Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Gaurav Gulmohar
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
नेपाळमधल्या पुराचा परिणाम भारताच्या काही भागांतही दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये गंडक (नारायणी) नदीत 4 मृतदेह, तर कुशीनगरमध्ये 3 मृतदेह सापडले आहेत.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मृतांमध्ये 5 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात हे मृतदेह नदीत वाहून गेले असावेत आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहासोबत भारताच्या दिशेने आले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सशस्त्र सीमा दलाच्या बचाव पथकाला नदीवर नजर ठेवताना हे मृतदेह वाहून जात असल्याचं दिसलं.
पथकाने मोटरबोटीच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढले. ते महाराजगंज आणि कुशीनगर जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आले आहेत. अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही.
निचलौलचे उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ गुप्ता यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “गुरुवारी (27 ऑगस्ट) दुपारी गंडक नदीत 4 मृतदेह सापडले. त्यामध्ये 3 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. हे मृतदेह अपस्ट्रीम म्हणजेच नेपाळच्या दिशेने वाहून आले असण्याची दाट शक्यता आहे.”
त्यांनी म्हटलं, “अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. आम्ही नेपाळ प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात आहोत. नदीकाठी एसडीआरएफ, आरआरटी आणि एसएसबीची पथकं सातत्याने नजर ठेवून आहेत.”
एसएसबी तसेच महाराजगंज आणि कुशीनगर जिल्हा प्रशासन मृतांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी नेपाळमधील संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
कुशीनगरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सिद्धार्थ वर्मा यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, “कुशीनगरमध्ये 3 मृतदेह सापडले आहेत. त्यामध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तिन्ही मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.”
नेपाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर आणि पुरानंतर गंडक नदीचा प्रवाह वेगवान झाला आहे. येत्या काळात आणखी मृतदेह भारताच्या दिशेने वाहून येऊ शकतात, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मृतांचा आकडा 469
नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 469 वर पोहोचला आहे.
चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने दिलेल्या माहितीनुसार, तिबेटमध्ये पुरामुळे अडकलेल्या 555 पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.
फोटो स्रोत, AP Photo/Niranjan Shrestha
नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी सांगितलं आहे की, बचाव पथकांनी आतापर्यंत जवळपास 600 जणांची सुखरूप सुटका केली आहे.
नेपाळ पर्यटन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पुरानंतर 31 देशांतील 540 परदेशी नागरिक बेपत्ता आहेत.
या भागात पर्यटक म्हणून येणाऱ्या परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. बेपत्ता भारतीय नागरिकांची संख्या 178 असल्याचं सांगण्यात आलं आहे.
बीबीसी नेपाळीच्या माहितीनुसार, बेपत्ता नागरिकांमध्ये भारतानंतर सर्वाधिक संख्या अमेरिका (65), युक्रेन (53), मलेशिया (51), ऑस्ट्रेलिया (35) आणि ब्रिटनमधील (33) नागरिकांची आहे.
पुन्हा पुराचा धोका
नेपाळ-तिबेट सीमेवरील पुराचा धोका अद्याप टळलेला नाही. इथल्या घटनास्थळी पाण्याची पातळी वाढून एक तलाव तयार झाला असून तो फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तिबेटमधील ग्यिरोंगजवळ चीनच्या शोध आणि मदतकार्य पथकांनी दिवसभर पूरस्थितीच्या स्थितीचं आणि संभाव्य धोक्याचं मूल्यांकन केलं. नेपाळमधील चोचेन नदी आणि पुरुचांगपो झांग्बो नदी यांच्या संगमाजवळ हा तलाव तयार झाला आहे.
फोटो स्रोत, REUTERS/Navesh Chitrakar
चीनच्या सरकारी माध्यमांनुसार, मदतकार्य पथकांनी सांगितलंय, मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या जलसाठ्याला स्थिर ठेवणं हे प्राधान्याचे काम आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 3 दिवस सतत पाऊस पडल्यास या तलावात सुमारे 30 लाख घनमीटर पाणी साचू शकतं.
चीनच्या सरकारी माध्यमांनी इशारा दिला आहे की, या तलावातील पाणी अचानक बाहेर पडल्यास खालच्या बाजूला असलेल्या भागांमध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. यामध्ये जिरोंग बंदर आणि आसपासच्या इतर भागांचा समावेश आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




