Source :- BBC INDIA NEWS
वेगवेगळे फंडे वापरून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सध्या वाढताना दिसत आहेत. देशभरातील नागरिकांची जिओ टॉवर बसवण्याच्या बहाण्यानं कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे.
ही फसवणूक करणाऱ्या40 जणांच्या टोळीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ही टोळी कोलकात्यासह इतर राज्यात सक्रीय होती.
नागरिकांची फसवणूक नेमकी कशी केली जायची? आणि फसवणुकीचा प्रकार नेमका कसा समोर आला? पाहूयात.
कसा समोर आला प्रकार?
नागपूर जिल्ह्यातील सावनेर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमेश्वर तालुक्यातील प्रफुल गहूकर नावाच्या व्यक्तीच्या खात्यात एका महिन्यात 30 लाख रुपये जमा झाले.
तुमच्या बँक खात्यात इतके पैसे जमा झाले, तुमचा कुठला व्यवसाय आहे अशी विचारणा बँकेनं त्या व्यक्तीला केली. त्यानंतर आपल्यावर कारवाई होईल या भीतीनं या व्यक्तीनं पोलिस ठाण्यात धाव घेतली. तसेच त्यानं पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वी दोन-तीन तरुण गावात आले होते. त्यांनी अनाथ आश्रमाच्या कामासाठी आम्हाला बँक अकाऊंट लागत आहे. तुम्ही नवीन बँक अकाऊंट सुरू करून त्याचे एटीएम, पासबूक आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला महिन्याला चार हजार रुपये देऊ असं सांगितलं.
महिन्याला चार हजार रुपये मिळणार असल्यानं त्यांनी अकाऊंट सुरू करून पासबूक आणि एटीएम त्यांना दिले, असं तक्रारीत सांगितलेलं होतं.
कोलकात्यातून अटक केलेल्या टोळीत नागपुरातून काम करणारे दोन आरोपी होते. वैभव दवंडे आणि कमलेश गजभिये अशी त्यांची नावं आहेत.
हे दोन्ही आरोपी नागपूरच्या ग्रामीण भागात फिरून अनाथ आश्रमासाठी बँक खाते पाहिजे, आम्ही फक्त इन्शुरन्सच्या कामासाठी याचा वापर करू असं लोकांना सांगत होते.
लोकांकडून बँक खातं उघडून ते आपल्या ताब्यात घेऊन पुढे कोलकात्याला अलाउद्दीन शेख नावाच्या आरोपीला पाठवायचे. ही टोळी या अकाऊंटचा वापर फसवणुकीतून मिळवलेले पैसे ट्रान्सफर करण्यासाठी करत होते.
एकट्या नागपूर जिल्ह्यातील 150 लोकांच्या बँक खात्यांचा वापर फसवणुकीसाठी करण्यात आला. तसेच मध्य प्रदेशातल्या काही लोकांचेही बँक अकाऊंट या कामासाठी वापरले.
टोळीसोबत संपर्क नेमका कसा आला?
वैभव दवंडे, कमलेश गजभिये आणि कोलकात्याच्या टोळीतील आरोपी अलाउद्दीन शेख चार वर्षांपूर्वी एकाच ऑनलाइन कंपनीत काम करत होते. पण, ती कंपनी फ्रॉड निघाली आणि बंद झाली.
त्यानंतरही हे लोक संपर्कात होते. त्यातून अधून-मधून त्यांचं बोलणं व्हायचं. त्यानंतर 2021 पासून कोलकात्यात तीन कॉल सेंटर उभारून त्यांनी देशभरात जिओ टॉवरच्या नावानं फसवणूक करायला सुरुवात केली.
अशी व्हायची फसवणूक
काही बँक खात्यातून महिन्याला लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. नागपूर ग्रामीण पोलिसांनी कोलकात्यात जाऊन चौकशी केली असता हे मल्टीलेअर रॅकेट असल्याचं समोर आलं.
पोलिसांनी सुरुवातीला वैभव दवंडे, कमलेश गजभिये आणि अलाउद्दीन शेख या तीन आरोपींना अटक केली. त्यांच्या माध्यमातून पोलिस कोलकात्यातील कॉल सेंटरपर्यंत पोहोचले जिथून जिओ टॉवरच्या नावाखाली फसवणूक होत होती.
आम्ही जिओ कंपनीतून बोलतोय. तुमच्या मालकीच्या जागेत आम्हाला जिओचे टॉवर उभारायचे आहे. तुमची जमीन जिओ टॉवर उभारण्यासाठी दिली तर आम्ही तुम्हाला महिन्याला 20 हजार रुपये भाडं, घरच्या एका व्यक्तीला 20 हजार रुपये पगाराची सुरक्षा रक्षकाची नोकरी आणि टॉवर लागण्याच्या आधी तुमच्या बँक खात्यात 25 लाख रुपये जमा होतील, असं आमीष नागरिकांना दाखवलं जात होतं.
नागरिकांनी होकार दिला की, पुन्हा चार पाच दिवसांनी पुढील प्रक्रियेसाठी फोन केला जात होता. यासाठी आम्ही कंपनीकडून काही कॉन्ट्रॅक्ट करायचं आहे, प्रदूषण विभाग, जागतिक आरोग्य संघटना याचे सुद्धा प्रमाणपत्र लागतात असं सांगून एका प्रमाणपत्रासाठी 25-30 हजार रुपये उकळले जायचे.
प्रमाणपत्र तयार झाले की, ते व्हॉट्सअप द्वारे किंवा कुरीअर द्वारे घरी पाठवत होते. नागपूर ग्रामीण पोलिसांनी जागतिक आरोग्य संघटनेपासून तर जिओ कंपनीपर्यंत सगळ्यांना फोन करून प्रमाणपत्राची पडताळणी केली. त्यानंतर हे प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं.
अगदी खरेखुरे वाटतील असे हे बनावट प्रमाणपत्र होते. त्यामुळे नागरिकांनाही संशय येत नव्हता. यानंतर जिओ टॉवर लावण्यासाठी कोलकात्यावरून ट्रक भरून सामान तुमच्या गावाकडे यायला निघालं आहे, असाही फोटो पाठवला जात होता.
तसेच शेवटची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा पैसे घेतले जात होते. एक एक करून एका टॉवरच्या मागे 2 लाख रुपयांची फसवणूक केली जात होती.
या फसवणुकीतून मिळालेली रक्कम सामान्य नागरिकांच्या नावानं तयार केलेल्या बँक खात्यात जमा केले जात होते. त्यानंतर आरोपी एटीएमद्वारे हे पैसे काढत होते. या फसवणुकीतून जवळपास 15 कोटी रुपये या टोळीनं जमवल्याचं पोलिसांनी सांगितलं.
कोलकात्यात असे तीन कॉल सेंटर होते ज्यामध्ये जवळपास 60 मुलं मुली काम करत होते. त्या सगळ्यांना व्यवस्थित प्रशिक्षण दिलं होतं. प्रणव मोंडल, सुवेंदू मैती, रवींद्र बॅनर्जी हे तिघे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असून पोलिसांनी त्यांनाही कोलकात्यातून अटक केली आहे. 2021 पासून हे रॅकेट सक्रिय होतं.
आरोपींकडून मर्सिडीज कार जप्त
या फसवणुकीच्या पैशातून आरोपी प्रणव मोंडलसह इतर आरोपींनी स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर करोडो रुपयांची संपत्ती घेतली आहे. पोलिसांनी आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांतील 15 लाख रुपये गोठवले आहेत.
तसेच आरोपी प्रणव मोंडल यानं वडिलांच्या नावावर केलेली 36 लाख रुपयांची फिक्स्ड डिपॉजिट गोठवण्यात आलं आहे. तसेच या आरोपींकडून एक मर्सिडीज कार, एक अल्टो कार जप्त केली आहे.
आतापर्यंत एकूण 42 आरोपी समोर आले असून त्यापैकी 40 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या रॅकेटमधून आणखी काही समोर येतं का? फसवणुकीची रक्कम आणखी कुठं कुठं वळती केली? याबद्दल पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी दिली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC