Home LATEST NEWS ताजी बातमी ‘मुलानं खेळताना चुकून वडिलांच्या वृषणांवर लाथ मारली, आठवडाभर वेदना, पण अखेर त्यामुळेच...

‘मुलानं खेळताना चुकून वडिलांच्या वृषणांवर लाथ मारली, आठवडाभर वेदना, पण अखेर त्यामुळेच जीव वाचला’

5
0

Source :- BBC INDIA NEWS

'मोव्हेंबर'चा दूत (ॲम्बेसेडर) म्हणून बेन पुरुषांना आपल्या मित्रांची विचारपूस करण्याचं आणि एकमेकांची काळजी घेण्याचं आवाहन करतात.

बेन लिजी आपल्या 4 वर्षांच्या मुलासोबत बागेत खेळत होते. खेळता खेळता चुकून मुलाने त्यांच्या वृषणावर (अंडकोष) लाथ मारली. परंतु, या घटनेमुळेच त्यांना कॅन्सर असल्याचं समजलं आणि कदाचित त्यामुळेच त्यांचे प्राणही वाचले.

आठवडाभरानंतरही वेदना कमी न झाल्याने बेन यांनी डॉक्टरांकडे जाण्याचा निर्णय घेतला. तपासणीनंतर त्यांना वृषणाचा कॅन्सर असल्याचं समजलं.

पुरुषांसाठी काम करणाऱ्या ‘मोव्हेंबर’ या संस्थेच्या एका नवीन अहवालानुसार, वेल्समध्ये 3 पैकी एका पुरुषाचा मृत्यू वयाची 75 वर्षं पूर्ण होण्याआधीच होतो. पुरुषांच्या आरोग्यासाठी एक विशेष योजना तयार करावी, अशी मागणी या संस्थेने वेल्स सरकारकडे केली आहे.

पुरुषांसमोरील आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी जीव देण्यापासून रोखणे, स्वतःला इजा करण्यापासून रोखणे, मानसिक आरोग्य आणि कॅन्सर यांसाठी पूर्वीपासूनच योजना सुरू असल्याचं सरकारने सांगितलं आहे.

(सूचना : या लेखात आत्महत्येविषयी चर्चा केली आहे.)

कार्डिफमध्ये राहणारे लिजी सांगतात की, त्यांच्या मुलाची लाथ लागल्यानंतर त्यांच्या वृषणाला ‘क्रिकेटच्या चेंडूएवढी’ सूज आली होती. परंतु, हा त्रास आपोआप बरं होईल, असं वाटल्याने त्यांनी डॉक्टरांकडे (जीपी) जाणं टाळलं होतं.

“पुरुषांबाबत अशा गोष्टी घडणं सामान्य असतं. त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि ‘आपोआप बरं होईल’ असं समजून गप्प बसतो,” असं ते म्हणाले.

“2 लहान मुलं असल्यामुळे घरात खूप गडबड असायची. इतरही अनेक गोष्टी सुरू असायच्या.”

कर्करोगातून पूर्णपणे बरे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर लिजी यांच्यासमोर एक वेगळंच आव्हान उभं राहिलं.

ते म्हणाले, “मला वाटत होतं की मी ठीक आहे. पण 5 वर्षांनंतर माझी पत्नी म्हणाली, ‘तू ठीक आहेस असं मला वाटत नाही. तू कोणाशी तरी बोलायला हवं.'”

“माझ्या स्वभावात बदल झाल्याचं तिच्या लक्षात येत होतं. मी पूर्वीपेक्षा कमी बोलू लागलो होतो, लोकांशी जास्त वाद घालत होतो, संयम कमी झाला होता. मी पूर्वीसारखा राहिलो नव्हतो.”

समुपदेशनानंतर लिजी यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली. आता पुरुषांना आणि मुलांना अधिक मदत व आधार मिळावा, यासाठी ते प्रयत्न करताना दिसत आहेत.

पुरुषांचा मृत्यू कमी वयात का होतो?

शारीरिक किंवा मानसिक त्रास होत असतानाही अनेक पुरुष मदतीसाठी डॉक्टरांकडे जाणं किंवा कोणाशी बोलणं टाळतात. पुरुषांचा मृत्यू कमी वयात होण्यामागे हे एक अत्यंत महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जातं.

‘मोव्हेंबर’च्या अहवालानुसार, 2024 मध्ये जवळपास 7 हजार पुरुषांचा वयाची 75 वर्षे पूर्ण होण्याआधीच मृत्यू झाला.

महिलांमध्ये कमी वयात मृत्यू होण्याचं प्रमाण यापेक्षा खूप कमी असून ते 28 टक्के इतकं आहे.

या अहवालानुसार, अनेक पुरुषांचा मृत्यू अशा आजारांमुळे होतो, जे टाळता येऊ शकतात किंवा ज्यांचं लवकर निदान आणि उपचार केल्यास जीव वाचू शकतो.

यात काही प्रकारचे कॅन्सर, हृदय, फुफ्फुस आणि यकृताचे आजार, अमली पदार्थ आणि मद्यापानाशी संबंधित होणारे त्रास आणि आत्महत्येचा समावेश आहे.

पुरुष कुठे राहतात, याचाही त्यांच्या आयुष्यावर परिणाम होतो. ब्लेनॉ ग्वेंटमध्ये पुरुषांचा वयाच्या 75 वर्षांपूर्वीच मृत्यू होण्याचं प्रमाण पॉविसच्या तुलनेत सुमारे 60 टक्क्यांनी जास्त आहे.

सर्वाधिक गरीब आणि वंचित भागांमध्ये राहणाऱ्या पुरुषांचं आयुर्मान सर्वात कमी वंचित भागांमध्ये राहणाऱ्या पुरुषांपेक्षा 7.5 वर्षांनी कमी असू शकतं.

या अहवालानुसार, पुरुषांचा कमी वयात मृत्यू होण्यामागील प्रमुख 5 कारणांमुळे वेल्सच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी सुमारे 1.4 अब्ज पौंडांचं (सुमारे 17,900 कोटी रुपये) नुकसान होतं.

जोनाथन स्कॉरफिल्ड म्हणतात, तरुणांवर आधीपासूनच अनेक गोष्टींचा दबाव असतो. त्यात सोशल मीडियाचीही मोठी भर पडते आणि त्याचा त्यांच्यावर प्रभाव पडतो.

कार्डिफ विद्यापीठातील ‘सोशल केअर’ विषयाचे प्राध्यापक जोनाथन स्कॉरफिल्ड म्हणाले, “विशेषतः तरुण पुरुष जास्त धोकादायक गोष्टी करतात. त्यामुळे त्यांना दुखापत होण्याची किंवा मृत्यू येण्याची शक्यता जास्त असते. पुरुषांनी शारीरिकदृष्ट्या ताकदवान असलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांच्यावर असते.”

काही पुरुष मित्रमैत्रिणी आणि इतर लोकांशी चांगले संबंध ठेवणं (सोशल नेटवर्क) महत्त्वाचं मानत नाहीत. तर काही पुरुष यासाठी आपल्या महिला जोडीदारावर अवलंबून राहतात, असंही त्यांनी सांगितलं.

“अशा पुरुषांच्या पत्नीचा मृत्यू झाला किंवा ते निवृत्त झाले, तर त्यांना एकटेपणाचा सामना करणं खूप कठीण जातं,” असं ते म्हणाले.

“आहार हा आरोग्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पण, फळं आणि भाज्यांसारखे आरोग्यदायी पदार्थ खाणं म्हणजे पुरुषीपणा नाही, असं काही जणांना वाटतं. याउलट, भरपूर मद्यपान करण्यासारख्या आरोग्यासाठी घातक सवयी म्हणजे मुलगा मोठा होऊन पुरुष बनत असल्याचं लक्षण आहे, असंही मानलं जातं,” असंही ते नमूद करतात.

जड उद्योग आणि शारीरिक श्रमाची कामं कमी झाली असली, तरी ‘पुरुषीपणा’बद्दलच्या जुन्या कल्पना आजही तरुणांमध्ये कायम आहेत. सोशल मीडिया आणि तिथल्या ‘इन्फ्लुएन्सर्स’कडून या कल्पना तरुणांपर्यंत पोहोचत आहेत, असं स्कॉरफिल्ड यांनी सांगितलं.

या अहवालात म्हटलं आहे की, पुरुषांच्या आरोग्यासाठी योजना तयार केल्यास 2024 मध्ये जाहीर झालेल्या महिलांच्या आरोग्यविषयक योजनेला पूरक ठरेल. यासाठी ‘अगदी नव्याने सुरुवात’ करावी लागणार नाही, कारण पुरुषांना मदत आणि आधार मिळावा यासाठी अनेक संस्था पूर्वीपासूनच कार्यरत आहेत.

कॅलम टिप्टन सांगतात की, 'मेनट्राइब' ही संस्था पुरुषांना पबमध्ये जाण्याऐवजी किंवा पैसे खर्च करण्याऐवजी एकत्र येऊन मोकळेपणाने बोलण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देते.

मेनट्राइब हा बँगोर आणि एरिरी (स्नोडोनिया) परिसरात काम करणारा मदत गट (हेल्प ग्रुप) आहे. मैदानी आणि साहसी उपक्रमांच्या माध्यमातून पुरुषांची मानसिक आणि शारीरिक तब्येत सुधारावी, त्याचबरोबर कठीण परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता वाढावी, यासाठी हा ग्रुप काम करतो.

एकटेपणावर मात करण्यासाठी 34 वर्षीय कॅलम यांनी पुरुषांच्या ग्रुपला सोबत घेऊन डोंगरात फिरायला म्हणजेच हायकिंगला जाण्यास सुरुवात केली.

“शारीरिक हालचालींमुळे किंवा सक्रियतेमुळे शरीरात नैसर्गिकरीत्या एंडोर्फिन्स नावाचं रसायन तयार होतं. त्यामुळे माणसाला बरं वाटतं. त्यातच, जेव्हा पुरुष मन मोकळं करून आपल्या अडचणींबद्दल बोलतात, तेव्हा ते अधिक मोकळे आणि शांत होतात,” असं ते म्हणाले.

मेनट्राइबच्या वतीने पुरुषांना मनावरील ताण कमी करता यावा, यासाठी दर महिन्याला डोंगरभ्रमंती (हाइक्स) आणि दर आठवड्याला फुटबॉलचा सामना आयोजित केला जातो.

बँगोर येथील गॅव्हिन रॉबर्ट्स यांना 5 वर्षांपूर्वी जुळी मुलं झाली. परंतु, दोघांपैकी एका बाळाचा मृत्यू झाला. कारण, दोन्ही बाळांवर परिणाम करणारा ‘ट्विन टू ट्विन सिंड्रोम’ (जुळ्या मुलांमधील रक्तपुरवठ्यातील असंतुलन) हा आजार त्यांना झाला होता.

त्यांचा आता 5 वर्षांचा मुलगाही गंभीर आजाराने ग्रस्त आहे. त्याच्या हृदयाचा डावा भाग पूर्णपणे विकसित झालेला (हायपरप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम) नाही. त्यामुळे त्याच्या हृदयाचा केवळ अर्धाच भाग काम करतो आणि केवळ एकच फुफ्फुस व्यवस्थित काम करतं.

44 वर्षीय रॉबर्ट्स म्हणाले, “या सर्व परिस्थितीचा सामना मी स्वतःच करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे खूप कठीण होतं, कारण यातून आपण नेमकं काय सहन करत आहोत, हे मित्र आणि कुटुंबीयांनाही क्वचितच समजू शकतं.”

“साधारण 2 वर्षांपूर्वी मला मेनट्राइब या ग्रुपबद्दल समजलं. मला वाटलं की, डोंगरात फिरायला जाताना सोबत कोणीतरी असेल तर बरं होईल. कारण मी अनेकवेळा एकटाच डोंगरात फिरायला जायचो.”

“माझ्या काही मित्रांनी आत्महत्या केली, पण इतर पुरुषांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा, इतकीच माझी इच्छा आहे. त्यांनी सुरुवातीला एकत्र फिरायला जावं, गप्पा माराव्यात. बोलावंसं वाटत नसेल, तरी हरकत नाही. निदान एकत्र फिरायला आणि शारीरिक हालचाल करायला तरी सुरुवात केली पाहिजे.”

गॅव्हिन यांच्या मते, पुरुषांना आपल्या जवळच्या व्यक्तींपेक्षा अनोळखी लोकांशी मनातलं बोलणं अधिक सोपं वाटतं.

जुगाराच्या व्यसनातून सावरण्याचा प्रयत्न करणारे वेल्सचे प्रसिद्ध फुटबॉलपटू जॉन हार्टसन हेही पुरुषांच्या आरोग्यासाठी वेल्समध्ये विशेष योजना सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्यांपैकी एक आहेत.

जुलै 2009 मध्ये हार्टसन यांच्यावर तातडीची मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना वृषणाचा कॅन्सर (टेस्टिक्युलर कॅन्सर) झाला होता आणि तो मेंदू व फुफ्फुसांपर्यंत पसरल्याचं समोर आलं होतं.

ते म्हणाले, “माझ्या वृषणावर एक छोटीशी गाठ असल्याचं मला जाणवलं होतं. पण मी स्वतःच्या आरोग्याबाबत बेफिकीर होतो. मला वाटलं, जाऊ दे, आपलं काम सुरू ठेवूया.”

“माझ्यामुळे माझ्या कुटुंबालाही या सर्व गोष्टीतून जावं लागलं, याची मला खंत वाटते. कारण कॅन्सरचा सामना मी करत होतो, पण त्याचं दुःख, वेदना माझं कुटुंबही सहन करत होतं.”

याच वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या भावानेही जीवन संपवलं होतं. पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त का आहे, हे समजून घेणं आणि ही समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, असं ते म्हणतात.

वृषणाच्या कॅन्सरची लक्षणं कोणती?

  • वृषणावर गाठ येणे किंवा सूज येणे
  • वृषणाचा आकार वाढणे
  • वृषणात किंवा वृषणाभोवतीच्या त्वचेत वेदना होणे किंवा सतत दुखत राहणे
  • वृषणाभोवतीची पिशवी जड, घट्ट किंवा कडक वाटणे.

वृषणाचा कॅन्सर सहसा एका वृषणाला होतो. परंतु, काही वेळा तो दोन्ही वृषणांनाही होऊ शकतो.

ही लक्षणं इतर आजारांमुळेही दिसू शकतात. पण, वृषणात कोणताही बदल जाणवल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

वेल्स सरकारच्या प्रवक्त्याने सांगितलं, “पुरुषांच्या आरोग्याच्या समस्या गंभीर होण्यापू्र्वीच त्यावर उपाय करण्यावर आमचा भर आहे. शारीरिक किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या असतील, तर पुरुषांनी वेळेत मदत घ्यावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”

“यात मानसिक आरोग्यासाठी लवकर मदत मिळण्याची व्यवस्था आणि कॅन्सरच्या तपासण्या करून घेणाऱ्या पुरुषांची संख्या वाढवणं, यांचाही समावेश आहे.”

(मिचेला रिव्हा यांचं अतिरिक्त वार्तांकन)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC