Source :- BBC INDIA NEWS

तानुबाई बिर्जे

फोटो स्रोत, BBC/Puneet Kumar

( मे महिना हा महाराष्ट्र स्थापनेचा महिना आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील नायिका या मालिकेतून महाराष्ट्राच्या जडण-घडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांचा परिचय करुन देण्यात येत आहे.)

“हे पत्र हार्नबी रोड, सीताराम बिल्डिंग येथे ‘दीनबंधु’ छापखान्यात तानुबाई वासुदेवराव बिर्जे यांनी छापून प्रसिद्ध केले. (दीनबंधु, दि. 6 एप्रिल 1912, अंक 28)”

‘दीनबंधु’ या महात्मा फुलेंच्या विचाराने प्रेरित वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर अशी नोंद आहे.

ही फक्त मुद्रण तपशिलाची नोंद नाही तर इतिहासाच्या पानांवर उमटलेली एका सत्यशोधक स्त्रीची स्वाक्षरीच म्हणावी लागेल.

हे वाक्य जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर तानुबाईंचे एक चित्र समोर येते. कधी त्या प्रिटिंग प्रेसच्या खडखडाटात अक्षरांचे ठोकळे जुळवत आहेत, कधी त्या लेख तपासून पुन्हा लिहित आहेत, कधी त्या दोन्ही हात पाठीमागे बांधून विचार करत आहेत, तर कधी त्यांचे विचार कागदावर उमटताना त्या पाहत आहेत; अशी तानुबाईंची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

परिवर्तनाचं हत्यार म्हणून तानुबाईंनी पेन हाती घेतलं होतं. पानांवर छापल्या गेलेल्या त्यांच्या संपादकीय लेखात विचारांसोबतच एक दृढ संकल्प होता – सशक्त समाजाचा, स्त्री स्वातंत्र्याचा आणि सत्यशोधक परंपरेच्या उजेडात चालणाऱ्या नव्या वाटेचा.

त्यांच्या 1908 ते 1913 या तानुबाईंच्या संपादकीय कारकिर्दीत ‘दीनबंधु’ हे बहुजन समाजाचा आधार बनलं होतं. सत्यशोधक समाजाला दिशा देण्याचं काम या वृत्तपत्रानं केलं.

तानुबाईंचे बालपण आणि शिक्षण

तानुबाईंचे कार्य पाहण्याआधी आपण त्यांची पार्श्वभूमी थोडी समजून घेऊ. तानुबाईंचा जन्म बहुजन कुटुंबात झाला. त्यांचे वडील देवराव ठोसर हे आधी पोलीस खात्यात काम करत. त्यांचे कायद्यातील ज्ञान पाहून त्यांना पुढे इंग्रज सरकारने मॅजिस्ट्रेट होण्याची संधी दिली आणि ते मॅजिस्ट्रेट झाले.

मूळचे नाशिकचे असलेले ठोसर हे पुण्यात स्थायिक झाले. त्याच काळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समाज सुधारणेचे काम प्रगतिपथावर होते. देवराव ठोसर हे फुले दाम्पत्याचे अनुयायी बनले आणि पुढे सत्यशोधक चळवळीत त्यांनी काम देखील केले.

ठोसर हे महात्मा फुलेंचे शेजारी देखील होते. महात्मा फुले यांचे वेताळ पेठेत एक दुकान होते. याच दुकानाच्या वरच्या मजल्यावर पुढे सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. या ऐतिहासिक वास्तूपासून केवळ शे-दोनशे पावलांवर ठोसरांचे घर होते.

महात्मा फुले

ठोसर दाम्पत्याला तीन मुलं होत्या. तानुबाई या धाकट्या होत्या. त्यांच्या जन्माची नोंद कुठे सापडत नाही. पण विविध कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या चरित्रकारांनी तानुबाईंचा जन्म हा 1876 झाला असावा असा अंदाज बांधला आहे. ज्येष्ठ सत्यशोधक नेते आणि विचारवंत जी. ए. उगले यांनी तानुबाईंचे चरित्र लिहिले आहे. तानुबाईंवर संशोधन करणारे विद्यार्थी याच चरित्राचा आधार घेताना दिसतात.

जी. ए. उगलेंनी लिहिलेल्या ‘दीनबंधु आणि तानुबाई बिर्जे’ या ग्रंथात एक नोंद आहे. त्याकाळात इंग्रज सरकार वर्तमानपत्र आणि त्यांचे चालक, संपादक यांच्या नोंदी ठेवून गोपनीय अहवाल सरकारला पाठवत असत.

‘कॉन्फिडेन्शिएल रिपोर्ट ऑन नेटिव्ह पेपर्स’च्या एप्रिल 1913 ते सप्टेंबर 1913 च्या अहवालात तानुबाई ‘दीनबंधु’च्या संपादिका असून त्यांचं वय 37 वर्ष असल्याचं सांगितलं आहे.

अक्षर जुळवणीसाठी आधी असे खिळे वापरले जात असत (संग्रहित)

फोटो स्रोत, Getty Images

ही नोंद तत्कालीन मुंबई सरकारच्या भाषांताराधिकारी एस.एम. भारूका यांच्या निर्देशनाखाली झाली असल्यानं विश्वासार्ह म्हणता येते. त्यावरून तानुबाईंचा जन्म 1876 सालचा असल्याचा अनुमान उगलेंनी काढला आहे.

तानुबाईंसाठी वर म्हणून सत्यशोधक समाजातील तरुणाची निवड

तानुबाईंचे शिक्षण वेताळ पेठेतील पुणे नगर परिषदेतील शाळेत झाले होते. ही शाळा महात्मा फुलेंनी यांनीच काढली होती. पण पुढे ती नगर परिषदेकडे हस्तांतरित केली होती.

तानुबाईंचे लग्न वयाच्या 15 ते 17 व्या वर्षं म्हणजे 1891 ते 1893 या काळात झाले असावे. देवराव ठोसर हे सत्यशोधक समाजातील असल्यामुळे त्यांनी त्याच विचाराचा वर आपल्या मुलीसाठी शोधला. त्यांचा विवाह वासुदेव लिंगोजी बिर्जे यांच्याशी सत्यशोधक पद्धतीने लावण्यात आला.

वासुदेव बिर्जे यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. वासुदेव बिर्जे हे देखील सत्यशोधक चळवळीतील महत्त्वाचे कार्यकर्ते मानले जातात. ते मुळचे बेळगावचे होते. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना पुढील शिक्षण घेणे जमले नव्हते. तरी त्यांचा पिंड अभ्यासू आणि संशोधकाचा होता.

जी. ए. उगले यांनी लिहिलेले तानुबाईंचे चरित्र

फोटो स्रोत, SWAROOP PRAKASHAN

वासुदेव बिर्जे सत्यशोधक चळवळीतील नेत्यांना लेखनात साहाय्य करत असत. त्यातूनच पुढे त्यांनी महत्त्वाचे लिखाण केल्याचं आपल्याला दिसतं.

दीनबंधुचे संपादक आणि संस्थापक कृष्णराव भालेकरांशी त्यांचे निकटचे संबंध होते. भालेकरांच्या ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ या नियतकालिकासाठीही वासुदेव बिर्जे लेखन करायचे.

लग्नाला पंडिता रमाबाईंची उपस्थिती

उगले यांच्या चरित्रात उल्लेख आहे की, या दोघांच्या सत्यशोधक लग्नाची बातमी ‘दीनबंधु’ आणि ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ अशा दोन्ही वृत्तपत्रात छापून आली होती. बहुजन समाजासाठी हे लग्न प्रेरणादायी ठरावं म्हणून ही प्रसिद्धी दिली असावी.

रविवार 29 जानेवारी 1893 च्या ‘दीनबंधु’च्या अंकात तानुबाई ठोसर आणि वासुदेव बिर्जे यांचं लग्न 22 जानेवारीला झाल्याची नोंद आहे. त्यात वधुचं वय 15 वर्ष तर वराचं वय 26 वर्ष सांगण्यात आलं आहे.

पंडिता रमाबाई

फोटो स्रोत, ANUPAMA UJAGARE

तानुबाईंचे भाऊ लक्ष्मणराव ठोसर, फुलेंचे चिरंजीव यशवंत हे जवळचे मित्र होते. त्यामुळे मित्राच्या बहिणीचं, म्हणजे आपल्याच बहिणीचं लग्न लावून देण्यासाठी तेही हजर होते.

नव्यानं रचलेली काही मंगलाष्टकंही त्यांनी लग्नात म्हटल्याचा उल्लेख ‘दीनबंधु’मध्ये सापडतो.

लग्नाला पंडिता रमाबाईही उपस्थित होत्या. त्यातून हे लग्न किती महत्त्वाचं होतं ते समजतं. लग्नानंतर नवदाम्पत्य मुंबईत राहू लागलं.

वासुदेव बिर्जेंना बडोद्यात नोकरी आणि राजीनामा

लग्नानंतर एखादं वर्ष मुंबईत काढून तानुबाई आणि वासुदेव बिर्जे लगेचच बडोद्याला गेले. तिथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या लक्ष्मीविलास राजवाड्यातल्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून वासुदेव बिर्जेंना नोकरी मिळाली होती. बडोद्यात बिर्जे कुटुंब जवळपास 11 वर्ष राहिलं.

लग्नानंतर एखादं वर्ष मुंबईत काढून तानुबाई आणि वासुदेव बिर्जे लगेचच बडोद्याला स्थायिक झाले. तिथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या लक्ष्मीविलास राजावाड्यातल्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून वासुदेव बिर्जेंना नोकरी मिळाली होती. बडोद्यात बिर्जे कुटुंब जवळपास 11 वर्ष राहिलं.

याच काळात वासुदेव बिर्जेंनी ‘क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व’ हा ब्राह्मणेतर चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा ग्रंथ लिहिला.

‘वासुदेव बिर्जे दीनबंधुचे संपादक झाले’

महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे मुखपत्रच बनलेले ‘दीनबंधु’ कृष्णराव भालेकरांनी 1877 साली सुरू केले होते. काही काळ ते पुण्यातून चालवले गेले मग ‘दीनबंधु’ मुंबईतून निघू लागले. आर्थिक अडचणींमुळे दीनबंधु चालवणे हे अवघड झाले होते.

तेव्हा भालेकरांनी ‘दीनबंधु’ पत्र कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांना चालवायला दिले. त्यांनी 1900 पर्यंत ‘दीनबंधु’ चालवले. नंतर ‘दीनबंधु’ पडले आणि पुन्हा ते सुरू करावे हा विचार सत्यशोधक चळवळीतील नेत्यांनी केला आणि वासुदेव बिर्जेंकडे ‘दीनबंधु’ चालवण्याची जबाबदारी आली.

दीनबंधुचे अंक

फोटो स्रोत, Deenbandhu

बिर्जेंनी आपल्या ग्रंथपालाच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते मुंबईत आले. पाच वर्षांच्या खंडांनंतर म्हणजेच 1905 ला दसऱ्याच्या दिवशी पुन्हा ‘दीनबंधु’ सुरू झाले.

वासुदेव बिर्जेंच्या कारकिर्दीत दीनबंधु बहरू लागलेला असतानाच 1908 मध्ये वासुदेव बिर्जेंचे कॉलरामुळे निधन झाले आणि हे पत्र चालवण्याची जबाबदारी तानुबाईंवर आली.

1905 पासून तानुबाई देखील वासुदेव बिर्जे यांना कामात सहकार्य करत होत्या त्यामुळे त्यांनी दीनबंधुची जबाबदारी समर्थपणे पेलली पुढील चार-पाच वर्षे त्या ‘दीनबंधु’च्या संपादक राहिल्या.

सत्यशोधक समाजाचा वृत्तांत, राजकीय भाष्य आणि सामाजिक प्रश्न

उगले यांच्या संशोधनानुसार, तानुबाईंनी 1908 पासून ते 1913-14 पर्यंत ‘दीनबंधु’चं संपादन केलं असावं. त्यावेळी ‘दीनबंधु’ दर शनिवारी प्रसिद्ध होत असे.

दीनबंधुंच्या उपलब्ध अंकांमधून तानुबाईंनी सत्यशोधक तत्त्वज्ञानाची आच जोपासल्याचं दिसतं. सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनांचा विस्तृत वृत्तांत तानुबाई प्रसिद्ध करत होत्या.

सत्यशोधक समाजाची आचारसंहिता लिहिण्याचं आवाहन ‘दीनबंधु’नं केलं होतं. त्यानंतर सत्यशोधक कार्यकर्ते भास्करराव जाधव यांनी सत्यशोधक समाजाची आचारसंहिता लिहिली. आचारसंहिता किंवा घटना ‘दीनबंधु’त प्रकाशित करण्यात आली होती.

तानुबाईंचे लिखाण कसे होते?

समाजाला आत्मभान यावं म्हणून संत तुकाराम महाराजांचे अभंग तानुबाई वृत्तपत्रात प्रसिद्ध करत असत. त्यांनी स्वतः लिहिलेल्या राजकीय लेखांमध्येही तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ असे.

त्यांच्या एका संपादकीय लेखात देशात लोकशाही शासनप्रणाली आणण्याविषयी त्या बोलल्या आहेत.

देश स्वतंत्र होईल असं चिन्ह कुठेही दिसत नसताना याविषयावर त्यांनी एक लेखमालाच चालवली होती.

प्रिंटिंग प्रेसचे संग्रहित छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

एका लेखमालेत त्यांनी भारतातल्या प्राचीन राजसत्तेचा आणि इतिहासाचा सत्यशोधकीय भूमिकेतून एक आढावा त्यांनी घेतला आहे.

असंच, 27 जुलै 1912 च्या अंकातलं ‘लेजिस्लेटिव्ह कौन्सिल आणि बहुजन समाज’ हे तानुबाई बिर्जेंचं संपादकीय अतिशय रोखठोक आणि प्रभावी होतं.

‘मुंबई राज्यातील विधिमंडळात शेतकऱ्यांच्या किंवा बहुजन समाजाचा कुणीही वाली नाही,’ असं त्यांनी म्हटलंय.

त्या लिहितात, “बहुजन समाजाच्या हिताविषयी कायदे कौन्सिलात अगोदर प्रश्न निघणेच कठीण आणि कदाचित निघालाच तर त्याला पुष्टी देणारा मिळणे कठीण.”

“मराठीत एक अशी म्हण आहे की ज्याचे पोट दुखते तो ओवा मागेल. बहुजन समाजाच्या दुःखांनी हल्लीच्या कौन्सिलातील लोकनियुक्त अथवा सरकारी सभासदांचे पोट दुखत नाही.”

“कायदे कौन्सिलात किंबहुना सरकार दरबारात ज्या लोकांचा प्रवेश होऊ शकतो अथवा होतो त्या लोकांच्या आणि बहुजन समाजाच्या चालीरीती व आचार विचार यामध्ये महंदतर असल्यामुळे कौन्सिलात सभासदांना या मुक्या समाजाची ओरड ऐकू जावी कशी आणि त्यांनी सरकारपाशी या मुक्या समाजाचे पोट दुखत आहे म्हणून ओवा मागावा कसा? हा मोठा प्रश्न आहे,” असं तानुबाई लिहितात. त्यातूनच त्यांच्या प्रतिभेचा अंदाज येतो.

दीनबंधुचे अंक

फोटो स्रोत, Deenbandhu

स्त्री-पुरूष समानताही त्यांच्या लिखाणातून डोकावत राहते. 20 जुलैच्या अंकात त्यांनी बहुजन समाजातल्या पितृसत्ताकवादी रुढी परंपरांवर टीका केलेली दिसते.

“स्त्रीने एकच पती करावा; परंतु पुरुषाने एकापेक्षा अधिक स्त्रिया करून स्वतःच्या विषयासक्तीचे प्रदर्शन करावयाचे.

“स्त्रियांनी पुरुषांच्या सेवेत तत्पर राहावे म्हणून ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला तिची अवहेलना करून ‘न स्त्री स्वातंत्र्य-मर्हति’ यासारखी अनुदार वचने शास्त्रातून प्रतिपादन करावयाची हा सर्व प्रकार रूढीचा परिणाम आहे.

“रूढीने शहाण्यासही वेडे बनविण्याचे श्रेय अनेक प्रसंगी घेतले आहे,” असं त्यांनी लिहिलंय.

‘तानुबाईंचे शब्द हीच त्यांची खरी ओळख’

तानुबाईंच्या वैयक्तिक आयुष्याविषयी इतकी कमी माहिती उपलब्ध आहे त्यांचे लेखन हीच त्यांची खरी ओळख आहे.

“दीनबंधु आणि तानुबाई बिर्जे हे जी. ए. उगले यांनी लिहिलेलं तानुबाईंवरचं एकमेव पुस्तक उपलब्ध आहे,” असं पुणे विद्यापीठाच्या पीएचडी संशोधक सोनाली शिंदे सांगतात.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सत्यशोधक महिलांचे कार्य’ या विषयावर शिंदे सध्या पीएचडी संशोधन करत आहेत.

त्यांच्या एम. फील. च्या शोधनिबंधासाठी त्यांनी तानुबाई बिर्जे, सावित्रीबाई रोडे आणि ताराबाई शिंदे या तीन स्त्रियांच्या कामाचा अभ्यास केला होता.

“सावित्रीबाई फुल्यांनंतर महत्त्वाचं काम करणाऱ्या महिलांपैकी तानुबाई एक होत्या,” सोनाली शिंदे सांगतात. पण तरीही त्यांचे संदर्भ शोधताना खूप अडचणी येत असल्याचे त्या मांडतात.

सावित्रीबाई फुले यांच्यानंतरच्या सत्यशोधक समाजातील महत्त्वाच्या महिला समाजसुधारक असं तानुबाईंना म्हटलं जातं.

“उगलेंचं पुस्तक सोडल्यास सत्यशोधक समाजातल्या लोकांनी लिहिलेल्या काही लेखांमध्ये, श्रीराम गुंदेकर यांच्या ‘सत्यशोधक साहित्याचा इतिहास’ या पुस्तकात आणि दीनबंधुच्या अंकात तानुबाईंचा उल्लेख दिसतो,” शिंदे पुढे सांगतात.

‘त्याकाळी वृत्तपत्र चालवणे हे धाडसाचेच काम’

कोल्हापूर येथील भोगावती कॉलेजमधल्या निवृत्त मराठी विभाग प्रमुख डॉ. छाया पोवार यांनीही तानुबाई बिर्जेंवर अभ्यास केला आहे. तानुबाईंचे कार्य समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशी संपर्क साधला.

डॉ. पोवार सांगतात, “हे साप्ताहिक चार पानी, चार कॉलम स्वरुपात प्रसिद्ध होत होतं. त्याच्या मुखपृष्ठावर औषधांच्या जाहिराती तर मागच्या पानावर सत्यशोधक ग्रंथांच्या जाहिराती, सत्यशोधक समाजाच्या देणगीदारांची यादी असा मजकूर असे. दुसऱ्या पानावर संपादकीय लेख, वेगवेगळी वैचारिक वृत्तं छापली जायची. तर तिसऱ्या पानावर वृत्त संकलन, वाचकांची पत्रं, वर्तमानसार असा मजकूर असायचा. याच पानावर अनेकदा उद्बोधक विचारही प्रसिद्ध होत असत.”

“अंकाची किंमत अर्धा आणा होती. सत्यशोधक चळवळीचा बराच अभ्यास झाला आहे. मात्र तितकासा साहित्याचा अभ्यास झालेला नाही. ते साहित्य दुर्मिळ आहे,” असं डॉ. पोवार सांगत होत्या.

“उगले यांचे पुस्तक सोडल्यास सत्यशोधक अधिवेशनाचे अहवालात तानुबाईंचा उल्लेख सापडतो. ‘दीनबंधु’नं किवा तानुबाई बिर्जेंनी आमच्या कामाची दखल घेतली किंवा आमची बातमी लिहिली यामुळे किती मदत झाली याबद्दल त्यांचे आभार मानल्याचा काही ठिकाणी उल्लेख आहे. ‘सत्यशोधक वर्तमानपत्रे’ या पुस्तकातही त्यांचा काहीसा उल्लेख आहे,” असं डॉ. पोवार सांगतात.

“त्या काळात, ‘दीनबंधु’ हे वृत्तपत्र केवळ एक माध्यम नव्हतं, तर सत्यशोधक विचारांचा दीपस्तंभ होता. त्याच प्रकाशात पुढे अनेक वृत्तपत्रांनी आपली वाट शोधली. सत्यशोधक संपादकांची एक समर्पित पिढी निर्माण झाली.

“आपण आजच्या काळाचा विचार केला तरी एखादी महिला अशी कोणतीही जबाबदारी उचलताना दहा वेळा विचार करते. त्या काळात तर महिलांवर अनेक बंधनं लादलेली होती. शिक्षणंही फारसं नव्हतं. अशा काळात बहुजन समाजातली एक स्त्री पतीच्या निधनानंतर वृत्तपत्र व्यवसायासारख्या क्षेत्रात धाडसाने उतरून ‘दीनबंधु’ वृत्तपत्र यशस्वीपणे चालू ठेवते, ही फार मोठी गोष्टच म्हणावी लागेल,” डॉ. पोवार म्हणाल्या.

तानुबाई बिर्जे

फोटो स्रोत, BBC/Puneet Kumar

‘बिर्जे दाम्पत्याचे कार्य अलौलिक’ – सदानंद मोरे

ज्येष्ठ संशोधक आणि लेखक डॉ. सदानंद मोरे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की “या दोन्ही दाम्पत्याचं काम खूप मोठं आहे. बडोद्यात ग्रंथपाल असल्याने बीर्जेंचा ‘बडोदा वत्सल’ हे वृत्तपत्र चालवणाऱ्या दामोदर सावळाराम यंदे यांच्याशीही संबंध आला असणार. त्यांनीही 1899 ला मुंबईत येऊन ‘इंदुप्रकाश’ वृत्तपत्राचं आणि त्याच्या छापखान्याचं पुनरुज्जीवन केलं.

“कृष्णाजी अर्जून केळुसकरही त्यात असायचे, लोखंडे असायचे. असा वैचारिक लोकांचा एक गटच मुंबईमध्ये त्याकाळी जमा झाला होता. बिर्जे दाम्पत्य त्याचा भाग होते.

“त्यांनी मराठा शब्दाचा व्यापक अर्थ घेऊन मराठा ऐकेच्छू मंडळ काढलं होतं. त्या माध्यमातून मोठं काम होत होतं,” असं मोरे सांगतात.

“संदर्भांची कमतरता हा त्या काळातल्या सगळ्याच लोकांचा मुद्दा आहे. काही चांगलं काम करायची मुभाही त्या काळात नव्हती. पण केलं असेल तरी त्याकडे दुर्लक्ष केलं जायचं. तेच तानुबाई यांच्याबाबतही झालेलं दिसून येतं.

“तानुबाईं त्या काळात वृत्तपत्र चालवत होत्या तेव्हा इतर कोणत्याही संपादकाला येतात त्या सगळ्या अडचणी तर आल्या असणारच,” मोरे पुढे सांगतात.

“तानुबाईंना वृत्तपत्र चालवण्यासाठी आलेल्या आर्थिक अडचणींचा उल्लेख आणि त्यांनी केलेलं मदतीचं आवाहन अनेक अधिवेशनांच्या अहवालात दिसून येतंच. पण त्याशिवाय, एखाद्या स्त्रीने मत मांडलं तर लोक गंभीरपणे घेत नाहीत ही त्याकाळातही सगळ्यात मोठी अडचण होती. समाजात तेवढी प्रगल्भताच नव्हती,” सदानंद मोरे सांगतात.

तानुबाईंचं वेगळेपण

महाराष्ट्रानं पाहिलेल्या आद्य स्त्री संपादकांमध्ये तानुबाईंचं नाव अजूनही ठळकपणे घेतलं जातं. पती निधनानंतर 1908 ते 1912 अशा फार थोड्या काळासाठी संपादकत्व पाहिलं असलं तरी तानुबाईंनी केलेल्या कामामुळे आणि त्यांनी लिहिलेल्या संपादकीय लेखांमुळेच हा मान त्यांच्या पदरी पडतो.

“तानुबाईंनी खडतर शब्दांत आपल्या लिखाणातून रोखठोकपणे प्रश्न विचारले. मग ते राजकीय असो वा सामाजिक असो त्यांनी कुणाचीही भीड न बाळगता अतिशय तीव्र शब्दांत सगळ्यांचाच चांगलाच समाचार घेतला होता,” असं सोनाली शिंदे यांनी एम. फिलच्या निबंधामध्ये लिहिले आहे.

संदर्भ :

1. ‘दीनबंधु आणि तानुबाई बिर्जे’, लेखक – जी. ए. उगले, स्वरूप प्रकाशन

2. सत्यशोधक महिलांचे कार्य – सोनाली शिंदे, एम. फीलसाठी पुणे विद्यापीठाला सादर केलेला प्रबंध.

3. लोकमान्य ते महात्मा – डॉ. सदानंद मोरे, राजहंस प्रकाशन

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC