Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
मांजरी आणि कुत्र्यांना परागकण आणि अगदी माणसांची देखील ॲलर्जी असू शकते. मात्र त्याचं निदान होणं ही एक दीर्घ आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे.
तुम्हाला आठवडाभरापासून शिंका येत असतील आणि डोळ्यातून सतत पाणी येत असेल तर हा ॲलर्जीचाच हंगाम आहे.
पण, असा त्रास होणारे तुम्ही एकटेच नाही.
तुमच्या पाळीव प्राण्याला अलीकडे जास्त खाज सुटत असेल, तो रात्रभर खाजवत असेल तर कदाचित त्यामुळं तुमची झोप होत नसेल.
त्याच्या डोळ्यातून सतत पाणी येणं आणि इतर त्रासांनी ते तुमच्याएवढेच दु:खी किंवा त्रासलेले असू शकतात.
फोटो स्रोत, Getty Images
पण, म्हणजे तुमचा कुत्रा किंवा मांजरदेखील परागकणांमुळे होणाऱ्या त्रासाला सामोरं जात असतील का? चार पायांच्या या मित्रांनादेखील ‘हे फीव्हर’ म्हणजे परागकणांपासून होणाऱ्या ॲलर्जीचा किंवा सीझनल ॲलर्जीचा त्रास होत असतो.
मात्र असंख्य ॲलर्जींपैकी ही फक्त एक शक्यता आहे. यात काही ॲलर्जी अशा आहेत, ज्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल.
आपल्या पाळीव प्राण्यांना नेमका कशाचा त्रास होतो आहे, हे शोधून काढणं गुंतागुंतीचं असू शकतं. मात्र आता ही गोष्ट सोपी होते आहे.
ॲलर्जीची लक्षणं कोणती?
आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्या सभोवतालच्या वातावरणातील एखाद्या घटकावर अचानक हल्ला करायचं ठरवते, तेव्हा ॲलर्जी होते. मग ते हवेत नव्यानं पसरलेले परागकण असू शकतात किंवा आपण वर्षानुवर्षे वापरत असलेला एखादा सुगंध किंवा परफ्यूम असू शकतात.
माणसांना शिंका येणं किंवा नाक गळत असल्यास नाक ओढणं यासारख्या गोष्टींवरून ॲलर्जी झाल्याची खबर मिळू शकते किंवा सुगावा लागू शकतो.
मात्र मांजरी आणि कुत्र्यांमध्ये ही लक्षणं कमी प्रमाणात आढळतात.
पाळीव प्राण्यांमध्ये डोळ्यातून जास्त प्रमाणात पाणी वाहणं आणि नाक वाहणं ही लक्षणं असू शकतात.
त्याचबरोबर मांजरीमध्ये दमा आणि कुत्र्यांमध्ये कानात संसर्ग होणं किंवा डोकं हलवणं ही लक्षणं असू शकतात.
फोटो स्रोत, Getty Images
ॲलर्जी बहुतांशवेळा त्वचेवर ॲटोपिक डर्माटायटिसच्या म्हणजे त्वचेच्या जुनाट आजाराच्या स्वरुपात दिसतात.
सतत येणाऱ्या खाजेमुळे प्राणी त्यांचे पाय किंवा शरीरावरील इतर भाग सतत, खूप जास्त प्रमाणात चाटतात, चघळतात किंवा चावतात. यामुळे ‘हॉट स्पॉट्स’ तयार होऊ शकतात.
हॉट स्पॉट म्हणजे शरीरावरील लालसर भाग. त्याचं काही तासांमध्येच ‘भयानक जखम किंवा व्रणांमध्ये’ रुपांतर होऊ शकतं, असं ब्रायन कॉलिन्स म्हणतात.
ते न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ व्हेटर्नसी मेडिसीनमध्ये पशुवैद्य (व्हेटरिनरियन) आहेत.
या स्थितीमध्ये आणखी वाढ होण्यापासून त्याला आळा घालणं आवश्यक असतं. कारण दीर्घकाळापासूनच्या किंवा जुनाट हॉट स्पॉट्सचा फायदा घेऊन जिवाणू किंवा यीस्ट एक वेदनादायी संसर्ग निर्माण करू शकतात.
मग, ही नक्की ॲलर्जीच आहे का?
ज्या गोष्टींमुळे माणसांना ॲलर्जी होऊ शकते, त्याच गोष्टींमुळे पाळीव प्राण्यांनादेखील ॲलर्जी होऊ शकते. अशा गोष्टी म्हणजे परागकण, गवत, कीटक, अन्न, धुळीचे कण, परफ्यूम.
बाजारात पाळीव प्राण्यांसाठी उपलब्ध असलेल्या ॲलर्जीसाठीच्या चाचण्या करण्याचा तुम्हाला मोह होऊ शकतो.
सोशल मीडियावर अशा चाचण्यांची जाहिरात अनेकदा केली जाते. त्यांच्यामुळे ॲलर्जीमागचं कारण समोर येतं असं सांगितलं जातं.
जॅकलीन बॉइड नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. या चाचण्यांचा उपयोग होत नाही असा इशारा जॅकलीन देतात. (एका चाचणीत तर मुलायम कापडाच्या खेळण्यावरील मऊ फर किंवा केसांमधून स्वॅब दिल्यावरही सारखेच परिणाम दिसून आले.) तसंच कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमच्याकडे असलेली अँटीहिस्टामाईन औषधं देऊ नयेत. कारण अनेक गोष्टी ज्या ॲलर्जीसारख्या वाटतात त्या तशा नसतात.
“यातील बरंचसं काम हे उघड किंवा स्पष्ट दिसणाऱ्या शक्यता नाकारण्याचं असतं,” असं त्या म्हणाल्या.
“आम्ही सर्वात आधी त्वचेला संसर्ग झाला आहे का? याचा शोध घेतो,” असं कॉलिन्स म्हणाल्या. उपचारामुळे खाज येणं थांबलं तर त्यातून समस्येचं उत्तर मिळतं.
फोटो स्रोत, Getty Images
पुढील पायरी म्हणजे छोटे किडे किंवा पिसवं आहेत का? याची तपासणी करणं. ते चावणं अनेक कारणांमुळे त्रासदायक ठरू शकतं.
तुम्ही कदाचित असा आक्षेप घेऊ शकता की तुमच्या कुत्र्यावर पिसवं टाळण्याचे उपचार आधीच घेण्यात आले आहेत. मात्र पिसवांचा नायनाट करणं कठीण असू शकतं. कारण पिसवं चलाख असतात. ते इतर पाळीव प्राणी (विशेषकरून मांजर) किंवा घरात इतरत्र लपून बसू शकतात.
कुत्र्यांमध्ये त्यांचा प्रादूर्भाव होऊ शकत नसला तरी ते तुमच्या कुत्र्यावर बसून त्याचा पटकन चावा घेण्यास आणि नंतर त्यांच्या नेहमीच्या यजमानाकडे परतण्यास उत्सुक असतात.
काही कुत्र्यांना पिसवांच्या लाळेची तीव्र ॲलर्जी होऊ शकते. यातील आणखी गुंतागुंत म्हणजे, पिसवांच्या काही प्रजाती हंगामी स्वरुपाच्यादेखील असतात. त्यामुळं तुम्हाला चुकून या ॲलर्जीमागचं कारण परागकण असल्याचं वाटू शकतं.
काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये किंवा क्वचित, त्वचेला येणाऱ्या खाजेतून कर्करोग किंवा चयापचयाचे आजार सारख्या अधिक गंभीर आजारांची लक्षणं दिसू शकतात.
विशेषत: वृद्ध मांजरी किंवा कुत्र्यांमध्ये ते दिसू शकतं.
तुम्ही आणि तुमच्या व्हेटर्नरी डॉक्टरनं या शक्यता लक्षात घेतल्या असतील आणि तरीदेखील त्या पाळीव प्राण्याला खाज येणं सुरूच असेल, तर त्यानंतर खरी तपासणी किंवा शोध सुरू होतो.
ॲलर्जीच्या लक्षणांवर उपचार करणं
यातील सर्वात महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे खाज नियंत्रणात आणणं. “त्या प्राण्याला आराम पडला पाहिजे,” असं कॉलिन्स म्हणतात. यासाठी इंजेक्शन, तोंडावाटे घ्यायची औषधं, शॅम्पू आणि स्प्रे यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
या उपचारांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. पूर्वी ॲलर्जी असलेल्या पाळीव प्राण्याला स्टिरॉईडचं इंजेक्शन दिलं जायचं. त्याचा उपयोग व्हायचा, मात्र त्याचे मोठे दुष्परिणाम होते.
यात खूप जास्त तहान लागणं, लघवीचं प्रमाण वाढणं, वजन वाढणं आणि रोगप्रतिकार शक्ती कमी होणं या गोष्टींचा समावेश होता. त्यामुळे संधीसाधू स्वरुपाचे संसर्ग त्या प्राण्याच्या शरीरात शिरकाव करू शकतात.
मात्र काही वर्षांपूर्वी अधिक नेमकेपणाची किंवा ॲलर्जीला अधिक योग्यप्रकारे लक्ष्य करणारी औषधं उपलब्ध झाली.
ही औषधं रोगप्रतिकारक व्यवस्थेमध्ये व्यापक स्वरुपात बदल करण्याऐवजी खाज येणं आणि इन्फ्लमेशनच्या समस्येवर अधिक अचूकतेनं परिणाम करतात. यात सायटोकिन्स नावाच्या रसायनांद्वारे सक्रिय केलेल्या एन्झाईमना प्रतिबंध केला जातो.
अशा नवीन बदल आणि सुधारणांमुळे आजची औषधं अधिक प्रभावी आहेत. त्यांचे दुष्परिणाम कमी आहेत. तसंच 80 टक्के कुत्र्यांना त्याचा उपयोग होतो, असं राल्फ मुलर म्हणतात. ते म्युनिक विद्यापीठतील एक व्हेटर्नरी डर्मेटोलॉजिस्ट आहेत.
“जर नियमितपणे व्यवस्थित दिली तर सहसा ती पुरेशी असतात. मात्र तरीदेखील 15 टक्के कुत्र्यांमध्ये त्याचा उपयोग होत नाही किंवा त्यांना प्रतिसाद मिळत नाही. तसंच ज्यांच्या बाबतीत चांगला प्रतिसाद मिळतो त्यांना अनिश्चित काळ अधिक सहन करता येणारी औषधं द्यावी लागतात. त्यातून काही प्राण्यांमध्ये त्यासाठीची प्रतिरोधकता तयार होते. काहीवेळेस हंगामी स्वरुपाच्या ॲलर्जीचं रुपांतर सततच्या ॲलर्जीमध्ये होऊ शकतं”, असं कॉलिन्स म्हणतात.
या आणि इतर कारणांमुळे, अनेकजणांना त्यांच्या पाळीव प्राण्यांमधील ही मूळची समस्या कायमची दूर करायची असते.
खरं कारण शोधून काढणं
पशुवैद्य किंवा व्हेटर्नरी डॉक्टर प्राण्यांची जीवनशैली आणि त्यांच्या आधीच्या गोष्टींबद्दल अनेक प्रश्न विचारतात. त्यातून एकेक संभाव्य कारण किंवा घटक टप्प्याटप्प्यानं वगळत ॲलर्जी निर्माण करणारा घटक किंवा पदार्थ (म्हणजेच ॲलर्जेन) शोधला जातो.
“मी माझ्या सर्व क्लायंट्सना कुत्र्यांची डायरी ठेवण्याचा सल्ला देतो,” असं बॉइड म्हणतात. त्यातून त्यांचे वेगवेगळे पॅटर्न पटकन समोर येतात.
काही लक्षणं काही महिन्यांमध्येच वाढतात आणि इतर हंगामी स्वरुपाची नसतात. जी लक्षणं कायमच आढळतात ती अन्न किंवा त्यांच्या सभोवतालमध्ये सतत असणाऱ्या गोष्टीशी संबंधित असू शकतात.
फोटो स्रोत, Getty Images
“आपल्याकडे कोणतीही अशी एकच चाचणी उपलब्ध नाही जी ॲलर्जी असणारा आणि ॲलर्जी नसणारा यांच्यात फरक करू शकेल,” असं मुलर पुढे म्हणतात.
आता व्हेटर्नरी डर्मेटोलॉजिस्टकडे जाण्याची वेळ असते. हे तज्ज्ञ दुर्मिळ असतात. मात्र इंट्राडर्मल ॲलर्जी चाचणी करण्यासाठी तेच सर्वात योग्य व्यक्ती असतात, असं कॉलिन्स म्हणतात.
मग प्राण्यांना भूल देऊन झोपेत किंवा बेशुद्धावस्थेत नेलं जातं. नंतर त्यांच्या त्वचेवरील काही भाग त्यावरील केस काढून साफ केला जातो. तिथे एक ग्रीड म्हणजे ठिपक्यांची किंवा चौकटींची एक जाळी आखली जाते.
मग चौकटीतील प्रत्येक भागावर वेगवेगळे ॲलर्जी निर्माण करणारे पदार्थ किंवा त्यांचा एक गट चौकटीवरील त्याच्यासाठी ठरवून दिलेल्या जागेवर टोचला (इंजेक्ट) जातो. त्यानंतर डर्मेटोलॉजिस्ट त्या त्वचेवरील प्रतिक्रियेचं निरीक्षण करतात.
पाळीव प्राण्यांची इम्युनोथेरपी (पेट इम्युनोथेरपी)
चाचणीतून निकाल समोर आल्यानंतर, पाळीव प्राण्यांच्या मालकाकडे दोन पर्याय असतात. फक्त लक्षणांवर उपचार करत राहणं किंवा त्यासंदर्भातील मूळची संवेदनशीलतेची समस्या दूर करणं.
आधीचा उपाय सोपा आहे. मात्र जर तुम्हाला तुमची मांजर किंवा कुत्र्याची औषधं कमी करायची असतील तर तुम्ही ॲलर्जीचा पूर्ण नायनाट करण्यासाठी पावलं उचलू शकता.
म्हणजेच एक असा प्रोटोकॉल किंवा पद्धती जी तुमच्या पाळीव प्राण्याच्या रोगप्रतिकारक व्यवस्थेला ॲलर्जेनच्या बाबतीत सक्षम करेल किंवा त्याची संवेदना कमी करेल.
याला ॲलर्जेन-स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट ॲलर्जेनसंबंधित इम्युनोथेरेपी म्हणतात. व्हेटेर्नरी डर्मेटोलॉजिस्ट बहुधा ॲलर्जीसाठी जबाबदार घटकांना इम्युनोथेरपी कॉकटेलमध्ये टाकतात. मग ते तुमच्या पाळीव प्राण्यांच्या शरीरात हळूहळू वाढत्या प्रमाणात इंजेक्शनद्वारे सोडलं जातं.
प्रोटोकॉल फक्त लक्षणांवरच नाही तर मूळ कारणांवर उपचार करतो. हे उपचार झाल्यावर अनेक पाळीव प्राणी बहुतांशपणे बरे होतात किंवा किमान त्यांची लक्षणं कमी होतात.
फोटो स्रोत, Getty Images
या उपचाराचे फक्त दोन दुष्परिणाम आहेत. ॲनाफिलेक्टिक शॉक (हा खूपच दुर्मिळ आहे – मुलर यांनी 43 वर्षांमध्ये त्याची फक्त 5 प्रकरणं पाहिली आहेत) आणि दुसरा म्हणजे खाज येण्यात तात्पुरती वाढ होणं.
मात्र प्रत्येकजण ते शेवटपर्यंत पूर्ण करू शकत नाही. कारण यासाठी प्रारंभिक किंवा मूळ खर्च जवळपास 1300 डॉलर्स (अंदाजे 1,23,266 रुपये) आहे. तसंच त्याचे निकाल किवा निष्कर्ष पाहण्यासाठी एक वर्ष लागू शकतं.
पाळीव प्राण्याच्या मालकांना इंजेक्शन देण्याचा कंटाळा न येणं आणि पुरेसा अनुभव असलेले व्यावसायिक किंवा चिकित्सक यांच्यावर यश अवलंबून असतं.
यातील चांगली बातमी अशी आहे की चांगली औषधं लवकरच उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत. नवीन सहाय्यक आणि चांगली पद्धती यामुळे एक वर्षांचा कालावधी कमी होऊन सहा आठवड्यांचा होऊ शकतो.
जपानच्या बाजारपेठेत आधीच औषधं उपलब्ध आहेत. आता युरोपियन युनियनमधील नियामक संस्थेच्या मंजूरीची वाट पाहिली जात आहे, असं मुलर म्हणतात.
“मग ॲलर्जीसंदर्भातील संवेदनशीलता कमी करण्यामध्ये एक मोठा आमूलाग्र बदल होईल,” असं ते म्हणतात.
पाळीव प्राण्यांमधील ॲलर्जीचं प्रमाण वाढतं आहे का?
यासंदर्भातील दोष अनेकदा प्रजननकर्त्यांना (ब्रीडर) दिला जातो. ते रोगप्रतिकारक आरोग्याकडे दुर्लक्ष करून फक्त दिसणं आणि फॅशनवर लक्ष केंद्रित करतात. मुलर म्हणतात, मात्र हे अधिक सोपं किंवा सुलभ करून सांगितल्यासारखं आहे.
“पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही त्यांच्या मालकांवर आणि या प्राण्यांना त्यांचे मालक कशाप्रकारची जीवनशैली देतात यावरही ठरवली जाऊ शकते. मानवी जीवनाबरोबरच या प्राण्यांचं आयुष्यदेखील बदललं आहे”, असं ते म्हणतात.
आपल्याप्रमाणेच हे प्राणीदेखील आता बाहेर कमी वेळ घालवतात. ते प्रक्रिया केलेल्या अन्नाद्वारे अधिक प्रमाणात कॅलरीज खातात. त्यांना अधिक वेळा धुतलं किंवा आंघोळ घातली जाते. तसंच त्यांच्यावर विविध उत्पादनांद्वारे परम्यूमचा अधिक वापर केला जातो. या उत्पादनांमध्ये ॲलर्जेन असू शकतात.
फोटो स्रोत, Getty Images
संभाव्य ॲलर्जेन शस्त्रागारात एक नवीन घटकदेखील असू शकतो. तो म्हणजे माणूस. इतर प्राण्यांप्रमाणेच आपणदेखील कोंडा उत्सर्जित करतो. कुत्र्यांना माणसाच्या या कोंड्याची ॲलर्जी असू शकते. पाळीव प्राण्यांना माणसांमुळे ॲलर्जी होणं ही किती सामान्य बाब आहे, हे स्पष्ट करण्यासाठी फारसा चांगला डेटा किंवा माहिती उपलब्ध नाही, असं कॉलिन्स म्हणतात.
मात्र बॉइड म्हणतात की हल्लीच्या काळात आपण आपल्या पाळीव प्राण्यांसोबत ज्याप्रकारे राहतो, त्यामुळे ते आपल्या संपर्कात येण्याची शक्यता अधिक असते.
“पिसवा आणि गोचिडासारखा कीटक यांच्यासंदर्भातील उपचारांपूर्वी, आपण कधीही कुत्र्यांना आपल्या अंधरुणात झोपू देत नसू. मात्र आता ते आपल्या चादरी वापरतात,” असं बॉइड म्हणतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC




