Home LATEST NEWS ताजी बातमी प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नेलं, पण पोटात बाळच नव्हतं; काय आहे नेमकं प्रकरण?

प्रसूतीसाठी महिलेला रुग्णालयात नेलं, पण पोटात बाळच नव्हतं; काय आहे नेमकं प्रकरण?

6
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रसूतीसाठी रुग्णालयात नेलं, पण 'पोटातलं बाळ'च गायब? बाळ नसतानाही सिझेरियन कसं झालं? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

प्रसूतीशास्त्रातील हे एक दुर्मिळ प्रकरण आहे. यामध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रियेदरम्यान शोधून काढलं की, महिलेच्या गर्भाशयात मूलच नव्हतं.

कराचीतील हमदर्द रुग्णालयात 17 ऑगस्ट 2026 रोजी एका महिलेचं सिझेरियन होणार होतं.

कुटुंबीयांच्या मते, तिची गर्भधारणा 9 महिने पूर्ण झाली होती. त्यांच्याकडे 38 आठवड्यांच्या गर्भावस्थेचा अल्ट्रासाऊंड अहवालही होता.

पण या महिलेच्या गर्भाशयात मूलच नव्ह, असं शस्त्रक्रियेनंतर कुटुंबीयांना सांगण्यात आलं. हे ऐकून ते संतप्त झाले आणि रुग्णालय मूल ‘शोधू’ शकलं नाही, असा आरोप त्यांनी केला

रुग्णालयात झालेल्या गोंधळानंतर पोलीसही तिथं पोहोचले. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार महिलेनं कथितपणे स्वतःच्या गर्भावस्थेबाबत खोटं सांगितलं होतं. महिलेच्या लग्नाला 3 वर्षं झाली होती आणि तिच्या कुटुंबातील इतर महिला माता बनल्या होत्या. त्यामुळे तिनंही स्वतः गरोदर असल्याचं सांगितलं होतं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.

या घटनेमुळे रुग्णालयानं स्वतः गर्भधारणेची खात्री न करता महिलेवर शस्त्रक्रिया का केली? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

हमदर्द रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. अंजुम आरा हसन यांनी एका निवेदनात म्हटलं की, ती महिला 27 ऑगस्ट रोजी रुग्णालयात आली होती आणि तिने अल्ट्रासाऊंडचा अहवाल सादर केला होता. त्याच्या आधारे ड्युटीवरील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी आणि इतर चाचण्या केल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला होता.

बीबीसीनं या प्रकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाकडे अधिक स्पष्टीकरण मागितलं असता, त्यांनी सिंध हेल्थकेअर कमिशनच्या निर्णय येईपर्यंत थांबण्यास सांगितलं.

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की गर्भधारणेची खात्री न करता अशी शस्त्रक्रिया केली जाऊ शकत नाही. सामान्यतः डॉक्टरांची पहिली पसंती सामान्य प्रसूतीलाच असते.

महिलेनं आपण गरोदर असल्याचं खोटं सांगितलं असेल तरीही ते डॉक्टरांच्या लक्षात का आलं नाही असा प्रश्न कराचीच्या पोलीस सर्जन डॉ. सामिया यांनी विचारला आहे.

महिलेवर समाजाचा दबाव होता – पोलीस

या घटनेची चौकशी जिल्हा सेंट्रल पोलिसांनी केली होती आणि तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक खालिद रफीक यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान वैद्यकीय कर्मचाऱ्यांना महिलेच्या गर्भाशयात मूलच नसल्याचं समजलं, तेव्हा महिला आणि तिचं कुटुंब ही वस्तुस्थिती स्वीकारण्यास तयार नव्हतं. त्यामुळे रुग्णालयात गोंधळ निर्माण झाला.

इन्स्पेक्टर खालिद रफीक यांनी बीबीसी उर्दूला सांगितलं की महिलेच्या पतीनं लेखी तक्रार दाखल केली होती आणि रुग्णालयाशी संपर्क साधल्यानंतर त्यांना कळलं की, “शस्त्रक्रियेदरम्यान महिलेच्या गर्भाशयात मूलच नव्हतं.”

प्रसूतीसाठी रुग्णालयात नेलं, पण 'पोटातलं बाळ'च गायब? बाळ नसतानाही सिझेरियन कसं झालं? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, ही बाब त्यांच्यासाठी धक्कादायक होती आणि त्यामुळे तपासासाठी आधुनिक वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यात आला.

“सरकारी रुग्णालयात महिलेची तातडीनं तपासणी आणि चाचण्या करण्यात आल्या. त्या अहवालानुसार महिला कधी गर्भवती झालीच नव्हती.”

“रुग्णालयाच्या अहवालानंतरही महिला आणि तिचं कुटुंब ही गोष्ट मान्य करण्यास तयार नव्हतं. त्यानंतर सर्व चाचण्या आगाखान रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला.”

पोलीस निरीक्षक खालिद रफीक पुढे सांगतात, “आम्ही हमदर्द रुग्णालयातील सर्व नोंदी ताब्यात घेतल्या होत्या आणि कर्मचाऱ्यांची सर्व निवेदनंही नोंदवली होती.”

“पोलिसांनी सर्व चाचण्यांचे अहवाल आणि इतर पुरावे तपासणीसाठी आगाखान रुग्णालयात पाठवले. त्यानंतर महिलेने कबूल केलं की ती कधी गरोदर झालीच नव्हती आणि तिनं हे सगळं खोटंच सांगितलं होतं.”

हे सगळं करण्यामागं ‘सामाजिक दबाव’ होता असं महिलेनं सांगितलं आहे, असा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, महिलेनं पुढे असंही सांगितलं, “लग्नाला 3 वर्षं होऊनही त्यांना मूलबाळ नव्हतं, तर तिच्या वयाच्या इतर महिला माता झाल्या होत्या. ही गोष्ट तिला मनातून त्रासदायक वाटत होती, म्हणून तिनं आपणही गरोदर असल्याचं कुटुंबाला सांगितलं.”

खालिद रफीक यांच्या मते, महिलेला गर्भवती होण्याची आशा होती, पण तसं झालं नाही आणि पुढे बाळाच्या जन्माचा अपेक्षित काळही आला.

मात्र, पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पत्नीने ‘पश्चात्ताप व्यक्त केल्यानंतर’ आता पती हा प्रकार विसरून पुढे जायला इच्छुक आहे.

खालिद रफीक म्हणतात की कुटुंबानं प्रश्न उपस्थित केला आहे, “महिलेनं खोटं सांगितलं असेल, तरी डॉक्टरांच्या नजरेतून सत्य कसं सुटलं? आणि त्याची खात्री न करता रुग्णालयानं शस्त्रक्रिया का केली?”

महिलेच्या पतीनं रुग्णालयाविरुद्ध तक्रार दाखल केली असून तिची चौकशी सुरू आहे.

खालिद रफीक यांच्या मते, “सिंध हेल्थकेअर कमिशन योग्य ती कारवाई करू शकतं. पोलीस आपला संपूर्ण तपास, संशोधन आणि मिळालेले पुरावे सिंध हेल्थकेअर कमिशनकडे पाठवतील.”

रुग्णालयाची भूमिका

हमदर्द रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. अंजुम आरा हसन यांनी व्हीडिओ निवेदन जारी केलं असून रुग्णालयाच्या प्रवक्त्यानंही त्याची पुष्टी केली आहे.

डॉ. अंजुम आरा यांच्या म्हणण्यानुसार, महिलेच्या वैद्यकीय नोंदींमध्ये काही बाबी संशयास्पद होत्या.

या महिलेनं नंतर दुसऱ्या रुग्णालयाचा अल्ट्रासाऊंड अहवाल सादर केला होता, त्यामध्ये ती गरोदर असल्याचं दाखवलं होतं. रुग्णालयाच्या मते, हा अहवालही कथितपणे बनावट होता, असं त्यांचं म्हणणं आहे.

डॉ. अंजुम आरा सांगतात, ती महिला 27 ऑगस्ट रोजी आपत्कालीन विभागात आली होती आणि अहवालाच्या आधारे ड्युटी डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी तसेच CTGसह आवश्यक चाचण्या केल्या होत्या. त्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला होता.

शस्त्रक्रियेदरम्यान ती गर्भवती नसल्याचं आणि तिच्या गर्भाशयात कोणतंही मूल नसल्याचं आढळून आलं, असं डॉ. आरा यांनी सांगितलं.

तरीही शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालयानं स्वतः तपासणी करून गर्भधारणेची खात्री का केली नाही? हा प्रश्न उरतोच.

शस्त्रक्रियेपूर्वी काय करणं गरजेचं होतं?

बीबीसीने वैद्यकीय तज्ज्ञांशी बोलून या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

इस्लामाबादमधील पाकिस्तान इस्लामिक मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. फझल रबी म्हणतात, “कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी सामान्यतः रुग्णाची वैद्यकीय तपासणी केली जाते आणि त्याचा वैद्यकीय इतिहास घेतला जातो. त्यानंतर शस्त्रक्रियेची गरज आणि निदानाची पुष्टी करण्यासाठी रुग्णाच्या स्थितीनुसार संबंधित चाचण्या आणि तपासण्या केल्या जातात, त्यामध्ये रक्त तपासणी, इमेजिंग किंवा इतर आवश्यक तपासण्यांचा समावेश असू शकतो.”

त्यांनी सांगितलं की शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्यासाठी रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीचंही मूल्यमापन केलं जातं. तसेच रक्तदाब, नाडीचे ठोके, ऑक्सिजनची पातळी आणि इतर महत्त्वाच्या शारीरिक मापदंडांची तपासणी केली जाते.

प्रसूतीसाठी रुग्णालयात नेलं, पण 'पोटातलं बाळ'च गायब? बाळ नसतानाही सिझेरियन कसं झालं? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. फझल रबी यांनी पुढे सांगितलं की, सर्व आवश्यक मूल्यमापनांनंतर शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची संमतीदेखील घेतली जाते.

“कोणत्याही प्रकारच्या गर्भावस्थेत सुरुवातीला सामान्य प्रसूतीला प्राधान्य दिलं जातं, मात्र काही गंभीर परिस्थितींमध्ये शस्त्रक्रियेचा आधार घेतला जातो.”

ते म्हणाले की, सामान्यतः रुग्णाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना सामान्य प्रसूती शक्य आहे की नाही याची कल्पना येते आणि त्यानंतर खात्रीसाठी अल्ट्रासाऊंड केला जातो.

“कोणतीही सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टर महिलेची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करतात. या तपासणीमुळे डॉक्टरांना आई आणि बाळाबाबत अनेक गोष्टींची माहिती मिळते.”

“डॉक्टर महिलेच्या पोटाची तपासणीही करतात. या तपासणीतून गर्भाशयाचा आकार, बाळाची संभाव्य स्थिती आणि गर्भावस्थेची एकूण स्थिती याचं मूल्यमापन केलं जातं. बाळाची उपस्थिती आणि त्याची स्थिती तपासण्यासाठी त्याच्या हृदयाचे ठोकेही तपासले जातात.”

त्यांनी सांगितलं की, वैद्यकीय तपासणी किंवा आधीच्या वैद्यकीय नोंदींच्या आधारे गर्भावस्थेबाबत काही शंका असल्यास डॉक्टर अधिक तपासण्या करू शकतात. बाळाच्या स्थितीबाबत शंका असल्यासही डॉक्टर गरजेनुसार अल्ट्रासाऊंड किंवा इतर आवश्यक वैद्यकीय तपासण्या करू शकतात. कोणत्याही गुंतागुंतीची शक्यता असल्यास आवश्यक चाचण्या केल्या जाऊ शकतात.

‘वैद्यकीय व्यवस्थेचं वास्तव उघड झालं’

कराचीच्या पोलीस सर्जन डॉ. सामिया यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं की, त्यांना महिलेने गरोदर असल्याबद्दल खोटं सांगितलं याची चिंता नाही. खरा प्रश्न हा आहे की, महिलेचं कथित खोटं सिझेरियन शस्त्रक्रिया होईपर्यंत उघड कसं झालं नाही.

त्या म्हणाल्या, “वैद्यकीय शास्त्रात रुग्णाला हानी पोहोचू न देणं हा एक मूलभूत सिद्धांत आहे, पण या प्रकरणात आपल्या वैद्यकीय व्यवस्थेचं वास्तव पुन्हा एकदा उघड झालं आहे.”

डॉ. सामिया यांच्या मते, सिझेरियन शस्त्रक्रिया ही अशी प्रक्रिया नाही की केवळ एक अहवाल पाहून तिचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्या म्हणतात की त्यात अनेक टप्पे समाविष्ट असतात, ज्यामध्ये विविध कागदपत्रं तयार करणं, रुग्णाची वैद्यकीय तपासणी करणं आणि विविध चाचण्यांच्या निकालांचं परीक्षण करणं यांचा समावेश असतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC