Home LATEST NEWS ताजी बातमी मासिक पाळीतील जास्त रक्तस्त्रावामुळे होतात आरोग्यावर गंभीर परिणाम, सहज लक्षातही येत नाहीत

मासिक पाळीतील जास्त रक्तस्त्रावामुळे होतात आरोग्यावर गंभीर परिणाम, सहज लक्षातही येत नाहीत

5
0

Source :- BBC INDIA NEWS

मासिक पाळी

फोटो स्रोत, Prashanti Aswani

मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्त्राव होणं ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे. हे नक्की कशामुळं होतं आणि यावर काय उपाय करता येऊ शकतात हे आता कुठं समजू लागलं आहे.

वयाच्या 12-13 व्या वर्षापासूनच मिशेल अल्स्टन मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या असह्य वेदनांमुळं शाळेतल्या नर्स रूममध्ये झोपून दिवस काढायच्या. भरपूर रक्तस्त्राव आणि पोटदुखीचा त्रास त्यांना व्हायचा.

त्या म्हणतात, “मला वाटायचं की हे असंच असतं आणि नॉर्मल आहे. हा त्रास सहन करायची सवय करून घ्यावीच लागते असंच मला सांगण्यात आलं होतं.”

इतर मुलींसारखा त्रास आपल्याला सहन होत नाही. आपणच कुठेतरी शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहोत, असंच त्यांना वाटायचं. पण वयाची चाळीशी गाठल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, दोष अशक्तपणाचा नव्हता, तर त्यांना पाळीत होणारा रक्तस्त्रावच खूप जास्त असायचा.

मासिक पाळीतला रक्तस्त्राव रोजच्या जगण्यावरच परिणाम होईल इतका जास्त होऊ लागतो तेव्हा डॉक्टर त्याला ‘हेव्ही मेन्स्ट्रुअल ब्लीडिंग‘ (अति रक्तस्त्राव) म्हणतात आणि ही खरोखरच आरोग्याची एक गंभीर समस्या आहे.

मासिक पाळी

फोटो स्रोत, Getty Images

पाळीत होणारा असा प्रचंड रक्तस्त्राव हा इतर आरोग्य समस्यांचेही लक्षण असू शकतो आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास ॲनिमियासारखे (रक्तक्षय) गंभीर परिणाम होऊ शकतात.

तरीही पाळीत होणाऱ्या या प्रचंड रक्तस्त्रावामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांचा सखोल अभ्यास करणे, तसेच त्यावर अधिक चांगल्या तपासण्या आणि उपचार शोधणे याला संशोधकांनी अगदी अलीकडेच सुरुवात केली आहे.

वैद्यकीय संशोधन लेखांच्या ‘पबमेड’ (PubMed) या डेटाबेसवर ‘मेन्स्ट्रुअल ब्लड’ (पाळीतील रक्त) हा शब्द शोधला असता गेल्या दशकात त्यावर अवघे 400 संशोधन लेख आढळले. याउलट ‘सीमन‘ (शुक्राणू/वीर्य) या विषयावर 15,000 हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत.

स्कॉटलंडच्या एडिनबर्ग युनिव्हर्सिटीतील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. जॅकी मेबिन म्हणतात, “महिलांच्या या आरोग्याच्या समस्येवर खरं तर कित्येक वर्षांपूर्वीच संशोधन व्हायला हवं होतं. पण आता तरी ही परिस्थिती बदलण्याची आणि योग्य संशोधन करण्याची वेळ आली आहे.”

किती रक्तस्त्राव हा प्रमाणापेक्षा जास्त मानला जावा?

संशोधकांच्या मते, एका पाळीच्या वेळी 80 मिलीहून अधिक रक्तस्त्राव होणं, मोठ्या नाण्याच्या आकाराच्या रक्ताच्या गुठळ्या पडणं किंवा 7 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाळी सुरू राहणं म्हणजे ‘अति-रक्तस्त्राव’ (Heavy Menstrual Bleeding).

पण ज्यांना पाळी येते त्यांच्याकडं हे मोजण्यासाठी कोणतीही पट्टी किंवा माप नसते. दिवसातून किती वेळा बाथरूमला जावं लागलं, किती पॅड्स किंवा टॅम्पॉन्स बदलावे लागले किंवा कपडे किती वेळा खराब झाले, यावरूनच त्या या त्रासाचा अंदाज लावतात.

काही डॉक्टर रुग्णांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. डाग पडलेले पॅड्स आणि टॅम्पॉन्सचे फोटो असलेले चार्ट दाखवून रक्तस्त्रावाचा अंदाज लावायला सांगतात. पण ही पद्धतही अचूक नाही. कारण बाजारात मिळणारे सर्व पॅड्स एकसारखे नसतात. त्यांची रक्त शोषून घेण्याची क्षमता वेगवेगळी असते.

यामुळंच पाळीत होणारा रक्तस्त्राव नेमका किती जास्त आहे हे ओळखणं सोपं नसतं. म्हणूनच या त्रासामुळं महिलांच्या दैनंदिन जीवनशैलीवर किंवा रोजच्या जगण्यावर परिणाम होतोय का यावरूनच डॉक्टर या समस्येचे निदान करतात.

सॅन फ्रान्सिस्कोच्या युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील स्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्र आणि पुनरुत्पादन विज्ञान विभागाच्या क्लिनिकल प्रोफेसर अॅड्वोआ क्रिस्टी म्हणतात, “अनेक महिलांच्या हे लक्षातच येत नाही की पाळीत त्यांना होणारा रक्तस्त्राव हा सामान्य नाही आणि योग्य उपचारांनी ही समस्या पूर्णपणे बरी होऊ शकते.”

मासिक पाळी

फोटो स्रोत, Prashanti Aswani

पाळीत अल्स्टन यांचे कपडे आणि बेडशीट नेहमीच रक्ताने खराब व्हायचे. एकदा तर मोबाईल शॉपमधल्या एका पांढऱ्या खुर्चीवरच रक्त लागलं होतं. पण आपणच काहीतरी चुकत असू आणि रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या पॅड्सची गरज आहे, असंच त्यांना वाटत राहिलं.

पाळीदरम्यान प्रचंड पोटदुखी आणि कपड्यांवरून रक्त बाहेर आल्याने होणारी कोंडी ही अगदी सामान्य आहे आणि हे सहन करायची सवय करून घ्या असंच त्यांना नेहमी सांगितलं

गेलं. जगातील इतर देशांमध्ये तर मासिक पाळीशी जोडलेले गैरसमज, सामाजिक प्रथा आणि असणारा संकोच यापेक्षाही अधिक खोलवर रुजलेला आहे.

श्रीलंकेतील कोलंबो विद्यापीठातील प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोगविज्ञानाचे मानद प्राध्यापक तसेच ‘एशियन सोसायटी ऑफ एंडोमेट्रिओसिस अँड अडिनोमायोसिस’चे प्रमुख हेमंत सेनानायके म्हणतात, “आशियाई देशांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्या या त्रासाबद्दल कधीच काही बोलत नाहीत. त्रास सहन करण्याची सवय झाल्यामुळे आणि लोक काय म्हणतील या संकोचामुळे त्या उपचारासाठी डॉक्टरांकडे जातच नाहीत.”

(अँडोमेट्रिओसिस आणि अडिनोमायोसिस हे दोन्ही आजार पाळीत प्रचंड रक्तस्त्राव होण्यास कारणीभूत ठरतात ज्याच्या संस्थेचे ते प्रमुख आहेत).

पाळीत होणारा प्रचंड रक्तस्त्राव ओळखावा कसा, हे स्त्रीरोगतज्ज्ञांना नीट ठाऊक असते आणि ते त्यादृष्टीने सविस्तर चौकशीही करतात. मात्र या क्षेत्राबाहेरील इतर डॉक्टरांचे या लक्षणांकडे दुर्लक्ष होऊ शकते.

अल्स्टन यांना आपल्याला असा त्रास आहे हे समजण्यासाठी तब्बल 30 वर्षे वाट पाहावी लागली. आणि असा अनुभव येणाऱ्या त्या एकमेव महिला नक्कीच नाहीत.

‘पाळीत प्रचंड रक्तस्त्राव हे सामान्य लक्षण नाही’

पाळीत प्रचंड रक्तस्त्राव होणे हे मुख्यत्वे शरीरातील एखाद्या मोठ्या समस्येचे लक्षण असते. पॉलिप्स, फायब्रॉईड्स, कॅन्सर, रक्ताचे विकार, ओव्हुलेशनच्या (अंडोत्सर्जनाच्या) समस्या आणि एंडोमेट्रिओसिस यांसारख्या विविध आजारांमुळे हा त्रास उद्भवू शकतो.

याशिवाय नुकतीच पाळी सुरू झाल्यावर आणि मेनोपॉजचा (रजोनिवृत्ती) काळ जवळ येतो तेव्हा शरीरातील हार्मोन्सच्या बदलांमुळे असा त्रास होणं खूप सामान्य आहे तरीही त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य ते उपचार करणे गरजेचे असते.

या आजारांवर उपचार केल्याने पाळीतील प्रचंड रक्तस्त्राव कमी होऊ शकतो. पण या आजारांमुळे नेमका कसा आणि किती रक्तस्त्राव वाढतो हे शास्त्रज्ञांना अजूनही स्पष्ट समजू शकलेले नाही. उदाहरणार्थ फायब्रॉईड्सवर भरपूर संशोधन झाले आहे. परंतु त्यांच्यामुळेच असा प्रचंड रक्तस्त्राव का होतो यावर अभ्यास झालेला नाही,” असं मेबिन सांगतात.

फायब्रॉईड्स म्हणजे गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये होणारी कॅन्सर नसलेल्या (Non-cancerous) गाठींची वाढ हेही त्या नमूद करतात.

दुसऱ्या बाजूला पाळीत होणाऱ्या या जास्त रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष केलं किंवा उपचार घेतले नाहीत तर शरीरात आयर्नची कमतरता भासण्यासारखे नवे आजार उद्भवू शकतात.

निरोगी पेशी, रोगप्रतिकारशक्ती, स्नायू, त्वचा, केस आणि नखे टिकवून ठेवण्यासाठी आयर्न हे खूप महत्त्वाचं असतं. शरीरातलं आयर्न कमी झालं की डोक्यावर ताण येणं किंवा काहीही न सुचणं, चक्कर येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, अंगावर लगेच निळसर वळ किंवा डाग उठणं आणि केस गळणं असे त्रास दिसायला लागतात.

मासिक पाळी

फोटो स्रोत, Getty Images

अशा प्रकारे पाळीत होणाऱ्या या प्रचंड रक्तस्त्रावाचे दुष्परिणाम पाळीचे दिवस संपल्यानंतरही कायम राहतात. पाळीत अति-रक्तस्त्राव होणाऱ्या 40% पेक्षा जास्त महिलांमध्ये आयर्नची (लोहाची) कमतरता असते असा अंदाज अभ्यासांमधून व्यक्त केला गेला आहे.

अल्स्टन यांनाही या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यांना नेहमीच थंडी वाजायची आणि बर्फाचे खडे खाण्याची इच्छा व्हायची. हा आयर्नच्या कमतरतेचा एक विचित्र पण महत्त्वाचा संकेत आहे. ज्यामागचं कारण शास्त्रज्ञांनाही अजून नीट समजलेलं नाही.

आयर्नच्या या कमतरतेवर वेळेत उपचार न केल्यास तिचे रुपांतर ॲनिमियामध्ये (रक्तक्षय) होऊ शकते. यात तांबड्या पेशींद्वारे संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आवश्यक असणारे हिमोग्लोबिन तयार करायला हाडांमधील ‘बोन मॅरो’कडे पुरेसं आयर्नच उरत नाही.

हा अत्यंत गंभीर आजार असून काही अति-गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाला बाहेरून रक्त देण्याची वेळ येते.

कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांत बाळंतपणात अति-रक्तस्त्राव झाल्यामुळे अनेक महिलांचा मृत्यू होतो असं सेनानायके सांगतात.

गरोदर राहण्यापूर्वीच महिलांमधील आयर्नची कमतरता आणि ॲनिमिया दूर झाला नाही तर डिलिव्हरीच्या वेळी होणाऱ्या रक्तस्त्रावातून शरीराची सावरण्याची किंवा सामना करण्याची क्षमता कमी होते. याचा गर्भातील बाळाच्या मेंदूच्या विकासावरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

पाळीत जास्त रक्तस्त्राव होण्याचे गंभीर परिणाम

पाळीत होणारा अति-रक्तस्त्राव हा आरोग्यासाठी किती घातक असू शकतो हे आता शास्त्रज्ञ मान्य करत आहेत. पण हा त्रास सहन करत जगताना महिलांना काय काय सहन करावं लागतं यावर अजूनही हवा तितका रिसर्च झालेला नाही.

अल्स्टन यांच्यासारखाच त्रास युकेच्या शेफील्ड हॅलम युनिव्हर्सिटीतील मानसोपचार शास्त्रज्ञ लेक्चरर एमिली यंग यांनीही सोसला आहे. जास्त रक्त गेल्यामुळे त्या एकापेक्षा जास्त वेळा चक्कर येऊन पडल्या होत्या.

कधीही अनपेक्षितपणे सुरू होणाऱ्या पाळीमुळे कपडे खराब होऊ नयेत म्हणून त्या नेहमी सोबत जास्त कपडे ठेवायच्या. पण ‘डिलिव्हरी झाली की सगळं ठीक होईल’, असंच डॉक्टर त्यांना सांगायचे.

सलग 20 वर्षं डॉक्टरांनी या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता त्या स्वतः अशा महिलांच्या अनुभवांवर अभ्यास आणि संशोधन करत आहेत.

यंग म्हणतात, “हा फक्त एखादा छोटासा त्रास नाही, तर यामुळे तुम्हाला तुमचं पूर्ण आयुष्यच पाळीच्या चक्रानुसार जुळवून घ्यावं लागतं.”

2025 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासासाठी अति-रक्तस्त्रावाचा त्रास सहन करणाऱ्या महिलांचे असेच अनुभव समोर आणण्यासाठी यंग यांनी ऑनलाइन फोरमवरील पोस्ट्सचा बारकाईने अभ्यास केला.

यात समोर आलेले अनुभव संताप आणणारे आणि तितकेच मनाला चटका लावणारे होते. डॉक्टरांना या त्रासाचे गांभीर्य समजण्याआधीच आपल्याला अनेकदा बाहेरून रक्त देण्याची वेळ आली होती असं काही महिलांनी यात लिहिलं होतं.

मासिक पाळी

फोटो स्रोत, Getty Images

काही पोस्ट्समध्ये तर अगदी जिवंत वर्णन आढळलं. एका महिलेने लिहिलं होतं की, “माझ्या बाथरूममध्ये जर कधी ल्युमिनॉल (गुन्ह्याच्या ठिकाणी रक्ताचे डाग शोधण्यासाठी वापरले जाणारे रसायन) फवारले, तर माझ्या अंगणात अनेक खुनांचे अवशेष सापडले म्हणून पोलीस मला थेट तुरुंगातच डांबतील.”

अति-रक्तस्त्रावामुळे शिक्षण किंवा नोकरी सोडावी लागणे, तसेच लैंगिक आयुष्य सुरळीत न राहणे यांबद्दलच्या पोस्ट्सही त्यात होत्या. काहींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा उल्लेख होता.

तर काही अनुभव अतिशय हृदयद्रावक होते. पाळीचा त्रास इतका तीव्र आणि आयुष्य उद्ध्वस्त करणारा होता की अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचं यंग सांगतात.

ट्रान्सजेंडर पुरुष किंवा नॉन-बायनरी (Non-binary) व्यक्तींसाठी मासिक पाळी येणे हाच मुळात खूप मानसिक त्रास देणारा प्रकार असतो. आणि त्यात जास्त रक्तस्त्राव होणे म्हणजे जणू जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

“स्वतःची ओळख पुरुष म्हणून सांगणाऱ्या पण पाळीत प्रचंड रक्तस्त्रावाचा त्रास सहन करणाऱ्या अनेक ट्रान्सजेंडर व्यक्ती आमच्याकडं येतात. हा त्रास त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी आणि भयानक अनुभव असतो,” असे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया सॅन दिएगो रेडिज चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या बालरोग रक्तशास्त्रज्ञ जुली जाफ्रे सांगतात.

शेवटी पाळीत होणाऱ्या जास्त रक्तस्त्रावाचा वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम पुढे जाऊन शिक्षण आणि कामावरही दिसू लागतो. त्याचा फटका संपूर्ण समाजाला बसतो.

अल्स्टन सांगतात की, पाळीच्या दिवसांत त्यांची शाळा बुडायची. आईने जबरदस्ती शाळेत पाठवले तरी त्या तिथे जाऊन नर्सच्या रूममध्येच झोपून राहायच्या.

मासिक पाळी

फोटो स्रोत, Getty Images

युकेमध्ये पाळीत जास्त रक्तस्त्रावाचा त्रास असणाऱ्या मुलींची वर्षातून साधारण 9 दिवसांची शाळा चुकते. श्रीलंकेसारख्या कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये हे प्रमाण याहूनही अधिक असण्याची शक्यता सेनानायके व्यक्त करतात.

गरीब किंवा कमी सोयी-सुविधा असलेल्या भागांतील मुली ज्या शाळांमध्ये जातात तिथे त्यांना पॅड्स बदलण्यासाठी किंवा त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशा सुविधाच उपलब्ध नसतात.

वय वाढल्यावर या त्रासामुळे नोकरी-कामाचे दिवस बुडतात आणि चांगल्या संधी हातातून जातात. न्यूयॉर्कमध्ये ‘टेलिहेल्थ थेरपिस्ट’ म्हणजेच टेलिफोन आणि ऑनलाईनद्वारे थेरपी देणाऱ्या अल्स्टन यांना जेव्हा शेवटच्या वेळी पाळीत प्रचंड त्रास झाला होता तेव्हा त्यांना त्यांचे सत्र (सेशन) अर्ध्यावरच सोडावे लागले आणि त्यात त्यांचा एक क्लायंट हातातून गेला.

अल्स्टन म्हणतात, “मला होणाऱ्या वेदना इतक्या भयानक होत्या की मला समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकूच येत नव्हतं. मी थेट त्यांना सांगितले की, मी हे सेशन पूर्ण करू शकत नाही.” कॉल बंद केल्यानंतर त्या खुर्चीवरून उठल्या तेव्हा त्यांना भरपूर रक्त साचलेले दिसले.

“अति-रक्तस्त्रावाचा त्रास असणाऱ्या महिलांना वर्षातील सरासरी 3.6 आठवडे कामावर जाता येत नाही. यामुळे अर्थव्यवस्थेचे अब्जावधी रुपयांचे नुकसान होत आहे,” असं मेबिन सांगतात. “महिलांची ही समस्या आपण जर योग्य रीतीने सोडवू शकलो, तर त्याचा फायदा खरोखरच समाजातील प्रत्येक घटकाला होईल.”

उपचार आणि संशोधन

या समस्येवर योग्य तो मार्ग काढण्यासाठी अजून खूप काम करणे बाकी आहे. पाळीत होणाऱ्या जास्त रक्तस्त्रावावर उपचार उपलब्ध आहेत, पण “ते मुळीच पुरेसे नाहीत. या त्रासावर आपल्याकडे खूपच कमी उपचार पर्याय उपलब्ध आहेत, ही खरोखर चिंताजनक गोष्ट आहे.” असं युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन मेडिकल स्कूलच्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक एरिका मार्श म्हणतात.

पाळीतील अति-रक्तस्त्रावावरील उपचार हे त्यामागील मुख्य कारणावर अवलंबून असतात. रक्तस्त्राव अतिशय गंभीर नसेल तर आयब्युप्रोफेनसारख्या (Ibuprofen) वेदना कमी करणाऱ्या औषधांमुळे (Non-steroidal anti-inflammatory drugs) रक्ताचा प्रवाह कमी होण्यास मदत होऊ शकते.

याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या किंवा हार्मोन्स सोडणारे आययूडी (Hormonal intrauterine devices – IUD) यांसारखे हार्मोनल उपचार पर्यायही उपलब्ध आहेत. पाळीतील रक्तस्त्राव कमी करण्यासाठी हे सर्वाधिक प्रभावी उपायांपैकी एक मानले जातात.

हे उपचार सहजासहजी मिळणारे असले, तरी ते वापरण्यामागे काही अडचणी आहेत. जसं की गर्भाशयात ‘आययूडी’ बसवताना होणारा त्रास आणि वेदना.

अल्स्टन यांच्या बाबतीत गर्भनिरोधक गोळ्यांचा उपाय यशस्वी ठरला. परंतु त्यांच्या घरात या गोळ्यांबद्दल असलेल्या गैरसमजांमुळे आणि सामाजिक संकोचामुळे त्यांना मोठे होईपर्यंत वाट पाहावी लागली. पुढे कॉलेजसाठी घराबाहेर पडल्यानंतरच त्यांना या औषधांचे प्रिस्क्रिप्शन मिळाले.

मासिक पाळी

फोटो स्रोत, Prashanti Aswani

हार्मोनल उपचार पद्धती प्रत्येकासाठीच उपयोगी पडते असे नाही. आणि स्तनांमध्ये वेदना होणे किंवा मूड सतत बदलत राहणे यांसारख्या दुष्परिणामांमुळे अनेकदा महिला हे उपचार मध्येच सोडून देतात, असं मेबिन सांगतात. यावर ट्रॅनेक्सॅमिक ॲसिडसारखी हार्मोन्स नसलेली औषधं घेता येतात ज्यामुळे वाहणारे रक्त थांबण्यास मदत होते.

“पण अडचण अशी आहे की, हे उपाय एखाद्या मलमपट्टीसारखे तात्पुरते असतात,” असं जाफ्रे म्हणतात. यामुळं जास्त रक्तस्त्राव होण्यामागचं मुख्य कारण मात्र दूर होत नाही.

फक्त औषधोपचारांनी ही समस्या नेहमीच सुटत नाही. वयाच्या पस्तीशीत अल्स्टन यांनी काही दिवस गर्भनिरोधक गोळ्या बंद केल्या तेव्हा त्यांना पाळीचा त्रास पुन्हा पूर्वीसारखाच तीव्रतेने सुरू झाला.

सोबतच मूड बदलण्याचा त्रासही खूप वाढला. शेवटी त्या एका स्त्रीरोगतज्ज्ञांकडे गेल्या. डॉक्टरांनी सोनोग्राफी केली तेव्हा त्रास कशा मुळे होतो याची काही कारणं समोर आली.

डॉक्टर त्यांना काय म्हणाल्या, हे अल्स्टन सांगताना म्हणाल्या की, “आता गर्भनिरोधक गोळ्यांचा विचार सोडून द्या. तुमच्या गर्भाशयावर 7 ते 8 मोठ्या गाठी आहेत आणि तुम्हाला एंडोमेट्रिओसिस असण्याची शक्यता आहे.”

एंडोमेट्रिओसिस म्हणजे ज्यामध्ये गर्भाशयाच्या आत असणारे पडदे किंवा उती बाहेरच्या बाजूने वाढू लागतात ज्यामुळे खूप वेदना होतात.

या सगळ्यामुळे त्यांनी ऑपरेशन करून संपूर्ण गर्भाशयच काढून टाकण्याचा मार्ग निवडला. खरं तर पाळीत जास्त रक्तस्त्राव होणं हेच अनेक महिलांचे गर्भाशयाची शस्त्रक्रिया करून घेण्यामागचं खूप मोठं कारण असतं. अल्स्टन यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्या समाधानी आहेत. आणि पाळीच्या या तीव्र त्रासातून त्यांची कायमची सुटका झाली.

पण साहजिकच गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे. ती कायमस्वरूपी असते आणि त्यामुळे पुढे गरोदर राहणे अशक्य होते. हे विशेषतः तेव्हा अधिक त्रासदायक ठरते जेव्हा डॉक्टर रुग्णाच्या स्वतःच्या आरोग्यापेक्षा ती मूल जन्माला घालू शकते की नाही या गोष्टीला जास्त महत्त्व देतात.

यंग यांच्या संशोधनातील एका सहभागी महिलेला आधीच 3 मुलं होती आणि तिच्या नवऱ्याची नसबंदी झालेली होती. तरीही तिच्या डॉक्टरांनी तिला अति-रक्तस्त्रावाच्या उपचारासाठी गर्भाशयाची शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला.

कदाचित भविष्यात या महिलेचा घटस्फोट झाला आणि तिने मूल हवे असणाऱ्या दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले तर, अशी शक्यता डॉक्टरांनी गृहीत धरली होती असं यंग सांगतात.

आपल्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याची चीड आणि खंत मेबिन यांच्या मनात होती. यातूनच त्यांनी ‘द मिस्ड व्हायटल साईन’ या मोठ्या जागतिक संशोधन उपक्रमाचे नेतृत्व केले. या कार्यक्रमाला ‘वेलकम लीप’ (Wellcome Leap) या आरोग्य क्षेत्रातील धर्मादाय संस्थेने निधी पुरवला आहे.

या कार्यक्रमाचं नाव एका खास कल्पनेवर आधारित आहे. जसं रक्तदाब, शरीराचं तापमान किंवा हृदयाचे ठोके यांवरून शरीराचं आरोग्य समजतं. अगदी तसेच पाळीत होणारे बदल हेसुद्धा शरीरातील इतर आजारांचे पहिले संकेत असू शकतात.

मासिक पाळी

फोटो स्रोत, Getty Images

येत्या 3 वर्षांमध्ये 13 संशोधकांची टीम एकत्र येऊन काम करणार आहे. पाळीत जास्त रक्तस्त्राव होणाऱ्या समस्येचे निदान आणि उपचार मिळायला सध्या जगात सरासरी 5 वर्षे लागतात. हा वेळ कमी करून तो फक्त 5 महिन्यांवर आणणे हे या टीमचे ध्येय आहे.

या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल म्हणून मेबिन यांना अति-रक्तस्त्राव आणि त्यामागील कारणे काय आहेत हे सखोलपणे शोधून काढायची आहे. यासोबतच या त्रासाचे निदान लवकर कसे करता येईल यावरही भर दिला जाणार आहे.

यातील काही प्रकल्पांतर्गत पाळीच्या रक्तातील ‘बायोमार्क्स’ (अति-रक्तस्त्रावाचे रासायनिक संकेत) शोधणे, पाळीत वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांद्वारे रक्तस्त्रावावर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्ट सेन्सर्स तयार करणे तसेच स्मार्टफोन आणि ‘वेअरेबल्स’च्या डेटाचा वापर करून शरीरातील आयर्नची पातळी कमी होण्याचा धोका ओळखणारी साधनं विकसित करण्याचे काम केले जाईल.

मेबिन यांच्या मते, या कामासाठी हीच योग्य वेळ आहे. जीनोम्स किंवा डीएनएचा वेगाने अभ्यास करणारे नवीन तंत्रज्ञान आता उपलब्ध होत आहे.

मेबिन म्हणतात, “पूर्वी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महिलांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी कधी केला नाही. पण आता ही परिस्थिती बदलण्याची आणि हे तंत्रज्ञान वापरण्याची वेळ आली आहे.”

याचप्रमाणे पाळीतील अति-रक्तस्त्रावाच्या समस्येवर मात करण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांसोबत रक्तविकारतज्ज्ञांनीही एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. असा आग्रह जाफ्रे यांनी धरला आणि या क्षेत्रात रक्तविकारतज्ज्ञांना जोडण्याचं काम केलं आहे.

उदाहरणार्थ अमेरिकेतील ‘द फाउंडेशन फॉर विमेन अँड गर्ल्स विथ ब्लड डिसऑर्डर्स’ ही संस्था तेथील ‘हेमोफिलिया उपचार केंद्रां’मध्ये महिला आणि मुलींच्या उपचारांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी आधीपासूनच कार्यरत आहे.

पण या सगळ्या सुधारणांचा खरा फायदा तेव्हाच होईल जेव्हा पाळीत जास्त रक्तस्त्राव होणाऱ्या महिलांना हे नवीन उपचार आणि चाचण्या प्रत्यक्षात वापरता येतील. म्हणूनच मार्श त्यांच्या परिसरातील कृष्णवर्णीय आणि हिस्पॅनिक महिलांसोबत काम करून नवनवीन उपाय शोधत आहेत.

अमेरिकेत गोऱ्या महिलांपेक्षा या महिलांमध्ये ॲनिमिया होण्याचे प्रमाण जास्त आहे. परिसरातील विश्वासू लोकांची मदत घेतल्यास या आजारांविषयी लोकांमध्ये जागरुकता वाढेल आणि महिलांना योग्य उपचारांपर्यंत कसे पोहोचवता येईल हे शोधणे सोपे जाईल असा विश्वास मार्श यांना वाटतो.

पाळीत जास्त रक्तस्त्राव होण्याच्या समस्येवर अधिक संशोधन आणि चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळणे किती गरजेचे आहे हे आता डॉक्टरांना आणि शास्त्रज्ञांनाही समजू लागले आहे. यामुळे महिलांना आयर्नच्या कमतरतेमुळे येणारी मानसिक सुस्ती, काम किंवा शाळेचा खोळंबा न होता आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करत आयुष्य जगता येईल. “महिलांच्या आरोग्याकडे अधिक गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. या जगात समान हक्काने जगण्यासाठी आम्हाला योग्य उपचारांची गरज आहे.” असं अल्स्टन सांगतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC