Home LATEST NEWS ताजी बातमी तरुणांना फसवणारा ‘फ्लॅश मॅरेज’ घोटाळा नेमका काय आहे?

तरुणांना फसवणारा ‘फ्लॅश मॅरेज’ घोटाळा नेमका काय आहे?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

लग्नानंतर काही दिवसांनी काढलेल्या फोटोत वांग आणि त्यांना सोडून गेलेली ती महिला

वयाच्या 37 व्या वर्षी वांग झुआंग यांनी लग्नाची आशा जवळजवळ सोडलीच होती. तितक्यातच त्यांची नजर विवाह जमवून देणाऱ्या काही जाहिरातींवर पडली.

ज्या नात्याला काही भवितव्यच नाही, अशा नात्यांच्या मागे पडून स्वतःची वर्षानुवर्षं वाया घालवण्याची गरज आता उरणार नाही, असा दावा त्या जाहिरातीत केला होता.

वांग सांगतात, “मध्यस्थांनी मला सांगितलं की गुईझोऊ येथील मुली कमी खर्चात घर चालवतात. त्या घर सांभाळण्यात आणि घरच्या कामांमध्ये खूप हुशार असतात. त्यांचे कुटुंब खूप गरीब असल्यामुळे लग्नानंतर त्या तुमच्या कुटुंबात येऊन तुमच्यासोबत छान संसार थाटतील.”

यानंतर वांग आपल्या आयुष्याची जोडीदार शोधण्यासाठी दक्षिण-पश्चिम चीनच्या गुईझोऊ प्रांतातल्या गुईयांग शहरात पोहोचले.

तिथं त्यांची भेट एका मुलीशी झाली. ती त्यांच्या अपेक्षेप्रमाणं अगदी योग्य वाटत होती. तेव्हा आता आपला शोध संपला असंच त्यांना वाटलं. लग्नाआधी ते दोघे फक्त काही वेळाच एकमेकांना भेटले होते.

पण ज्या वेगाने त्यांचं नवीन आयुष्य सुरू झालं होतं, जवळजवळ तितक्याच वेगानं ते संपलंही. वांग हताशपणे मान हलवत सांगतात, “माझ्या पूर्ण कुटुंबाचं आयुष्य पुरतं विस्कळीत होऊन गेलं आहे.”

एक वर्षापेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतरही ते आपलं आयुष्य पुन्हा सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्यांच्या पत्नीने स्वतःबद्दल सगळं खोटं सांगितलेलं हे हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे.

तीने आधी कराओके बारमध्ये काम केलं होतं. तीन वेळा लग्न केलं होतं आणि तिला तीन मुलंही होती. तिला लैंगिक संसर्गाशी संबंधित एक गंभीर आजार होता आणि ती कर्जाच्या प्रचंड ओझ्याखाली दबलेली होती. अगदी तिने तिचं वयसुद्धा खोटं सांगितलं होतं.

वांग सध्या घटस्फोटासाठी कायदेशीर लढाई लढत आहेत. ते त्यांच्या पूर्वीच्या आयुष्यात परतही जाऊ शकत नाहीत. आयुष्यभराच्या बचतीमधून खर्च झालेला काही भाग परत मिळत नाही तोपर्यंत तरी ते पूर्वीसारखं जगू शकणार नाहीत.

अनेक मुलींची स्थळं दाखवल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी ही रक्कम विवाह जुळवणाऱ्या संस्थेला दिल्याचं ते सांगतात.

ते म्हणाले, “माझे आई-बाबा यासाठी मलाच जबाबदार धरतात. मला सतत अस्वस्थ वाटतं आणि काही सुचत नाही. मला कामावर अजिबात लक्ष देता येत नाही.”

‘सिंगल चाइल्ड’ पॉलिसी चे साइड इफेक्ट्स

चीनमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून लोकसंख्येचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वांग यांची गोष्ट त्याचंच एक गंभीर रूप दाखवते.

चिनी कम्युनिस्ट पार्टीनं कित्येक दशकं असा कडक नियम लागू केला होता. जोडप्यांना केवळ एकाच मुलाला जन्म देण्याची परवानगी असेल, असा तो नियम होता.

जानेवारी 2016 मध्ये हा नियम बदलला गेला खरा पण तोपर्यंत ‘एकच मूल’ हा नियम आणि मुलगाच हवा या मानसिकतेमुळे महिलांची संख्या खूपच कमी झाली होती आणि स्त्री-पुरुष संख्येत मोठा फरक पडला होता.

सध्या चीनमध्ये पुरुषांची संख्या महिलांपेक्षा तब्बल 3 कोटींनी जास्त आहे.

या परिस्थितीचा सर्वात जास्त फटका वांग यांच्यासारख्या पुरुषांना बसला आहे. हे पुरुष मुख्यतः 30 ते 40 वयाच्या दरम्यान आहेत आणि लहान शहरांत किंवा ग्रामीण भागात राहतात. त्यांना लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालं आहे.

या भागांमध्ये महिला आपल्या जोडीदाराच्या निवडीबाबत अधिक सतर्क आणि आग्रही असू शकतात. कारण आपल्याला मोठी मागणी आहे याची त्यांना जाणीव असते.

चीनमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या फारच कमी झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

वांग सांगतात, “माझ्या शहरात पुरुषांकडून असणाऱ्या अपेक्षा खूप जास्त आहेत. तुमच्याकडे स्वतःची गाडी आणि हक्काचं घर असायला हवं. तसेच तुमच्या कुटुंबाचा एखादा व्यवसाय असल्यास अधिक उत्तम मानलं जाते.”

अनेक कुटुंबं लग्नाच्या वेळी नवरीची मोठी किंमत देखील मागतात. ही चीनमधील बऱ्याच काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे. यामध्ये नवरदेवाचं कुटुंब नवरीच्या कुटुंबाला ठरलेली रक्कम देतं.

चीनच्या काही भागांत जिथे मुलींपेक्षा मुलांची संख्या खूपच जास्त आहे तिथं या रकमेचं मोठं दडपण कुटुंबावर येतं.

याच कारणामुळे गुईझोऊसारख्या ठिकाणच्या विवाहसंस्थांची मागणी सातत्याने वाढत आहे.

या संस्था लग्नासाठी एकाच छताखाली ‘वन स्टेप क्विक सोल्यूशन’ (झटपट आणि सर्वसमावेशक उपाय) देण्याचा दावा करतात. याला “फ्लॅश मॅरेज” म्हणजेच अत्यंत कमी वेळात किंवा झटपट होणारं लग्न असंही म्हटलं जातं.

चीनमध्ये विवाह जुळवणाऱ्या संस्था काही नव्या नाहीत. पण यातील अनेक संस्था वाढत्या वयानुसार जोडीदार मिळवण्यात अडचणी येत आहेत अशा मुलांना जाळ्यात ओढत आहेत. आणि त्यामुळे ते जास्त हताश आणि असुरक्षित झाले आहेत.

हे प्रकरण इतकं वाढलं आहे की, चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी नुकताच असा अहवाल दिला आहे की या क्षेत्रात ‘फार झपाट्याने वाढ’ झाली आहे, यामुळे ‘बेकायदेशीर कामं आणि गैरव्यवहारांना खतपाणी घातलं गेलं आहे.’

‘फ्लॅश मॅरेज’ चा वाढता व्यवसाय

चीनमध्ये अशा प्रकारची फसवणूक नेमकी किती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, याचा अचूक अंदाज लावणं कठीण आहे. मात्र हे प्रकरण इतके वाढलंय की आता चिनी प्रशासनाचंही याकडे लक्ष गेलं आहे.

जानेवारी 2024 ते मार्च 2025 दरम्यान तपास यंत्रणांनी लग्न जुळवणाऱ्या व्यवसायाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये तब्बल 1,546 लोकांवर कायदेशीर कारवाई केली.

याच महिन्यात 5 वेगवेगळ्या सरकारी यंत्रणांनी मिळून विवाह जुळवण्याच्या उद्योगाविरोधात देशभरात मोहीम सुरू केली.

एका प्रकरणात तर असं उघडकीस आलं की, एका एजन्सीनं कराओके बारमध्ये काम करणाऱ्या महिलांचं आमिष दाखवून 128 लोकांची 25 लाख युआनपेक्षा (3 कोटी 12 लाख रुपये) जास्त रकमेची फसवणूक केली. ही रक्कम सुमारे 3.71 लाख डॉलर्स इतकी आहे.

बीजिंग जिंग्शी लॉ फर्मच्या नानजिंग शाखेशी संबंधित फॅन बिंगहे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, “झटपट लग्नाच्या नावाखाली होणारी लोकांची फसवणूक थांबवण्यासाठी सरकार या धंद्यासाठी वेगळे कडक नियम आणू शकतं, असं मला वाटतं.”

लाजरी आणि सालस जोडीदार मिळेल या आशेने वांग गुईयांग शहरात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

गुईयांग शहर आज या झपाट्याने वाढणाऱ्या “फ्लॅश मॅरेज”च्या बाजाराचं जणू केंद्रच बनलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र इथे प्रेम किंवा रोमान्ससारखं वाटावं असं काहीही दिसत नाही.

विवाह जुळवणाऱ्या संस्थांची कार्यालयं एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्यावर असलेल्या एकमेकांना खेटून उभारलेल्या दाटीवाटीच्या इमारतींमध्ये आहेत.

खाली रस्त्यावर दुकानदार फळं विकतात. तर ऑफिसला जाणारे कर्मचारी सूप विथ राइस नूडल्सचं पार्सल घेण्यासाठी रांगा लावून उभे असतात.

तरीसुद्धा वांग यांचा त्या एजन्सीवर पूर्ण विश्वास बसला होता. कारण मुलींची आधी पूर्ण ‘बॅकग्राउंड व्हेरिफाय’ केली जाईल आणि काही फसवणूक झालीच तर नुकसानभरपाई मिळेल, असं कंपनीvx त्यांना सांगितलं होतं.

म्हणून मग वांग यांनी पैसे दिले आणि त्यानंतर त्यांना स्थळं दाखवण्याचा सपाटा सुरू झाला.

लाजरी आणि सालस जोडीदार मिळेल या आशेने वांग गुईयांग शहरात आले होते.

फोटो स्रोत, Getty Images

काही दिवसांतच त्यांनी वेगवेगळ्या “ब्लाइंड डेट” रूम्समध्ये जाऊन 7 मुलींची भेट घेतली.

या भेटींवर एजन्सीच्या लोकांची करडी नजर होती. त्यांनी मुलींना त्या कुठून आल्या आहेत, आधी लग्न झालंय का आणि त्यांना काही मुलं आहेत का, अशा गोष्टी विचारल्या.

8 व्या मुलीला भेटल्यावर मात्र त्यांचा जीव तिच्यात अडकला. त्यांना अशी मुलगी हवी होती, जिचं आधी लग्न झालेलं नसावं, मुलंबाळं नसावीत आणि तसेच ती त्यांच्यापेक्षा थोडी लहान असावी.

ते त्या दिवसांची आठवण काढत सांगतात, “तिचे कपडेही खूप साधे असायचे.”

ते पुढे म्हणतात, “ती शांत स्वभावाची आणि प्रामाणिक वाटत होती.”

या दोघांच्या फक्त 4 ते 5 भेटी झाल्या आणि प्रत्येक भेट जेमतेम 8 ते 10 मिनिटांचीच असायची.

वांग यांनी सांगितलं की, एकमेकांना फोन नंबर किंवा चॅटिंगसाठी कोणताही कॉन्टॅक्ट शेअर करायचा नाही, अशी त्यांना सक्त ताकीद होती. नाहीतर मोठा दंड भरावा लागला असता.

2-3 दिवसांतच त्यांनी ठरवून टाकलं की हीच मुलगी आपल्यासाठी परफेक्ट आहे आणि त्यांनी ‘नवरीची किंमत’ म्हणून एक मोठी रक्कम द्यायला तयारी दाखवली.

ते सांगतात, “मी 3 लाख युआनपेक्षा (36 लाख ते 38 लाख रुपये ) जास्त खर्च केले.”

त्यांच्या हातात कायदेशीर कागदपत्रांचं एक मोठं बंडल होतं. ती कागदपत्रं या गोष्टीचा पुरावा असल्याचं ते सांगतात.

“जर लग्नाचं जेवण आणि इतर सर्व खर्च धरले तर मी जवळपास 4 ते 5 लाख युआन (50 लाख ते 62.5 लाख रुपये) खर्च केले आहेत.”

या संपूर्ण प्रक्रियेचे विवाह संस्थेने आकर्षक फोटोंची एक सिरीज बनवून रेकॉर्डिंग करून ठेवले.

हेच फोटो ती संस्था चायनीज सोशल मीडियावर स्वतःच्या सर्व्हिसेसची जाहिरात करण्यासाठी वापरते. व्हीडिओमध्ये हे जोडपं रेड कार्पेटवर हातात हात घालून उभं राहून गोड हसताना दिसतं आणि मागे छान रोमँटिक म्युझिक वाजत आहे.

‘ब्लाइंड डेट’ रूम्समधील संभाषण

लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच कर्जवसुली करणारे लोक तिला फोन करू लागले आणि तिने त्यांचे पैसे देणं बाकी असल्याचे सांगू लागले.

वांग यांना संशय आला आणि तिनं आपल्यापासून आणखी काय काय लपवून ठेवलंय हे त्यांना जाणून घ्यायचं होतं.

तिचा फोन तपासला तेव्हा त्यांना तिच्या भूतकाळातील आयुष्य, जन्म प्रमाणपत्र आणि तिच्या आधीच्या लग्नाशी संबंधित कागदपत्रांची माहिती मिळाली.

जेव्हा त्यांनी पत्नीकडे याबद्दल विचारणा केली, तेव्हा तिनं त्यांना घटस्फोट देण्याची तयारी दर्शवली. मात्र हुंड्यापोटी (नवरीचं मूल्य म्हणून) दिलेला एकही रुपया परत करण्यास नकार दिला.

वांग सांगतात की, त्यांनी आपलं लग्न जमवून देणाऱ्या त्या एजन्सीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा ते त्यांच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा एजन्सी तिथून आपला गाशा गुंडाळून गायब झाली होती.

सध्या वांग गुईयांग शहरात भाड्याच्या घरात राहत आहेत. गंमत म्हणजे त्यांच्या घराच्या अगदी समोरच तो मुख्य भाग आहे जिथे अशा मॅरेज एजन्सींचा मोठा सुळसुळाट आहे.

वांग आपला वेळ सोशल मीडियासाठी व्हीडिओ बनवण्यात घालवतात. या व्हीडिओंच्या माध्यमातून ते इतर पुरुषांना अशा प्रकारच्या लग्नांमध्ये काय काय घोटाळे किंवा फसवणूक होऊ शकते याबाबत सावध करण्याचा प्रयत्न करतात.

गुईयांगमध्ये कर्मचाऱ्यांशी बोलता येईल अशी कोणतीही एजन्सी शोधणे सध्या कठीण झालंय. एका एजन्सीचे मालक ऑफिसमध्ये आमच्याशी बोलायला तयार झाले होते पण तितक्यात त्यांच्या बिझनेस पार्टनरने आम्हाला तिथून निघून जायला सांगितलं.

आत जमिनीवर लाल कार्पेट अंथरलेलं होतं आणि त्यावर खोट्या फुलांच्या पाकळ्या विखुरल्या होत्या. एखाद्याला लग्नासाठी प्रपोज करता यावं, असाच तो माहोल तयार केला होता.

त्यांनी सांगितलं की, आम्ही तिथं जायच्या काही तास आधीच एका जोडप्यानं लग्न करायचं निश्चित केलं होतं.

ते म्हणाले, “चीनमध्ये अशा झटपट उरकल्या जाणाऱ्या लग्नांचा फार मोठा बाजार आहे. आणि हा धंदा खरं तर गेल्या 2-3 वर्षांतच खूप जोमाने फोफावला आहे.”

या संस्थांचं म्हणणं आहे की, येथील कुटुंबांनी ‘एक मूल’ (वन चाइल्ड) धोरणाचे काटेकोरपणे पालन केलं नाही. म्हणूनच या भागात महिलांची संख्या तुलनेने जास्त आहे.

यातील एका एजन्सी चालकानं बीबीसीला सांगितलं, “एखाद्या कुटुंबात 2 किंवा 3 मुली झाल्या तरीही मुलाच्या आशेने ते आणखी मुले जन्माला घालत राहिले.”

एजन्सींचं असं म्हणणं आहे, “आमच्याकडे येणाऱ्या लोकांना आपल्या आवडीचा जोडीदार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असतं. ज्या व्यक्तीसोबत आयुष्य काढायची इच्छा आहे, असाच जोडीदार शोधून देणं हे आमच्या कामाचं उद्दिष्ट आहे.”

यातील एका एजन्सीच्या जाहिरातीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लिहिलं आहे, “योग्य ओळखीसोबत घालवलेले 3 दिवस हे 3 वर्ष डेटिंग करत बसण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले असू शकतात.”

फसवणुकीला बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी

शू रूलिन यांनी आपल्या मुलासाठी सून शोधताना मोठी रक्कम खर्च केली होती पण ती नवरी फक्त 2 आठवड्यांतच पळून गेली.

वांग आता आपला वेळ अशाच प्रकारे फसवणूक झालेल्या इतर लोकांना मदत करण्यात घालवतात.

यांच्या भाड्याच्या घरात अशा लोकांची सतत वर्दळ असते, जे एकतर त्यांना गंडा घालणाऱ्या एजन्सीच्या मालकांचा शोध घेत आहेत किंवा लग्नानंतर अवघ्या काही आठवड्यांतच सोडून पळून गेलेल्या पत्नींकडून आपले पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

खिडकीपाशी टाकलेल्या एका फोल्डिंग खाटेवर बसून जियांग्शी प्रांतातील 59 वर्षांचे शू रूलिन लाल प्लास्टिकच्या पिशवीतून जमवलेल्या कागदपत्रांचे पुरावे काढतात.

मुलाचं लग्न जमवण्याच्या नादात त्यांनी “फ्लॅश मॅरेज” एजन्सीच्या नावे जवळपास 5 लाख युआन(अंदाजे 58.5 ते 60 लाख रुपये) खर्च केले.

ते मुलाला घेऊन तब्बल 1,000 किलोमीटरहून जास्त प्रवास करून गुईयांग शहरात पोहोचले होते. तिथे एका “ब्लाइंड डेट” रूममध्ये मुलाने ती मुलगी पाहिली आणि पहिल्या भेटीनंतर जेमतेम 7 दिवसांत दोघांचं लग्नही उरकलं.

शू रूलिन यांनी आपल्या मुलासाठी सून शोधताना मोठी रक्कम खर्च केली होती पण ती नवरी अवघ्या 2 आठवड्यांतच पळून गेली.

शू यांच्या माहितीनुसार, लग्नाची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्या तरुणीने त्यांच्याकडे आयफोन विकत घेऊन देण्याची आणि स्वतःच्या व्यवसायासाठी सुमारे 20,000 युआन (सुमारे 2.4 लाख रुपये) ट्रान्सफर करण्याची मागणी केली. लग्नाचे कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठीही तिने 1.20 लाख युआन ((मारे 14.4 लाख रुपये) उकळले, असा त्यांचा दावा आहे.

शू म्हणाले, “तिने खरं मन लावून संसार करावा आणि आमच्यासोबत गुण्यागोविंदानं राहावं एवढीच माझी साधी अपेक्षा होती. तिला स्वतंत्र घर हवं होतं आणि मी ते विकत घेऊन द्यायलाही राजी झालो होतो. सगळं काही ठरलं होतं.”

पण शू यांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मुलगी त्यांच्याकडे जेमतेम 2 आठवडेही नीट राहिली नाही आणि तिथून पसार झाली.

पोलिसांनी नंतर तिला ताब्यात घेतलं आणि त्या दोघांचा घटस्फोटही झाला.

लग्नाची मध्यस्थी करणाऱ्या त्या एजन्सीच्या मालकांनाही यंदा जानेवारी महिन्यात गजाआड करण्यात आल्याचं शू सांगतात.

तरीही शू अद्याप गुईयांगमध्येच मुक्कामी असून, या फसवणुकीत बुडालेल्या पैशांपैकी काही रक्कम तरी वसूल व्हावी म्हणून धडपडत आहेत.

लग्न जमवणाऱ्या मध्यस्थांचं काय म्हणणं आहे?

या एजन्सीचालकाचा असा दावा आहे की, या व्यवसायातील बरेचसे लोक प्रामाणिकपणेच काम करतात. बीबीसीशी बोलताना एका मॅनेजरने मान्य केलं की, ग्राहकांची कसलीही अधिकृत चौकशी किंवा कागदपत्रांची तपासणी केली जात नाही.

ते म्हणाले, “मुलींची ओळख तिथले स्थानिक मध्यस्थ करून देतात, जे त्यांना आधीपासूनच जवळून ओळखतात. एकाच गावातले असल्याने त्यांच्या घरादाराबद्दल मध्यस्थांना सगळी माहिती असते. तसेच मुलाकडचा मध्यस्थही त्या मुलाला अगदी नीट ओळखून असतो.”

या एजन्सी चालकाचा असा दावा आहे की या व्यवसायातील बरेचसे लोक प्रामाणिकपणेच काम पाहतात.

आपल्या कामासाठी किती पैसे आकारले जातात हे उघड करायला त्यांनी नकार दिला. ही गोष्ट गोपनीय असल्याचं ते म्हणाले.

पण त्यांनी एवढं स्पष्ट केलं की, दोन्हीपैकी एकाही बाजूने दिलेली माहिती खोटी निघाली तर ग्राहकाला त्याचे पैसे परत मागण्याचा पूर्ण अधिकार आहे.

ते ठामपणे म्हणाले, “मी तर म्हणेन की आमच्याकडे येणारे बहुतांश ग्राहक जी माहिती देतात ती अगदी खरी आणि खात्रीशीरच असते.”

ते पुढे म्हणाले, “एक आंबा कुजला की सगळी पेटीच खराब होते. इथेही नेमका हाच प्रकार घडतोय. आम्ही स्थानिक पोलिसांसोबत वारंवार मिटिंग्जमध्ये बसतो. लग्नाच्या नावाखाली एखाद्या विवाहसंस्थेने लोकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आलं तर तिच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”

फसवणूक झालेल्या पुरुषांसाठी वांग यांचं घर बनलंय आधार

ज्या लोकांची आयुष्यभराची कमाई यात बुडाली आहे त्यांच्यासाठी हा दिलासाही काहीच कामाचा नाही.

वांग खंत व्यक्त करत सांगतात, “इतकी मोठी फी घेणारी ती एजन्सी तिच्या गावात जाऊन चौकशी करणारा तिथला स्थानिक मध्यस्थ आणि कंपनीकडून मिळालेल्या एवढ्या खात्रींनंतरही त्या मुलींनी दिलेली सगळी माहिती अक्षरशः बनावट निघेल असं मला कधी वाटलंही नव्हतं.”

आपले पैसे कायमचे बुडाले हे आता वांग यांनी जवळपास मान्य केलं आहे. या सगळ्या फसवणुकीला ते स्वतःलाच जबाबदार धरतात.

ते म्हणतात, “ज्या महिलांच्या आयुष्यात काहीतरी गडबड असते त्याच अशा झटपट लग्नाला तयार होतात.”

गुईयांगमध्ये पोलिसांच्या ऑफिससमोर अक्षरशः गुडघे टेकून त्यांनी आपले पैसे परत मिळवून देण्याची विनवणी केली आहे.

अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांनी कडक पावलं उचलावीत, या मागणीसाठी त्यांनी थेट बीजिंगपर्यंतही धाव घेतली आहे.

अशा कित्येक केसेस हाताळणारे वकील फॅन बिंगहे म्हणतात की, या प्रकरणांमध्ये कोर्टात केस लढणं आणि चालवणं खूप अवघड असते.

यामागचे मुख्य कारण म्हणजे चिनी कायद्यात लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या अशा फसवणुकीसाठी वेगळी कायदेशीर तरतूद किंवा गुन्हा ठरवलेला नाही. त्यामुळे पोलिसांत गुन्हा नोंदवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा पहिला हेतू फक्त पैसे लाटण्याचाच होता हे पीडित व्यक्तीला पुराव्यानिशी सिद्ध करावे लागते.

ते म्हणतात, “मी पाहिलेल्या प्रकरणांमध्ये आरोपी सहसा असा युक्तिवाद करतात की त्यांचा हेतू खरंच लग्न करण्याचा आणि चांगले आयुष्य जगण्याचा होता. परंतु नंतर त्यांना जाणीव झाली की ते दोघे एकमेकांसाठी योग्य नाहीत, त्यांच्यात वादविवाद सुरू झाले आणि त्यांनी नाते संपवण्याचा निर्णय घेतला.”

“अशा परिस्थितीत गुन्हा आणि कौटुंबिक वाद या दोन्हींमधील फरक ओळखणं फार कठीण होऊन बसते. नात्यातील वादांशी संबंधित गोष्टी खोट्या ठरवणे अत्यंत कठीण असते.”

याहूनही अधिक कठीण काम म्हणजे बोगस विवाह संस्थांकडून पैसे परत मिळवणं हे आहे. अशा एजन्सी सहसा भरपूर पैसे कमावल्यानंतर आपला व्यवसाय बंद करून टाकतात.

वांग काही प्रमाणात रक्कम परत मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. परंतु त्यांना अजूनही संपूर्ण पैसे मिळालेले नाहीत.

ते म्हणतात, “अशा भयंकर प्रसंगातून गेल्यानंतर मला स्वतःलाच ठाऊक नाही की मी आता कधी लग्न करू शकेन की नाही. माझ्यासाठी आधीच जोडीदार शोधणं कठीण होतं आणि आता तर मी एवढे पैसेही गमावून बसलो आहे. आता मी लग्नाचा विचारही करणार नाही.”

वांग आणि त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या इतर पुरुषांचे आयुष्यही आता अधांतरी झालंय.

कायद्याच्या कागदपत्रांमध्ये अडकलेले वांग हताश होऊन सांगतात, “जवळपास 2 वर्षं झाली पण मला घटस्फोट कधी मिळेल हे अजूनही माहिती नाही. हा सगळा गोंधळ कधी संपेल आणि माझं रोजचं आयुष्य कधी पूर्वपदावर येईल काहीच सुचत नाहीये. असं वाटतंय की या त्रासाला आता शेवटच नाही.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC