Source :- BBC INDIA NEWS

रस्ते अपघात

फोटो स्रोत, Getty Images

दररोज सकाळी रस्त्यांवरील अपघातांच्या बातम्यांनी वर्तमानपत्रांचे रकाने भरलेले आपल्याला पाहायला मिळतात.

कधी प्रवाशांना घेऊन जाणारी बस थेट दरीतच कोसळते, तर कधी मद्यधुंद अवस्थेतील चालक रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडून पुढे निघून जातो, कधी एखादी वेगात जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकते तर कधी एखाद्या मोठ्या ट्रकनं दुचाकीला उडवून लावल्याचं वाचायला मिळतं.

रस्ते अपघाताच्या अशा बातम्या आपल्यासाठी आता रोजच्याच झाल्या आहेत.

रस्ते अपघात ही भारतातील सर्वात मोठी शोकांतिका बनत चालली आहे‌. पण या अपघातांना आपण आता इतके सरावलो आहोत की त्यांची तीव्रता अथवा गांभीर्य आपल्याला लक्षात येत नाही. पण रस्ते अपघात या भारतातील लोकांच्या अवेळी मृत्यूचं सर्वांत मोठं कारण बनत चालले आहे, या तथ्य्याकडे कानाडोळा करणं आपल्याला खचितच परवडणारं नाही.

आकड्यांमध्येच बोलायचं झाल्यास 2023 या एकाच वर्षात 1,72,000 भारतीयांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. याचाच अर्थ दिवसाला 474 म्हणजेच दर तीन मिनिटाला एका भारतीयाचा रस्त्यावरच मृत्यू होतो आहे.

अर्थात 2023 सालचा रस्ते अपघाताचा अधिकृत अहवाल अद्याप प्रसिद्ध व्हायचा असला तरी भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर महिन्यात रस्ते वाहतूक सुरक्षेच्या एका कार्यक्रमात बोलताना सादर केलेली आकडेवारी या परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित करायला पुरेशी आहे.

अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या

मागच्या वर्षी रस्ते अपघातात मरण पावलेल्या या 1,72,000 लोकांमध्ये 10,000 लहान मुलांचाही समावेश होता.

शाळा आणि महाविद्यालयांजवळ घडलेल्या रस्ते अपघातात मृत पावलेल्यांची संख्या त्यात ग्राह्य धरली तर हा आकडा आणखी 10,000 नी वाढतो. या 1,72,000 पैकी 35,000 तर फक्त पादचारीच होते‌.

पादचाऱ्यांनंतर रस्ते अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींच्या यादीत दुचाकीस्वारांचा क्रमांक लागतो. मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवणे हे या अपघातांचं प्रमुख कारण म्हणून समोर आलेलं आहे. अतिवेगाने वाहन चालवल्याने सर्वाधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे‌.

पुरेशी काळजी अथवा सावधगिरी न बाळगणं हे रस्ते अपघाताचं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं कारण ठरलंय. 2023 सालात हेल्मेट न घातल्यामुळे 54,000 लोकांचा रस्ते अपघातात बळी गेलाय तर सीट बेल्ट न घातल्याची किंमत 16 हजार लोकांना आपला जीव गमावून चुकवावी लागली आहे.

मर्यादेपेक्षा जास्त सामान अथवा प्रवासी गाडीत बसवल्याने (ओव्हरलोडिंग) 12000 मृत्यू झाले तर अधिकृत परवान्याशिवाय गाडी चालवणारे शिकाऊ चालक 34,000 रस्ते अपघातांचं कारण ठरलेत‌.

मुंबई-नाशिक हायवे

फोटो स्रोत, Getty Images

रस्त्याच्या चुकीच्या बाजूने गाडी चालवल्याने घडलेल्या अपघातात मृत्यू पावलेल्यांची संख्या देखील लक्षणीय ठरली आहे.

2021 साली घडलेल्या 13 टक्के रस्ते अपघातांचं प्रमुख कारण हे अधिकृत परवाना नसलेले शिकाऊ चालक होते.

भारतातील रस्त्यांवर धावणारी अनेक वाहनं ही अतिशय जुनी आणि खराब परिस्थितीतील असतात. बऱ्याच वाहनांमध्ये एअरबॅग तर दूरची गोष्ट सीटबेल्टसारख्या किमान सुरक्षा सुविधा देखील बसवलेल्या नसतात. भारतातील रस्त्यांवरील बेशिस्त आणि अनियमित रहदारी या वाहतुकीला आणखी धोकादायक बनवते.

भारतीय रस्त्यांवरील रहदारी ही फारच विस्कळीत आणि शिस्तहीन मानली जाते. कार, बस आणि मोटरसायकलसारख्या स्वयंचलित वाहनांबरोबरच सायकल, हातगाड्या आणि रिक्षांची गर्दी इथल्या रस्त्यांवर होते.

त्यात पुन्हा पादचारी आणि मोकाट जनावरांचा वावर या रस्त्यांना वाहतुकीसाठी आणखी बेभरवशाचे बनवतात.

वाहन

फोटो स्रोत, Getty Images

रस्त्याच्या बाजूला वस्तू विक्री करणारे फेरीवाले आधीच अरूंद असलेल्या रस्त्यात आतपर्यंत घुसखोरी करून त्याला आणखी निमुळते बनवतात.

रस्त्याच्या कडेला या फेरीवाल्यांनी आपलं दुकान मांडून ठेवल्यानं पादचाऱ्यांना रस्त्याच्या आतल्या बाजूंनी चालावं लागतं‌. मग उरलेल्या रस्त्याच्या भागातून सगळी वाहनं कशीबशी मार्ग काढू लागतात. त्यामुळे इथल्या रस्ते वाहतुकीत म्हणजे असा सगळा सावळागोंधळ सुरू राहतो आणि हे रस्ते आणखी जिकिरीचे बनत जातात. अशा बेशिस्त आणि बेभरवशाच्या रहदारीला नियंत्रित करणं ही फार अवघड गोष्ट बनून जाते.

भारतातील रस्ते वाहतुकीचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न आणि मोठ्या प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक देखील झालेली आहे. पण तरी अजून भारतातील रस्ते वाहतूक जगातील सर्वात धोकादायकच मानली जाते.

तज्ज्ञांच्या मते फक्त सोयी – सुविधांचा अभाव नव्हे लोकांच्या गैरवर्तवणुकीचाही यात मोठा वाटा आहे. रस्ते वाहतुकीचे नियम व कायदे लोकांनी पाळावेत अशी कठोर यंत्रणाच इथे कार्यरत नाही‌.

या सगळ्या कारणांमुळे ढिगाने घडणाऱ्या या रस्ते अपघातात जीवितहानी तर मोठ्या प्रमाणात होतेच शिवाय याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम होतो.

रस्ते अपघातामुळे वाहतूक खोळंबून भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात 3 टक्क्यांची घट होत असल्याचंही समोर आलेलं आहे.

भारतातील रस्त्यांचं जाळं

फोटो स्रोत, Getty Images

सर्वात मोठं / लांब रस्त्यांचं जाळं असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अमेरिकेचा पहिला क्रमांक लागतो.

66 लाख किलोमीटर (41 लाख मैल) लांबीचे रस्ते भारतात बांधले गेलेले आहेत‌. भारतातील एकूण 35 कोटी नोंदणीकृत वाहने या रस्त्यांवर धावतात.

‘हलगर्जीपणा की रस्त्यांची दूरवस्था’

रस्ता सुरक्षेविषयीच्या एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “लोकांना कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे लोक वाहतुकीचे नियम सर्रास धुडकावून लावत बेजबाबदारपणे वाहन चालवतात. लोकांचा हा हलगर्जीपणाच भारतातील रस्ते अपघाताचं प्रमुख कारण आहे.”

याशिवाय भारतातील रस्ते बनवताना स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये देखील अनेक मूलभूत चुका झालेल्या असल्याचं खुद्द गडकरींनीच मागच्या महिन्यात मान्य केलं होतं.

अनेक रस्त्यांची आखणीच वैज्ञानिक पद्धतीने करण्यात आलेली नाही, रस्ते बांधणीत सामान हीन दर्जाचं वापरलं जातंय, रहदारी नियंत्रणाचं व्यवस्थापन करण्याची यंत्रणा देखील कमजोर आहे. त्यात भर म्हणजे अनेक ठिकाणी रस्त्यांवरती नीट चिन्हे आणि दिशादर्शक लावण्यात आलेले नाहीत.

हे सगळे घटक मिळून भारतातील रस्ते वाहतुकीला धोकादायक बनवतात. त्यामुळेच भारतातील रस्ते अपघातांची संख्या इतकी जास्त झालेली आहे.

रस्ते अपघात

फोटो स्रोत, Getty Images

“भारतातील तब्बल 59 राष्ट्रीय महामार्ग चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले आहेत. या महामार्गांवरती एकूण 13795 अपघात प्रवण क्षेत्र आहेत. त्यापैकी फक्त 5,036 क्षेत्रांची डागडुजी करण्यात आलेली आहे. भारतातील रस्ते सुरक्षित नसण्यामागचे सर्वात मोठे गुन्हेगार हे आपले सिव्हील इंजिनिअर्स आहेत,” असं वक्तव्य केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी संसदेतील आपल्या भाषणात केलं होतं.

ट्रान्सपोर्टेशन रिसर्च ॲन्ड इन्जुरी प्रेव्हेंशन सेंटरनं दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भारतातील रस्ते वाहतुकीच्या सुरक्षेचं परिक्षण करणारा एक अहवाल बनवला होता.

या अहवालातून भारतातील रस्ते बांधणीत अनेक अक्षम्य व मूलभूत चुका झालेल्या असल्याचं समोर आलं.

उदाहरणार्थ क्रॅश बॅरियर्स. जर रस्त्यावरुन धावणारी गाडी रस्त्यावरुन काही कारणाने घसरली तर ती गाडी खाली पडू नये किंवा पलटी होऊ नये म्हणून रस्त्यांच्या कडेला हे क्रॅश बॅरियर्स बसवले जातात. पण अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने हे क्रॅश बॅरियर्स उभारण्यात आलेले आहेत, असं हा अहवाल सांगतो.

अवैज्ञानिक पद्धतीने बांधण्यात आलेले हे क्रॅश बॅरियर्स अपघात झालेल्या गाडी व चालकाला तारक नव्हे तर मारक ठरतात.

या क्रॅश बॅरियर्सची उंची किती असावी, ते नेमके कसे आणि कुठे उभारले जावेत याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. तिचं पालन न करता वाटेल त्या पद्धतीने हे क्रॅश बॅरियर्स बसवण्यात आले आहेत.

त्यामुळे एखादी बस, ट्रक अथवा कार तिला येऊन धडकली तर ती सुर‌क्षित एका जागी थांबण्याऐवजी आणखी वेगाने पलटी होऊन उलटं जास्त नुकसान होत असल्याचं हा अहवाल सांगतो.

अपघात

फोटो स्रोत, Reuters

आयआयटी दिल्लीमधील स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक गीतम तिवारी यांनी बीबीसीशी बोलताना याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला.

“वैज्ञानिकदृष्ट्या जसं अपेक्षित आहे त्याप्रमाणे जशास तसे हे क्रॅश बॅरियर्स जर उभारण्यात आले नसतील तर हे चुकीच्या पद्धतीने लावलेले क्रॅश बॅरियर्स फायदा कमी नुकसानच जास्त करतात,” असं ते म्हणाले.

रस्ते दुभाजकांनाही हीच गोष्ट लागू होते. दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या वाहनांना वेगळं करण्यासाठी एक छोटी रेघ रस्ते दुभाजक म्हणून अपेक्षित असते.

रस्ते दुभाजकांची उंची 10 सेंटीमीटर म्हणजेच 3.9 इंचापेक्षा जास्त असता कामा नये, असं अपेक्षित आहे. पण अनेक रस्ते दुभाजक हे त्यापेक्षा बऱ्याच जास्त उंचीवर बांधण्यात आले आहेत, असं हा अहवाल सांगतो.

रस्ता दुभाजक 10 सेंटीमीटर पेक्षा उंच बांधला जाऊ नये, असं तज्ञ सांगतात कारण वेगात आलेल्या गाडीचं चाक या उंचीवरील दुभाजकाला धडकलं तर धडक झालेल्या घर्षणातून आग पेटून गाडीचं चाक फुटू शकतं‌.

चाक फुटल्यानंतर वेगात असलेली ही गाडी पलटी होऊ शकते. ही गाडी पलटून मग मागच्या गाड्यांवर आदळून त्यांचाही अपघात होऊ शकतो.

भारतातील बहुतांश रस्त्यांवरील दुभाजक बांधताना या सगळ्या गोष्टींचा विचारच केला गेलेला नाही.

समृद्धी महामार्ग

फोटो स्रोत, Getty Images

विचार करून न बांधलेला रस्ता दुभाजक हा वाहतूक सुरक्षेतील मदत नव्हे तर अडथळा बनून जातो. भारताची राजधानी असलेल्या दिल्ली जवळून जाणाऱ्या महामार्गाचंच उदाहरण घ्या. हा महामार्ग दाट लोकसंख्या असलेल्या वस्तीतून जातो.

महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांमधून मार्ग काढत इथले स्थानिक रहिवासी हा रस्ता ओलांडत असतात.

बऱ्याचदा गाड्या पुढे जायची वाट पाहत ते या उंचावरील दुभाजकांवर थांबतात. जे अतिशय धोकादायक आहे‌.

ग्रामीण भागातील छोट्या रस्त्यांचीही हीच अवस्था आहे. हे रस्ते उखडले गेल्यानंतर दुरुस्तीच्या नावानं या रस्तांवर डांबर आणि काँक्रिटचे अक्षरशः थर रचले जातात. त्यामुळे हे रस्ते मध्येच उंच तर मध्येच खोलगट होतात. अशा अनिश्चित रस्त्यावरून गाडी चालवणं हे मग चालकांसाठी एक आव्हानच बनून जातं.

रस्त्यांची रचना कशी हवी?

अचानक तीव्र उतार आणि तीव्र चढ असलेल्या या रस्त्यांवरून गाड्या हमखास घसरतात व प्रसंगी पलटी देखील होतात. तरीही पुन्हा रस्ता उखडल्यानंतर दुरुस्तीच्या नावानं नवीन थर रचायची प्रक्रिया काही थांबत नाही.

भारतातील रस्त्यांची रचना कागदावर जरी व्यवस्थित केली गेलेली असली तरी प्रत्यक्षात या रस्त्यांचं झालेलं बांधकाम आणि तिथून होणारी वाहतूक फारच वेगळी आहे.

“रस्ते बांधताना सुरक्षेचे सगळे नियम पाळण्यात आलेले आहेत का? आणि चालकांसाठी पुरेशी काळजी घेण्यात आलेली आहे का? हे पाहिलंच जात नाही. यासंबंधी प्रशासनाकडून रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांना जाबही विचारला जात नाही. फक्त किती किलोमीटरचा रस्ता बांधला हे पाहून रस्त्याच्या लांबीनुसार कंत्राटदाराला पैसे देऊ केले जातात. चुकीच्या पद्धतीने रस्ता बांधण्याची कुठली शिक्षा कंत्राटदाराला दिली जात नाही. त्यामुळे अवैज्ञानिक पद्धतीने सुरक्षेचा फारसा विचार न करता कंत्राटदार सगळे नियम बासनात गुंडाळून रस्ते बांधत सुटतात,” अशा शब्दात प्राध्यापक तिवारी यांनी नेमक्या समस्येवर बोट ठेवलं.

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Getty Images

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील तब्बल 25 हजार किलोमीटर अंतरावरील दुपदरी राष्ट्रीय महामार्गांचं चौपदरीकरण करण्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पाची घोषणा नुकतीच केली होती.

“या चौपदरीकरणातून राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची संख्या लक्षणीयरित्या कमी होईल,” असा दावा त्यांनी केला.

शिकागो विद्यापीठातील या विषयातील तज्ज्ञ कवी भल्ला यांना मात्र नितीन गडकरींचा हा दावा पटलेला नाही.

गरीब व विकसनशील देशातील वाहतूक सुरक्षेवर त्यांनी याआधी देखील बरंच काम केलेलं आहे.

भारतातील वाहतुकीची गरज आणि समस्या या वेगळ्या आहेत. त्यांचं वेगळेपण समजून न घेता आंधळेपणानं पाश्चात्य देशांची वाहतूक यंत्रणा जशास तशी इकडे राबवणं शहाणपणाचं नसल्याचं भल्ला म्हणतात.

“रस्त्यांचं रुंदीकरण करून अपघाती मृत्यू रोखता येतील, हा एक भ्रम आहे. उलटपक्षी भारतासारख्या देशात रस्त्यांचं रूंदीकरण झाल्यावर कार व ट्रकचे चालक आपली वाहने आणखी वेगाने पळवतात आणि त्या रस्त्यावरील पादचारी, सायकलस्वार व मोटारसायकल चालवणाऱ्यांना आणखी धोक्यात टाकतात, असंच आत्तापर्यंतचे पुरावे सांगतात. त्यामुळे चौपदरीकरण हा काही रस्ते वाहतूक सुरक्षित करण्याचा मार्ग नाही,” असं सांगत कवी भल्ला यांनी नितीन गडकरींचा दावा खोडून काढला.

अपघातप्रवण क्षेत्र

फोटो स्रोत, Getty Images

“अमेरिका आणि युरोपातील वाहतूक व रहदारी भारतापेक्षा अतिशय वेगळी आहे. आपले रस्ते बांधण्याआधी अमेरिका आणि युरोपातील संबंधित विभागांनी तिथली गरज आणि समस्या काय आहेत, यासंबंधी भरपूर संशोधन केलेलं असतं. मग त्यानुसारच नियोजन करून रस्ते बांधले जातात. भारत सरकार भारतातील लोकांची गरज व समस्या काय आहेत हे न शोधता रस्ते बांधताना थेट अमेरिकेतील रस्त्यांची जशास तशी नक्कल करू पाहतंय‌. इथली गरज काय आहे त्यानुसार आपल्या पद्धतीने रस्ते बांधले गेले पाहिजेत,” असा सल्ला कवी भल्ला यांनी दिला.

यावर उपाय काय आहे?

वाहतूक सुरक्षेच्या या वाढत्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या के के कपिला यांनी बीबीसीला दिली.

रस्ते व वाहनांची वैज्ञानिक बांधणी, लोकशिक्षणातून जागरूकता, नियमांचं पालन लोकांनी करावं यासाठी निगराणीची व्यवस्था आणि अपघात झाल्यानंतर तातडीने वैद्यकीय मदत पुरवणे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं त्या म्हणाल्या.

भारतीय कायदा आयोगाच्या एका अहवालानुसार रस्ते अपघातानंतर जर वेळीच वैद्यकीय मदत मिळाली तर होणारे 50 टक्के मृत्यू रोखता येऊ शकतील.

रस्ते व वाहतूक सुरक्षेची योजना बनवण्यासाठी देशातील अनेक राज्य सरकारांसोबत आम्ही काम करत असल्याची माहिती के के कपिला यांनी दिली.

“यासाठी सात राज्यांमधील अपघात प्रवण क्षेत्र आधी हेरण्यात आले. मग या पट्ट्यांमध्ये वाहतूक सुरक्षेच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर आता हे अपघात प्रवनक्षेत्र अपघात मुक्त बनले आहेत,” असा दावा देखील त्यांनी केला.

मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधणी करून भारतातील रस्त्यांचं जाळं विस्तारणं भारताच्या आर्थिक वृद्धीसाठी गरजेचं आहे, यावर सगळ्याच अर्थतज्ञांचं एकमत आहे.

रोड

फोटो स्रोत, Getty Images

पण हे जाळं उभारताना संबंधित रस्ते हे सुरक्षित आणि शाश्वत दृष्टीकोनातून बांधले जातील, याची काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे.

वाहतूक जलद करण्याच्या आणि अर्थव्यवस्थेची उत्पादकता वाढवण्याच्या नादात पादचारी आणि सायकलस्वारांकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेणं गरजेचं आहे. तरच अपघाती मृत्यूंची संख्या भारताला नियंत्रणात आणता येईल.

“आर्थिक विकास साधताना त्याची किंमत फक्त समाजातील गरीब – वंचित घटकांनाच चुकवावी लागू नये, ही किमान अपेक्षा आहे. रस्ते बांधणीचा धडाका लावताना वेळोवेळी या प्रक्रियेचं पुनर्मूल्यांकन करत सुरक्षेकडे तर दुर्लक्ष होत नाहीये ना, याची खातरजमा केली गेली पाहिजे. आणि त्यानुसार वेळीच हस्तक्षेप करत प्रसंगी रस्तेबांधणीचा वेग कमी करुन झालेल्या चुका आधी दुरुस्त केल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा चकाकते रस्ते तर आपण बांधू. या चकाकत्या रस्त्यांवरून मोठमोठे ट्रक आणि अलिशान कार आणखी वेगाने धावतील. पण या रस्त्यांवर अपघातात जीव सोडणाऱ्या लोकांची संख्याही तितक्याच वेगाने वाढलेली असेल,” असा इशारा जाताजाता कवी भल्ला यांनी दिला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC