Source :- BBC INDIA NEWS
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
-
22 मार्च 2024
अपडेटेड 1 तासापूर्वी
जर महात्मा गांधींनी घालून दिलेल्या आदर्शांवर आणि मार्गावर तंतोतंत चालणारा म्हणजे गांधीवादी अशी व्याख्या कुणी केली तर कदाचित गुलझारीलाल नंदा यांच्यापेक्षा दुसरी गांधीवादी व्यक्ती राजकारणात सापडणं कठीण आहे.
कार्यालयातला कागद सुद्धा कधी आपल्या वैयक्तिक कामासाठी वापरला जाणार नाही याची खबरदारी घेणारा आणि दोनदा देशाचा काळजीवाहू पंतप्रधान राहिलेला हा नेता निवृत्तीनंतर भाड्याच्या घरात राहत होता.
ही गोष्ट आज तुम्हाला खरी वाटणार नाही ना? हो पण हे अगदी खरं आहे जेव्हा गुलझारीलाल नंदा यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं सर्व सामान एका पिशवीत मावेल एवढं होतं, असं त्यांच्याच मुलीने सांगितलं होतं.
कोण होते गुलझारी लाल नंदा आणि एकदा नाही तर दोनवेळा त्यांच्याकडे काळजीवाहू पंतप्रधानपद कसं आलं? हे आपण पाहू.
गुलझारी लाल नंदा यांचा जन्म 4 जुलै 1898 साली आता सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या सियालकोट जिल्ह्यात झाला.
महात्मा गांधी यांची भेट
आपलं पदव्युत्तर शिक्षण संपल्यानंतर ते अलाहाबादहून मुंबईत आले. गुलझारीलाल नंदा हे मुंबईच्या नॅशनल कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. मुंबईतच त्यांची भेट गांधींजींशी झाली.
1920 मध्ये गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केलं होतं. कोणत्याही प्रकारे इंग्रजांना सहकार्य करायचं नाही. जर मी सांगितलेल्या गोष्टी तुम्ही केल्या तर एका वर्षात स्वराज्य मिळेल, असं गांधीजींनी म्हटलं होतं. त्यांच्या म्हणण्यावरुन अनेकांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या होत्या.
गुलझारीलाल नंदा यांचे चरित्र ‘गुलझारीलाल नंदा – अ लाइफ इन द सर्व्हिस ऑफ पीपल’मध्ये गांधीजी आणि नंदा यांच्या भेटीचे वर्णन आहे. नंदा यांनी आपल्या डायरीत या गोष्टींची नोंद करुन ठेवली होती. असं या पुस्तकाच्या लेखिका प्रोमिला कानन यांनी म्हटलं आहे.
गांधीजींच्या असहकार आंदोलनात उतरण्यापूर्वी मनात खूप घालमेल झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 1916 ला त्यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना एक बाळ देखील होतं. तेव्हा या सर्वांची जबाबदारी कोण उचलणार हे देखील मनात होतं.
“गांधीजींसोबत जाण्यासाठी मला माझी नोकरी सोडावी लागणार होती. घर चालवण्यासाठी महिन्याला 40 रुपये मला आवश्यक होते. त्यामुळे हे कसं करावं याविषयी माझ्या मनात खल सुरू होता. त्यांना भेटल्यानंतर मी अस्वस्थ होतो आणि मनात विचारांचे काहूर माजलं होतं. पण शेवटी मी आंदोलनात उतरण्याचा निर्णय घेतला,” अशी नोंद नंदा यांच्या चरित्रात आहे.
शंकरलाल बांकेर नावाच्या स्वातंत्र्यसैनिकांनी त्यांची आणि गांधीजींची भेट घडवून आणली.
नंदा सांगतात की मुंबईतल्या लॅमिंग्टन रोडवरील मणी भवन येथे महात्मा गांधी यांची भेट झाली. त्यांच्या हातात एक मोठं पात्र होतं त्यातून ते नाश्ता करत होते. आजूबाजूला काही नेते मंडळी आणि पत्रांचा ढीग पडलेला होता. त्यानंतर गांधींजी यांनी माझी विचारपूस केली आणि मी काय करू शकतो याचा अंदाज घेतला.
कामगार प्रश्नांविषयी जिव्हाळा
1920-21मध्ये त्यांनी गांधींजीनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात उडी घेतली. तेव्हापासून गांधींजींनी दिलेल्या मार्गावरच ते आयुष्यभर चालले.
गुलझारीलाल नंदा यांना मजूर आणि कामगार प्रश्नांबद्दल सहानुभूती सुरुवातीपासूनच होती. त्यांच्या अभ्यासाचा विषयच मजूर चळवळ हा होता.
पण त्यांचं ज्ञान केवळ पुस्तकीच राहिलं नाही तर ज्या गोष्टी त्यांनी पुस्तकातून शिकल्या त्या प्रत्यक्ष जीवनात कशा लागू होतील याविषयी ते सजग होते.
यातूनच त्यांनी टेक्सटाइल कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी ‘मजूर महाजन’ या युनियनची सुरुवात केली.
काँग्रेसच्या ट्रेड युनियनच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील श्रमिकांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीतून त्यांनी आपले विचार मांडले होते. यातूनच ते 1947 साली जिनिव्हा येथे झालेल्या श्रम परिषदेत ते भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहभागी झाले होते.
गुलझारीलाल नंदांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून का निवड झाली?
27 मे 1964 रोजी तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचं निधन झाल्यानंतर 9 जूनपर्यंत नंदा यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी वाहिली. त्यानंतर लालबहादुर शास्त्री देशाचे पंतप्रधान राहिले.
नेहरूंच्या मंत्रिमंडळात काळजीवाहू पंतप्रधान म्हणून त्यांची निवड ते ज्येष्ठ असल्यामुळे झाली असं म्हटलं जातं. पण तसं असतं तर मंत्रिमंडळात त्यांच्याहून दोन वर्षं मोठे असलेले मोरारजी देसाई हे काळजीवाहू पंतप्रधान व्हायला हवे होते.
पण काँग्रेस कमिटीने मोरारजींच्या ऐवजी नंदा यांना पसंती दिली. नेहरूंच्या मृत्यूनंतर पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत मोरारजी देसाई स्वतः होते त्यामुळे शर्यतीत नसलेला परंतु ज्येष्ठ असा चेहरा म्हणून नंदा यांच्याकडे पाहिलं जात असावं. त्यातून त्यांना हे पद मिळालं असल्याचं म्हटलं जातं.
या 13 दिवसांच्या कार्यकाळात देशात कायदा आणि सुव्यवस्था नीट ठेवणं हेच महत्त्वाचं काम होतं ते त्यांनी चोखपणे बजावलं आणि नंतर काँग्रेस कमिटीने ठरवल्याप्रमाणे त्यांनी पंतप्रधानपदाची धुरा शास्त्रींच्या हाती दिली. शास्त्रींनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आणि ते गृहमंत्री बनले.
11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूरशास्त्री यांचं ताश्कंदमध्ये निधन झालं आणि त्याच दिवशी पुन्हा त्यांच्याच खांद्यावर पंतप्रधानपदाची जबाबदारी पडली.
यावेळी इंदिरा गांधी, के. कामराज, मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, एम. सी. छागला हे दिग्गज नेते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. गुलझारीलाल नंदा मात्र हे कधीच त्या शर्यतीत नव्हते म्हणून पुन्हा त्यांच्या गळ्यात ही माळ पडली आणि पुन्हा 13 दिवसांनी त्यांनी हे पद इंदिरा गांधी यांच्याकडे सुपूर्द केलं.
त्यांना सत्तेचा मोह नव्हता यामुळेच त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचं लेखिका श्रुती जोशी यांनी द प्रिंटसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
गुलझारीलाल नंदा यांच्यानंतर पुन्हा देशाचं काळजीवाहू पंतप्रधानपद देण्यात आलं. यावेळी इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान बनल्या. पुन्हा गुलझारीलाल नंदा हे गृहमंत्री बनले.
साधू-संतांच्या मोर्चामुळे गेलं गृहमंत्रिपद
1966 मध्ये गुलझारीलाल नंदा हे देशाचे गृहमंत्री होते. त्यावेळी गोहत्या प्रतिबंध कायद्यावरुन हिंदू समुदायाच्या भावना तीव्र होत्या. गोहत्या प्रतिबंध कायदा यावा यासाठी सतत आंदोलनं होत असत.
1966 मध्ये या कायद्यासाठी साधू संतांनी दिल्लीतील संसदेवर मोर्चा काढला होता. या मोर्चावेळी साधू-संत आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालत सरकारी स्थळांची आणि मालमत्तेची नासधूस केली. त्यानंतर त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी गोळीबार करण्यात आला होता.
या गोळीबारात 8-9 आंदोलकांचे प्राण गेल्याचं नंतर आलेल्या अहवालात म्हटलं होतं. एकूणच हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळे इंदिरा गांधी गुलझारीलाल नंदा यांच्यावर नाराज झाल्या आणि त्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढलं.
गुलझारीलाल नंदा यांना स्वतःला वाटायचं की गोहत्या बंदी व्हावी यामुळे त्यांनी आंदोलकांबाबत सहानुभूतीची भूमिका बाळगली आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम झाल्याचं म्हटलं गेलं.
या घटनेचे देशावर काय पडसाद उमटले याविषयी ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी बीबीसी हिंदीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की दिल्ली पोलिसांंनी आंदोलकांना डीटीसी (सिटी बस) मधून भरून अरावलीच्या जंगलात ( गुडगावजवळ) सोडून दिलं. त्यांच्याविरोधात कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
या घटनेनंतर गुलझारीलाल नंदा यांना राजीनामा द्यावा लागला. असं म्हटलं जातं की इंदिरा गांधी यांनी नंदा यांना आधीच सांगितलं होतं की परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते तुम्ही अगोदरच तयार राहा.
पण नंदा हे गृहमंत्री होते त्याचवेळी ते भारत साधू समाज नावाच्या एका संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांना असा विश्वास होता की वाटाघाटीतून ते हा प्रश्न सोडवू शकतील. पण तसं घडलं नाही.
हे प्रकरण येथेच थांबलं नाही, किडवई पुढे सांगतात की 1971 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या घटनेचा वापर निवडणूकच्या प्रचारासाठी केले. या घटनेला हिंदू हत्याकांड म्हणून रंगवलं गेलं आणि काँग्रेसविरोधी प्रचार गावांगावांत केला गेला. परंतु या घटनेचा खूप फायदा काँग्रेस विरोधकांना उचलता आला नाही. त्या काळात देशात प्रसिद्धीची साधनं मर्यादित होती.
पण सोशल मीडिया आल्यानंतर या घटनेचा उल्लेख ‘हिंदू नरसंहार’ म्हणून केला गेला. सोशल मीडियावर तर म्हटलं गेलं की या घटनेत हजारो जणांचा बळी गेला. परंतु अनेक अहवालांतून हे स्पष्ट झाले आहे की या घटनेतील बळींचा आकडा हा 10 च्या वर नव्हता. बीबीसी हिंदीने यावर फॅक्ट चेक केलं आहे.
एकूणच नंदा यांच्या काळात घडलेल्या एका घटनेचे पडसाद अलीकडच्या काळातही उमटल्याचं यावरुन दिसतं.
मंत्रिमंडळातून काढण्यात आल्यानंतर देखील त्यांचा रोजच्या कामावर परिणाम झाला नाही. कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार होते आणि कामगारांच्या कल्याणासाठी ते सदैव तत्पर असायचे आणि त्यांच्या निवासस्थानी सर्वांनाच प्रवेश असायचा.
आणीबाणीवर नाराजी आणि राजीनामा
त्यांचा आणीबाणीला असलेला विरोध आणि त्यावरुन इंदिरा गांधींशी झालेली चर्चा याबाबतचा एक किस्सा ज्येष्ठ पत्रकार विजय सभरवाल यांनी द ट्रिब्यूनसाठी लिहिलेल्या लेखात आहे.
25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. गुलझारीलाल नंदा यांचा आणीबाणीला विरोध आहे हे इंदिरा गांधींना ठाऊक होतं. त्यामुळे त्यांची समजूत काढावी या उद्देशाने त्या त्यांच्या निवासस्थान येणार होत्या.
पंतप्रधान कार्यालयाकडून नंदा यांना फोन आला की तुमच्या वाढदिवसाचे अभिष्ठचिंतन करण्यासाठी पंतप्रधान तुमच्या निवासस्थान येणार आहेत. तेव्हा नंदा यांनी स्पष्टपणे सांगितले की याची काहीच गरज नाही. तुम्ही त्यांना सांगा की येऊ नका. पण तोपर्यंत इंदिरा गांधींनी आपलं मन बनवलं होतं. इंदिरा गांधी त्यांच्या घरी आल्या. त्यांच्यात 25 मिनिटं चर्चा झाली.
नंदा यांनी आपला आणीबाणीला विरोध आहे हे इंदिरा गांधींना सांगितलं. स्वातंत्र्यासाठीच आपण हे केलेलं असताना लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं अयोग्य असल्याचं ते इंदिरा गांधींना म्हणाले. इंदिरा गांधींनी त्यांनी हे का केलं याविषयी नंदा यांना सांगितलं होतं.
11 एप्रिल 1977 रोजी त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी सांगितले होते की सध्याची काँग्रेसमधील परिस्थिती ही असह्य झाली आहे.
मला राजीनामा देऊ नका म्हणून आप्त आणि सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होते, पण मी आता राजीनामा देत आहे. आपण आता इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही हे देखील त्यांनी तेव्हाच स्पष्ट केलं होतं.
नंदा यांच्यानंतर पुन्हा काळजीवाहू पंतप्रधानच नाही
गुलझारीलाल नंदा यांच्यानंतर देशात कुणीही काळजीवाहू पंतप्रधान झालं नाही. इंदिरा गांधी यांचे 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच सुरक्षा रक्षकांनी प्राण घेतले होते. त्यानंतर पुन्हा हा विषय झाला होता की पुढील पंतप्रधानांची नियुक्ती होईपर्यंत कोण पंतप्रधान होईल.
या घटनेत नंदा यांचा थेट संबंध नसला तरी नंदा यांचे उदाहरण सर्वांच्या डोळ्यासमोर होतं. आणि त्यांच्या नावाचा उल्लेख देखील झाला होता.
या प्रसंगाबाबत रशीद किडवई यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं होतं की जेव्हा इंदिरा गांधी यांची हत्या झाली होती तेव्हा राजीव गांधी आणि प्रणव मुखर्जी हे सोबत होते. विमान प्रवासात असताना राजीव यांनी मुखर्जींना विचारलं की जेव्हा नेहरूंचा मृत्यू झाला तेव्हा काय घडलं होतं.
प्रणव मुखर्जी म्हणाले गुलझारीलाल नंदा यांना ज्येष्ठतेच्या आधारावर काळजीवाहू पंतप्रधानपद देण्यात आलं होतं. ही गोष्ट जेव्हा राजीव गांधी यांनी आपल्या निकटवर्तीय सहकाऱ्यांना सांगितली तेव्हा राजीव यांच्यासमोर सहकाऱ्यांनी असं सांगितलं की ज्येष्ठतेचा मुद्दा करुन प्रणव मुखर्जींना पंतप्रधान व्हायचं आहे, त्यामुळे त्यानंतर कुणालाच काळजीवाहू पंतप्रधानपद देण्यात आलं नाही.
4 नोव्हेंबर रोजी राजीव गांधी यांनी पूर्णवेळ पंतप्रधान म्हणूनच शपथ घेतली. एकाच महिन्यानंतर निवडणुका झाल्या आणि राजीव गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला भुतो-न-भविष्यती असं यश मिळालं. ही देशातली एकमेव निवडणूक ठरली जिथे एखाद्या पक्षाने 400 च्या वर खासदार निवडून आणले होते.
या सर्व घटनांकडे पाहिलं तर एक लक्षात येतं की इंदिरा गांधींचा ज्या वेळी मृत्यू झाला त्यावेळी गुलझारीलाल नंदा हे मंत्रिमंडळात नव्हते. जे लोक मंत्रिमंडळात होते त्यांच्याकडे अशी कोणतीच व्यक्ती नव्हती जी काही काळापुरतं हे पद सांभाळेल आणि पुन्हा ते सुरळीतपणे काँग्रेसच्या नेत्यांकडे सोपवेल. गुलझारीलाल नंदा हे करू शकत होते, पण इतर कुणी असं करेलच याची शाश्वती कुणालाच नव्हती.
अत्यंत साधी राहणी
गुलझारीलाल नंदांची राहणी अत्यंत साधी होती असं ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी आपल्या ‘भारत के प्रधानमंत्री’ या पुस्तकात म्हटलं आहे.
ते लिहितात, “तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक आणि निःस्वार्थ भावाने सेवा करणाऱ्या नंदा यांनी आपलं संपूर्ण आयुष्य साधेपणाने घालवलं. परिस्थिती अशी बनली होती की राजकीय निवृत्तीनंतर त्यांच्याजवळ उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन नव्हते. अशात सन्मानपूर्वक जगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. दिल्लीतील कॅनॉट प्लेसवर नेहमी त्यांना सरकारी बसची वाट पाहत उभे असल्याचे ते दिसत. तिथून बस पकडून दिल्लीतील फ्रेंडस् कॉलनीतील आपल्या भाड्याच्या घरी ते जात.”
1977 पासून 1998 पर्यंतच्या काळात त्यांनी कुठल्याही राजकीय कार्यक्रमांत सहभाग घेतला नाही. त्यांची मुलगी पुष्पाबेन नाईक यांच्यासोबत ते अहमदाबाद येथे राहिले. त्यांचा मृत्यू 15 जानेवारी 1998 ला झाला. मृत्यूनंतर त्यांचे सर्व सामान ठेवण्यासाठी एक पिशवी पुरेशी होती असं त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं.
पुष्पाबेन यांनी इंडिया टुडेला आपल्या वडिलांबद्दलची एक आठवण सांगितली होती. त्या सांगतात की एकदा त्यांच्या मुलाने म्हणजे गुलझारीलाल नंदा यांचा नातू तेजसने त्यांना श्रीकृष्णाचे चित्र काढून भेट म्हणून दिलं.
सुरुवातीला त्यांनी त्याची स्तुती केली, पण त्यांनी नंतर विचारलं हा कागद कुठून मिळाला. त्यावर हा कागद त्यांच्या कार्यालयातून घेतला असं म्हटल्यावर त्यांना राग आला. त्यांनी तेजससाठी वेगळे कागद मागवले आणि त्याला दिले.
भ्रष्टाचाराबाबत त्यांना चीड होती आणि कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार त्यांना खपत नसे. संपूर्ण आयुष्य ते गांधीवादाच्या तत्त्वांवर चालले.
दोन वेळा पंतप्रधानपद मिळाल्याबद्दल त्यांना पुढे पंतप्रधान व्हावेसं का वाटलं नाही याबद्दल पुष्पाबेन यांनी इंडिया टुडेला सांगितलं होतं की
“काळजीवाहू पंतप्रधान बनणं हा आपल्या कर्तव्याचाच भाग आहे असं त्यांना वाटायचं. दुसऱ्यांदा जेव्हा त्यांनी पदभार घेतला त्यानंतर मंत्रिमंडळातील अनेकांनी त्यांना म्हटलं की तुम्हीच पंतप्रधान व्हा, पण सत्तेच्या खेळापासून ते नेहमीच दूर राहिले.”
गांधीजींच्या तत्त्वांपासून दूर जाणे हेच सर्व भ्रष्टाचारांचं मूळ आहे असं ते म्हणायचे, ही गोष्ट केवळ ते बोलतच नसत तर ते पाळतही असत. कदाचित त्याचमुळे त्यांच्या बॅंक खात्यात कधी काही हजारांच्या वर रक्कम गेली नव्हती.
SOURCE : BBC