Home LATEST NEWS ताजी बातमी नोकरीसाठी साडीसह अनवाणी पायांनी धावली, पतीच्या निधनानंतर संघर्ष करणाऱ्या कविताची गोष्ट

नोकरीसाठी साडीसह अनवाणी पायांनी धावली, पतीच्या निधनानंतर संघर्ष करणाऱ्या कविताची गोष्ट

7
0

Source :- BBC INDIA NEWS

4 ऑक्टोबर रोजी कविता देवी साडी नेसून धावत असल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला.

साडी नेसून अनवाणी पायांनी धावणाऱ्या एका ग्रामीण महिलेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सुरुवातीला पाहिलं तर एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा वाटणारा हा व्हीडिओ आहे झारखंडमधील कविता महातो यांचा. रामगड जिल्ह्यातील सिदो-कान्हू मैदानावर त्या धावल्या.

होमगार्ड भरतीसाठी आयोजित केलेल्या 1600 मीटर शर्यतीच्या चाचणीच्या वेळी त्या धावल्या तेव्हाचा हा व्हीडिओ आहे.

व्हीडिओ पाहिल्यानंतर कविता महातो यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. गृहिणी असलेल्या कविता यांच्या पतीचं निधन झालेलं आहे.

आधुनिक स्पोर्ट्स शूज, ट्रॅक सूट किंवा व्यावसायिक प्रशिक्षण नसताना कविता यांनी ही 1600 मीटरची शर्यत साडीसह अनवाणी पायांनी पूर्ण केली.

पहिल्यांदाच शर्यतीत सहभाग

झारखंडच्या रामगड जिल्ह्यात होमगार्डच्या 284 पदांसाठी 24 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे.

नियमांनुसार यात 50 टक्के पदं महिलांसाठी राखीव आहेत.

त्याशिवाय ज्या महिलांच्या पतीचं निधन झालं असेल किंवा ज्या घटस्फोटीत असतील अशा महिलांसाठी अतिरिक्त 5 टक्के आरक्षण आहे. या भरती प्रक्रियेत मोठ्या संख्येनं महिला सहभागी होण्याची शक्यता आहे.

त्यामुळं मुख्य भरती प्रक्रियेपूर्वी उमेदवारांच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी तसंच त्यांना सरावाची संधी मिळावी म्हणून रामगडच्या स्थानिक मैदानावर सरावासाठी 1600 मीटरची शर्यत आयोजित करण्यात आली होती.

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशिक्षक अंकित अग्रवाल यांनी कविता यांना मोफत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे.

त्यात नियमानुसार महिला उमेदवारांना 1600 मीटर अंतर कापण्यासाठी १० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला होता. कविताही 4 ऑक्टोबर रोजी या चाचणीत सहभागी होण्यासाठी पोहोचल्या.

कविता त्यांच्या सोसो या गावापासून सोळा किलोमीटर दूर असलेल्या मैदानावर धावायला आल्या होत्या. त्यांच्या जीवनातली ही पहिलीच वेळ आणि पहिलीच अशी चाचणी होती.

त्या अनवाणी पायांनी धावू लागल्या. एखाद्या व्यावसायिक धावपटूप्रमाणं नव्हे तर सामान्य ग्रामीण गृहिणीप्रमाणं साडी नेसून त्या धावत होत्या. त्यांनी अवघ्या नऊ मिनिटांत 1600 मीटरचं अवघड आव्हान पूर्ण केलं.

चाचणीचं आयोजन करणारे प्रशिक्षक अंकित अग्रवाल यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, “सुविधांची कमतरता असली तरी ते स्वप्नांच्या आड कधीच येऊ शकत नाही, हे कविता यांनी सिद्ध केलं आहे.”

कविता यांनी बीबीसी हिंदीबरोबर बोलताना म्हटलं की, “दिलेल्या वेळेत 1600 मीटरचं अंतर पार करता येईल की नाही, अशी शंका त्यांच्या मनात हा विचार घोळत होता.”

“पण मी पुढे गेले तेव्हा काही जणी माझ्या मागे राहिल्याचं पाहून माझा उत्साह वाढला आणि मी अधिक तीव्र प्रयत्न केले आणि मला हे यश मिळालं.”

जाऊ, सासूने दिले प्रोत्साहन

कविताची पावलं मैदानावर धावताना जशी वेगात होती, तसाच त्यांच्या जीवनातला संघर्षही तीव्र होता. 2023 मध्ये कविता यांच्या पतीचं दीर्घ आजारानं निधन झालं.

“पतीच्या मृत्यूच्या पाच वर्षांपूर्वी त्यांना यकृताचा त्रास सुरू झाला, पण त्यांनी उपचारांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळं त्यांची प्रकृती खालावतच गेली. ते गुजरातमधील एका कारखान्यात काम करत होते,” असं कविता सांगतात.

कविता बारावीपर्यंत शिकलेल्या असून त्यांचं वय 31 वर्षे आहे. पतीच्या निधनानंतर त्यांचा दीर कुटुंबाची काळजी घेत होता, पण पतीच्या निधनाच्या दोन वर्षांनंतर 2025 मध्ये दीर्घ आजारानं त्यांच्या दीराचाही मृत्यू झाला.

फुलको देवी सांगतात की, त्या आपल्या सुनेला पहाटे गावात घेऊन गेल्या आणि दोन महिने तिच्याकडून धावण्याचा सराव करून घेतला.

कविता यांना 13 वर्षांची मुलगी आणि 11 वर्षांचा मुलगा अशी दोन अपत्यं आहेत. सोसो गावात त्या वृद्ध सासू-सासऱ्यांसोबत राहतात.

त्यांची जाऊ सरिता रामगडमध्ये माहेरी राहते आणि मजुरी करते.त्यांना होम गार्डमधील नोकरीच्या संधीबद्दल समजलं. त्यावेळी त्यांनी शर्यतीची तयारी सुरू केली आणि जाऊ, कविता यांनाही अर्ज करण्यास सांगितलं.

सासू, सासरे आणि जावेच्या प्रयत्नांनंतर कविता यांनी होम गार्डचा अर्ज ऑनलाइन भरला.

“गावकऱ्यांनी माझे रहिवासी आणि जात प्रमाणपत्र बनवून घेतले. त्यामुळं मला प्रोत्साहन मिळालं आणि फिटनेस चाचणीची तयारी करण्यासाठी मी पहाटे चार वाजता गावाबाहेर धावू लागले,” असं कविता सांगतात.

पतीच्या मृत्यूनंतरचा संघर्ष

कविताच्या सासू, फुलको देवी सांगतात की, “त्यांच्याकडे असलेली एकमेव मालमत्ता म्हणजे दोन खोल्यांचे घर. त्यांच्या दोन मुलांनी लग्नाआधी गुजरातमध्ये पैसे कमावून हे घर बांधलं होतं .”

फुलको देवी यांचे शेजारी असलेले सचिन कुमार सांगतात की, फुलको यांच्या मुलांनी कष्टाने कमावलेली सर्व बचत त्यांच्याच दीर्घकालीन आजाराच्या उपचारांवर खर्च झाली.

“या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूप दयनीय आहे. पूर्वी कुटुंबाची परिस्थिती चांगली होती. पण आता हे कुटुंब कर्जाच्या ओझ्याखाली दबलं आहे,” असं ते सांगतात.

कविता यांचे पती आणि दीराच्या मृत्यूनंतर, मुलांची आणि सासरच्या मंडळींची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.

विधवा आणि वृद्धांसाठीच्या पेन्शनवर अवलंबून असलेल्या या कुटुंबाची जबाबदारी आता कविता यांच्यावर आहे.

“घर चालवण्यासाठी, गाईचं दूध विकण्याशिवाय आम्ही आमच्या गावातील भात, मका आणि भुईमुगाच्या शेतात मजुरी करतो. उन्हाळ्यात विटभट्ट्यांमध्येही काम मिळतं,” असं कविता सांगतात.

“आमच्याकडे फारशी जमीन नाही. त्यावर आमचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. आमची सून, कविता, हीच आमच्या म्हातारपणात आमचा एकमेव आधार आहे,” असं कविता यांच्या सासू फुलको देवी म्हणाल्या.

फुल्को म्हणाल्या, “माझ्या दोन्ही सुना विधवा आहेत. त्या दोघीही होमगार्डमध्ये नोकरीला लागल्या तर माझ्या नातवंडांच्या भविष्याबरोबरच आमचं म्हातारपणही आरामात जाईल.”

तयारीसाठी गावात धावायला सुरुवात

मुख्य चाचणीपूर्वी सराव चाचण्या आयोजित करणारे प्रशिक्षक अंकित अग्रवाल यांनी कविताला मोफत प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. इतर महिला उमेदवारांनाही ते अशी मदत करत आहेत.

सराव शर्यतीदरम्यान त्यांनी कविता यांची प्रतिभा ओळखली.

पण कविता यांच्यासाठी प्रशिक्षणाला जाणंही सोपं नाही. दररोज पहाटे लवकर उठून उपाशीपोटी सुमारे 16 किलोमीटरचा प्रवास करून रामगडच्या मैदानावर पोहोचत असल्याचं त्या सांगतात.

कविता यांच्या धावण्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर, त्यांच्या ट्रेनरने त्यांना धावण्यासाठी ट्रॅक सूट आणि शूजदेखील उपलब्ध करून दिले.

त्या रात्री दहा वाजेपर्यंत इतर महिला उमेदवारांसोबत सराव करतात आणि मग त्यांच्या सोसो या गावी परत जातात. सरावाची चाचणी झाली त्या दिवशीही त्या उपाशीपोटी मैदानावर धावल्या होत्या.

“मी 1600 मीटरची शर्यत पूर्ण करू शकेन याची मला कल्पनाही नव्हती. पण देवाचा आशीर्वाद होता आणि व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर मला एक प्रशिक्षक मिळाले जे मला मोफत शिकवणार आहेत,” असं त्या सांगतात.

कविता यांच्या धावण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशिक्षकांनी त्यांना धावण्यासाठी ट्रॅक सूट आणि शूजदेखील दिले आहेत.

पण शर्यतीचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर निर्माण झालेल्या चर्चेमुळे कविता अस्वस्थही आहे. भविष्यात अपयशी ठरल्यास लोक काय म्हणतील याची त्यांना काळजी वाटते.

कविता म्हणतात की, “व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्हाला खूप विचित्र वाटत आहे. 25 ऑक्टोबरच्या शर्यतीत आम्ही यशस्वी झालो नाही, तर गावातील लोक माझी चेष्टा करतील, या विचाराने भीती वाटते.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC