Source :- BBC INDIA NEWS

रशियाची BUK M-3 हवाई संरक्षण प्रणाली (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

38 मिनिटांपूर्वी

नुकत्याच झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात देशाच्या सुरक्षेसाठी एअर डिफेन्स सिस्टिम (हवाई संरक्षण यंत्रणा) किती महत्त्वाची ठरू शकते हे दिसून आलं.

पाकिस्तानकडून झालेले क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले भारताच्या एस-400 म्हणजेच सुदर्शन चक्रानं निष्फळ ठरवले. त्याचवेळी भारताच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम भेदली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोनच दिवसांपूर्वी अमेरिका हवाई हल्ले रोखणारी अत्याधुनिक ‘गोल्डन डोम’ ही एअर डिफेन्स सिस्टिम उभारणार असल्याचं जाहीर केलं. ट्रम्प यांच्या मते ही ‘भविष्यातील क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली’ असेल.

वेगवेगळ्या देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या देशाची एअर सिस्टिम मजबूत किंवा अत्याधुनिक आहे याचा शोध घेतला जात आहे. देशाच्या सुरक्षेसाठी एअर डिफेन्स सिस्टिम किती महत्त्वाचं आहे, हे आता सर्वांना लक्षात येतंय.

येत्या काळात एअर डिफेन्स सिस्टिमचं महत्त्व वाढत जाणार आहे. या एअर डिफेन्स सिस्टिममध्ये भारत कुठं आहे आणि जगातील प्रमुख देशांकडे कोणकोणती एअर डिफेन्स सिस्टिम आहे, हे जाणून घेणार आहोत. त्याच्या आधी एअर डिफेन्स सिस्टिम काय असतं हे माहीत करून घेऊयात.

एअर डिफेन्स सिस्टिम म्हणजे काय?

हवाई संरक्षण यंत्रणा (एअर डिफेन्स सिस्टिम) ही एक लष्करी यंत्रणा आहे, जी शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि इतर हवाई धोक्यांपासून देशाच्या हवाई सीमेचे संरक्षण करते.

ही प्रणाली रडार, सेन्सर्स, क्षेपणास्त्रं आणि तोफ प्रणालींचा वापर करून हवाई धोक्यांचा शोध घेते, त्यांना ट्रॅक करते आणि ते नष्ट करण्यासाठी प्रत्युत्तरात्मक कारवाई करते.

एअर डिफेन्स सिस्टिम एका ठिकाणी तैनात करता येते किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येते. छोट्या ड्रोनपासून ते बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारख्या मोठ्या धोक्यांना रोखण्यात ते सक्षम असतात.

एप्रिलमध्ये अमेरिका आणि फिलिपिन्स यांच्या संयुक्त लष्करी सरावादरम्यान मरिन्स एअर डिफेन्स इंटिग्रेटेड सिस्टिमची (मादीस) क्षमताही पाहायला मिळाली.

फोटो स्रोत, Getty Images

एअर डिफेन्स सिस्टिम चार मुख्य भागांमध्ये कार्य करते. रडार आणि सेन्सर शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन शोधतात. कमांड आणि कंट्रोल सेंटर या डेटावर प्रक्रिया करून कोणत्या धोक्याला प्रथम प्रतिसाद द्यायचा हे ठरवतो.

शस्त्र प्रणाली धोक्यांना रोखतात, तर मोबाईल युनिट्स जलद तैनात करण्यास सक्षम असतात, ज्यामुळे युद्धभूमीवर ते अत्यंत प्रभावी बनतात.

भारताची एअर डिफेन्स सिस्टिम – एस 400

भारताची एअर डिफेन्स सिस्टिम एस-400 ला भारतीय लष्कर ‘सुदर्शन चक्र’ असे संबोधित करतं.

भारताची एअर डिफेन्स सिस्टिम तिच्या अनेक स्तरांमुळे आणि प्रणालींच्या विविधतेसाठी ओळखली जाते. यात रशियन, इस्रायली आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामुळे ते शेजारील देशांच्या तुलनेत अधिक प्रभावी बनते.

2018 मध्ये भारताने रशियाकडून पाच एस-400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा करार केला होता.

त्याची तुलना अमेरिकेच्या सर्वोत्तम पॅट्रियट क्षेपणास्त्र एअर डिफेन्स सिस्टिमशी केली जाते. भारत आणि रशिया यांच्यात हा 5.43 अब्ज डॉलर्समध्ये करार झाला होता.

अमेरिकेच्या नाराजीनंतरही भारताने रशियाकडून एस-400 खरेदी केले.

फोटो स्रोत, Getty Images

एस-400 ही एक मोबाइल सिस्टिम आहे, म्हणजेच या प्रणालीला रस्त्याने आणले आणि नेले जाऊ शकते. आदेश मिळाल्यावर 5 ते 10 मिनिटांच्या आत याला तैनात केले जाऊ शकते, असं याबद्दल सांगितलं जातं.

संरक्षण तज्ज्ञ संजीव श्रीवास्तव म्हणतात की, एस-400 ला सध्या जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टिम म्हणता येईल.

ते म्हणतात, “याची रेंज 400 किलोमीटरपर्यंत आहे. याचा रशियाने युक्रेनविरुद्ध वापर केला होता, जो खूप यशस्वी ठरला. भारताने याचा पाकिस्तानविरुद्धच्या अलीकडील संघर्षात वापर केला, जो खूप यशस्वी ठरला.”

अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम

अमेरिका आपल्या गोल्डन डोम सिस्टिमवर 175 अब्ज डॉलरचा खर्च करत आहे. गोल्डन डोम सिस्टिमसाठी अमेरिकेच्या अर्थसंकल्पात सुरुवातीला 25 अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार आहेत.

अमेरिकेकडे असलेली सध्याची डिफेन्स सिस्टिम ही संभाव्य शत्रूंच्या झपाट्याने वाढणाऱ्या आधुनिक शस्त्रांपासून संरक्षण करण्याच्या बाबतीत मागे पडली असल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांचं मत आहे.

नवीन क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा जमीन, समुद्र आणि अवकाशात नव्या पिढीच्या तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. या प्रणाली अंतर्गत, अंतराळात असे सेन्सर्स आणि इंटरसेप्टर असतील, जे या हवाई हल्ल्यांचे धोके थांबवू शकतील, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

ही व्यवस्था काही प्रमाणात इस्रायलच्या आयर्न डोमपासून प्रेरित आहे. इस्रायल 2011 पासून रॉकेट आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना थांबवण्यासाठी याचा वापर करत आहे.

परंतु, गोल्डन डोम आयर्न डोमपेक्षा खूप मोठा असेल आणि हायपरसॉनिक शस्त्रांसह अधिक मोठ्या धोक्यांचा सामना करण्यास सक्षम असेल.

हे ध्वनीच्या गतीपेक्षा आणि फ्रॅक्शनल ऑर्बिटल बॉम्बार्डमेंट सिस्टिम्स म्हणजेच फॉब्सपेक्षाही अधिक वेगाने स्थान बदलू शकेल. फॉब्स अंतराळातून शस्त्रं प्रक्षेपित करू शकतो.

अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टीम

फोटो स्रोत, AFP

ट्रम्प यांनी सांगितलं की, असे सर्व धोके हवेतच नष्ट केले जाऊ शकतात. त्याच्या यशाचा दर जवळपास 100 टक्के आहे.

सध्या अमेरिकेकडे असलेली थाड म्हणजेच टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स मिसाइल सिस्टिम मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेसाठी तैनात केली आहे. यामध्ये दक्षिण कोरिया, ग्वाम आणि हैती यांचा समावेश आहे.

ही सिस्टिम मध्यम रेंजच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना उड्डाणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच नष्ट करण्यात सक्षम आहे. याचे तंत्रज्ञान ‘हिट टू किल’ आहे, म्हणजेच ती समोर येणाऱ्या शस्त्राला फक्त रोखत नाही, तर त्याला पूर्णपणे नष्ट करते.

ही प्रणाली 200 किलोमीटर दूर आणि 150 किलोमीटर उंचीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे.

याबाबत संजीव श्रीवास्तव म्हणाले, “अमेरिकेकडे थाड व्यतिरिक्त एमआयएम 104 पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टिम आहे. त्याची ऑपरेशनल रेंज 170 किलोमीटर आहे.”

त्यांचं म्हणणं आहे की, “सर्व देश हवाई हल्ल्यांविरोधात बहुस्तरीय सुरक्षा राखण्याचा प्रयत्न करत असतात. अमेरिका, जर्मनी आणि इटलीकडे एमईए डिफेन्स सिस्टिम देखील आहे.”

इस्रायलचं आयर्न डोम

इराणनं पहिल्यांदाच आपल्या भूमीवरून इस्रायलवर हल्ला केला होता. त्यावेळी इराणनं ड्रोन आणि क्षेपणास्त्र इस्रायलवर डागले होते. इराणच्या या हल्ल्यानंतर इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टिम ‘आयर्न डोम’ चर्चेत आली.

ही यंत्रणा हल्ला करण्यात आलेलं रॉकेट नागरी भागांमध्ये पडण्यापासून रोखते आणि हे रॉकेट हवेतच नष्ट करते. या सुरक्षा यंत्रणेला आयर्न डोम अँटी मिसाइल म्हणतात.

लाखो डॉलर्स खर्च करून इस्रायलने उभारलेली ही यंत्रणा ही एका मोठ्या बचावात्मक यंत्रणेचा एक भाग आहे.

डागण्यात आलेलं रॉकेट किंवा क्षेपणास्त्र हे रहिवासी भागांवर पडेल किंवा नाही याचा अंदाज ही सिस्टिम लावते किंवा कोणतं रॉकेट आपल्या लक्ष्यापासून दूर जाण्याचा अंदाज असल्याचंही ही सिस्टिम ठरवते.

जे रॉकेट रहिवासी भागांवर पडण्याची शक्यता असते, अशा रॉकेट्सला ही सिस्टिम हवेमध्येच नष्ट करते.

या वैशिष्ट्यामुळे ही बचावात्मक यंत्रणा अतिशय परिणामकारक ठरत आहे.

या प्रत्येक इंटरसेप्टरची किंमत सुमारे दीड लाख डॉलर्स असल्याचं टाइम्स ऑफ इस्रायलनं म्हटलं आहे. 2006 साली हिजबुल्ला या इस्लामी गटाशी युद्ध झाल्यानंतर इस्रायलने या यंत्रणेवर काम करायला सुरुवात केली होती.

इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इराणचा ड्रोन पाडला

फोटो स्रोत, @IDF

इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, हे तंत्रज्ञान 90 टक्के यशस्वी ठरले आहे. रहिवासी भागात रॉकेट पडण्यापूर्वीच ते नष्ट करण्यात ही यंत्रणा सक्षम आहे.

ही सिस्टिम स्वतःच शोध घेते की, कोणते क्षेपणास्त्र रहिवाशी भागात पडण्याची शक्यता आहे किंवा कोणती क्षेपणास्त्र लक्ष्यापासून चुकत आहे.

ही प्रणाली फक्त तीच क्षेपणास्त्रं पाडतं जे नागरी भागात पडण्याची शक्यता असते. या प्रणालीद्वारे हवाई मार्गातच ती क्षेपणास्त्रं नष्ट केली जातात. ही वैशिष्ट्यं या तंत्रज्ञानाला अत्यंत किफायतशीर बनवते.

संरक्षण तज्ज्ञ संजीव श्रीवास्तव यांच्या मते, इस्रायलकडे ‘डेव्हिड फ्लिंग’ नावाची एअर डिफेन्स सिस्टिम देखील आहे. त्याची रेंज 70 ते 300 किलोमीटरपर्यंत आहे.

कमी अंतरावरून होणाऱ्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने आयर्न डोमची रचना करण्यात आली आहे. हे कोणत्याही हवामानात कार्य करते.

हे रडारने सुसज्ज असतं जे त्याच्या क्षेत्राकडे येणाऱ्या रॉकेट्स किंवा क्षेपणास्त्रांना रस्त्यातच ट्रॅक करू शकतो.

संपूर्ण इस्रायलमध्ये आयर्न डोम डिफेन्स सिस्टिमचे युनिट्स तैनात आहेत. प्रत्येक युनिटमध्ये तीन ते चार प्रक्षेपण (लाँच) वाहने आहेत. त्यातून 20 इंटरसेप्टर क्षेपणास्त्रे डागू शकतात.

आयर्न डोम डिफेन्स सिस्टिम कायमस्वरूपी एकाच ठिकाणी स्थापित करून ऑपरेट करता येते आणि कोणत्याही ठिकाणी सहजपणे हलवता येते.

काही जाणकारांच्या मते, सध्या ही यंत्रणा गाझाकडून येणारी रॉकेट्स प्रभावीपणे नष्ट करत असली तरी भविष्यात ती इतर दुसऱ्या कोणत्या शत्रूच्या विरुद्ध इतकी प्रभावी सिद्ध होईलच याची खात्री नाही.

चीन आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम

पाकिस्तानकडे चीनमध्ये बनवलेले एचक्यू-9, एचक्यू-16 आणि एफएन-16 यांसारखी एअर डिफेन्स सिस्टिम आहेत. यामधून एचक्यू-9 ला पाकिस्तानने 2021 साली आपल्या शस्त्रसज्जतेत सामील केलं होतं. याची तुलना रशियाच्या एस-300 प्रणालीशी केली जाते.

याचाच अर्थ चीनकडेही अशी एअर डिफेन्स सिस्टिम आहे. पण संजीव श्रीवास्तव म्हणतात की, नुकताच झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानला चीनकडून मिळालेली एचक्यू-9 सिस्टिम अपयशी ठरली.

क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असल्याचा पाकिस्तानचा दावा (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

त्यांचं म्हणणं आहे, “चीनकडे जी एअर डिफेन्स सिस्टिम किंवा शस्त्रं आहेत, त्यांचा कधीही प्रत्यक्ष युद्धभूमीत वापर झालेला नाही.

याचा अर्थ ही सिस्टिम किती यशस्वी ठरेल, याबद्दल निश्चितपणे काही सांगता येत नाही. कारण चीननं शेवटचं युद्ध 1978-79 मध्ये व्हिएतनाममध्ये लढलं होतं.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC