Home LATEST NEWS ताजी बातमी नोकरी मिळवताना AI मुळे मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या...

नोकरी मिळवताना AI मुळे मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या 5 गोष्टी

5
0

Source :- BBC INDIA NEWS

AI मुळे नोकरीसाठी मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या 5 गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही तुमचा जवळचा मित्र आणि तेवढाच मोठा शत्रूही ठरू शकते. अगदी सीव्ही तयार करण्यापासून ते मुलाखतीच्या तयारीपर्यंत याची तुम्हाला मदत होऊ शकते. पण तुमची कौशल्ये, अनुभव किंवा इतर गोष्टी एखाद्या व्यक्तीने तपासण्याआधीच तुमचा अर्ज फेटाळला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

तज्ज्ञांच्या मते, AI मुळं नोकरी शोधणं आणि एकूणच या बाजारपेठेत मोठा बदल घडलाय. पण जसजसं AI अधिक विकसित होतंय तसतशी अल्गोरिदम तुमच्या नोकरीच्या अर्जाचं मूल्यांकन कसं करेल? आणि केलेलं मूल्यांकन उमेदवारासाठी फायद्याचं असावं म्हणून काय करावं? हा प्रश्न उपस्थित होतो.

“नोकरीच्या बाजारपेठेत एवढी स्पर्धा कधीच नव्हती,” असं गूगल आणि लिंक्डइनसारख्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये रिक्रूटर म्हणून काम केलेल्या तसंच सोशल मीडियाद्वारे रोजगार आणि AI वर सल्ला देणारे अॅड्रियाना कार्वाजल यांनी सांगितलं.

“नोकरीच्या प्रत्येक जाहिरातीमागं उमेदवारांची सरासरी संख्या 250 आहे. त्यात लिंक्डइनच्या ‘इझी अप्लाय’ द्वारे याची जाहिरात केली तर ही सरासरी जाहिरातीमागं 800 हून अधिक उमेदवारांपर्यंत वाढते,” असे ते सांगतात.

एवढ्या संख्येमुळं कंपनीला अर्ज स्वतंत्र तपासणं अशक्य होतं. शिवाय त्यामुळं उमेदवारांना आणखी नोकऱ्यांसाठी अर्ज करण्याचं प्रोत्साहन मिळतं. लिंक्डइन दर मिनिटाला सुमारे 11 हजार अर्जांवर प्रक्रिया करतं. गेल्या वर्षीपेक्षा हे 45% अधिक आहे.

त्यामुळं तुम्हाला नोकरी बदलायची असेल किंवा पहिल्यांदा नोकरी शोधत असाल तरी या महत्त्वाच्या बाबींबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं ठरतं.

1) ऑटो फिल्टरिंग आता अपवाद नव्हे अनिवार्य

संस्थेला नोकरीसाठी आलेल्या अर्जांचे अधिक वेगानं आणि अचूक मूल्यांकन करून भरती आणि निवड प्रक्रियेत मोठा बदल एआयमुळं घडून येत आहे.

त्यामुळं मनुष्यबळ विकास (एचआर) विभागाला जास्त वेगानं योग्य कौशल्य निवडता येतात. त्यामुळं भरती प्रक्रियेचा वेग वाढतो.

पण ऑटो फिल्टरिंग आल्यामुळं आता उमेदवारही अर्जामध्ये महत्त्वाचे फॉरमॅट आणि कीवर्ड्स असावेत यासाठी अर्ज करताना एआयचा वापर करत आहेत.

पहिल्या छाननीतून उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी निवड व्हावी हे त्यांचं ध्येय असतं.

अर्जातील प्रश्न एआय टूलमध्ये टाकून त्यातून आलेलं उत्तर कॉपी-पेस्ट करता येत असल्यानं आता कमी वेळात जास्त नोकऱ्यांसाठी अर्जही करता येतो.

AI मुळे नोकरीसाठी मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या 5 गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

यामुळं आपल्या निगराणीशिवाय व्हॅकन्सी शोधणं, अर्ज करणं अशा गोष्टी करता येतात.

पण याचा एक दुष्परिणामही असू शकतो, असा इशारा अनेक एम्प्लॉयर देतात. यामुळं अनेक उमेदवारांच्या अर्जाचं स्वरूप आणि भाषा यात साम्य असू शकतं.

“त्यामुळं छाननीत त्याचा परिणाम दिसतो आणि परिणामी अनेक उमेदवारांना अपयश हाती येतं आणि नैराश्यात वाढ होते,” असं कार्वाजल सांगतात.

“लाखो अर्जांपैकी एखादा जो वेगळा ठरतो त्याचं कारण म्हणजे त्यात भूतकाळातील यशाबरोबरच त्यासाठी तुम्ही काय वेगळं केलं हे सांगितलेलं असतं,” असंही ते पुढं म्हणाले.

2) पात्रतेपेक्षा कौशल्याधारित भरतीला अधिक महत्त्व?

पूर्वी पदवीधरांना सुरुवातीला जी कामं मिळायची ती कामं म्हणजे, एक्सेल स्प्रेडशीटमधील डेटा तपासणे, रिपोर्ट तयार करणे ही कामं आता एआय करतं. त्यामुळं पहिली नोकरी मिळवणं कठीण असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

“मग लोक म्हणतील आम्ही शिकलो कशासाठी? तर कारण म्हणजे पदवीनं दृष्टिकोन मिळतो, स्वतःचं मूल्य समजतं,” असं टॅलेंट 4 प्रोसेस या कन्सल्टिंग फर्ममधील हेडहंटर आणि टॅलेंट मॅनेजमेंटच्या उपाध्यक्ष क्लाऊडिया कार्डेनास सांगतात.

तज्ज्ञांच्या मते, तरुणांनी एआयद्वारे तयार केलेल्या सीव्ही किंवा पदवीद्वारे स्वतःची प्रतिमा तयार करण्याऐवजी स्वतःची मूल्यं, कौशल्य आणि अनुभव देणाऱ्या तात्पुरत्या नोकऱ्या किंवा कामांना ठळकपणे समोर मांडायला हवं.

AI मुळे नोकरीसाठी मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या 5 गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

एआयद्वारे जेव्हा छाननी किंवा मूल्यांकन होतं तेव्हा हा पैलू महत्त्वाचा होतो.

चष्मा घातलेली एक तरुणी लॅपटॉपसमोर काम करत असून, ती एका वहीत नोंदी घेत असल्याचे दिसते.प्रतिमा स्रोत,गेटी इमेजेस

“त्यामुळं नेहमीसारखा सीव्ही तयार करण्याआधी त्यात आधीच्या ठिकाणी आपण उत्तम कर्मचारी होतो हे कशावरून दाखवता येईल याचा विचार करा,” असं कार्वाजल सांगतात.

उदाहरण द्यायचं झाल्यास, मी अमूक काम केलं हे सांगण्याऐवजी, एखाद्या गोष्टीमुळं जुन्या कंपनीला नफा वाढवण्यात कशी मदत केली हे स्पष्टपणे मांडावं.

3) बॉटसोबतच्या मुलाखतीसाठी सज्ज राहा

अनेक कंपन्या एआय बॉट्सच्या मदतीनं प्राथमिक मुलाखती घेतात. त्यामुळं प्रश्नांसाठीच नव्हे तर मुलाखतीच्या पद्धतीसाठीही तयार राहावं. कारण मुलाखतीत एखादी समस्या सोडवावी लागू शकते किंवा प्रेझेंटेशन तयार करावं लागू शकतं.

शिकागो विद्यापीठातील (अमेरिका) ब्रायन जाबारियन आणि इरास्मस युनिव्हर्सिटी रॉटरडॅममधील (नेदरलँड्स) लुका हेन्केल या दोन संशोधकांनी नोकऱ्यांसाठी अर्ज करणाऱ्या 70 हजार उमेदवारांवर एक प्रयोग केला.

प्रत्येक उमेदवाराची मुलाखत मानवी मुलाखतकार किंवा एआय व्हॉइस एजंट याद्वारे घेण्यात आली. नंतर त्या सगळ्या मुलाखतींचं मूल्यांकन करून भरतीचे निर्णय घेतले.

यात एआय एजंटद्वारे मुलाखत घेतलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळण्याची शक्यता 12 टक्क्यांनी जास्त असल्याचं समोर आलं.

AI मुळे नोकरीसाठी मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या 5 गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

मुलाखतीसाठी एआयचे प्रश्न अधिक साचेबद्ध आणि सुसंगत असल्याचं विश्लेषणातून समोर आलं. तसंच प्रत्येक उमेदवारानुसार ते वेगळे असल्यानं उमेदवार भरतीसाठी अधिक चांगली माहिती मिळते, असं संशोधकांनी सांगितलं.

मुलाखतकार निवडताना 78% अर्जदारांनी बॉटला पसंती दिली.

तज्ज्ञांच्या मते, एआय फिल्टर्स असतील तर कंपनीतील दुसऱ्या कर्मचाऱ्यानं तुमची शिफारस करणंही फायद्याचं ठरू शकतं.

“कंपनीत काम करणाऱ्यांना लिंक्डइनवर शोधून त्यांना थेट संपर्क करा आणि संबंधित पदावर तुम्हाला रस का आहे? हे समजावून सांगा आणि नम्रपणे शिफारशीची विनंती करा,” असं कार्वाजल यांनी सुचवलं.

कठिण वेळखाऊ असल्यानं बरेच जण हे करत नाही. पण हा सर्वोत्तम उपाय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

4) ‘सॉफ्ट स्किल्स’वर कंपन्यांचं लक्ष

कोणतंही काम करण्यासाठी त्या क्षेत्राचं तांत्रिक ज्ञान म्हणजेच ‘हार्ड स्किल्स’ची गरज असते. पण सध्या ‘सॉफ्ट स्किल्स’ तितकेच किंबहुना महत्त्वाचे ठरू शकतात. कारण वर्तन, वैशिष्ट्यांनाही सध्या महत्त्वं दिलं जातं.

टीम तयार करताना स्वभावासारख्या गोष्टींना असलेलं महत्त्व आता कंपन्यांना समजत आहे. त्यामुळं त्याचाही एआय फिल्टरिंगमध्ये समावेश होत आहे. पण तरी त्याचं मूल्यांकन मानवी पद्धतीनंच होतं.

AI मुळे नोकरीसाठी मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या 5 गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) एका अहवालानुसार सध्या तांत्रिक कौशल्यांइतकंच सॉफ्ट स्किल्सनाही महत्त्वं दिलं जातं.

पोम्पेउ फाब्रा विद्यापीठातील संशोधक किम्बर्ली सेउंग गौलार्ट, जॉर्ज रॉड्रिगेझ-मेनेस आणि जोसेप मारिया कारोज आर्मायोनेस यांनी भरती प्रक्रिया समजून घेण्यासाठी एच आर क्षेत्रातील 14 जणांच्या मुलाखती घेतल्या.

“बऱ्याचदा, उमेदवारांची प्राथमिक निवड तांत्रिक कौशल्यांवर होते. त्यात प्रमाणपत्रं, आणि इतर गोष्टींची गरज असते” असं या अभ्यासात म्हटलं आहे. पण नंतर मुलाखतीतून समोर आलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या गुणांच्या आधारावर सर्वात योग्य उमेदवार निवडला जातो.

5) कंपनीची सखोल माहिती घ्या

सध्या कंपन्यांना अशा उमेदवारांचा शोध असतो ज्यांना फक्त कामाचा प्रकार, पगार किंवा वेळा याशिवाय कंपनीच्या संस्कृतीशी संबंधित काही विशिष्ट पैलूंमुळंही तिथं कामाची इच्छा असते. त्यात आता एआयमुळं निवड प्रक्रियेत याला स्वतंत्रपणे तपासताही येतं.

त्यामुळं एकाच क्षेत्रातल्या दोन कंपन्या एकाच रिक्त पदासाठी वेगळ्या पद्धतीनं फिल्टरिंग करू शकतात. अनेक कंपन्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या वेबसाइट्स किंवा ॲप्लिकेशन्सवर एखाद्या पदासाठी अर्ज करताना ही गोष्ट जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

“एखाद्या जॉब प्लॅटफॉर्मवर 5 कोटी जाहिराती असतात आणि प्रत्येक जाहिरातीसाठी 300 जण अर्ज करतात. त्यात बरेच कदाचित अयोग्य असतात. त्यामुळं सर्वांच्या वेळेचा प्रचंड अपव्यय होतो, ” असं बार्सिलोनामधील टॅलेंट ॲक्विझिशन सल्लागार आणि प्रशिक्षक टोनी गिमेनो सोलान्स यांनी सांगितलं.

AI मुळे नोकरीसाठी मदत होते की अडथळा? अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या 5 गोष्टी

फोटो स्रोत, Getty Images

गिमेनो यांच्या मते, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी कंपनीबाबत माहिती घेऊन आपण कंपनीसाठी कसे महत्त्वाचे आहोत हे समजून घ्यावं.

थोडक्यात सांगायचं झाल्यास, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या (ILO) तज्ज्ञांच्या मते, कर्मचारी निवडीमध्ये AI ची वाढती भूमिका ही नोकरी शोधणाऱ्यांसाठी, विशेषतः तरुणांसाठी, नवीन आव्हानं निर्माण करते. त्याचवेळी त्यांना तयारीसाठीही मदत मिळते.

“एआयच्या (AI) संदर्भात चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे,” असं आयएलओच्या (ILO) रोजगार, कौशल्य आणि शाश्वत उद्योग विभागाचे संचालक सुक्ती दासगुप्ता यांनी सांगितलं.

“आपण कौशल्यं, कायम शिकत राहणं आणि सामाजिक संरक्षणातील गुंतवणूक दुप्पट केली पाहिजे, म्हणजे तरुण पिढीला बदलांशी जुळवून घेता येईल. एआय (AI) मुळं होणाऱ्या तांत्रिक प्रगतीचा तरुणांना फायदाच व्हावा नुकसान होता कामा नये,” असं ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC