Source :- BBC INDIA NEWS

प्राध्यापक अली खान मेहमुदाबाद हरियाणाच्या अशोका युनिव्हर्सिटीत सहायक प्राध्यापक आहेत.

फोटो स्रोत, Ali Khan Mahmudabad/FB

भारत आणि पाकिस्तान संघर्ष, तसंच कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पत्रकार परिषदेत समावेश करण्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना अटक करण्यात आली आहे.

स्थानिक रहिवाशी योगेश यांच्या तक्रारीनंतर हरियाणातील सोनीपत पोलिसांनी ही अटक केली आहे. हरियाणा पोलिसांनी प्राध्यापक अली खान यांच्या विरोधात दोन समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

प्राध्यापक अली खान हरियाणातील अशोका विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांच्या पत्नीनं बीबीसीला सांगितलं की रविवारी (18 मे) सकाळी साडे सहा वाजता पोलीस त्यांच्या घरी आले आणि ते प्राध्यापक अली खान यांना सोबत घेऊन गेले.

याआधी या प्रकरणात हरियाणा राज्य महिला आयोगानं देखील प्राध्यापक अली खान यांना समन्स बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं होतं.

प्राध्यापक अली खान यांच्या अटकेसंदर्भात अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर देखील याची चर्चा करत आहेत.

काय आहे प्रकरण?

सहा आणि सात मे च्या मधल्या रात्री भारतीय सैन्यानं पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली. त्यानंतर कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.

त्यानंतर आठ मे ला प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये त्यांनी कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांना पत्रकार परिषदेत पाठवण्याबद्दल लिहिलं होतं.

याशिवाय प्राध्यापक अली खान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भारत-पाकिस्तान संघर्ष आणि ‘युद्ध करण्याची मागणी’ करणाऱ्यांच्या भावनांबद्दल देखील लिहिलं होतं. त्यात त्यांनी युद्धामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती दिली होती.

हरियाणा राज्य महिला आयोगानं स्वत:हून या पोस्टची दखल घेत प्राध्यापक अली खान यांना 12 मे ला समन्स पाठवलं. या समन्समध्ये त्यांच्या या वक्तव्यामुळे ‘सशस्त्र दलांमधील महिलांच्या कथित अपमान करण्याचा आणि सांप्रदायिक द्वेष वाढवण्याचा’ मुद्दा मांडण्यात आला.

प्राध्यापक अली खान यांनी हरियाणा पोलिसांनी अटक केली.

फोटो स्रोत, Vineet Kumar

हरियाणा महिला आयोगानं त्यांच्या नोटीसमध्ये सहा मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला. तसंच यात ‘कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासह युनिफॉर्ममधील महिलांचा अपमान आणि भारतीय सशस्त्र दलांमधील अधिकारी म्हणून त्यांच्या कामाला हलकं लेखण्याचा’ मुद्दादेखील मांडण्यात आला.

त्याचबरोबर हरियाणा महिला आयोगानं प्राध्यापक अली खान यांना 48 तासांचा वेळ देत आयोगासमोर हजर राहण्यास सांगितलं आणि त्यांच्याकडून लेखी स्पष्टीकरण मागवलं.

त्यानंतर प्राध्यापक अली खान यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी महिला आयोगाला लेखी स्पष्टीकरण दिलं. या उत्तरात त्यांनी राज्यघटनेच्या कलम 19(1) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला.

प्राध्यापक अली खान यांच्या वकिलांनी सांगितलं की ते इतिहास आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी त्यांच्या ‘शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञानाचा’ वापर करून वक्तव्यं दिलं आहे आणि त्या वक्तव्याचा ‘चुकीचा अर्थ लावण्यात’ आला आहे.

प्राध्यापक अली खान यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यांनंतर शनिवारी, 17 मे ला हरियाणामधील सोनीपत येथील योगेश या स्थानिक रहिवाशानं एक एफआयआर नोंदवली होता.

या तक्रारीच्या आधारे रविवारी (18 मे) हरियाणा पोलिसांनी प्राध्यापक अली खान यांना अटक केली आहे.

हरियाणा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 196 (1)बी, 197 (1)सी, 152 आणि 299 अंतर्गत प्राध्यापक अली खान यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

काय म्हणाले होते अली खान

आठ मे ला प्राध्यापक अली खान यांनी एक पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं, “उजव्या विचारसरणीचे इतके लोक कर्नल सोफिया कुरैशी यांचं कौतुक करत आहेत, हे पाहून मला आनंद झाला.”

“मात्र हे लोक कदाचित याचप्रकारे मॉब लिंचिंगचे पीडित, मनमानीपणे बुलडोझरचा वापर करणं आणि भाजपाकडून द्वेष पसरवण्यास बळी पडलेल्या लोकांबाबत देखील आवाज उठवू शकतात. ते म्हणू शकतात की या लोकांना भारतीय नागरिक म्हणून सुरक्षा देण्यात यावी.”

प्राध्यापक अली खान म्हणाले, “दोन महिला सैनिकांद्वारे माहिती देण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. मात्र हा दृष्टीकोन वास्तवात आला पाहिजे. नाहीतर मग हा केवळ दांभिकपणा आहे.”

प्राध्यापक अली खान

फोटो स्रोत, Ali Khan Mahmudabad/FB

अर्थात, प्राध्यापक अली खान यांनी याच पोस्टमध्ये भारतातील विविधतेचं कौतुकदेखील केलं.

त्यांनी लिहिलं, “सरकार जे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे, त्यातुलनेत प्रत्यक्षात सर्वसामान्य मुस्लिमांसमोरची परिस्थिती वेगळी आहे. मात्र त्याचबरोबर या पत्रकार परिषदेतून (कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची पत्रकार परिषद) हे दिसून येतं की भारतातील विविधतेमध्ये ऐक्य आहे आणि एक विचार म्हणून तो अद्याप पूर्णपणे संपलेला नाही.”

प्राध्यापक अली खान यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी तिरंग्याबरोबर ‘जय हिंद’ लिहिलं होतं.

खान यांच्या पत्नी आणि वकील काय म्हणाले.

प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्या अटकेबद्दल जाणून घेण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा त्यांच्या पत्नीशी बोलले.

प्राध्यापक अली खान यांच्या पत्नी ओनाइजा यांनी बीबीसीला सांगितलं, “सकाळी साधारण साडे सहा वाजता पोलिसांची टीम अचानक आमच्या घरी आली आणि कोणतीही माहिती न देता प्राध्यापक अली खान यांना सोबत घेऊन गेली.”

ओनाइजा म्हणाल्या, “मी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. लवकरच माझी प्रसूती होणार आहे. कोणतंही ठोस कारण न सांगता माझ्या पतीला जबरदस्तीनं घरातून घेऊन गेले आहेत.”

पोलीस ठाणे

फोटो स्रोत, Vineet Kumar

तर प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्या वकिलांच्या टीममधील एका वकिलानं बीबीसीला सांगितलं, “आम्ही असं मानत आहोत की त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना ट्रांझिट रिमांडवर सोनीपतला नेण्यात येत आहे. तिथे स्थानिक न्यायालयासमोर त्यांना हजर केलं जाऊ शकतं. सध्या आम्हीदेखील आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.”

हरियाणा पोलिसांनी प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर वक्तव्यं केल्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

प्राध्यापक अली खान यांच्या अटकेबाबत कोण काय म्हणाले.

प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना अटक करण्यात आल्यानंतर अनेक ख्यातनाम लोकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्वराज अभियानाचे सह-संस्थापक योगेंद्र यादव म्हणाले की प्राध्यापक अली खान यांना झालेली अटक ही धक्कादायक आहे.

त्यांनी अली खान महमूदाबाद यांची पोस्ट शेअर करत एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, “ही पोस्ट वाचा आणि स्वत:लाच विचारा, यात महिला विरोधी काय आहे? या पोस्टमुळे धार्मिक द्वेष कसा काय पसरतो आहे? आणि भारताचं ऐक्य, अखंडता आणि सार्वभौमत्व याला या पोस्टमुळे धोका कसा काय निर्माण होतो आहे? (एफआयआरमधील भारतीय न्याय संहितेचं कलम 152). अशा तक्रारीवर पोलीस कारवाई कशी काय करू शकतात?”

योगेंद्र यादव यांनी पुढे लिहिलं आहे, “हे देखील विचारा की मध्य प्रदेशातील ज्या मंत्र्यानं प्रत्यक्षात कर्नल सोफिया यांचा अपमान केला होता, त्याचं काही झालं आहे का?”

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी प्राध्यापक अली खान यांच्या अटकेच्या बातमीनंतर एक्स या सोशल मीडियावर लिहिलं,”लोकशाहीची जननी.”

लेखक आणि दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अपूर्वानंद म्हणाले, “हरियाणा पोलिसांनी बेकायदेशीरपणे अली खान महमूदाबाद यांना अटक केली आहे.”

प्राध्यापक अपूर्वानंद यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, “हरियाणा पोलिसांनी डॉ. अली खान यांना बेकायदेशीरपणे अटक केली आहे. ट्रांझिट रिमांडशिवाय त्यांना दिल्लीतून हरियाणात आणण्यात आलं. रात्री 8 वाजता एफआयआर नोंदवण्यात आली आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच पोलीस त्यांच्या घरी पोहोचले!”

योगेंद्र यादव आणि महुआ मोईत्रा

फोटो स्रोत, ANI

या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा अशी मागणी प्राध्यापक अपूर्वानंद यांनी केली आहे. तसंच प्रबीर पुरकायस्थ प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

तर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार मनोज कुमार झा यांनी देखील अली खान महमूदाबाद यांच्या अटकेसंदर्भात पोस्ट टाकली आहे.

त्यांनी लिहिलं आहे, “खरी लोकशाही ती असते, जिथे तुमच्या मोकळं होण्यावर ‘बंधन’ नसतं.”

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा, प्राध्यापक अली खान यांच्या अटकेविरोधात न्यायालयात जाण्याबद्दल बोलल्या.

‘द हिंदू’ या वृत्तपत्राच्या पत्रकार सुहासिनी हैदर म्हणाल्या की प्राध्यापक अली खान यांनी पोस्ट भेदभावासंदर्भात होती.

त्या म्हणाल्या, “त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या मुद्द्यावरून एक मंत्र्यानं जातीय तेढ निर्माण करणार वक्तव्यं केलं होतं आणि आता ते उघडपणे फिरत आहेत.”

याआधी हरियाणा राज्य महिला आयोगाच्या समन्सच्या विरोधात 1203 जणांनी एक पत्र जारी करून प्राध्यापक अली खान यांना पाठिंबा दिला होता.

या पत्राद्वारे या लोकांनी हरियाणा राज्य महिला आयोगाकडे “समन्स मागे घेण्याची आणि प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांची उघडपणे माफी मागण्याची” मागणी केली होती.

त्याचबरोबर या लोकांनी अशोक विद्यापीठाला आवाहन केलं की विद्यापीठानं त्यांच्या प्राध्यापकाच्या पाठिशी उभं राहावं.

कोण आहेत प्राध्यापक अली खान

प्राध्यापक अली खान हरियाणाच्या अशोका विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक आहेत. हे एक खासगी विद्यापीठ आहे.

अली खान महमूदाबाद राज्यशास्त्र आणि इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ते राज्यशास्त्राचे विभागप्रमुख देखील आहेत.

अली खान महमूदाबाद यांच्या फेसबुकवरील प्रोफाईलनुसार, ते मूळचे उत्तर प्रदेशातील महमूदाबादचे रहिवासी आहेत.

प्राध्यापक अली खान मेहमुदाबाद.

फोटो स्रोत, Ali Khan Mahmudabad/FB

अशोका विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, अली खान यांनी अमेरिकेच्या एमहर्स्ट कॉलेजमधून इतिहास आणि राज्यशास्त्राची पदवी घेतली आहे.

त्यानंतर त्यांनी सीरियातील दमिश्क विद्यापीठात एमफिल केलं. यादरम्यान त्यांनी सीरियाबरोबरच लेबनॉन, इजिप्त, येमेन, इराण आणि इराकमध्येही काही काळ प्रवास केला. त्यांनी इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातून पीएचडी केली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC