Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही इस्रायलची प्रसिद्ध एअर डिफेन्स सिस्टिम (हवाई संरक्षण यंत्रणा) ‘आयर्न डोम’ किंवा ‘डेव्हिड्स स्लिंग’बद्दल ऐकलं असेल. या यंत्रणेला ‘अॅडव्हान्स्ड मिसाइल शील्ड’ (प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण कवच) म्हटलं जातं.
इराणकडून क्षेपणास्त्र हल्ले असोत, हमासने रॉकेट डागले असतील किंवा हुथी बंडखोरांचे ड्रोन असतील, इस्रायली हवाई क्षेत्रात ते प्रवेश करताच या स्वयंचलित संरक्षण प्रणालींच्या मदतीनं हवेतच त्यांना नष्ट केलं जातं.
युद्ध परिस्थितीत कोणत्याही देशाच्या हवाई संरक्षण यंत्रणेला अत्यंत महत्त्व असतं. संरक्षण प्रणालीमध्ये क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेसह रडार आणि इतर उपकरणांचाही समावेश असतो, जे आक्रमण करणाऱ्या विमानांचा शोध घेतात आणि त्यावर लक्ष ठेवतात.
भारताने बुधवारी (7 मे) मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. भारताचं म्हणणं आहे की, त्यांचं लक्ष्य ‘कट्टरतावाद्यांचे अड्डे’ होते.

फोटो स्रोत, Getty Images
पहलगाममध्ये 26 पर्यटकांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आल्याचं भारताचं म्हणणं आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या मते, 6 मे रोजी रात्री 1:05 ते 1:30 पर्यंत चाललेल्या या ऑपरेशनमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील मशिदी आणि नागरिकांना लक्ष्य करण्यात आलं.
तर भारताने केवळ ‘दहशतवादी ठिकाणांना’ लक्ष्य केल्याचं म्हटलं आहे.
या हल्ल्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या शस्त्रांचा वापर करण्यात आला, हे भारतानं स्पष्ट केलेलं नाही. परंतु, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलं की, भारताने सहा ठिकाणी विविध शस्त्रांचा वापर करून एकूण 24 हल्ले केले.
भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय हवाई दलाची पाच लढाऊ विमाने आणि एक ड्रोन पाडल्याचा दावा देखील पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने केला.
पाकिस्तानच्या या दाव्यावर भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बीबीसी या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी करत नाही.
क्षेपणास्त्र पडण्याची ही पहिली घटना नाही
पाकिस्तानच्या भूमीवर भारताकडून क्षेपणास्त्र पडण्याची ही पहिलीच वेळ नाही.
मार्च 2022 मध्ये, भारताचे ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मियां चन्नू शहराजवळ पडले होते. परंतु, यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
हे क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या दिशेने डागले गेले होते, असं एक निवेदन त्यावेळी भारताकडून जारी करण्यात आले होते.
पाकिस्तानच्या हद्दीत घुसलेले ‘भारतीय क्षेपणास्त्र’ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र होते, असं पाकिस्तानी लष्कराचे इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (आयएसपीआर) महासंचालक बाबर इफ्तिखार यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती देताना सांगितलं होतं.
प्राथमिक तपासात हे क्षेपणास्त्र सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असून ते आवाजाच्या तिप्पट वेगाने प्रवास करू शकते, असा दावा पाकिस्तानने त्यावेळी केला होता.
हे क्षेपणास्त्र तीन मिनिटे 44 सेकंद पाकिस्तानच्या हद्दीत राहिल्याचा दावाही करण्यात आला होता. त्यानंतर पाकिस्तानी हद्दीत 124 किलोमीटर आत पोहोचल्यानंतर ते नष्ट झाले.
भारताच्या सिरसा शहरातून क्षेपणास्त्र डागल्यापासूनच पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेने क्षेपणास्त्रावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती, असा दावा पाकिस्तानच्या लष्करी सूत्रांनी केला होता
त्याच्या संपूर्ण उड्डाण कालावधीत त्यावर सातत्याने देखरेख ठेवण्यात आली होती.
बालाकोट नंतर दोन्ही देशांनी वाढवली संरक्षण खरेदी
2019 पासून दोन्ही देशांनी नवीन संरक्षण उपकरणे खरेदी केली आहेत. यासाठी भारताचं उदाहरण देता येईल. भारतीय हवाई दलाकडे आता फ्रेंच बनावटीची 36 राफेल लढाऊ विमाने आहेत.
भारताच्या ताज्या हल्ल्याचा बदला म्हणून दोन राफेल विमाने पाडल्याचा पाकिस्तानी लष्कराचा दावा आहे, मात्र भारताने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, लंडन येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजनुसार, याच काळात पाकिस्तानने चीनकडून किमान 20 आधुनिक जे-10 लढाऊ विमाने खरेदी केली आहेत, जी पीएल-15 क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
हवाई संरक्षणाबाबत सांगायचं म्हटलं तर, 2019 नंतर भारताने रशियन एस-400 अँटी एअरक्राफ्ट मिसाइल सिस्टिम (विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली) घेतली, तर पाकिस्तानने चीनकडून एचक्यू-9 एअर डिफेन्स सिस्टिम (हवाई संरक्षण प्रणाली) घेतली आहे.
रेडिओ पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानी हवाई दलाने नुकत्याच दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, त्यांच्या हवाई संरक्षण क्षमतेमध्ये अडव्हान्स्ड एरियल प्लॅटफॉर्म्स (प्रगत हवाई प्लॅटफॉर्म), उच्च ते मध्यम उंचीवरील हवाई संरक्षण प्रणाली, मानवरहित लढाऊ हवाई वाहनांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त यात स्पेस, सायबर आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता चलित (एआय) प्रणाली देखील आहे.
परंतु, भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थितीत झाले आहेत.
पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा भारताकडून येणारी क्षेपणास्त्रे रोखण्यास सक्षम आहे का? आणि भारताकडून येणारी क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात पाकिस्तानला का जमले नाही?
पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम मिसाइल इंटरसेप्ट करू शकते का?
पाकिस्तानच्या हवाई दलाचे माजी व्हाइस एअर मार्शल इक्रामुल्ला भाटी यांनी बीबीसी उर्दूला सांगितलं की, पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीमध्ये कमी पल्ल्याच्या, मध्यम पल्ल्याच्या आणि लांब पल्ल्याच्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता आहे.
त्यांनी म्हटलं की, पाकिस्तानने आपल्या डिफेन्स सिस्टिममध्ये अनेक क्षेपणास्त्र प्रणालींचा समावेश केला आहे, ज्यामध्ये चीन निर्मित एचक्यू-16 एफई संरक्षण प्रणाली आहे, जी पाकिस्तानला आधुनिक संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची क्षमता प्रदान करते.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे आणि युद्धनौकांविरोधात ती प्रभावी आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
परंतु, जेव्हा हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रश्न येतो, तेव्हा अशी कोणतीही संरक्षण प्रणाली अस्तित्वात नाही.
मात्र, भारताने हे क्षेपणास्त्र हवेतून सोडले की जमिनीवरून हे माहीत नाही.
माजी एअर कमोडोर आदिल सुलतान यांनी बीबीसीला सांगितलं की, जगात अद्याप अशी कोणतीही संरक्षण यंत्रणा विकसित झालेली नाही, जी पूर्णपणे सुरक्षिततेची हमी देऊ शकेल.
विशेषत: अशा परिस्थितीत जेव्हा पाकिस्तान आणि भारतासारखे देश ज्यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत आणि काही ठिकाणी हे अंतर फक्त काही मीटर इतकेच आहे.
तिथे हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांना 100 टक्के रोखणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांनी येणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखण्यासाठी कोणत्याही संरक्षण यंत्रणेची क्षमता मर्यादित असते.
त्यांनी सांगितलं की, जरी या आधुनिक संरक्षण प्रणाली अत्यंत प्रभावी असल्या तरी 2,500 किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या पूर्व सीमेवर अशी संरक्षण प्रणाली बसवणे शक्य नाही, ज्यामुळे 100 टक्के हमी देता येईल की कोणतेही क्षेपणास्त्र तिथे प्रवेश करू शकणार नाही.
आदिल सुलतान यांच्या मते, असं करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गरज भासेल आणि सीमा जवळ असल्यामुळे ते फारसे प्रभावी ठरणार नाही.
हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे रोखणे कठीण का आहे?
इक्रामुल्ला भाटी म्हणाले की, भारताने कदाचित ही क्षेपणास्त्रे हवेतून जमिनीवर सोडली असतील आणि जर आपल्याला हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांबद्दल सांगायचं म्हटलं तर ते आजकाल खूप आधुनिक झाले आहेत.
त्यांनी सांगितलं, “त्यांचा वेग खूप जास्त झाला आहे, जो मॅक 3 (3,675 किमी/तास) पासून मॅक 9 (11,025 किमी/तास) पर्यंत असतो आणि अमेरिका, रशिया किंवा चीन यांसारख्या कोणत्याही देशाकडे इतक्या वेगवान क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता नाही.”
इक्रामुल्ला भाटी म्हणाले की, हवेतून प्रक्षेपित केलेल्या क्षेपणास्त्रांना रोखण्यात आणखी एक अडचण ही आहे की, त्यांचा उड्डाण कालावधी खूप कमी असतो आणि प्रतिक्रिया देण्यासाठी तुमच्याकडे खूप मर्यादित वेळ असतो.
याउलट जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांना रोखता येतं. कारण त्यांचा उड्डाण कालावधी जास्त असतो.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानी हवाई दलाचे माजी एअर कमोडोर आदिल सुलतान म्हणाले की, जगातील कोणतीही संरक्षण यंत्रणा भौगोलिकदृष्ट्या जोडलेल्या प्रतिस्पर्धी देशांच्या हल्ल्यांना 100 टक्के रोखू शकत नाही. मात्र यामुळे नुकसान कमी होऊ शकतं, असंही ते म्हणाले.
आदिल सुलतान यांनी म्हटलं की, अशा संरक्षण व्यवस्थेमध्ये हल्ला कसा असतो हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे एकाच वेळी वेगवेगळ्या दिशांनी डागली गेली, तर त्यांना रडारवर ओळखणं आणि त्याला लगेच प्रतिसाद देणं थोडं कठीण आहे.
जर आपण जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र किंवा क्रूझ क्षेपणास्त्रांबद्दल बोलायचं म्हटलं तर ते कुठं तैनात केले आहेत याची माहिती असते आणि आपण त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतो.
लढाऊ विमानांसह हवेत युद्धाची परिस्थिती खूप वेगळी असते, असं आदिल सुलतान म्हणाले.
त्यांनी सांगितलं, “जमिनीतून हवेत किंवा जमिनीतून जमिनीवर मारा करणाऱ्या संरक्षण प्रणालीमध्ये तुम्हाला या क्षेपणास्त्रांची क्षमता, संभाव्य प्रक्षेपण स्थान आणि संभाव्य मार्ग याबद्दल माहिती असते.
पण हवाई युद्धामध्ये आपल्याला कधी आणि कुठून काय डागले जाऊ शकते याची कल्पना नसते आणि तुम्हाला स्वत:ला सर्व बाजूंनी सुरक्षित ठेवायचं असतं.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC