Home LATEST NEWS ताजी बातमी ‘निळी’ नव्हे भारतीय हॉकीची जर्सी आता ‘भगवी’, माजी कर्णधारानं म्हटलं ‘लाजिरवाणं’, हे...

‘निळी’ नव्हे भारतीय हॉकीची जर्सी आता ‘भगवी’, माजी कर्णधारानं म्हटलं ‘लाजिरवाणं’, हे आहे वादाचं कारण

5
0

Source :- BBC INDIA NEWS

भारतीय महिला हॉकी टीम

फोटो स्रोत, @TheHockeyIndia

Published

वाचन वेळ: 6 मिनिटे

नेदरलँड्स आणि बेल्जियममध्ये होणाऱ्या आगामी एफआयएच (इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन ) विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या भारतीय हॉकी संघाच्या नवीन जर्सीच्या रंगावरून वाद सुरू झाला आहे.

हॉकी इंडियाने पुरुष आणि महिला दोन्ही संघांसाठी पारंपरिक निळ्या रंगाच्या ऐवजी नवीन भगव्या रंगाची जर्सी सादर केली आहे. त्यावर माजी कर्णधार वीरन रस्किन्हा आणि परगट सिंग यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

निळ्या रंगावरून अचानक भगव्या रंगात झालेल्या या बदलामुळं सोशल मीडिया आणि क्रीडा जगतातही यावरून चर्चा सुरू झाली आहे.

मात्र, हॉकी इंडियानं ही एक तांत्रिक गरज असल्याचं सांगत त्याचं समर्थन केलं आहे.

हॉकी इंडियानं सोशल मीडियावर नवीन जर्सी सादर करताना म्हटलं की, या नव्या डिझाइन आणि रंगांमागे ‘एक गोष्ट सांगणे’ आणि ‘भारताचा अभिमान’ दाखवणे हा उद्देश आहे.

हॉकी इंडियाने एक व्हीडिओ प्रसिद्ध करत ही नवी जर्सी सादर केली आहे.

जर्सीचा रंग आणि डिझाइन

हॉकी इंडियाच्या व्हीडिओमध्ये भगव्या रंगाला शौर्य, त्याग आणि विजयाचं प्रतीक म्हटलं आहे. हा रंग भारतीय ध्वज आणि उगवत्या सूर्यापासून प्रेरणा घेत वापरला असून, तो नव्या सुरुवातीचं प्रतीक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

जर्सीच्या मध्यभागी एक डिझाईन आहे. ते ‘मंडला’ प्रकारातील डिझाईन असून ते भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशानं प्रेरित असल्याचं सांगितलं जातं.

मानेवर आणि हाताच्या बाहीवर निळ्या रंगाची (नेव्ही ब्लू) एक पातळ पट्टी आहे, ती प्रगती, शांती आणि एकाग्रतेचं प्रतीक असलेल्या अशोक चक्रापासून प्रेरित आहे.

जर्सी

फोटो स्रोत, @TheHockeyIndia

जर्सीच्या छातीच्या वरील भागावर असलेल्या ग्राफिक्समध्ये सुदर्शन चक्राचं आधुनिक रूप दर्शवलं आहे. ते सामर्थ्य, एकता आणि गतीचं प्रतीक मानलं जातं.

जर्सीवर गळ्यापासून खांद्यापर्यंत तिरंग्याची (भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाती किनार) पट्टी आहे, हे राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असल्याचं सांगण्यात आलं.

जर्सीच्या मध्यभागी इंग्रजीमध्ये ‘India’ हा शब्द लिहिलेला आहे. तो देवनागरी लिपीपासून प्रेरणा घेऊन लिहिलेला असून भाषिक आणि सांस्कृतिक विविधता दर्शवणारा असल्याचं सांगण्यात आलं आहे.

माजी कर्णधारांनी उपस्थित केले प्रश्न?

पुरुष हॉकी संघाचे माजी कर्णधार परगट सिंग आणि विरेन रस्किन्हा यांनी हॉकी इंडियाच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रस्किन्हा यांनी हा निर्णय ‘लाजिरवाणा’ असल्याचं म्हटलं आहे.

माजी कर्णधार आणि ऑलिम्पियन विरेन रस्किन्हा यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. अनेक दशकांपासून चालत आलेली क्रीडा परंपरा सोडून देण्यामागील कारणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

“मी मान्य करतो की हॉकी इंडियाने भारतीय हॉकीसाठी खूप चांगलं काम केलं आहे, पण हे लज्जास्पद आहे. भारतीय संघाचा वारसा आणि ओळख नेहमीच निळा रंग राहिला आहे. मी अनेक वर्ष अभिमानानं निळी जर्सी परिधान केली आहे. चाहत्यांनाही भारतीय संघाला निळ्या जर्सीमध्ये पाहायचे आहे. या भगव्या रंगामागे काय तर्क आहे?” असं त्यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटलं.

पुरुष हॉकी संघाचे आणखी एक माजी कर्णधार, परगट सिंग यांनीही खेळामध्ये विचारसरणी लादल्याचा आरोप केला आहे.

परगट सिंग पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते आहेत. ते जालंधर कॅन्टचे काँग्रेस आमदार आहेत. ते पंजाबचे माजी शिक्षण आणि क्रीडा मंत्रीही होते.

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, “हॉकी इंडियाचा संघ दशकांपासून अभिमानानं निळी जर्सी परिधान करत आला आहे. हा रंग आमच्या क्रीडा क्षेत्रातील ओळखीचा एक भाग बनला आहे. तो बदलून भगवा करणं हे भारतीय जनता पक्षाच्या सरकारची विचारसरणी दर्शवणारं आहे. सर्वत्र आपली विचारसरणी लादण्याचा ते प्रयत्न करत आहे.”

“खेळामध्ये राजकारण करण्याऐवजी, खेळाडूंना उत्तम पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि अधिक पाठिंबा देण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. खेळाला राजकारणापासून दूर ठेवा. खेळाला कोणताही धर्म किंवा जात नसते, फक्त खिलाडूवृत्ती असते,” असंही परगट सिंग म्हणाले.

हॉकी इंडियाने काय म्हटले

हॉकी इंडियाने जर्सीच्या नवीन रंगामागं तांत्रिक कारणं दिली आहेत.

“यामागे मुख्य विचार तांत्रिक होता. खेळाडूंची निळी जर्सी अनेकदा निळ्या सिंथेटिक टर्फच्या रंगामध्ये मिसळून जायची. तो रंग आता आंतरराष्ट्रीय हॉकी मैदानांसाठी मानक रंग आहे. याचा परिणाम खेळाडूंना मैदानातील स्पष्टता आणि दृश्यमानतेवर होत होता,” असं हॉकी इंडियानं म्हटलं आहे.

हॉकी इंडियाच्या मते, खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर जर्सीला अंतिम स्वरूप देण्यात आलं. भगवा रंग शौर्य, त्याग आणि विजयाचे प्रतीक आहे, असंही हॉकी इंडियानं म्हटलं आहे.

“आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये आता मानक बनलेल्या निळ्या सिंथेटिक टर्फच्या रंगात मिसळली जात होती,” असं हॉकी इंडियानं एका निवेदनात म्हटलं आहे.

हॉकी इंडिया

फोटो स्रोत, @TheHockeyIndia

“यामुळे खेळाडूंना मैदानावर गोष्टी स्पष्टपणे पाहण्यात आणि ओळखण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळेच भारतीय संघासाठी भगवी जर्सी स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असं हॉकी इंडियानं सांगितलं.

हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, यापूर्वी 2014 च्या विश्वचषकात पिवळ्या जर्सीचे डिझाइन आणि 2018 मध्ये आकाशी रंगाचे डिझाइन वापरण्यात आले होते. त्यामुळे जर्सीच्या रंगातील बदल ही काही नवीन गोष्ट नाही.

दरम्यान, विरेन रस्किन्हा यांनी X वर एका वेगळ्या पोस्टमध्ये त्यांना या मुद्द्याचे राजकारण करायचे नाही, असं स्पष्ट केलं.

“यावर अनेक अनावश्यक राजकीय टीका होत असल्याचं मी पाहत आहे. मला त्यात पडायचं नाही. माझा साधा आणि नम्र मुद्दा केवळ अभिमान, ओळख आणि वारसा याबद्दल आहे,” असं त्यांनी लिहिलं.

‘नव्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न’-प्रियांका गांधी

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी हॉकी इंडियानं जर्सीचा रंग बदलणं म्हणजे इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

“त्यांनी गणवेश बदलला किंवा शिक्षण धोरणाच्या माध्यमातून इतिहास नव्याने लिहिण्याचा प्रयत्न केला तरी या देशातील तरुणांनी आपलं मत स्पष्ट केलं आहे. जंतर मंतरवर जमलेले तरुण काय म्हणत होते ते तुम्ही पाहिलं का? तो देशाचा आवाज आहे,” असे त्या संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

हॉकी टीमची जर्सी

फोटो स्रोत, @TheHockeyIndia

भारताचा स्वातंत्र्यलढा अहिंसा आणि सत्यावर आधारित होता. त्यात आरएसएसची कोणतीही भूमिका नव्हती. हे सत्य संपूर्ण देशाला माहीत आहे. ज्यांना ते माहीत नव्हते, त्यांनाही आता त्यांचे हेतू समजू लागले आहेत, असंही त्यांनी म्हटलं.

नवीन पटनायक काय म्हणाले?

ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हॉकी इंडियावर खेळामध्ये राजकारण आणल्याचा आरोप केला आहे.

इन्स्टाग्रामवर एका मोठ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, “भारतीय हॉकी संघाच्या जर्सीचा ऐतिहासिक रंग बदलून भगवा करण्यात आला आहे. हे समजल्यानंतर मला खूप दुःख आणि वेदना झाल्या. भारतीय हॉकी संघाचा निळा रंग हा केवळ एक रंग नव्हे, तर ती देशाच्या क्रीडा संस्कृतीशी निगडित एक भावना आहे.”

“अनेक दशकांपासून, या रंगाने आम्हाला आशा, विजय, पराजय आणि क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी एकत्र आणलं आहे. आम्ही रडलो आहोत, हसलो आहोत, उत्सव साजरा केला आहे आणि निळ्या जर्सीमधील आमच्या पुरुष व महिला संघांसोबत अभिमानाने उभे राहिलो आहोत. हीच निळी जर्सी घालून आमच्या संघांनी ऑलिम्पिक पदकं जिंकली आणि जागतिक स्तरावर राष्ट्रगीत गायलं. निळा रंग आपल्या राष्ट्रध्वजाच्या निळ्या चक्रावरून घेतला आहे. तो आपल्या राष्ट्रीय अभिमानाचं आणि ओळखीचं प्रतीक आहे. निळा रंग प्रत्येक भारतीयाचा आहे.”

“राष्ट्रीय हॉकी संघ प्रायोजकांसाठी झगडत असताना, ओडिशाने राष्ट्रीय संघांना आणि आपल्या लाडक्या खेळाला पाठिंबा देणारं पहिलं आणि एकमेव राज्य बनून इतिहास रचला होता. जगभरातील प्रत्येक ओडिया व्यक्तीला राष्ट्रीय हॉकीमधील राज्याच्या योगदानाचा अभिमान वाटत होता. तब्बल 41 वर्षांनंतर, आपल्या पुरुष संघानं ऑलिम्पिक पदक जिंकलं. केवळ ओडिशामध्ये सरकार बदललं म्हणून आपल्या राष्ट्रीय संघाचे रंग बदलले जाऊ नयेत. हे अगदी खालच्या पातळीवरील राजकारण आहे,” असंही ते म्हणाले.

नवीन पटनायक

फोटो स्रोत, ANI

“आमच्यासाठी आमच्या निळ्या जर्सीचे महत्त्व अर्जेंटिनाच्या पट्ट्यांच्या आणि ब्राझीलच्या पिवळ्या जर्सीइतकेच आहे. ती जर्सी आमच्या सामूहिक स्मृतीत कोरली गेली आहे. या रंगात कोणताही बदल करणे म्हणजे आमचा अनमोल क्रीडा वारसा पुसून टाकण्याचा एक कुटिल प्रयत्न आहे. राष्ट्रीय चिन्हं आपल्याला एकत्र आणण्यासाठी असतात, विभाजित करण्यासाठी नव्हे.”

पटनायक म्हणाले,”मला असं कळलं आहे की, ओडिशातील भाजप सरकारच्या दबावाखाली हे पाऊल उचलण्यात आलं आहे. सत्तेत असलेले हे नाकारतील, पण सत्य हे आहे की, गेल्या दोन वर्षांपासून या सरकारला इमारती, बस आणि अगदी पुलांचेही रंग बदलण्याचे जे वेड लागले आहे, ते ओडिशातील प्रत्येक व्यक्ती पाहत आहे. आज ओडिशामध्ये फक्त हीच एक गोष्ट घडताना दिसत आहे. आता याच सरकारने आपल्या राष्ट्रीय संघाचे रंगही बदलले आहेत.”

भाजप ओडिशाकडून राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीचे राजकारण करण्याच्या या प्रयत्नाचा मी तीव्र निषेध करतो.

यापूर्वीही झाला आहे जर्सीच्या रंगावरून वाद

नवीन जर्सीमध्ये निळ्या आणि तिरंग्याच्या छटा कायम ठेवण्यात आल्या असल्या तरी, त्याच्या राजकीय परिणामांवरील चर्चा तीव्र झाली आहे.

गेल्या दीड दशकात सत्ताधारी एनडीए सरकारच्या काळात या रंगाच्या वाढत्या वापराला ‘भगवीकरण’ म्हटलं गेलं आहे.

हॉकी इंडियाच्या व्हीडिओमध्येही राष्ट्रीय प्रतीकांचा ठळकपणे वापर करण्यात आला होता. त्यात भगव्या पार्श्वभूमीवर देवनागरी लिपी, सुदर्शन चक्राचं चित्र आणि सरकारची प्रमुख घोषणा “एक भारत, श्रेष्ठ भारत” यांचा समावेश होता.

भारतीय हॉकी टीम

फोटो स्रोत, GE

पीटीआयनं एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं म्हटले आहे की, “यात काहीही राजकीय नाही. जर ही पहिलीच भगव्या रंगातील जर्सी असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? भगवा रंग आपल्या तिरंग्याचा भाग आहे. बदलाचं स्वागतच केलं पाहिजे.”

इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या वन डे विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघानं भगव्या रंगाची ‘अवे’ जर्सी परिधान केली होती. त्यामुळंही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, संपूर्ण निळ्या किटची जागा नारंगी आणि तिरंगी पट्ट्या आणि डिझाइन्सच्या वापराने घेतली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन

SOURCE : BBC