन सप्लिमेंट्स आधीच कमकुवत झालेल्या किडनीवर अतिरिक्त ताण आणू शकतात. त्यामुळे ज्यांना आधीपासून किडनीचा आजार आहे, त्यांनी कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी नेफ्रॉलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.

ते पुढं सांगतात, “भारतामध्ये अनेक हर्बल आणि सप्लिमेंट उत्पादनांची तपासणी प्रिस्क्रिप्शन औषधांइतक्या कठोर निकषांवर होत नाही. त्यामुळे त्यामध्ये दूषित पदार्थ असण्याचा धोका असतो. यामध्ये अफ्लाटॉक्सिन्स (aflatoxins) किंवा यकृत आणि किडनीला हानी पोहोचवणारे इतर घटक असू शकतात. तसेच ज्येष्ठमध (licorice root) यांसारखे काही हर्बल घटक रक्तदाब वाढवू शकतात किंवा शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन बिघडवू शकतात. काही पारंपरिक औषधी उपचारांचाही किडनीच्या दुखापतीशी संबंध आढळून आला आहे.”

किडनीच्या आरोग्याबाबत लोकांच्या सर्वात मोठ्या गैरसमजुती कोणत्या आहेत?

डॉ. कुलकर्णीः किडनीचा आजार झाला की नेहमी वेदना होतात, अशी अनेकांची समजूत असते. प्रत्यक्षात बहुतांशवेळा किडनीच्या आजारांमध्ये वेदना होत नाहीत. आणखी एक गैरसमज म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यातील क्रॉनिक किडनी डिसीज फार गंभीर नसतो, कारण डायलिसिसची वेळ अजून दूर असते. प्रत्यक्षात, उपचारांचा सर्वाधिक फायदा सुरुवातीच्या टप्प्यातच होऊ शकतो.

तरुणांनाही धोका

किडनीचे आजार हे केवळ वृद्धांचं संकट नाही, असं तज्ज्ञ सांगतात. आता तरुण भारतीयांमध्येही क्रॉनिक किडनी डिसीजची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. यामागे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची वाढती रुग्णसंख्या हे एक महत्त्वाचं कारण आहे.

जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे नेफ्रॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. ऋषी देशपांडे यांच्यामते, “टाइप-2 मधुमेह हा जवळपास 40 ते 50 टक्के क्रॉनिक किडनी डिसीज प्रकरणांमागचा प्रमुख घटक आहे, तर 20 ते 27 टक्के प्रकरणं उच्च रक्तदाबाशी संबंधित आहेत. भारतातील अनेकांना या दोन्ही समस्या तुलनेने कमी वयात होऊ लागल्या आहेत.”

तपासण्या कधी करायच्या आणि काय काळजी घ्यायची?

फोटो स्रोत, Getty Images

याशिवाय वाढतं शहरीकरण, लठ्ठपणा, जास्त मीठ आणि साखर असलेले प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव आणि अपुरी झोप यामुळेही किडनीच्या आजाराचा धोका वाढत आहे, असंही ते सांगतात.

तरुणांना असलेल्या धोक्याबद्दल डॉ. देशपांडे सांगतात, “शिवाय जिममध्ये वापरली जाणारी काही प्रोटिन सप्लिमेंट्स, वजन वाढवणारी उत्पादने, परफॉर्मन्स एन्हान्सर्स आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतली जाणारी औषधंही किडनीवर ताण आणू शकतात. काही भागांमध्ये CKDu (Chronic Kidney Disease of Unknown Cause) नावाचा प्रकारही वाढताना दिसत आहे. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि इतर काही भागांमध्ये हा आजार विशेषतः तरुण, कमी उत्पन्न असलेल्या शेतमजुरांमध्ये आढळतो. उष्णतेचा ताण, निर्जलीकरण, दूषित पाणी आणि जड धातूंचा संपर्क यांचा याच्याशी संबंध असू शकतो.”

डायलिसिसची वेळ का येते? किडनीच्या आजाराची लक्षणं दिसेपर्यंत उशीर का झालेला असतो?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. ऋषी देशपांडे सांगतात, “क्रॉनिक किडनी डिसीजचा सर्वाधिक परिणाम केवळ आरोग्यावर नाही तर आर्थिकदृष्ट्याही होतो. डॉ. देशपांडे यांच्या माहितीनुसार, भारतातील क्रॉनिक किडनी डिसीजच्या रुग्णांचा वार्षिक खर्च सरासरी सुमारे 3.64 लाख रुपये असू शकतो. सुरुवातीच्या टप्प्यातही तपासण्या, डॉक्टरांच्या भेटी आणि औषधांचा खर्च सतत सुरू राहतो.”

ते सांगतात, “डायलिसिसची वेळ आल्यास आर्थिक ताण आणखी वाढतो. अनेक कुटुंबांना कर्ज घ्यावं लागतं, मालमत्ता विकावी लागते किंवा बचत संपवावी लागते. काही रुग्ण आर्थिक कारणांमुळे उपचारही बंद करतात. उपचारासाठी रुग्णांसोबत जाणाऱ्या कुटुंबीयांच्याही उत्पन्नावर परिणाम होतो.”

ही स्थिती कशी बदलता येईल?

मग या स्थितीत सुधारणा कशी करता येईल? असं विचारल्यावर डॉ. ऋषी देशपांडे सांगतात, “क्रॉनिक किडनी डिसीजचं ओझं कमी करण्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं पाऊल म्हणजे लवकर निदान. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींसाठी दरवर्षी eGFR आणि युरीन अल्ब्युमिन-क्रिएटिनिन रेशो (UACR) चाचणी बंधनकारक करण्याचा विचार होऊ शकतो.”

ही स्थिती कशी बदलता येईल?

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. देशपांडे पुढं सांगतात, “सध्या मोठ्या प्रमाणात खर्च होणाऱ्या डायलिसिसऐवजी, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB PM-JAY) अंतर्गत किडनी आजाराची प्रगती थांबवणाऱ्या बाह्यरुग्ण (OPD) पॅकेजेसना अधिक निधी देण्याची गरज असल्याचं आमच्यासह अनेक तज्ज्ञांचं मत आहे. अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्नपदार्थांवर फ्रंट-ऑफ-पॅक सूचना देणारं लेबल लावणे आणि जास्त सोडियम असलेल्या पदार्थांवर कर किंवा दंड लावणे यासारख्या उपायांचा विचार केला जाऊ शकतो. आंध्र प्रदेशातील उद्दानम आणि ओडिशातील काही भागांसारख्या किडनी आजारांचे प्रमाण जास्त असलेल्या भागांमध्ये पर्यावरणीय आणि साथरोगशास्त्रीय तपासणी पथके तैनात करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. भूजलातील जड धातू (Heavy Metals), कीटकनाशकांचा वापर आणि पारंपरिक किंवा खनिज औषधांमधील धातूजन्य भेसळ यावर कठोर देखरेख आणि नियमन केल्यास किडनीवरील पर्यावरणीय धोके कमी होऊ शकतात. उन्हात काम करणाऱ्या कामगारांना ठरावीक अंतराने सावलीत विश्रांती आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्याची मागणी होत आहे. यामुळे उष्माघात आणि त्यातून होणाऱ्या किडनीच्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.”

किडनीचं आरोग्य जपण्यासाठी आजपासून कोणती 5 पावलं उचलता येतील?

1. नियमित तपासणी करून घ्या

रक्त आणि लघवीच्या साध्या चाचण्यांद्वारे किडनीचं नुकसान गंभीर होण्यापूर्वीच शोधता येऊ शकतं. विशेषतः 40 वर्षांनंतर, किंवा मधुमेह, उच्च रक्तदाब अथवा किडनीच्या आजार कुटुंबात कोणाला असल्यास, दरवर्षी रक्तदाब, रक्तातील साखर आणि किडनीच्या कार्यक्षमतेची तपासणी करून घ्यावी.

2. रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा

मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचं निदान झालेलं असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते नियंत्रणात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. किडनीचं नुकसान टाळण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो.

3. आहाराकडे लक्ष द्या आणि पुरेसं पाणी प्या

मीठाचं प्रमाण मर्यादित ठेवा, संतुलित आहार घ्या आणि शरीराला आवश्यक तेवढं पाणी प्या. आरोग्यदायी आहारामुळे किडनीवरील ताण कमी होण्यास मदत होते.

4. वेदनाशामक औषधं आणि सप्लिमेंट्सचा चुकीचा वापर टाळा

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय दीर्घकाळ वेदनाशामक औषधं घेणं किंवा पडताळणी न झालेली सप्लिमेंट्स आणि हर्बल उत्पादने वापरणं किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं. इथं स्वतः निर्णय घेऊ नये. ऐकिव माहितीचा आधार घेऊ नये.

5. नियमित व्यायाम करा आणि व्यसनांपासून दूर राहा

शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहणं, योग्य वजन राखणं, धूम्रपान टाळणं आणि मद्यपानापासून दूर राहणं यामुळे किडनीसह संपूर्ण शरीराचं आरोग्य चांगलं राखता येतं.

किडनीचं आरोग्य जपण्यासाठी आजपासून कोणती 5 पावलं उचलता येतील?

फोटो स्रोत, Getty Images

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC