Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Facebook/Dr. Medha Kulkarni
-
Published
-
वाचन वेळ: 8 मिनिटे
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी वटपौर्णिमा साजरी करण्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय.
या ऐतिहासिक ठिकाणी वटपौर्णिमा साजरी करणं ही कृती महात्मा फुलेंच्या विचारांच्या विरोधात जाणारी कृती असल्याचा दावा करत पुरोगामी कार्यकर्त्यांकडून गेली तीन वर्षे इथे मनपरिवर्तन आंदोलन करण्यात आलं आहे.
या पार्श्वभूमीवरच यावर्षी पुरातत्त्व खात्यानं फुले वाड्यात वटपौर्णिमा साजरी न करण्याचा आदेश काढला होता. मात्र, काही दिवसांनी तो मागेही घेतला.
काल (29 जून) झालेल्या वटपौर्णिमेला खासदार मेधा कुलकर्णी यांनी उपस्थिती लावत मोठ्या पोलीस बंदोबस्तात पूजा केली आहे. त्यांच्या या कृतीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, पुरातत्त्व खात्याच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
पुरातत्त्व खात्याचा निर्णय बदलवायला राजकीय दबाव वापरल्याचा आरोपही मेधा कुलकर्णी यांच्यावर होतो आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घेऊयात.
‘फुले वाड्यात होणारी वटपौर्णिमा महात्मा फुले यांच्या मूलभूत विचारांशी विसंगत’
महात्मा फुले वाडा हे समाजसुधारक सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे निवासस्थान होते.
या दाम्पत्याने ज्या वाड्यातून समाज परिवर्तनाची वाटचाल केली तो पुण्याच्या गंज पेठेतला महात्मा फुले वाडा हे राज्य संरक्षित स्मारक असून पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित आहे.
या वाड्याच्या परिसरातच मध्यभागी वडाचं मोठं झाड आहे.
फुले वाड्यात होणारी वटपौर्णिमा ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर केलेल्या समाजसुधारणेच्या कामाच्या विरोधात जाणारी कृती आहे, असं म्हणत पुरोगामी कार्यकर्ते मनपरिवर्तन आंदोलन करतात.

शीतल यशोधरा त्यापैकीच एक आहेत. त्यांनी गेली तीन वर्षे वटपौर्णिमेला फुले वाड्यात जाऊन महिलांचं मनपरिवर्तन करण्याचं काम केलं आहे.
तिथे आलेल्या महिलांना गुलाबाचं फुल देऊन फुले वाड्यात वटपौर्णिमा साजरी करू नका, असं आवाहन आपल्या काही सहकाऱ्यांसह त्यांनी केलं होतं.
तेव्हा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढावदेखील त्या मनपरिवर्तन आंदोलनात होते. नुकतंच त्यांचं निधन झालं.
बीबीसी मराठीशी बोलताना शीतल यशोधरा म्हणाल्या की, “पुरातत्त्व खात्यानं पत्र काढल्यानंतर आम्ही त्यावर विश्वास ठेवायचा निर्णय घेतला. तिथे वटपौर्णिमा न होण्याची जबाबदारी पोलिसांची आहे, असं म्हणून आम्ही गेलो नाही. पण आता या सगळ्या घटनांकडे मी हतबलतेने पाहते आहे.”

“शिवाय, यावेळी मला असा काळजीतून विनंती करणारा फोन आलेला की, तुम्ही इथे येऊ नका. यावेळी ठरवून पूर्ण तयारी केली असून विरोध झाल्यास हिंसा आणि गोंधळ होऊ शकतो.”
“पुरातत्त्व खात्यानं आपला निर्णय फिरवल्याचं पत्र काढलंय, हेच फार उशीरा उजेडात आलं आणि आम्हाला समजलं. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी गेलो नाही” असं त्या सांगतात.
पुढे त्या म्हणाल्या की, “महात्मा फुले वाडा हे सामाजिक परिवर्तन, स्त्री-पुरुष समता, विवेकवाद आणि मानवमुक्तीच्या विचारांचं पवित्र स्मारक आहे. अशा ठिकाणी धार्मिक वा राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करणं हे महात्मा फुले यांच्या मूलभूत विचारांशी विसंगत असून स्मारकाच्या ऐतिहासिक पावित्र्यालाही बाधा पोहोचवणारं आहे, हे आम्ही गेल्या वर्षीही महिलांना समजावून सांगितलं.”
“विरोध पुजेला नसून फक्त फुलेवाड्यात ती केली जाऊ नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. पण यावर्षी हिंदुत्ववादी संघटनांनी ठरवून ही गोष्ट घडवून आणली आहे,” असं त्या सांगतात.
‘मेधा कुलकर्णींचा हा ठरवून केलेला पॉलिटीकल स्टंट’
महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस ऍड. शारदा वाडेकर यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे.
“मेधा कुलकर्णी यांनी हा ठरवून केलेला पॉलिटीकल स्टंट आहे,” असं त्या सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या की, “‘शनिवार वाडा विरुद्ध महात्मा फुले वाडा’ असा हा संघर्ष आहे. गेल्यावर्षी आम्ही काही लोकांच्या अंगावर जाऊन आंदोलन केलेलं नव्हतं. उलट, आम्ही त्यांना विनंतीच करत होतो. आम्ही सांगत होतो की, फुलेवाड्याच्या बाहेरही दोन-तीन वडाची झाडं आहेत. फुल्यांनी कर्मकांडाविरोधात जे काम केलेलं आहे, ते पाहता फुले वाड्यातच वटपौर्णिमा साजरी करणं हे त्याविरोधात जाणारं आहे.”

“प्रतिष्ठाननं यापूर्वीच पुरातत्त्व विभागाकडे लेखी आक्षेप नोंदवून, दिनांक 9 मार्च 2026 रोजीच्या परवानगीपत्रातील अटी क्रमांक 15, 16 व 17 नुसार राज्य संरक्षित स्मारकात कोणताही राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रम घेता येत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. तरीही संबंधित कार्यक्रम होऊ दिला गेला, ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असंही त्या सांगतात.
“बहुजन समाजातल्या स्त्रियांना आम्ही समजावून सांगण्याचं काम केलंय आणि करतो आहोत. मात्र, भाजप आणि मेधा कुलकर्णी यांनी यावर्षी मुद्दाम ही पूजा घडवून आणली आहे. तशी सगळी तयारीही त्यांनी यावर्षी केली होती. पण, आम्ही कायदेशीरदृष्ट्या जे काही करता येईल, ते करणारच आहोत,” असं त्या सांगतात.
पुरातत्त्व खात्यानं काढलेलं पत्र मागे का घेतलं?
पुरातत्त्व खात्यानं काढलेलं पत्र अचानक मागे का घेतलं? दरम्यानच्या काळात नक्की काय घडलं? असा प्रश्न प्रामुख्यानं उपस्थित केला जातोय.
यासाठी खासदार मेधा कुलकर्णी यांनी राजकीय दबाव आणल्याचा आरोप ऍड. शारदा साठे करतात.
स्वत: पुरातत्त्व खात्याच्या पुणे विभागीय कार्यालयानं 2 जून रोजी पोलीस आयुक्तांना अधिकृत पत्र लिहून फुले वाड्यात वटपौर्णिमा साजरी होणार नाही, याची दक्षता घेण्याची विनंती केली होती.
त्यासाठी, ‘महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवस्तूशास्त्रविषयक स्थळे व अवशेष नियम 1962’ मधील काही नियमांचाही हवाला देण्यात आला होता.
या काद्यातील नियम 8 (फ) नुसार स्मारकास लागू असलेल्या किंवा त्यांत पाळण्यात येणाऱ्या कोणत्याही चालीरितीचे, वहिवाटीचे किंवा रुढींचे उल्लंघन करता कामा नये, असं सांगण्यात आलं होतं.

पुढे या पत्रामध्ये लिहिलं होतं की, “महात्मा फुले यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाज सुधारणेसाठी खर्ची घातले असून त्यांनी नेहमीच कर्मकांडाला विरोध केल्याचे सर्वश्रूत आहे. महात्मा फुले वाडा या वास्तूमध्ये समाज सुधारणेची बीजे पेरली गेली असल्यामुळे तसेच या वास्तूमध्ये अनिष्ठ रुढी परंपरेला थारा नसल्यामुळे तसेच वरील नियमानुसार व संदर्भीय निवेदनास अनुलक्षून दि. 29 जून 2026 रोजी वट पौर्णिमेच्या दिवशी महात्मा फुले वाडा या राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रातील वडाच्या झाडाची सौभाग्यवती महिला दोरा गुंडाळून पूजा करणार नाहीत यादृष्टीने सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्याच्या दृष्टीने तसेच कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही यादृष्टीने आपल्या स्तरावर संबंधितास आवश्यक ते आदेश व्हावेत.”
मात्र, 23 जून रोजी हे पत्र मागे घेण्याचे आदेश पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालनालयाच्या मुख्य संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याकडून देण्यात आले.

‘महात्मा फुले वाडा, जि. पुणे हे स्मारक संरक्षित होण्या अगोदरच्या काळापासून चालत आलेल्या परंपरा व चालीरीती यांची सद्यस्थिती कायम ठेवणे ही आपल्या कार्यालयाची जबाबदारी आहे,’ असं म्हणत वटपौर्णिमेला परवानगी देण्यात आली.
या नव्या पत्रात म्हटलंय की, महात्मा फुले वाडा हे राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्यापूर्वी वा नंतर स्मारक परिसरात सुरु असलेले धार्मिक कार्यक्रम किंवा इतर रूढी-परंपरा याबाबत शासनाच्या अधिनियमात कोणतीही स्पष्टता नाही.
‘केंद्र शासनाच्या उपरोक्त अधिनियमाच्या कलम 16 (1) नुसार कोणतेही स्मारक संरक्षित होण्यापूर्वी त्याचे स्वरूप जसे आहे व तेथे ज्या रूढी-परंपरा प्रचलित आहेत त्या तश्याच अबाधित रहाव्या,’ असं नमूद करून आधीचा निर्णय मागे घेण्यात आला.
पुरातत्त्व खात्यानं काय म्हटलं?
शारदा वाडेकर सांगतात की, सोमवारी फुले वाड्याला सुट्टी असते. एरव्ही सामान्य लोक अथवा सत्यशोधक पद्धतीनं विवाह करून आलेल्या जोडप्यांनाही सोमवारी फुले पुतळ्याला हार घालू दिला जात नाही, तर मग सोमवार असताना वटपौर्णिमा कशी साजरी करू दिली, असा प्रश्नही त्या उपस्थित करतात.
या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने पुरातत्त्व खात्याचे पुणे विभागीय कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. विलास वाहणे यांच्याशी संवाद साधला.

आधी काढण्यात आलेलं पत्र मागे का घेण्यात आलं आणि वटपौर्णिमा साजरी न करू देण्याचा निर्णय एकाएकी मागे का घेण्यात आला, या प्रश्नावर ते म्हणाले की, “मागील वर्षी दोन गटात थोडा वाद झाला होता. काही सामाजिक कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की, फुले वाड्यात वटपौर्णिमा व्हायला नको. त्या पार्श्वभूमीवर, आम्ही जानेवारी महिन्यातच संचालकांच्या ऑफिसमध्ये कळवलं होतं. मात्र, त्यावर त्यांच्याकडून काही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर यासंदर्भात वारंवार तक्रारी येत असल्यानं आम्ही वटपौर्णिमेची पूजा करू देऊ नका, असं पत्र लिहिलं होतं. परंतु, डायरेक्टर लेव्हलला वरती हे पत्र गेल्यावर त्यांनी त्यावर विचार केला आणि त्यांनी म्हटलं की, ही आधीपासूनची चालीरिती आणि परंपरा असेल तर ते चालू ठेवा. वरूनच अशा गाईडलाईन्स आल्यानंतर आम्ही ही प्रथा चालू ठेवावी, असं म्हटलं.”
सोमवारी फुले वाड्याला सुट्टी असूनही त्या कार्यक्रमाला परवानगी कशी काय देण्यात आली, या प्रश्नावर ते म्हणाले की, “वाड्याला सुट्टी असते. माती-दगडाची वास्तू असलेला वाडा कालही बंदच होता. पण परिसरात तो कार्यक्रम घेण्यास आम्ही संचालकांच्या आदेशानं परवानगी दिली.”
खासदार मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या?
सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला दक्षता समिती कोल्हपूरच्या उपाध्यक्षा तनुजा शिपूरकरही या घटनेचा निषेध करतात.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या की, “मेधा कुलकर्णींना सत्यवानाच्या सावित्रीची जास्त शक्ती मिळाली की, जोतिरावांच्या सावित्रीची मिळाली, हा विचार त्यांनीही करायला हवा. वटपौर्णिमा साजरी करण्याला विरोध नाही, पण सार्वजनिक ठिकाणी जिथं ज्ञानाची परंपरा आहे, अशा फुले वाड्यात मुद्दाम करणं, ही गोष्ट फार चुकीची आहे. दुसरीकडेही वडाची झाडे आहेत. पण तिथेच पुजा का करायची आहे? पण आम्ही इथेच करणार, अशी ही मानसिकता आहे,” असं त्या सांगतात.
सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा परदेशी सांगतात की, “वटपौर्णिमेला कधीही नव्हता इतक्या मोठा इव्हेंट फुलेवाड्यात यावेळी ठरवून करण्यात आलाय. तेही अगदी पुतळ्याला हार घालून, सावित्रीबाई फुलेंची तसबीर एकमेकींना देऊन हे सगळं करण्यात आलं. खरं तर दोन्ही विरोधाभासी परंपरा एकत्रितपणे कशा स्वीकारता येणार? स्त्रियांनी हे लक्षात घेण्याची गरज आहे.”
“यावेळी पोलीस बंदोबस्तात हे सगळं करण्यात आलं. काहीही करून आम्ही हे करणारच, असा हा हेका आहे. हा खरं तर सांस्कृतिक संघर्षाचाच एक भाग आहे, जो फुल्यांच्या काळात त्यांनाही करावा लागला आहे. खरं तर हा पेशवाई पुढे आणण्याचाच प्रकार आहे,” असंही त्या सांगतात.
फोटो स्रोत, Facebook/Dr. Medha Kulkarni
शीतल यशोधरा सांगतात की, “कहर असा की, कालच्या वटपौर्णिमेनंतर मेधा कुलकर्णी यांना फुले पगडीही घालण्यात आली, हाच प्रचंड मोठा विरोधाभास आहे. ज्यांनी फुल्यांना वाचलंय, ते अशी भूमिका घेऊच शकत नाहीत.”
या सगळ्या प्रकरणासंदर्भात बीबीसी मराठीने मेधा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला.
त्या म्हणाल्या की, “पुरातत्व खात्याने रिव्हाईज्ड पत्रक काढलं होतं. मी आज अनेक ठिकाणी गेले. त्यापैकी एक हे ठिकाण होतं. या झाडापाशी गेल्या तीन चार पिढ्या वटपौर्णीमा सुरु आहे. जे सुरु आहे त्यात काही बदल करायचा नाही असं पत्रक आलं होतं.”
फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात की, “वटपौर्णिमेचा हा पवित्र सण आपल्याला निसर्गाचे महत्त्व आणि वृक्ष संवर्धनाचा बहुमूल्य संदेश देतो. या निमित्ताने पुणे येथील ऐतिहासिक ‘महात्मा फुले वाडा’ परिसरात आयोजित भव्य वटपूजन कार्यक्रमात सहभागी झाले.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC




