Home LATEST NEWS ताजी बातमी भारतीय ध्वज असलेलं जहाज क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानं बुडालं; येमेनच्या किनाऱ्याजवळ काय घडलं?

भारतीय ध्वज असलेलं जहाज क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानं बुडालं; येमेनच्या किनाऱ्याजवळ काय घडलं?

5
0

Source :- BBC INDIA NEWS

यमन

फोटो स्रोत, AFP via Getty Images

येमेनच्या किनाऱ्याजवळ भारतीय ध्वज असलेल्या जहाजावर एक क्षेपणास्त्र येऊन आदळल्यामुळे हे जहाज समुद्रात बुडालं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

भारताचे केंद्रीय जहाज बांधणी आणि जल वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याबाबत अधिक माहिती दिली. एमएसव्ही फैज नुरे औलिया या जहाजावरील सर्व 14 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. त्यापैकी 13 जण भारतीय नागरिक असल्याचे त्यांनी सांगितलं.

सोनोवाल यांनी या ‘विनाकारण केलेल्या हल्ल्याचा’ निषेध केला. तसेच, या भागात जहाजांवरील खलाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावलं उचलली जातील, असंही ते म्हणाले.

या जहाजावर हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, सौदी अरेबियाचा पाठिंबा असलेल्या येमेन सरकारने या हल्ल्यासाठी हुती बंडखोरांना जबाबदार धरले आहे.

तांबड्या समुद्रात जहाजांवर झालेल्या अलीकडच्या हल्ल्यांमधील ही सर्वात ताजी घटना आहे.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर काही तेलवाहू जहाजं पर्यायी मार्ग म्हणून लाल समुद्राच्या या सागरी मार्गाचा वापर करत आहेत.

यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत या भागात व्यापारी जहाजांवर होत असलेल्या हल्ल्यांचं वर्णन ‘गंभीर चिंतेचा विषय’ असं केलं.

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, “या भागात व्यापारी जहाजांवर होणारे हल्ले तात्काळ थांबले पाहिजेत. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करत या सागरी मार्गांवरील जहाजांची वाहतूक आणि व्यापार विनाअडथळा पुन्हा सुरळीत सुरू झाला पाहिजे.”

येमेनच्या परराष्ट्र मंत्रालयाचं काय म्हटलं?

सौदी अरेबियाचा पाठिंबा असलेल्या येमेन सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी करत म्हटलं की, “हा हल्ला हुती दहशतवादी गटाकडून (मिलिशिया) सातत्याने केल्या जात असलेल्या हल्ल्यांच्या मालिकेतील आणखी एक हल्ला आहे.”

“या कारवायांमध्ये शहरांवर हल्ले करणं, विमानतळ आणि तेल प्रकल्पांवर बॉम्बहल्ले करणं, निर्यातीत अडथळे आणणं आणि येमेनच्या जनतेला उत्पन्नाच्या महत्त्वाच्या स्रोतांपासून वंचित ठेवणं यांचा समावेश आहे,” असं या निवेदनात म्हटलं आहे.

हे जहाज येमेनच्या किनाऱ्याजवळ बुडाले असल्याचं सांगितलं जात आहे. (फाइल फोटो)

फोटो स्रोत, AFP via Getty Images

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, “हुती बंडखोरांच्या सत्ताबदलामुळे निर्माण झालेलं मानवी संकट या घटनांमुळे आणखी वाढलं आहे.”

“हुती बंडखोरांमुळे लाल समुद्र, बाब-अल-मंदबची सामुद्रधुनी आणि एडनच्या आखातातील जहाजांची वाहतूक आणि बंदरांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळे व्यापार आणि अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होत असून, या प्रादेशिक सुरक्षा आणि स्थैर्य कमकुवत होत आहे.”

फेब्रुवारीच्या अखेरीस इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर या भागातील अनेक सागरी व्यापार मार्गांवर परिणाम झाला आहे.

यानंतर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. हा जगातील सर्वाधिक व्यस्त तेलवाहतूक मार्गांपैकी एक आहे. त्यामुळे जगभरातील कच्च्या तेलाच्या किमतींवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

सौदी अरेबियातून तेल घेऊन येणारी काही जहाजं लाल समुद्रातील पर्यायी मार्गाचा वापर करत होती. परंतु, अलीकडे येमेनमधील हुती बंडखोरांनी सौदीच्या तेलवाहू जहाजांवर हल्ले केल्यामुळे या भागातील धोका आणखी वाढला आहे.

तांबड्या समुद्रातील धोका वाढला

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या पाठिंब्याचं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या येमेन सरकारच्या परिवहन मंत्रालयाने इराण समर्थित हुती बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेल्या बोटीचा वापर करत हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

हुती बंडखोरांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हुती बंडखोरांनी 20 जुलै रोजी सौदी अरेबियाच्या लाल समुद्र किनाऱ्यावरील बंदरांची ‘नाकेबंदी’ करण्याची घोषणा केली होती.

ब्रिटनच्या ‘यूके मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स’ या संस्थेनं गेल्या आठवडाभरात या भागात जहाजांवर अनेक हल्ले झाल्याची माहिती दिली आहे.

असं असूनही मंगळवारी (4 ऑगस्ट) कच्च्या तेलाच्या किमती तीन आठवड्यांतील नीचांकी पातळीवर आल्या. कारण, अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इराणशी करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे.

जूनमध्ये अमेरिका आणि इराण यांनी लष्करी कारवाई थांबवणं, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करणं आणि पुढील 60 दिवसांत युद्ध संपवण्यासाठी 14 मुद्द्यांच्या सामंजस्य करारावर (एमओयू) सहमती दर्शवली होती.

परंतु, करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर अवघ्या 3 आठवड्यांमध्ये इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही हल्ले केले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी संपुष्टात आल्याची घोषणा केली.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितलं की, इराणशी सुरू असलेल्या चर्चेमध्ये प्रगती होत आहे. त्याचबरोबर, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतचा करार बुधवारपर्यंत (5 ऑगस्ट) होऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे, इराणने आपण अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, सध्या अमेरिकेशी चर्चा करण्याचा कोणताही विचार नसून ओमानसोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC