Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
तुमच्या भागात पावसाचा अलर्ट आहे का? कमी दाबाच्या क्षेत्राची काय स्थिती आहे? पाहूयात.
कमी दाबाचे क्षेत्र सध्या बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात स्थित आहे. सोप्या शब्दांत सांगायचे तर, समुद्रामध्ये ओडिशा राज्याची दक्षिण किनारपट्टी आणि आंध्र प्रदेशची उत्तर किनारपट्टी जिथे एकत्र येते, त्या किनाऱ्याजवळ ढगांचा आणि वाऱ्याचा एक मोठा पट्टा तयार झाला आहे.
हा कमी दाबाचा पट्टा अधिक शक्तिशाली होत असून, पुढील 24 तासांत तो पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.
म्हणजेच तो समुद्रातून पुढे येऊन दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडून जमिनीवर प्रवेश करेल. त्यामुळे या भागांसह महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढेल.
दक्षिण महाराष्ट्र वगळता कोकण, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासोबत 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
12 सप्टेंबरचा अंदाज :
12 सप्टेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळ, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया हे जिल्हे ऑरेंज अलर्टवर आहेत.
फोटो स्रोत, IMD
तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार; विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम; मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव; तसेच पुणे, अहिल्यानगर, सातारा, सोलापूर, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
13 सप्टेंबरचा अंदाज:
13 सप्टेंबरला हवामान कसे असेल? तर या दिवशी उत्तर कोकण व नाशिक परिसराला अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि नाशिक हे जिल्हे ऑरेंज अलर्टवर असतील. ऑरेंज अलर्टच्या काळात 24 तासांत 115.6 मिमी ते 204.4 मिमी इतका अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असते.
फोटो स्रोत, IMD
तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हे जिल्हे वगळता सिंधुदुर्ग, दक्षिण रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली येथे पावसाचा कोणताही इशारा नाही.
14 सप्टेंबरचा अंदाज:
14 सप्टेंबरला पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, पुणे (घाट परिसर), अहिल्यानगर, धुळे आणि नंदुरबार या भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




