Home LATEST NEWS ताजी बातमी ‘माहीत असूनही मॉडेलिंग एजन्सीने मला एपस्टीनच्या घरी पाठवलं,’ रेप सर्व्हायवरने काय सांगितलं?

‘माहीत असूनही मॉडेलिंग एजन्सीने मला एपस्टीनच्या घरी पाठवलं,’ रेप सर्व्हायवरने काय सांगितलं?

7
0

Source :- BBC INDIA NEWS

रोझाने आपली कहाणी बीबीसीला सांगण्याचा निर्णय घेतला आहे.

जेफ्री एपस्टीनने अत्याचार केलेल्या एका महिलेनं मॉडेलिंग एजन्सीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत.

एजन्सीच्या अध्यक्षांनी तिला फ्लोरिडातील एपस्टीनच्या समुद्रकिनाऱ्यावरील घरी दोन वेळा फोटोशूटसाठी पाठवलं होतं. त्यामुळे आपला जीव धोक्यात आला, असं या महिलेचं म्हणणं आहे. एपस्टीनला लैंगिक गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आलं होतं.

त्यावेळी म्हणजे 2009 मध्ये, अल्पवयीन मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात एपस्टीन तुरुंगवासाची शिक्षा भोगत होता. परंतु, त्याला दररोज आपल्या घरातून काम करण्याची परवानगी होती.

बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला तिनं सांगितलं, “माझ्या सुरक्षेची जबाबदारी मॉडेलिंग एजन्सीची होती. पण त्यांनी ती पार पाडली नाही. उलट त्यांनी मला धोक्यात टाकलं. त्यामुळे यासाठी त्यांनाच जबाबदार धरलं पाहिजे.”

रोझा 18 वर्षांची असताना तिला पहिल्यांदा एपस्टीनच्या पाम बीचमधील घरी पाठवण्यात आलं होतं. त्यावेळी ती अमेरिकेत येऊन जेमतेम 1 महिना झाला होता. ती उझबेकिस्तानमधून अमेरिकेत आली होती.

एमसी2 मॉडेल मॅनेजमेंटच्या अमेरिकेतील शाखेनं तिला तिथे पाठवलं होतं. त्यावेळी या शाखेचे अध्यक्ष जेफ फुलर होते. आता ते अमेरिकेतील ‘द सोर्स मॉडेल्स’ ही दुसरी मॉडेलिंग एजन्सी चालवतात.

रोझा सांगते, “मी कुठे जात आहे, याची माझ्या एजन्सीला पूर्ण माहिती होती. त्यामुळे मला कुठे पाठवलं जात आहे, हे जेफ यांनाही माहिती होतं.”

एपस्टीनच्या घरी दुसऱ्यांदा फोटोशूट केल्यानंतर रोझाला पाम बीचवरून घरी परतण्यासाठी लागणारं विमानाचं तिकीट जेफ फुलर यांनी स्वतः बुक केलं होतं. या खर्चाचा तपशील रोझाने आम्हाला दाखवला. परंतु, रोझा एपस्टीनच्या घरी जाणार आहे, हे आपल्याला माहीत नव्हतं, असा दावा फुलर यांनी यापूर्वी केला होता.

रोझाच्या म्हणण्यानुसार, या फोटोशूटनंतर एपस्टीनने तिला आपली सहाय्यक म्हणून कामावर ठेवलं. इतर पीडित महिलांनीही सांगितलं आहे की, तरुण महिलांवर अत्याचार सुरू ठेवण्यासाठी, त्यांचे शोषण करण्यासाठी एपस्टीनने सहाय्यक म्हणून नोकरी देण्याचा एक डाव आखला होता.

जेफ फुलर आता 'द सोर्स मॉडेल्स' ही मॉडेलिंग एजन्सी चालवतात.

रोझाच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर एपस्टीनने तिच्यावर बलात्कार केला.

बीबीसीने केलेल्या आरोपांवर जेफ फुलर यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रोझावर अत्याचार होत असल्याची आपल्याला माहिती नव्हती, असं त्यांनी यापूर्वी म्हटलं आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने (डीओजे) एपस्टीनशी संबंधित काही कागदपत्रे प्रसिद्ध केली. त्यातून एमसी2 या मॉडेलिंग एजन्सीच्या 10 मॉडेल्स शिक्षा झाल्यानंतरही एपस्टीनला भेटल्या होत्या किंवा त्याच्या संपर्कात होत्या, अशी माहिती आम्हाला मिळाली.

या कागदपत्रांमधून आणखी एक गोष्ट समोर आली आहे. 2005 मध्ये एपस्टीनने एमसी2 मॉडेलिंग एजन्सीला 10 लाख डॉलर (सुमारे 9 कोटी 40 लाख रुपये) दिले होते. परंतु, 2 वर्षांनंतर या एजन्सीच्या मालकांनी एका अमेरिकन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एपस्टीनचा त्यांच्या कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं होतं.

बीबीसी आयला मिळालेल्या उत्तरांमधून मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या आणखी 2 व्यक्तींच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांनुसार, या दोघांचेही एपस्टीनशी जवळचे संबंध होते. त्यापैकी एक माजी एजंट रॅमसे एल्खोली आणि दुसऱ्या मॉडेलिंग एजन्सीच्या संचालक फेथ केट्स आहेत.

गेल्या वर्षी अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटलं होतं की, या प्रकरणात गुन्हा दाखल न झालेल्या इतर व्यक्तींविरोधात पुढील तपास करण्याची गरज असल्याचा कोणताही पुरावा मिळून आलेला नाही. परंतु, न्यूयॉर्क राज्याचे सिनेटर झेलनॉर मायरी यांनी या दाव्याला आव्हान दिले आहे.

एपस्टीनला मदत करणाऱ्या लोकांची चौकशी करण्यासाठी पोलिसांना अधिक अधिकार मिळावेत, यासाठी त्यांनी मानवी तस्करीविरोधात एक नवीन विधेयक मांडलं आहे.

एपस्टीनच्या अत्याचारांबद्दल ज्यांना माहिती होती किंवा माहिती असायला हवी होती, अशा सर्वांना जबाबदार धरलं जावं, अशी आपली इच्छा असल्याचं सिनेटर मायरी यांनी बीबीसीला सांगितलं.

अमेरिकेतील मॉडेल्सना अधिक संरक्षण मिळावं यासाठी काम करणाऱ्या ‘मॉडेल अलायन्स’ या संघटनेच्या संस्थापक सारा झिफ यांनीही या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

“अनेकदा मॉडेलिंग एजन्सीच अडचणीचं कारण ठरतात. मॉडेल्स आणि त्यांचं शोषण करणाऱ्या पुरुषांमधला दुवा म्हणून त्या काम करत असतात.”

रोझा सांगते की, एमसी2 एजन्सीने तिला ज्या फोटोशूटसाठी पाठवलं होतं, तिथे कॅमेऱ्यामागे कोणताही व्यावसायिक फोटोग्राफर नव्हता. त्यावेळी एपस्टीनची प्रेयसी असलेली नादिया मार्सिन्को फोटो काढत होती.

रोझाच्या म्हणण्यानुसार, तिथलं फोटोशूट खूप ‘विचित्र’ होतं. ‘तिथे कोणीही स्टायलिस्ट नव्हता’ आणि काढलेले फोटोही कधी वापरण्यात आले नाहीत. त्यामुळे एपस्टीन आणि एमसी2 एजन्सीने मिळून या फोटोशूटचं आधीच नियोजन केलं होतं, असा तिचा आता ठाम विश्वास आहे.

न्याय विभागाच्या कागदपत्रांमधील फुलर यांनी एपस्टीनला पाठवलेल्या एका ईमेलमधून मॉडेलिंग एजन्सी आणि एपस्टीन यांच्यातील घनिष्ठ संबंध स्पष्ट होतात.

मार्च 2012 मध्ये फुलर यांनी दुसऱ्या एका मॉडेलबद्दल एपस्टीनला ईमेल केला होता. त्यात ते म्हणतात, “तुम्ही सांगितलं नसतं, तर आम्ही तिला काही महिन्यांपूर्वीच कामावरून काढलं असतं. ती अनेक गोष्टी इतरांना सांगत असते, त्यामुळे तिच्याबाबतीत मी सावध राहीन.”

2019 मध्ये एपस्टीनला दुसऱ्यांदा अटक झाल्यानंतर एका महिन्याने एमसी2 मॉडेलिंग एजन्सीची अमेरिकेतील शाखा बंद करण्यात आली. त्यानंतर जेफ फुलर यांनी ‘द सोर्स मॉडेल्स’ ही नवीन एजन्सी सुरू केली. ही एजन्सी अजूनही सुरू आहे. बीबीसीच्या तपासात असं आढळून आलं की, एमसी2 मधील 50 मॉडेल्सना फुलर यांच्या नव्या एजन्सीत पाठवण्यात आलं होतं.

बीबीसीने आपल्या तपासातून समोर आलेल्या माहितीवर प्रतिक्रिया विचारण्यासाठी ‘द सोर्स मॉडेल्स’ या एजन्सीशी संपर्क साधला. परंतु, एजन्सीने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

एपस्टीनला मॉडेलिंग एयटजन्सींचा चांगलाच उपयोग होत होता, असं एपस्टीनच्या 100 हून अधिक पीडित महिलांची बाजू मांडणाऱ्या प्रमुख वकील सिग्रिड मॅककॉली यांनी सांगितलं.

“एपस्टीन अनेकांना सांगायचा की, त्याला दररोज 3 वेगवेगळ्या मुली हव्या आहेत. जरा विचार करा, ही संख्या किती मोठी आहे. एपस्टीनला कोणत्या प्रकारच्या तरुणी आवडतात, हे ओळखून त्याच्यासाठी मुली शोधण्याचं काम मॉडेलिंग एजन्सींचे स्काऊट्स करत होते. त्यामुळे त्यांची भूमिका खूप महत्त्वाची होती.”

माजी एजंट रॅमसे एल्खोली यांच्याबाबतीत बीबीसी आयच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी 34 महिलांची एपस्टीनशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला होता. यात एका 18 वर्षीय शाळकरी मुलीचाही समावेश होता.

एका महिलेच्या अनुभवातून असं समोर येतं की, एपस्टीनच्या सहाय्यकांनाही हळूहळू त्याच्या अत्याचारांच्या जाळ्यात सामील करून घेतलं जात होतं.

लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमधील मृत गुन्हेगार जेफ्री एपस्टीन

न्याय विभागाच्या कागदपत्रांनुसार, एल्खोली यांनी एपस्टीनला एक सल्ला दिला होता. एपस्टीनच्या एका महिला सहाय्यकाने आधी या महिलेशी मैत्री करावी आणि त्यानंतर तिची एपस्टीनशी ओळख करून द्यावी, असं त्यांनी सुचवलं होतं.

बीबीसीने या महिलेशी बातचीत केली. तिने सांगितलं की, वयाच्या 19व्या वर्षी एपस्टीनशी पहिल्यांदा भेट झाली, तेव्हाच त्याने न्यूयॉर्कमधील आपल्या आलिशान टाऊनहाऊसमध्ये तिचं लैंगिक शोषण केलं होतं.

रॅमसे एल्खोली यांनी बीबीसीला सांगितलं, “माझ्यावर केलेले सर्व आरोप मी फेटाळतो. मला कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराची माहिती नव्हती आणि अशा अत्याचारांना मी कधीही मदत केली नाही. त्यावेळी मला एपस्टीनने 2008 मध्ये दाखल झालेल्या खटल्याबद्दल जे सांगितलं, तेवढंच माहीत होतं. त्याने सांगितलेली माहिती मी चुकीच्या समजुतीतून खरी मानली होती.”

ते पुढे म्हणाले, “एपस्टीनच्या जवळच्या वर्तुळातील महिलाच इतर महिलांना त्याच्या जाळ्यात ओढत असत, असं उपलब्ध कागदपत्रांमधून आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधून दिसतं. परंतु, माझा अशा लोकांशी किंवा अशा कोणत्याही गोष्टीशी संबंध नव्हता. मॉडेल्सना व्यावसायिक कामाच्या संधी मिळाव्यात, हाच माझा हेतू होता. त्यासाठी मी त्यांची ओळख अनेक लोकांशी संपर्क असलेल्या एका व्यक्तीशी करून देत होतो.”

वकील सिग्रिड मॅककॉली म्हणतात, एपस्टीनच्या या महिला सहाय्यकांना कसं वागायचं, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. त्यांच्याकडे ‘दुसरा पर्यायच’ नव्हता.

“या तरुण सर्व्हायवर महिलांवर नियमितपणे अत्याचार होत होते. त्यांचं काम आणि उपजीविका धोक्यात होती. त्यामुळे त्यांना सांगितल्याप्रमाणे वागण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.”

आम्ही पूर्व युरोपमधील आणखी एका मॉडेलशी बोललो. तिचं नाव सिमोना (हे तिचं खरं नाव नाही) आहे. तिने सांगितलं की, एपस्टीनने तिच्यावर 200 हून अधिक वेळा बलात्कार केला होता.

सिमोना म्हणते, “लोकांना वाटतं की, आम्ही काहीतरी मिळवण्यासाठी या अत्याचारांना संमती दिली होती. त्यामागे पैसे मिळवणं किंवा प्रभावशाली लोकांशी ओळख करून घेणं, असा आमचा हेतू होता. पण हे खरं नाही. या सर्वामुळे आमच्यावर खोल मानसिक आघात झाला आहे.”

सिमोनाच्या म्हणण्यानुसार, एपस्टीनला ती पहिल्यांदा भेटली तेव्हा तिचं वय 20 वर्षं होतं. त्यावेळी ती न्यूयॉर्कमधील एका मॉडेलिंग एजन्सीशी आधीच करारबद्ध झाली होती. एपस्टीनने तिची आपली जवळची मैत्रीण फेथ केट्सशी ओळख करून देण्याची तयारी दाखवली होती.

त्यावेळी फेथ केट्स या जगातील सर्वात मोठ्या मॉडेलिंग एजन्सींपैकी एक असलेल्या ‘नेक्स्ट मॅनेजमेंट’च्या प्रमुख होत्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांनी हे वरिष्ठ पद सोडलं. परंतु, कंपनीच्या अधिकृत नोंदींमध्ये त्यांचं नाव अजूनही संचालक म्हणून आहे.

सिमोना सांगते की, एपस्टीनच्या सांगण्यावरून फेथ केट्स यांनी तिची भेट घेतली होती.

सिमोनाच्या म्हणण्यानुसार, या भेटीत केट्स यांनी तिला प्लास्टिक सर्जरी करून घेण्याचा सल्ला दिला. तसेच, एका डॉक्टरची माहिती एपस्टीनला पाठवली.

फेथ केट्स यांच्याबरोबर भेट झाल्यानंतर एपस्टीनने सिमोनाला मॉडेलिंग सोडण्यासाठी राजी केलं, असं तिचं म्हणणं आहे.

रोझाप्रमाणेच आणि एपस्टीनच्या इतर अनेक पीडित महिलांप्रमाणे सिमोनाही त्याची सहाय्यक बनली. पुढची जवळपास 2 वर्षे एपस्टीनने तिच्यावर बलात्कार केले आणि तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवलं, असं ती सांगते.

न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांनुसार, एपस्टीनने फेथ केट्स यांना आणखी 5 मॉडेल्सना भेटण्यास सांगितलं होतं. पण, यापैकी किती जणींच्या प्रत्यक्ष भेटी झाल्या, हे स्पष्ट झालेलं नाही.

फेथ केट्स यांच्या वकिलांनी बीबीसीला सांगितलं, “जेफ्री एपस्टीन लोकांना आपल्या जाळ्यात ओढण्यात तरबेज होता. त्याने केट्स यांचीही दिशाभूल केली होती. त्याच्याबद्दल आज आपल्याला जी माहिती आहे, ती त्यावेळी केट्स यांना असती, तर त्यांनी त्याच्याशी कधीही संबंध ठेवले नसते.”

त्यांनी पुढे सांगितलं की, केट्स यांनी कोणत्याही मॉडेलला प्लास्टिक सर्जरी करून घेण्यास कधीही सांगितलं नव्हतं.

बीबीसीने याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘नेक्स्ट मॅनेजमेंट’शी संपर्क साधला. परंतु, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

मायरी यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांचं विधेयक कायद्यात रूपांतरित झालं, तर एपस्टीन काय करत होता, याची माहिती असूनही किंवा ती माहिती असायला हवी असतानाही तुम्ही मॉडेल्सना त्याच्याकडे पाठवत असाल, तर तुम्हाला त्यासाठी जबाबदार धरलं जाईल.

आपली कहाणी सांगितल्यामुळे इतरांनाही पुढे येऊन आपले अनुभव सांगण्याचं धैर्य मिळेल, अशी रोझाला आशा आहे.

“अशा अनेक पीडित महिला आहेत, ज्या कधीच आपल्यावर झालेल्या अत्याचारांबद्दल बोलत नाहीत. कारण त्यांना भीती वाटते. त्यामुळे माझ्यासारख्या इतर सर्व्हायवर महिलांना मी सांगू इच्छिते की, आता तुम्ही मला ओळखता. तुम्हाला माझं नाव माहीत आहे. तुम्हीही पुढे या आणि माझ्याशी संपर्क साधा.”

(अन्निका ग्रॉसर याचं अतिरिक्त वार्तांकन.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC