Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, NASIR KACHROO/NURPHOTO VIA GETTY IMAGES
48 मिनिटांपूर्वी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये कट्टरतावाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.
या हल्ल्यानंतर भारतानं दोन्ही देशांमधील सिंधू जल करार स्थगित करणं, सीमेवरील वाहतूक किंवा दळणवळण (बॉर्डर क्रॉसिंग) बंद करणं आणि पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करणं यासह अनेक निर्णय घेतले आहेत.
भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देत पाकिस्तानं 1960 चा सिमला करार स्थगित केल्याचं जाहीर केलं आहे.
त्याचबरोबर पाकिस्ताननं म्हटलं आहे की पाकिस्तानात येणाऱ्या नद्यांचं पाणी अडवण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याला ‘युद्ध’ मानलं जाईल आणि त्याला पूर्ण ताकदीनं उत्तर दिलं जाईल.
दोन्ही देशांमधील राजकीय नेतृत्वांकडून एकमेकांना कडक इशारा देत जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याबद्दलची कठोर वक्तव्यं केली जात आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर, गेल्या गुरुवारी (24 एप्रिल) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा एका प्रचारसभेत उघडपणे म्हटलं की ‘हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडील शिक्षा मिळेल.’
ते म्हणाले, “मी सगळ्या जगाला हा संदेश देतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याची ओळख पटवून, त्याला शोधून शिक्षा देईल आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनादेखील, आता दहशतवाद्यांची उरलेली ताकदही संपवण्याची वेळ आली आहे.”
तर भारताचे जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील म्हणाले की, ‘पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळू नये, यासाठी व्यूहरचना तयार केली जाते आहे.’
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी कोणत्याही प्रयत्नाला कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल असं सांगितलं.
तर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीदेखील म्हटलं की, ‘सिंधू जल कराराशी निगडीत कोणत्याही कारवाईला युद्ध मानलं जाईल.’
निवृत्त जनरलचा इशारा
दक्षिण आशियातील राजकारणावर लक्षं ठेवणारे जाणकार, भारताकडून मर्यादित लष्करी कारवाई केली जाण्याची शक्यता नाकारत नाही. या कारवाईमुळे युद्ध सुरू होण्याचा धोका आहे, असं त्यांचं मत आहे.
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) एस. एच. पनाग यांनी घाईघाईनं लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यासंदर्भात सावधगिरीचा इशारा दिला आहे.
‘द प्रिंट’ मध्ये त्यांनी एक लेख लिहिला आहे. त्यात लिहिलं आहे की, पाकिस्तान हा एक अण्वस्त्रधारी देश आहे. तसंच भारतीय सैन्याकडून केल्या जाणाऱ्या मर्यादित लष्करी कारवाईला उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी पारंपरिक लष्करी शक्ती आहे.

फोटो स्रोत, Getty Images
“क्षेपणास्त्र, ड्रोन किंवा वायुदलाची ताकद असो, भारत कोणत्याही क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं इतका पुढे नाही की, ज्यामुळे कोणतंही नुकसान न होता त्याला सर्जिकल स्ट्राईक करता येईल. पाकिस्तानकडे उत्तर देण्याची क्षमता आहे. आपण त्यासाठी सज्ज असलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.
तर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानच्या लष्करी सज्जतेबद्दल सांगितलं की, “आम्हाला तयारी करायची नाही. आम्ही आधीच सज्ज आहोत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

शनिवारी (26 एप्रिल) पाकिस्तानचे पंतप्रधान शहनावज शरीफ देखील म्हणाले की ‘जर कोणत्याही प्रकारचं पाऊल उचललं गेलं, तर 2019 प्रमाणेच त्याला उत्तर दिलं जाईल.’
पुलवामामधील कट्टरतावादी हल्ल्यानंतर भारतानं बालाकोटमध्ये हवाई हल्ला केला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या वायुदलात चकमक उडाली होती. या घटनेकडे शहनावज शरीफ लक्ष वेधत होते.
भारतीय सैन्याची ताकद
ग्लोबल फायर पॉवरनुसार, 2025 च्या सैन्य स्ट्रेंथ रँकिंगमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये आठ रँकचा फरक आहे.
2025 मध्ये जागतिक स्तरावरील सैन्याच्या शक्तीसंदर्भात 145 देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान 12 व्या स्थानावर आहे.
भारतीय सैन्याकडे जवळपास 22 लाख जवान, 4,201 टँक किंवा रणगाडे, जवळपास दीड लाख चिलखती वाहनं, 100 सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी (स्वयंचलित तोफखाना) आणि 3,975 ओढून न्यायची आर्टिलरी (तोफा) आहेत. याशिवाय 264 मल्टी बॅरल रॉकेट आर्टिलरी आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
भारतीय वायुदलाकडे 3 लाख 10 हजार वायु सैनिक आणि एकूण 2,229 विमानं आहेत. त्यातील 513 लढाऊ विमानं आणि 270 वाहतुकीची विमानं आहेत. याशिवाय 351 ट्रेनर विमानं आणि 6 टँकर फ्लीटची (इंधन पुरवणारी) विमानं आहेत.
भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांकडे एकूण 899 हेलिकॉप्टर्स आहेत. यातील 80 लढाऊ हेलिकॉप्टर आहेत.

भारतीय नौदलाकडे 1.42 लाख नौसैनिक आहेत. एकूण 293 विविध युद्धनौका आहेत. ज्यात दोन विमानवाहू जहाजं, 13 डिस्ट्रॉयर, 14 फ्रिगेट्स, 18 पाणबुड्या आणि 18 कॉर्वेड्स युद्धनौका आहेत.
दळणवळण, वाहतुकीचा विचार करता भारतीय सैन्याकडे 311 विमानतळ, 56 बंदरं, 63 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते आणि 65 हजार किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग आहे.
पाकिस्तानी लष्कराची शक्ती
ग्लोबल फायर पॉवरनुसार, पाकिस्तानच्या सैन्याकडे जवळपास 13.11 लाख जवान, 1.24 लाख नौसैनिक आणि 78 हजार वायु सैनिक आहेत.
पाकिस्तानकडे एकूण 1,399 विमानं आहेत. त्यातील 328 लढाऊ विमानं, 90 अटॅक टाईप, 64 ट्रान्सपोर्ट विमानं, 566 ट्रेनर विमानं, 4 टँकर फ्लीट आणि 373 हेलिकॉप्टर आहेत. यातील 57 हेलिकॉप्टर लढाऊ हेलिकॉप्टर आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानकडे 2,627 रणगाडे, 17.5 हजार चिलखती वाहनं, 662 सेल्फ प्रोपेल्ड आर्टिलरी, 2,629 खेचून न्यायची आर्टिलरी आणि 600 मल्टीबॅरल रॉकेट आर्टिलरी आहे.
पाकिस्तानी नौदलाकडे एकूण 121 युद्धनौका आहेत. त्यातील 9 फ्रिगेट्स, 9 कॉर्वेट्स, 8 पाणबुड्या आणि 69 पेट्रोल वेसेल्स किंवा जहाजं आहेत.
दळणवळण, वाहतुकीच्या दृष्टीकोनातून पाकिस्तानकडे फक्त 3 बंदरं, 116 विमानतळं आणि 60 मर्चंट मरीन फ्लीट आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे 2 लाख 64 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आणि 11.9 हजार किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग आहे.
कोणत्या देशाकडे किती आहेत अण्वस्त्रं?
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपरी) या स्वीडनमधील थिंक टँकच्या 2024 च्या अहवालानुसार, भारताकडे 172 अण्वस्त्रं आहेत. तर पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रं आहेत.
अर्थात दोन्ही देशांकडे नेमकी किती अण्वस्त्रं तैनात आहेत, हे स्पष्ट नाही.
या संस्थेचं म्हणणं आहे की, भारताशी लढण्यासाठी पाकिस्तान अण्वस्त्रांची निर्मिती करतो आहे. तर भारतानं लांब पल्ल्याच्या शस्त्रांच्या तैनातीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. लांब पल्ल्याची शस्त्रं म्हणजे ज्याद्वारे चीनवर देखील हल्ला केला जाऊ शकतो.

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा शेजारी देश असलेल्या आणि जगातील तिसरा सर्वात शक्तीशाली अण्वस्त्रधारी देश असलेल्या चीनकडील अण्वस्त्रांच्या संख्येत 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता चीनकडील अण्वस्त्रांची संख्या 410 वरून 500 वर पोहोचली आहे.
ड्रोन्सची संख्या
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बीबीसीचे प्रतिनिधी शकील अख्तर यांचा एक लेख प्रकाशित झाला होता. त्या लेखानुसार, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडील ड्रोनच्या संख्येत वेगानं वाढ होते आहे.
संरक्षण विषयक बाबींचे विश्लेषक राहिलेल्या राहुल बेदी यांच्या मते, पुढील दोन ते चार वर्षांमध्ये भारताकडे जवळपास पाच हजार ड्रोन्स असतील.
त्यांच्या मते, तसं तर पाकिस्तानकडे ‘भारतापेक्षा कमी डोन्स’ आहेत. मात्र तरीदेखील पाकिस्तानकडे असलेल्या डोन्समध्ये विविध प्रकारच्या क्षमता आहेत. पाकिस्तानकडे 10 ते 11 वेगवेगळ्या बनावटीचे ड्रोन्स आहेत.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतानं अमेरिकेशी साडेतीन अब्ज डॉलर किंमतीचे 31 प्रीडेटर ड्रोन्स विकत घेण्याचा करार केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
प्रीडेटर ड्रोन्सना जगातील सर्वात यशस्वी आणि घातक ड्रोन मानलं जातं.
या ड्रोनबरोबर 50 कोटी डॉलर किंमतीचे बॉम्ब आणि लेझर गाइडेड क्षेपणास्त्रंदेखील विकत घेतली जातील. ड्रोनद्वारे या बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा लक्ष्यावर मारा केला जातो.
राहुल बेदी यांच्या मते, पाकिस्तान तुर्की आणि चीनकडून ड्रोन आयात करतो. त्याचबरोबर पाकिस्ताननं जर्मनी आणि इटलीकडून देखील ड्रोन विकत घेतले आहेत.
पाकिस्ताननं स्वत:देखील बर्राक आणि शहपर सारखे ड्रोन्स विकसित केले आहेत.
पाकिस्तानकडे तुर्कीचे आधुनिक ‘बॅराक्तर’ ड्रोन्स टीबी टू आणि एकेंजी आहेत. त्याचबरोबर पाकिस्ताननं चीनकडून ‘वँग लाँग टू’ आणि ‘सीएच 4’ सारखी ड्रोन्सदेखील विकत घेतली आहेत.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC