Source :- BBC INDIA NEWS

बसवराजू

फोटो स्रोत, UGC

1 तासापूर्वी

सीपीआय-माओवादी संघटनेचा सरचिटणीस, सर्वोच्च नेता आणि नक्षलवादी चळवळीचा कणा म्हणून ओळखला जाणारा नंबाला केशव राव उर्फ बसवराजू छत्तीगडमधील नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ठार झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही माहिती जाहीर केली.

माओवादी पक्षाच्या सरचिटणीस पदावरील नेता सुरक्षा दलांकडून मारला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

माओवादी पक्षाचा नेता असलेला नंबाला केशव राव उर्फ बसवराजू हा मूळचा श्रीकाकुलम जिल्ह्यातील होता. तेलगू राज्यांमधील नक्षल चळवळीचं मूळ असलेला हा जिल्हा आहे.

नंबाला केशव राव याचा जन्म 1955 मध्ये जिय्यान्नापेट या छोट्या गावात झाला होता. कोटाबोम्मली मंडल केंद्रापासून चार किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

बसवराजूचे वडील वासुदेवराव शिक्षक होते. त्याच्या आईचं नाव लक्ष्मीनारायणअम्मा असं होतं. वासुदेवराव यांना तीन मुलं आणि तीन मुली अशी सहा अपत्यं होती.बसवराजू त्यांचा दुसरा मुलगा होता.

केशव राव याचा मोठा भाऊ दिल्लीश्वर राव कबड्डीपटू आहे. दिल्लीश्वर राव यांनी पोर्ट ब्लेअर बंदराचे चेअरमन म्हणून काम केलं आहे. ते निवृत्त झाले असून सध्या विशाखापट्टणममध्ये वास्तव्यास आहेत.

श्रीकाकुलम चळवळीचा परिणाम

श्रीकाकुलम भूकंपाचा परिणाम बसवराजू यांच्या कुटुंबावर झाला.

त्याच्या महाविद्यालयीन काळात त्यानं विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व केलं. तेव्हापासून चळवळीकडे असणारा त्याचा कल स्पष्ट झाला होता.

बसवराजूनं वारंगळमधील रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज (आरईसी) मध्ये बी.टेकसाठी प्रवेश घेतला होता. त्याचा मोठा भाऊ दिल्लीश्वर राव याच्याप्रमाणेच तोदेखील कबड्डीबरोबरच उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू होता.

श्रीकाकुलम जिल्ह्यातील बसवराजू याचे घर

कट्टरपंथी चळवळीत आधीच सहभागी असलेल्या सुरपाणेनी जनार्दन यांनी जन्नू चिन्नालू यांच्या प्रभावाखाली त्या दिशेनं पावलं उचलली.

त्याचवेळी, सीपीआय (एमएल) नेते आणि पीपल्स वॉर पार्टीचे नेते कोंडापल्ली सीतारामय्या हे रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजच्या (आरईसी) विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. विद्यार्थ्यांना ते विद्यार्थी चळवळींमध्ये मार्गदर्शन करत होते.

सीपीआय (एमएल) चे आणखी नेते, के जी सत्यमूर्ती देखील विद्यार्थ्यांना भेटत असत. त्यांच्या प्रभावाखाली 1976 मध्ये बसवराजू पीपल्स वॉर पार्टीमध्ये सहभागी झाले.

भूमिगत झाल्यानंतर

1980 मध्ये पीपल्स वॉर पार्टीनं गनिमी काव्याचं क्षेत्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केशव राव विशाखापट्टणम-पूर्व गोदावरी जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या मन्यम भागात गेला. हा भाग पूर्व विभाग किंवा डिव्हिजन म्हणून ओळखला जात असे.

काही दिवसांनी बसवराजू आदिवासी भागामध्ये कृष्णा या नावानं नक्षल चळवळीचे उपक्रम राबवत असताना त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र त्यानंतर जामिनावर सुटका झाल्यानंतर तो भूमिगतच झाला, समोर आलाच नाही.

बसवराजूचे घर श्रीकाकुलममधील

तेव्हापासून जवळपास 45 वर्षं बसवराजू याला पुन्हा कधीही अटक झाली नाही.

1987 च्या उत्तरार्धात बसवराजू एकटाच विशाखापट्टणमला आला होता. त्याच्या जवळच्या मित्रांचं म्हणणं आहे की, पोलिसांना याबाबत विश्वसनीय माहिती मिळाल्यावर, ते मद्दिलापलेमजवळ दबा धरून बसले.

त्यांनी बसवराजूला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र खेळाडू असल्यामुळे आणि सहा उंचीचा असल्यामुळे तो या मजबूत दलाला झटकून पळून जाण्यात यशस्वी झाला.

सर्वोच्च नेता म्हणून पाच दशकांचा काळ

बसवराजूने सुरुवातीला गंगण्णा या नावानं पूर्व विभागाचा सचिव म्हणून काम केलं. पूर्व विभागाबरोबरच, तेव्हाच्या मध्य प्रदेशात असणाऱ्या बस्तर जिल्हा, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि उत्तर तेलंगणातील आदिलाबाद जिल्हा इथेही त्यानं काम केलं. त्यानंतर हे चार प्रदेश एकत्र करून दंडकारण्य समितीची स्थापना करण्यात आली.

बसवराजू याच्याबरोबर कोटेश्वर राव आणि कटकम सुदर्शन हे देखील या समितीचे सदस्य होते.

1990 मध्ये झालेल्या पक्षाच्या अधिवेशनात, कोंडापल्ली सीतारामय्या याच्याजागी गणपती याची केंद्रीय समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली, तर बसवराजू याची समितीचा सदस्य म्हणून निवड झाली.

त्यानंतर केशव राव दंडकारण्य समितीचा सचिव झाला. त्यानंतर लवकरच, कोंडापल्लीला पक्षातून काढून टाकण्यात आलं. नंतर गणपती आणि इतर काही जणांसह, केशव राव पक्षाचा प्रमुख नेता बनला.

केशव रावनं, 1995 पासून बसवराजू आणि बीआर या नावांखाली पक्षाच्या केंद्रीय समितीच्या लष्करी बाबींशी निगडीत विशेष विभागाचं नेतृत्व केलं.

2001 मध्ये झालेल्या पीपल्स वॉर पार्टीच्या 7 व्या अधिवेशनात बसवराजू याची पक्षाच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली.

बसवराजूचे घर श्रीकाकुलममधील

सप्टेंबर 2004 मध्ये, माओवादी कम्युनिस्ट सेंटर (एमसीसी)चं पीपल्स वॉरमध्ये विलीनीकरण होऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)ची स्थापना झाली होती. त्यानंतरदेखील केशव राव त्याच पदावर होता.

2016 मध्ये, वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे गणपती, माओवादी पक्षाच्या केंद्रीय समितीच्या सचिवपदावरून पायउतार झाल्यानंतर, बसवराजूनं त्या पदाचा भार स्वीकारला.

अनिता या माओवादी पक्षात काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी महिलेशी बसवराजूचं लग्न झालं होतं.

2010 मध्ये आजारपण आणि मानसिक समस्यांमुळे अनितानं आत्महत्या केली होती. पक्षातील बसवराजूच्या जवळच्या मित्रांचं म्हणणं आहे की, या घटनेमुळे बसवराजू मानसिकदृष्ट्या खूपच खचला होता आणि खूपच नैराश्यग्रस्त झाला होता.

नक्षलवादी चळवळीच्या लष्करातील महत्त्वाची भूमिका

बसवराजू याच्या जवळच्या सहकाऱ्याचं म्हणणं आहे की, 1987 मध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यातील दारागड्डा इथं पोलिस दलावर माओवादी कम्युनिस्ट पार्टीच्या गनिमी कावा दलानं दबा धरून केलेल्या पहिल्या हल्ल्याचं नेतृत्व बसवराजूने केलं होतं. या हल्ल्यात एपीएसपीचे सहा पोलीस कर्मचारी ठार झाले होते.

माओवादी कम्युनिस्ट पार्टीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलटीटीईबरोबर (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम) आधी काम केलेल्या काहींनी 1987 आणि 1989 मध्ये नक्षलवाद्यांना दंडकारण्यात गनिमी

बसवराजूनं देखील हे प्रशिक्षण घेतलं होतं. या अनुभवाच्या आधारे त्यानं आंध्र प्रदेश, तेलंगणा, दंडकारण्यम तसंच बिहार आणि झारखंडमध्ये शेकडो नक्षलवाद्यांना गनिमी काव्याचं लष्करी प्रशिक्षण दिलं होतं.

डिसेंबर 2000 मध्ये पीएलजीए (पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मी) या नावानं गनिमी काव्यानं लढणारं दल स्थापन करण्यात, तसंच लष्करी कारवाईसाठी आणि संघटनात्मक कामांसाठी स्वतंत्र रचना निर्माण करण्यात बसवराजूनं महत्त्वाची भूमिका बजावली होती.

असं म्हटलं जातं की तुकड्यांचा विस्तार करण्यात त्याची भूमिका महत्त्वाची होती. त्यातूनच एकेकाळी तुकडीत जिथं 10 ते 12 बारा जण असायचे, त्याचं रुपांतर पलटण, कंपन्या आणि बटालियन्समध्ये करण्यात आलं.

15 फेब्रुवारी 2008 ला ओडिशाच्या नयागड जिल्हा मुख्यालयातील शस्त्रागारावर पीएलजीएनं मारलेल्या छाप्याचा सूत्रधार आणि नेता बसवराजू होता. या हल्ल्यात एक हजारांहून अधिक आधुनिक शस्त्रं ताब्यात घेण्यात आली होती.

10 एप्रिल 2010 ला दांतेवाडा जिल्ह्यातील तडीमेट्टाजवळ हिडमाच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 76 जवान मारले गेले होते. या हल्ल्यामागचा सूत्रधार बसवराजू असल्याचं सांगितलं जातं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC