Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, SUPPLIED
माउंट एव्हरेस्टच्या शिखरापासून खूप थोड्या अंतरावर बर्फात एक मृतदेह गेल्या 30 वर्षांपासून पडून आहे. हिरव्या बुटांमुळे तो ‘ग्रीन बूट्स’ म्हणून ओळखला जातो.
हे टोपणनाव एका खडकाखाली दबून मृत्यू झालेल्या भारतीय गिर्यारोहकाला देण्यात आले होते. त्यांच्या पायात आजही हिरव्या रंगाचे बूट आहेत. तेव्हापासून हे बूट एव्हरेस्टच्या शिखराकडे जाणाऱ्या गिर्यारोहकांसाठी एक ‘भीतीदायक चिन्ह’ ठरले आहेत.
आता भारत त्या गिर्यारोहकाचा मृतदेह परत आणण्यासाठी एका बचाव पथकाचा शोध घेत आहे.
जेव्हा हा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचेल, तेव्हा कदाचित त्यांना या दुःखातून सावरण्यास थोडीफार मदत होऊ शकेल.
1996 मध्ये एव्हरेस्टच्या उत्तरेकडील तिबेट मार्गावरून चढाई करणाऱ्या भारताच्या पहिल्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी निघण्यापूर्वीच्या आदल्या रात्री दोरजे मोरुप यांनी लडाखमधील आपल्या घरी पत्नी कोंचक यांगस्किट यांच्यासोबत वेळ घालवला होता.
त्यांनी आपल्या पत्नीला वचन दिलं होतं की, ते एक हिरो बनून परत येतील आणि देशाचं नाव उज्ज्वल करतील.
हिमालयाच्या दुर्गम भागातील आपल्या घरातून यांगस्किट यांनी बीबीसीला सांगितलं, “त्यांनी मला मुलांची काळजी घेण्यास आणि ते जेव्हा परत येतील तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी विमानतळावर येण्यास सांगितलं होतं.”
फोटो स्रोत, FAMILY HANDOUT
त्या म्हणतात की, त्या वेळी त्यांना काहीतरी अघटित घडेल अशी जाणीव झाली होती. त्यांना सतत वाटत होतं की, आपण त्यांना पुन्हा पाहू शकू की नाही, याची खात्री नाही.
त्या वर्षी 10 मे रोजी मोरूप हे भारताच्या एव्हरेस्ट मोहिमेतील 6 गिर्यारोहकांपैकी एक होते. हे सर्वजण जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्टवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते.
एव्हरेस्ट हे नेपाळ आणि चीनच्या प्रशासनाखालील तिबेट भागाच्या सीमेवर आहे.
बहुतेक गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यासाठी नेपाळच्या दक्षिणेकडील मार्गाची निवड करतात. कारण उत्तरेकडील तिबेटचा मार्ग अधिक उंच, तीव्र उताराचा आणि धोकादायक आहे.

या मोहिमेतील 6 गिर्यारोहकांपैकी 3 जण हिमवादळामुळे परत फिरले. पण, दोरजे मोरुप आणि भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे 2 सदस्य त्सेवांग समनला आणि त्सेवांग पालजोर शिखराच्या दिशेने पुढे गेले.
परत येताना ते हिमवादळात अडकले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
भारताच्या या अयशस्वी मोहिमेतील 2 गिर्यारोहकांचे मृतदेह कधीच सापडले नाहीत. परंतु, तिसऱ्या गिर्यारोहकाचा मृतदेह गेल्या 30 वर्षांपासून बर्फात गोठलेल्या अवस्थेत पालथा पडलेला आहे. हिरव्या बुटांमुळे त्यांना ‘ग्रीन बूट्स’ म्हणूनही ओळखले जाते.
एव्हरेस्ट सर करण्याच्या प्रयत्नात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. यातील अनेक मृतदेह अजूनही पर्वतावर आहेत.

काही वर्षांपूर्वी आयटीबीपीने हा मृतदेह परत आणण्याच्या शक्यतेवर विचार सुरू केला.
अनेक वर्षांपासून ‘ग्रीन बूट्स’ हा त्सेवांग पालजोर यांचा मृतदेह असल्याचे मानले जात होते. परंतु, 2024 मध्ये अधिकाऱ्यांनी याबाबतचं आपलं मत बदललं.
1996 च्या मोहिमेत बचावलेल्या सदस्यांच्या साक्षीवरून आणि गिर्यारोहकांशी झालेल्या शेवटच्या रेडिओ संपर्काच्या ठिकाणावरून या प्रकरणाचा पुन्हा विचार करण्यात आला. आता अधिकाऱ्यांना वाटतं की, हे अवशेष मोरुप यांचेच आहेत.
एका आयटीबीपी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना सांगितलं, “त्यांच्या कपड्यांवरून आणि सामानावरून त्यांची ओळख पटवण्यास मोठी मदत झाली.”
अधिकाऱ्यांच्या मते, याआधी मृतदेह परत आणण्याची मोहीम सुरू करण्यामध्ये लॉजिस्टिक्स हा एक मोठा अडथळा ठरला होता.
ते म्हणाले, “आम्ही त्यांना कधीच विसरलेलो नाही. हा फक्त वेळेचा प्रश्न होता. एकदा मृतदेह ताब्यात आला आणि सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांना याबाबत कळवलं जाईल.”
‘त्यांचा मृत्यू झाला आहे, हे मानायला माझं मन तयार नव्हतं’
मोरुप हे लडाखमधील स्कूरबुचान गावचे रहिवासी होते. हे गाव एव्हरेस्टपासून 1 हजार किलोमीटरहून अधिक अंतरावर पश्चिमेला आहे. ते आयटीबीपीमध्ये लान्स नायक या पदावर कार्यरत होते.
आयटीबीपी हे भारत-चीन सीमेच्या मोठ्या भागाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस दल आहे.
मोरुप यांचा जन्म 1948 मध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला होता. गरिबीवर मात करण्यासाठी ते 1969 मध्ये आयटीबीपीमध्ये दाखल झाले. 1971 मध्ये त्यांनी यांगस्किट यांच्याशी विवाह केला.

आता साधारण 75 वर्षांच्या असलेल्या यांगस्किट यांना मधुमेह आहे. त्यांना ऐकायलाही कमी येतं. त्यांना त्यांच्या लग्नाचा दिवसही स्पष्टपणे आठवत नाही.
पण त्या दुर्घटनेनंतरचे दिवस आजही त्यांच्या आठवणीत आहेत.
त्या आठवणी सांगताना त्या म्हणतात, “सुरुवातीला कुटुंबातील एकानेही मला काहीच सांगितलं नाही.”
नंतर आयटीबीपीच्या एका पथकाने त्यांच्या कुटुंबाला सांगितलं की, कदाचित मोरुप यांचा मृत्यू झाला आहे.
मोरुप यांचे भाऊ आणि भारतीय लष्करातून निवृत्त झालेले सैनिक ताशी सोनम सांगतात, “मी अधिकाऱ्यांना विचारलं की त्यांच्या मृतदेहाचे काय झालं, तेव्हा त्यांनी तो परत आणणे शक्य नव्हतं, असं सांगितलं.”
नंतर मोरुप यांच्या कुटुंबीयांनी मृतदेहाशिवायच अंत्यसंस्काराचे विधी करण्याचा निर्णय घेतला.

यांगस्किट कधीच शाळेत गेल्या नव्हत्या आणि त्यांना त्यांच्या पतीच्या मोहिमेतील धोके किंवा जोखिमीविषयीही फारशी माहिती नव्हती.
त्या भावूक होत सांगतात, “मला फक्त इतकंच माहीत होतं की, पर्वतावर वादळ आलं होतं. आम्ही घरी त्यांच्या अंत्यविधीची केला होता, पण त्यांचा मृत्यू झाला आहे, हे मानायला माझं मन तयार नव्हतं.”
त्या म्हणतात, “मी त्यांचा मृतदेह पाहिला नव्हता, त्यामुळे यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी खूप कठीण होतं.”
मृतदेह परत आणण्याचं आव्हान किती मोठं?
माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 8,849 मीटर आहे. मोरुप यांचा मृतदेह सुमारे 8,500 मीटर उंचीवर आहे. सप्टेंबरपर्यंत हा मृतदेह परत आणण्याचे आयटीबीपीचं नियोजन आहे.
शेर्पा सूत्रांनी बीबीसी न्यूज नेपाळीला सांगितलं की, शरद ऋतूतील म्हणजेच सप्टेंबरच्या गिर्यारोहण हंगामात मृतदेह आणण्यासाठी आधी दोरखंड लावावे लागतील आणि इतर आवश्यक व्यवस्था करावी लागेल. त्यामुळे हे काम आणखी कठीण होणार आहे.

बहुतेक गिर्यारोहक मार्च ते मेदरम्यान असलेल्या वसंत ऋतूतील गिर्यारोहण हंगामात एव्हरेस्टवर चढाई करणं पसंत करतात.
‘डेथ झोन’मधून मृतदेह परत आणणं हे खूप धोकादायक आणि खर्चिक काम आहे. या भागातील तापमान उणे 40 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाऊ शकतं. तसेच येथे समुद्रसपाटीच्या तुलनेत ऑक्सिजनचे प्रमाण केवळ एक तृतीयांश इतकं राहतं. त्यामुळे बहुतेक कुटुंबांना हा खर्च परवडत नाही.
तज्ज्ञांच्या मते, मृतदेह खाली आणण्यासाठी 40 हजार ते 80 हजार डॉलरपर्यंत खर्च येऊ शकतो. हे काम खूपच कठीण असतं, कारण मृतदेह प्रत्यक्ष उचलून खाली आणावा लागतो. यासाठी 6 ते 10 किंवा त्याहून अधिक शेर्पांच्या पथकाची आवश्यकता भासू शकते.
नेपाळचे आघाडीचे गिर्यारोहक आणि मोहिमेचे मार्गदर्शक त्शिरिंग जांगबू शेर्पा यांचं म्हणणं आहे की, पर्वताच्या उतारावर मागील 30 वर्षांपासून बर्फात गोठलेला मृतदेह परत आणणं हे मोठं आव्हान असेल.
त्यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, “हवामान आणि बर्फाची स्थिती खूप महत्त्वाची असेल. उत्तरेकडील मार्गावर बर्फाच्या भेगा कमी आहेत, पण ती बाजू जास्त धोकादायक आहे. नेपाळच्या बाजूने काही अडचण आली, तर हेलिकॉप्टरने लवकर बाहेर काढता येते. परंतु, चीनच्या बाजूला अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही.”
फॉरेन्सिक तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मृतदेह परत आणण्याचं नियोजन करताना त्याची सध्याची शारीरिक अवस्था प्रामुख्याने लक्षात घ्यावी लागेल.”
मृतदेह परत मिळाल्यानंतर त्याचा आपल्यासाठी काय अर्थ असेल याबद्दल मोरुपचे कुटुंबीय सावध आहेत. मृतदेहाची ओळख निश्चित करण्यासाठी अद्याप डीएनए चाचणी करण्यात आलेली नाही.
मोरुप यांचा मुलगा दोरजई यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, “काही वर्षांपूर्वी आयटीबीपीने आमच्या रक्ताचे नमुने घेतले होते. परंतु, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांशिवाय आम्हाला याबाबत कुणीही काहीही सांगितलेलं नाही.”
फोटो स्रोत, FAMILY HANDOUT
आज त्यांच्या घरात मोरुप यांच्या आठवणी म्हणून केवळ त्यांची पदकं, ट्रॉफी, गिर्यारोहण मोहिमांचे काही जुने फोटो आणि काश्मीर खोऱ्यातून आणलेला एक ग्लास जपून ठेवला आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीन सरकारने दिलेलं एक प्रमाणपत्र. त्यात लिहिलं आहे की, 10 मे 1996 रोजी सायंकाळी 5.30 (17.30) वाजता मोरुप एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले होते.
मोरुप हे तिबेटच्या बाजूने एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले होते. त्यामुळे चीनच्या सरकारने त्यांच्या या कामगिरीची दखल घेत त्यांना हे प्रमाणपत्र दिले होते.
‘इतकी वर्षे तुम्ही कुठे होता?’
दरवर्षी 10 मे रोजी मोरुप यांचं कुटुंब त्यांच्या आठवणीत विशेष बौद्ध प्रार्थनेचं आयोजन करतं.
जर मृतदेह परत आणण्याची मोहीम यशस्वी झाली, तर त्यांच्या वडिलांवर लेहमधील शहीद पार्कजवळ अंत्यसंस्कार केले जातील, असं त्यांचा मुलगा पंचोक दोरजई यांनी बीबीसीला सांगितलं.
दोरजई म्हणाले, “माझ्या वडिलांनी देशासाठी आपला जीव दिला. त्यांना हुतात्मा म्हणून स्मरलं गेलं पाहिजे.”
“त्यांच्यासोबत जीव गमावलेल्या इतर गिर्यारोहकांनाही हाच सन्मान मिळायला हवा,” अशी मागणीही त्यांनी केली.
त्यांनी सांगितलं की, कुटुंबीय मोरुप यांच्या एव्हरेस्ट शिखरावर पोहोचल्याच्या प्रमाणपत्रासोबत त्यांच्या आठवणींची एक खास निशाणी घरात अभिमानाने जपून ठेवेल.

ते म्हणाले, “आम्ही ग्रीन बूट्सची आठवणही आमच्यासोबत जपून ठेवू इच्छितो.”
यांगस्किट, सोनम आणि कुटुंबातील इतर सदस्यांना आशा आहे की, मृतदेह परत आणण्याची मोहीम यशस्वी होईल आणि अखेरीस मोरुप यांचा मृतदेह घरी आणता येईल.
त्यांना ही देखील चिंता आहे की, पर्वतावर 3 दशके उलटून गेल्यानंतर मृतदेहाची ओळख पटू शकेल का?
यांगस्किट म्हणतात, ‘जेव्हा ते घरी येतील, तेव्हा मी त्यांना विचारेन, इतकी वर्षे तुम्ही कुठे होता?'”
(बीबीसी न्यूज नेपाळीचे प्रतिनिधी प्रदीप बश्याल यांचं अतिरिक्त वार्तांकन)
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




