Home LATEST NEWS ताजी बातमी तुमच्या जोडीदाराचं घोरणं तुमच्या आरोग्यावरही परिणाम करतंय का?

तुमच्या जोडीदाराचं घोरणं तुमच्या आरोग्यावरही परिणाम करतंय का?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

जोडीदाराच्या घोरण्यामुळे रात्री नीट झोप होत नाही आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तणाव, थकवा किंवा विसरभोळेपणा जाणवतो का?

घोरणं ही एक सामान्य गोष्ट असल्यामुळे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. परंतु तज्ज्ञांच्या मते, घोरणाऱ्या व्यक्तीच्या शेजारी झोपल्यामुळे आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.

डेंटल स्लीप मेडिसिनच्या तज्ज्ञ डॉ. क्लेअर सायमन सांगतात की, झोपताना घशातील आणि श्वसनमार्गातील वरच्या भागातील मऊ भाग (सॉफ्ट टिश्यूज) हलल्यामुळे किंवा कंप पावल्यामुळे घोरण्याचा आवाज येतो किंवा ती क्रिया घडते.

ब्रिटनमध्ये सुमारे 40 टक्के प्रौढ लोक घोरतात. ब्रिटिश स्नोरिंग अँड स्लीप ॲप्निया असोसिएशनच्या (बीएसएसएए) मते, महिलांपेक्षा पुरुषांमध्ये घोरण्याचं प्रमाण जास्त आहे.

अमेरिकेतील स्लीप फाउंडेशनच्या एका सर्वेक्षणानुसार, घोरणाऱ्या जोडीदारासोबत झोपणाऱ्या 75 टक्के लोकांच्या झोपेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

याचा जोडीदाराच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आणि त्यासाठी काय करता येईल, हे जाणून घेऊया.

एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर परिणाम

एरॉक्स हेल्थचे ऑर्थोडॉन्टिस्ट आणि स्लीप (निद्राविकार) तज्ज्ञ प्रा. अमा जोहल सांगतात की, जोडीदाराच्या घोरण्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या झोपेवर इतका परिणाम होऊ शकतो की शेवटी शांत झोपेसाठी त्यांच्याकडे शेवटचा एकच उपाय उरतो, तो म्हणजे, दुसऱ्या खोलीत जाऊन झोपणं.

ते पुढे म्हणतात, “माणसाला झोप ही गरजेचीच असते. झोप न मिळाल्यास आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या व्यवस्थित काम करू शकत नाही.”

प्रा. अमा जोहल सांगतात, अनेक जोडपी घोरण्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांकडे खूप काळापर्यंत करत राहतात.

फोटो स्रोत, Professor Ama Johal

रात्रीच्या वेळी आपण साधारणपणे दर 90 मिनिटांनी झोपेच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून पुन्हा पुन्हा जात असतो.

झोपेच्या या चक्रातील टप्पे शरीराला आवश्यक विश्रांती आणि ताजंतवानं होण्यासाठी महत्त्वाचे असतात.

वारंवार झोप मोड होत असेल, तर शरीराला पूर्ण विश्रांती देणाऱ्या झोपेच्या टप्प्यांत कमी वेळ मिळतो. त्यामुळे बराच वेळ झोपूनही सकाळी थकवा जाणवू शकतो, असं बीएसएसएए सांगते.

झोपेत वारंवार व्यत्यय येत असेल, तर मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. घोरणाऱ्या जोडीदारामुळे वारंवार जाग येत असेल, तर याचा आपल्या लक्ष देण्याच्या म्हणजेच एकाग्रतेवर आणि गोष्टी लक्षात ठेवण्याच्या म्हणजेच स्मरणशक्तीच्या क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो.

झोपेत वारंवार व्यत्यय आल्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलनही बिघडू शकते. याचा परिणाम आपल्या ऊर्जेवर आणि उत्साहावर होऊ शकतो.

झोपेमुळे ताण आणि भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूतील यंत्रणाही व्यवस्थित काम करतात. परंतु झोपेत वारंवार व्यत्यय येत असेल, तर या यंत्रणांचं संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे आपल्याला जास्त चिडचिड होऊ शकते आणि ताणतणावाचा सामना करणंही कठीण होऊ शकतं.

असंच काहीसं 29 वर्षीय मेग वॉरेन हिच्यासोबतही घडलं. तिचा पूर्वीचा जोडीदार घोरत असल्यामुळे तिला रात्री जागं राहावं लागायचं.

ती म्हणते, “घोरण्यामुळे झोपेतून जाग आली की, मला प्रत्येक वेळी खूपच सतर्क म्हणजेच अलर्ट असल्यासारखं आणि अस्वस्थ वाटायचं.”

मेग वॉरेनला तिच्या पूर्वीच्या जोडीदाराच्या घोरण्यामुळे रात्री नीट झोप मिळायची नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर तिला खूप सुस्तपणा आणि गोंधळल्यासारखं वाटायचं.

फोटो स्रोत, Meg Warren

मेग ही एका चॅरिटी संस्थेत मीडिया ऑफिसर म्हणून काम करते. तिचा जोडीदार रात्री घोरत असताना ती त्याला वारंवार हलवायची आणि पाठ टेकून झोपण्याऐवजी कुशीवर झोपवण्याचा प्रयत्न करायची.

ती म्हणते की, मी सकाळी उठायची तेव्हा मला खूपच सुस्त आणि गोंधळल्यासारखं वाटायचं. कधी कधी तर ते एखाद्या हँगओव्हरसारखं वाटायचं.

या घोरण्याच्या सवयीमुळे त्यांच्या नात्यावरही परिणाम झाला. मेग सांगते, “मी नेहमी म्हणायचे की, जर आपण एकत्र राहिलो तर ज्या रात्री खूपच त्रासदायक घोरणं असेल, त्या रात्री वेगळं झोपण्यासाठी घरात एक अतिरिक्त बेडरूम असायला हवी.”

सायमन सांगतात की, जोडीदाराच्या घोरण्यामुळे वारंवार झोपमोड होत असेल, तर चिडचिड होणे आणि दोघांमध्ये वाद होण्यावर होऊ शकतो. आणि जर यामुळे वेगवेगळ्या खोलीत झोपण्याचा निर्णय घेतला गेला, तर दोघांमधील जवळीकही कमी होऊ शकते.

ॲना-लुईस डीयर्डन सांगतात की, त्यांच्या जोडीदाराच्या घोरण्यामुळे त्यांना कधी-कधी दुसऱ्या खोलीत जाऊन झोपावं लागतं.

फोटो स्रोत, Anna-Louise Dearden

52 वर्षीय पत्रकार ॲना-लुईस डीयर्डन सांगतात की, त्यांच्या जोडीदाराच्या घोरण्यामुळे त्या कधी-कधी वेगळ्या खोलीत जाऊन झोपतात.

वेगळ्या खोलीचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे, घोरणं जास्त त्रासदायक असताना त्यांना पुरेशी झोप घेण्याला प्राधान्य देता येतं.

ॲना-लुईस म्हणतात, “रात्री नीट झोप झाली नाही तर दुसऱ्या दिवशी जास्त खाऊ वाटतं आणि चिडचिडही जास्त होते.”

ती पूर्वी जोडीदाराच्या घोरण्यामुळे रात्री वारंवार जागी व्हायची. पण आता तिला कानात इअरप्लग लावल्याने खूप फायदा होतो. त्यामुळे जोडीदारासोबत एकाच बेडवर झोपताना घोरण्याचा आवाज असूनही तिला बहुतेक वेळा शांत झोप लागते.

डॉक्टरांची मदत कधी घ्यावी?

सायमन आणि जोहल सांगतात की, यावर उपाय करता येतात. पण त्याआधी तुमचा जोडीदार केवळ घोरतोय की त्याला स्लीप ॲप्निया आहे, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

सायमन म्हणतात, “केवळ रात्रीचा घोरण्याचा आवाज कमी करण्याच्या नादात एखाद्याला झोपेशी संबंधित श्वसनाचा आजार किंवा मूळ विकार आहे, हे दुर्लक्षित होऊ देऊ नये.”

स्लीप ॲप्नियाची काही लक्षणं आहेत, म्हणजे झोपेत श्वास वारंवार थांबणं आणि पुन्हा सुरू होणं, रात्री गुदमरल्यासारखं होणं, वारंवार जाग येणं, ठसका लागणे आणि सकाळी उठल्यावर डोकेदुखीचा त्रास होणं.

सायमन स्पष्ट करतात की, अशा वेळी डॉक्टर आपल्याला कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) मशीन वापरण्याचा सल्ला देऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियाही करावी लागू शकते.

केवळ घोरण्यासाठी जीवनशैलीत काही बदल केल्यानेही फायदा होऊ शकतो, असं सायमन सांगतात. यामध्ये वजन कमी करणं, धूम्रपान सोडणं, झोपण्यापूर्वी मद्यपान कमी करणं आणि झोपण्याची पद्धत बदलणं यांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपणं.

तुमच्या जोडीदाराला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लाही सुचवू शकता. डॉक्टर पुढे काय करायचं याबाबत मार्गदर्शन करतील किंवा गरज असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवतील.

तज्ज्ञ सांगतात की, घोरण्याचं कारण नाक बंद होणं किंवा ॲलर्जी असेल, तर त्यावर उपचार केले जाऊ शकतात. काही वेळा झोपताना घालण्यासाठी खास माउथगार्डही दिला जाऊ शकतो. यामुळे खालचा जबडा थोडा पुढे राहतो आणि श्वसनाचा मार्ग खुला राहण्यास मदत होते.

जोहल सांगतात की, अनेक जोडपी घोरण्यामुळे होणारा त्रास ‘खूप काळ सहन करत राहतात’. याचा त्यांच्या नातेसंबंधांवर आणि आरोग्यावरही परिणाम होतो.

“महत्त्वाचं म्हणजे यासाठी मदत उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी योग्य ठिकाणी मदत घेणं गरजेचं आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC