Source :- BBC INDIA NEWS

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, ANI

2 तासांपूर्वी

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित केला आहे, त्यानंतर पाकिस्तान अशी भीती व्यक्त करत आहे की भारत पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह वळवू शकतो.

आता असं वृत्त आणि व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात जम्मूमधील रामबन येथील चिनाब नदीवर बांधलेल्या बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद असलेले दिसत आहेत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, सिंधू पाणी करार स्थगित झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतानं या करारांतर्गत धरणावर काही काम सुरू केलं आहे.

वृत्तसंस्था पीटीआयनं सूत्रांच्या हवाल्यानं दावा केला आहे की, भारत उत्तर काश्मीरमधील झेलम नदीवर बांधलेल्या किशनगंगा धरणाचे दरवाजे अशाच प्रकारे बंद करण्याची योजना आखत आहे.

या प्रकरणाशी संबंधित एका जवळच्या सूत्रानं पीटीआयला सांगितलं की, बगलिहार आणि किशनगंगा ही जलविद्युत धरणं आहेत. त्यामुळे ती भारताला पाणी सोडण्याची वेळ ठरवण्याचा अधिकार देतात.

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच म्हटलं आहे की, जर भारतानं पाकिस्तानात येणाऱ्या पाण्याची दिशा रोखण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न केला तर ते युद्ध मानलं जाईल.

ते म्हणाले की, ‘युद्ध हे फक्त तोफगोळे किंवा बंदुकींचा मारा करण्यापुरतं मर्यादित नाही, त्याचे अनेक प्रकार आहेत, हे त्यापैकी एक आहे.’ यामुळे देशातील लोक उपासमारीनं किंवा तहानेनी मरू शकतात.

बगलिहार धरणाचं महत्त्व

1960 मध्ये जागतिक बँकेच्या मध्यस्थीनं भारत आणि पाकिस्तानमध्ये सिंधू पाणी करार झाला. या कराराअंतर्गत, सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या वापराबद्दल दोन्ही देशांमध्ये एक करार झाला.

बगलिहार धरण

फोटो स्रोत, ANI

बगलिहार धरण हे बऱ्याच काळापासून दोन्ही शेजारी देशांमधील वादाचा मुद्दा आहे.

पाकिस्ताननं यापूर्वी या प्रकरणात जागतिक बँकेच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती आणि काही काळ जागतिक बँकेनंही या प्रकरणात मध्यस्थी केली होती.

याशिवाय, पाकिस्ताननं किशनगंगा धरणाबाबतही आक्षेप घेतला आहे आणि त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ही दोन्ही धरणं जलविद्युत आहेत, यापासून वीज निर्मिती होते.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, ANI

बगलिहार धरणाच्या जलाशयात 475 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. तसेच त्याची वीज निर्मिती क्षमता 900 मेगावॅट आहे.

धरणातून वीज निर्मिती करण्याच्या या जलविद्युत प्रकल्पाला ‘बगलिहार हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट’असं नाव देण्यात आलं आहे.

हा प्रकल्प 1992 पासून विचाराधीन होता, अखेर 1999 मध्ये त्यावर काम सुरू झालं.

त्यानंतर त्यावर अनेक टप्प्यांत काम सुरू राहिलं आणि अखेर 2008 मध्ये ते काम पुर्ण तयार झालं.

दरवाजे का बंद केले गेले?

हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्रानं बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करण्याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केलं आहे.

अहवालात नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटलं आहे की, जलाशयातील गाळ काढण्यासाठी दरवाजे बंद करण्यात आले होते.

त्यामुळेच पाकिस्तानकडं जाणारा पाण्याचा प्रवाह 90 टक्क्यांनी कमी झाला आहे.

किशनगंगा धरणातही असंच काम करणार असल्याचं अधिकाऱ्यानं वृत्तपत्राला सांगितलं.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर वृत्तपत्राला सांगितलं की, “बगलिहार जलविद्युत प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. आम्ही जलाशयातील गाळ काढण्याचं काम केलं आहे आणि आता त्यात पाणी भरावं लागेल. ही प्रक्रिया शनिवारी सुरू झाली.”

द ट्रिब्यूनमधील एका वृत्तानुसार, जलाशयातील गाळ काढण्याची आणि भरण्याची ही प्रक्रिया पहिल्यांदाच केली जात नाही. उत्तर भारतातील धरणांवर ऑगस्ट महिन्यात ही प्रक्रिया केली जाते.

मे ते सप्टेंबर या काळात उत्तर भारतातील धरणांच्या जलाशयांमध्ये जास्तीत जास्त पाणी भरलं जातं, कारण याच काळात पावसाळा येतो.

आता बगलिहार जलाशयात पाणी भरण्याच्या प्रक्रियेला ऑगस्ट महिन्यापेक्षा खूप जास्त वेळ लागेल.

पाकिस्तानला कशाची भीती आहे?

चिनाब ही सिंधू पाणी करारातील पश्चिमेकडील नद्यांपैकी एक आहे.

या करारामुळे शेती, घरगुती आणि वीज निर्मितीसाठी पाण्याचा वापर करण्यास परवानगी मिळते.

मात्र, पाकिस्तान 1992 पासून बगलिहार धरणावर आक्षेप घेत आहे.

या धरणाबाबत करार करण्यासाठी जागतिक बँकेच्या मध्यस्थीखाली दोन्ही देशांमध्ये अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या.

पाकिस्तान असं म्हणत आहे की, जर भारतातून पाणी येत असेल तर भारत पाण्याच्या तुटवड्यादरम्यान ते पाणी थांबवू शकतं आणि जास्त पाणी असल्यास ते कधीही सोडू शकतं.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

भारताचा युक्तिवाद असा आहे की, पाकिस्तानची अशी भीती दूर करण्यासाठी भारत काहीही करू शकत नाहीत.

दोन्ही देशांमधे झालेल्या बऱ्याच वादविवाद आणि चर्चेनंतर, 1999 मध्ये धरण बांधण्यासाठी एक करार झाला आणि अखेर त्याचं बांधकाम सुरू झालं, परंतु त्यानंतरही पाकिस्तानचे त्यावर अनेक आक्षेप होते.

यावर अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या पण दोन्ही देशांमधील मतभेद कायम राहिले.

आता भारताची योजना काय आहे?

बगलिहार व्यतिरिक्त चिनाब नदीवर इतर अनेक जलविद्युत प्रकल्पांवर काम सुरू आहे. चिनाब आणि तिच्या उपनद्यांवर असे चार प्रकल्प सुरू आहेत, जे 2027-28 पर्यंत सुरू होतील.

हे प्रकल्प म्हणजे पाकल दुल ( 1000 मेगावॅट), किरू (624 मेगावॅट), क्वार (540 मेगावॅट) आणि रतले (850 मेगावॅट) जे ‘नॅशनल हाइड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन’ आणि ‘जम्मू-कश्मीर स्टेट पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ संयुक्तपणे विकसित करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये पाकल दुल प्रकल्प, 2019 मध्ये किरू आणि 2022 मध्ये क्वार जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, पाकल दुल येथे 66 टक्के, किरू येथे 55 टक्के, क्वार येथे 19 टक्के आणि रतले येथे 21 टक्के काम पूर्ण झालं आहे.

प्रतिकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्ताननं या प्रकल्पांना विरोध केला आहे. त्यांचा विरोध विशेषतः रॅटले आणि किशनगंगा प्रकल्पांबाबत आहे.

या धरणांची रचना सिंधू पाणी कराराचं उल्लंघन करत असल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

बगलिहार व्यतिरिक्त पाकल दुल, किरू, क्वार आणि रतले येथे 3,014 मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते.

या प्रकल्पांमधून दरवर्षी 10,541 दशलक्ष युनिट वीज निर्मिती होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

असा अंदाज आहे की, एकट्या जम्मू आणि काश्मीरमध्ये 18,000 मेगावॅट वीज निर्मिती करण्याची क्षमता आहे, त्यापैकी 11,823 मेगावॅट एकट्या चिनाब खोऱ्यात आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC