Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे
हवामान विभागाने आज (13 सप्टेंबर) दुपारी 2.13 वाजता पुढील 5 दिवसांसाठी हवामान अंदाज वर्तवला आहे. यानुसार आज महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिमुसळधार (रेड अलर्ट) पावसाचा अंदाज आहे. याशिवाय राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा (ऑरेंज अलर्ट) अंदाज व्यक्त केला आहे.
12 सप्टेंबरला दक्षिण छत्तीसगड आणि लगतच्या भागावर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र आज (13 सप्टेंबर) सकाळी 8:30 च्या सॅटेलाईटनुसार मध्य प्रदेशच्या नैऋत्येला आणि विदर्भाच्या उत्तर भागावर केंद्रित झालं आहे. हे क्षेत्र पुढील 24 तासांमध्ये राजस्थान आणि गुजरातच्या उत्तर दिशेला सरकण्याची शक्यता आहे.
गुजरात राज्यात नैऋत्य मोसमी पाऊस जोरदार होता, मध्य महाराष्ट्रात सक्रिय होता आणि उर्वरित प्रदेशात सामान्य होता. गुजरात आणि सौराष्ट्र प्रदेशात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.
उत्तर कोकण आणि गुजरात प्रदेशात बहुतांश ठिकाणी, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये अनेक ठिकाणी, तसेच दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.
अरबी समुद्राच्या दिशेने आणि उत्तर महाराष्ट्रावर वाऱ्याचा प्रवाह आणि चक्राकार परिस्थिती. हिरव्या आणि निळ्या रंगाचे पट्टे दिसत असून, तिथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता दर्शवली आहे.
पिवळ्या रंगाच्या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 5 दिवस राज्यात हवामान कसे असेल समजून घेऊयात.
मुंबई शहर आणि परिसरात पुढील 48 तास हवामान कसे असेल?
मुंबई शहर आणि परिसरात पुढील 24 तास आकाश ढगाळ राहील आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडतील. उपनगरांमध्ये ताशी 40-50 किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह तीव्र ते अति-तीव्र पावसाच्या 1-2 सरी पडण्याची शक्यता आहे.
या भागात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 27 अंश सेल्सिअस आणि 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुढील 48 तास शहरात आणि उपनगरांमध्ये आकाश सामान्यतः ढगाळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडतील.
कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 30 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
पुढील 5 दिवस कोणत्या जिल्ह्यात काय अलर्ट?
13 सप्टेंबर –
रेड अलर्ट –
नंदूरबार जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि एक-दोन ठिकाणी अतिवृष्टी ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
ऑरेंज अलर्ट –
पालघर, ठाणे, धुळे आणि नाशिक घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट आहे. पालघरमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि एक-दोन ठिकाणी अतिवृष्टी ते अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ठाण्यात एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
नाशिकच्या घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि एक-दोन ठिकाणी अतिवृष्टी ते अत्यंत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
धुळ्यात विजांच्या कडकडाटासह वादळ, 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे आणि एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
फोटो स्रोत, IMD
यलो अलर्ट –
मुंबई, रायगड, नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, पुणे घाट, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे.
या भागात परिस्थिती जिल्ह्यानुसार वेगवेगळी आहे. मुंबईत एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रायगडमध्ये एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, तर नाशिक आणि जळगावमध्ये विजांसह वादळ, मुसळधार पाऊस आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात.
छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथेही विजांसह वादळ, मुसळधार पाऊस आणि 40-50 किमी प्रतितास वेगाचे वारे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुणे आणि बीड, परभणी, हिंगोली येथे विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
पुणे घाटात मात्र मुसळधार पाऊस आणि 40-50 किमी प्रतितास वेगाचे वारे वाहण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम येथे विजांसह वादळ, मुसळधार पाऊस आणि 40-50 किमी प्रतितास वेगाचे वारे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर येथे एक-दोन ठिकाणी विजांसह वादळाची शक्यता आहे.
14 सप्टेंबर –
14 सप्टेंबरला राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही.
यलो अलर्ट –
नंदूरबार, पालघर, ठाणे, नाशिक घाट, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर या भागांसाठी यलो अलर्ट आहे.
या दिवशी नंदूरबार, पालघर आणि नाशिक घाटात एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बुलढाणा, अकोला आणि अमरावती येथे एक-दोन ठिकाणी विजांसह वादळ, तर नागपूरमध्येही एक-दोन ठिकाणी विजांसह वादळ होण्याची शक्यता आहे. ठाण्यात एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इतर जिल्ह्यांमध्ये कोणताही अलर्ट नाही. मात्र काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मुंबईत मध्यम पाऊस, रायगड व रत्नागिरीत हलका ते मध्यम पाऊस, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे.
फोटो स्रोत, IMD
15 सप्टेंबर –
15 सप्टेंबरला राज्यात कुठेही रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट नाही.
मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे. पालघर आणि ठाण्यात मध्यम पाऊस, तर मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
पुणे घाट आणि सातारा घाटात मध्यम पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस, तर परभणी आणि नांदेडमध्ये मेघगर्जनेसह हलका पावसाची शक्यता आहे. विदर्भातील बहुतांश भागात पाऊस कमी होत जाऊन काही ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
फोटो स्रोत, IMD
16 सप्टेंबर –
16 सप्टेंबरलाही राज्यात कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही.
असं असलं तरी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे घाट आणि सातारा घाटातही हलका ते मध्यम/मध्यम पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस, तर काही जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
फोटो स्रोत, Getty Images
17 सप्टेंबर –
17 सप्टेंबरलाही राज्यात कोणत्याही जिल्ह्यासाठी रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही.
मात्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये हलका पाऊस, ठाणे आणि मुंबईत हलका पाऊस, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक आणि पुणे घाट परिसरात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात हलका पाऊस किंवा कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. अनेक जिल्ह्यांसाठी सलग तिसऱ्या दिवशी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




